जेपी आयफा अॅवॉर्ड्स २०१२ या लायन सिटी, सिंगापोर मध्ये होणाऱ्या सोहळ्यात सौंदर्य आणि विषयासक्तता यांचा केंद्रबिंदू असलेल्या रेखाचा ‘भारतीय सिनेमामधील अतुलनीय कामगिरी’ या पुरस्काराने गौरव होणार आहे. भारतीय रसिकांना रेखाने तब्बल तीन दशके मंत्रमुग्ध केले आहे. तिने कित्येक अजोड चित्रपट केले असून या चित्रपटांनी तिच्या चाहत्यांच्या मनावर कायमस्वरूपी छाप पाडली आहे. रेखाचा हा प्रवास फार प्रदीर्घ असा आहे आणि ती भारताची फार लोकप्रिय ग्लॅमर आयकॉन ठरली आहे. तिला अस्सल ‘मेकओव्हर क्वीन’ म्हणूनच ओळखले गेले.
दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेता जेमिनी गणेशन आणि पुष्पवल्ली यांची मुलगी असलेली रेखा गेल्या तीस वर्षांहूनही अधिक काळ बॉलीवूडमध्ये असून ती अगदी सुरुवातीपासूनच आश्वासक अभिनेत्री म्हणून ओळखली गेली आहे. १९७० मध्ये आलेला सावन भादो हा तिचा पहिलाच चित्रपट अगदी लोकप्रिय ठरला होता आणि त्यानंतर ती एक मोठी स्टार ठरली. त्यानंतर नमक हराम, धर्मा, कहानी किस्मत की आणि प्राण जाए पर वचन ना जाए यासारखे कित्येक हीट चित्रपट तिने दिले. दो अंजाने या चित्रपटात तिने महत्वाकांक्षेसाठी आपल्या प्रेमाची तिलांजली देणाऱ्या पत्नीची साकारलेली भूमिका प्रेक्षकांना वेगळा आनंद देऊन गेली. गुलजार यांच्या घर मध्ये एक प्रगल्भ रेखा पाहायला मिळाली. त्यानंतर ती भारतीय प्रेक्षकांचे मन जिंकत गेली आणि शेवटी बॉक्स ऑफिस क्वीन म्हणूनच ओळखली जाऊ लागली. मुकद्दर का सिकंदर, खुबसुरत, जुदाई, माँग भरो सजना, एक ही भूल यासारखे तिचे चित्रपट हीट ठरले होते. यश चोप्रा यांचा सिलसिला आणि मुजफ्फर अली यांचा उमराव जानने तिच्या आगळ्या प्रतिमेवर शिक्कामोर्तब केले आणि तिला स्वतःचे स्थानही मिळवून दिले. रेखाने भारतीय चित्रपट इतिहासाला सुवर्णक्षणांचे संचित बनवले आहे.
दरवर्षी, भारतीय चित्रपटामध्ये अतुल्य असे योगदान केलेल्या भारतीय चित्रपट क्षेत्रातील एका सदस्याला आयफा सन्मानित करते. विझक्राफ्ट इंटरनॅशनल एन्टरटेनमेंटचे संचालक टीमिन्स म्हणाले, “गेल्या कित्येक वर्षांमध्ये, भारतीय चित्रपट सृष्टीतील कित्येक बड्या कलाकारांना त्यांचे सिनेमाप्रती असलेले योगदान लक्षात घेऊन आम्ही अभिवादन केले आहे. आमच्या १३ व्या वर्षामध्ये, आयफाला भारतातील सर्वाधिक प्रेम मिळालेली अभिनेत्री रेखा हिला तिच्या भारतीय चित्रपट उद्योगाप्रतीच्या फार मोठ्या योगदानासाठी गौरवताना अतिशय आनंद होत आहे. नेमका याच वर्षी भारतीय सिनेमाचा शतकमहोत्सवही आम्ही साजरा करत आहोत. आमच्या चित्रपट क्षेत्रातील लाखो लोकांच्या मनावर तिने निःसंशयपणे अधिराज्य गाजवले आहे आणि आजही तिची जादू कमी झालेली नाही.”
या पुरस्काराबाबतीत रेखा म्हणते, “माझ्या नावाचा विचार झाला आणि भारतीय चित्रपट क्षेत्रातील माझ्या योगदानाचा गौरव केला जात आहे, ही बाब माझ्यासाठी हेलावून सोडणारी आहे. हा प्रवास खूप प्रदीर्घ राहिला आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की सिनेमाप्रती असलेले प्रेम आणि वेड पुढेही मला माझ्या सर्व चाहत्यांपर्यंत पोहोचवायला मदत करेल. भारतीय चित्रपट सृष्टीचा शतक महोत्सव साजरा केला जात असतानाच माझा अशाप्रकारे गौरव होत आहे, ही बाब माझ्यासाठी आणखी आनंददायी आहे.”
No comments:
Post a Comment