Friday, June 1, 2012

झपाटलेला पार्ट २

महेश कोठारे यांच्या ‘झपाटलेल्या’ तात्या विंचूने १९९३-९४ मध्ये मराठी सिनेसृष्टीत खळबळ उडवून दिली. तब्बल वीस वर्षांनी हा क्रूर तात्या विंचू परत येतोय. आता तो असेल आणखी ताकदवान, हायटेक आणि थ्रीडीसुद्धा! तात्या विंचू, कुबड्या खवीस अशी सगळी टीम पुन्हा अवतरणार आहे, ती महेश कोठारे यांच्या झपाटलेला पार्ट २ मधून. त्यामुळे महाराष्ट्राला पुन्हा ‘ओम फट स्वाहा’चा भयावह मंत्र ऐकायला मिळणार आहे.
सिनेमाची कथा, पटकथा कोठारे यांचीच असून, अशोक पाटोळे यांचे संवाद आहेत. या चित्रपटासाठी परदेशी तंत्रज्ञांची मदत घेण्यात येतेय तसेच हायटेक लॅबशी करार करण्यात आलाय. या चित्रपटाचा बाहुलाही रामदास पाध्येच बनवणार आहेत. चित्रपट आजच्या काळातला असेल. सर्व तयारी झाल्यानंतर २८ सप्टेंबरला चित्रपटाचं शूट सुरु होईल.
‘झपाटलेला’ला लोकांनी डोक्यावर घेतलं, त्यामुळे त्याचा सिक्वल करताना जबाबदारी वाढलीय. या चित्रपटातून येणारा तात्या हायटेक असेल पण तो पूर्णपणे ग्राफिकल बनवलेला नाही कारण त्याची मजा त्या बाहुल्यात आहे. या चित्रपटातला बाहुला तोच असला तरी त्याच्यावर खूप काम केलं जाईल.
‘झपाटलेला’ मध्ये सर्वात जास्त भाव खाऊन गेला तो लक्ष्मीकांत बेर्डे. तो आज नसल्याची खंत आहेच पण चित्रपटाचं कथानक असं फिरलंय की या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे असणारच आहे. आता तो चित्रपटात कसा येईल ते आपण चित्रपटातच बघू.

No comments:

Post a Comment