Saturday, June 30, 2012

अनमोल महत्त्व ‘साहित्याचे’

मातृभाषेला परिपूर्ण ज्ञानभाषा म्हणून प्रस्थापित करायचं असेल तर इंग्रजी बरोबरच अन्य भाषातलं ज्ञान, तंत्रज्ञान आणि साहित्य मराठीत आणलं पाहिजे कारण मराठीकडे ज्ञानभाषा म्हणून जेव्हा आपण बघतो, तेव्हा ती कुठेतरी अपूर्ण दिसते. हिंदी आपल्या देशाची अधिकृत राष्ट्रभाषा आहे. आपल्या राजकीय इतिहासाने आपल्या आंतरराष्ट्रीय भाषेतल्या व्यवहाराची गाठ इंग्रजीशी घालून दिली कारण इंग्रजी ही जगाची मूकसंमत व्यवहार भाषा आहे. दीडशे वर्षं इंग्रजी भाषा शिकण्याचा अनुभव असूनही ना धड इंग्रजी ना धड मराठी अशी आपली स्थिती आहे. कारण इंग्रजीचा योग्य वापर करून घेण्यात आपण कमी पडलो, विशेषतः मराठी माणसाच्या बाबतीत हे सत्य आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षांमध्ये इंग्रजी भाषेवर प्रभुत्व नसल्यामुळे मराठी तरुण मागे पडतात. इंग्रजी भाषा वाघिणीचं दूध आहे, या महान तत्वाचा साक्षात्कार होऊनही त्याचा सखोल अभ्यास आपल्या भाषा विषयक संवेदनशीलतेला यथार्थपणे करता आलेला नाही. त्यामुळेच इंग्रजीतलं अनेक विषयांमधलं साहित्य मराठीत आलं नाही आणि जागतिक दर्जाचं मराठी साहित्यही इंग्रजीसह इतर भाषांमध्ये जाऊ शकलं नाही.
कोणत्याही समाजाची मातृभाषा ही त्या समाजाच्या सर्जनशीलतेची आणि सर्जनशील संचिताची वाहक आणि रक्षक असते, पण अन्य भाषा जेव्हा आपल्या कक्षेत प्रवेश करतात, तेव्हा त्या भाषाही समाजाच्या सर्जनशीलतेला आणि संचिताला श्रीमंत करणारी साधनं ठरतात. हा भाषिक दृष्टीकोन जणू आपल्या लक्षातच आला नाही. म्हणूनच बहुभाषिक वारसा आपण उपेक्षाबुद्धीने उधळून दिला. नाहीतर गोव्यातील पोर्तुगीज भाषेतील साहित्याची दालनं आपण बंद केली नसती. तसेच निजामाच्या राजवटीतील मराठवाड्यातील उर्दू भाषा शिक्षणाची आणि संपादनाची परंपरा आपण कटाक्षाने जपली असती. महाराष्ट्रातील हिंदी आणि इतर भारतीय भाषांची केंद्रं मराठीच्या मध्यधारेला जोडून घेण्याचंही टाळलं नसतं.
दुसऱ्या महायुद्धात संपूर्ण जपान बेचिराख झाला, युद्धात सैनिक आणि पुरुष मारले गेल्याने पुरुषांची संख्या घटली, परंतु अनाथ झालेल्या अनेक मुलांचं संगोपन महिलांनी स्वहिंमतीवर केलं. विविध भाषांमधील अनेक पुस्तके जपानी भाषेत अनुवादित केली. ती अगदी तळागाळातल्या शेतकऱ्यांपर्यंत नेली. मुलांना आणि युवकांना इंग्रजी, जर्मन आणि फ्रेंच भाषा शिकवली. त्या भाषांमधील विज्ञान, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनाचं तत्वज्ञान जपानी भाषेत आणलं. त्यामुळेच जपानला फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुन्हा आकाशात झेप घेता आली कारण त्यात जपानी भाषेत आणलेल्या इतर भाषेतील पुस्तकांची भूमिका अनन्यसाधारण होती.
संत ज्ञानेश्वर, संत एकनाथांना संस्कृत भाषेतील ज्ञान सामान्यांपर्यंत पोहोचवायचं होतं. त्यांनी संस्कृत वाङमयातील
अध्यात्म भाषा, वर्णनं आणि प्रतिमा आत्मसात करून त्याला अभिनव रंगरूप देण्याचं काम केलं. त्यांनी प्रसंगी हिंदी भाषेतही रचना केल्या. अन्य भाषांशी देवाणघेवाण करण्याची एक उन्नत आणि स्वागतार्ह भाषादृष्टी आणि भाषाविवेक असतो, तो आपल्या संतांनी दाखवून दिला. साने गुरुजींनी दिलेला ‘आंतरभारती’ हा एक राष्ट्रीय एकात्मतेचा सुविचार आहे. जगातील सर्व भाषा एकमेकींच्या भगिनी आहेत असं त्यांनी सांगितलं. परंतु, संतांनी दिलेली शिकवण मराठी आधुनिकांनी पुरेशी लक्षात घेऊन जपल्याचं दिसत नाही.
भाषा आणि त्या भाषेतील पुस्तके हे समाज आणि संस्कृतीला समृद्ध करण्याचं काम करतात. इंग्रजी भाषा आत्मसात करून मातृभाषेला समर्थ आणि संपन्न करणं हे खरं तर आव्हान आहे. ते पेलण्यासाठी पुस्तकांच्या सहवासात अधिक काळ घालवला पाहिजे. पुस्तकं विचार देतात आणि विचार कृती करायला भाग पाडतो आणि म्हणूनच पुस्तकांचं, पर्यायाने, साहित्याचं महत्त्व अनमोल आहे.

Friday, June 29, 2012

लेकुरे उदंड जाहली

Sumeet Raghavan with wife3 240x300   लेकुरे उदंड जाहली



नाट्यसंपदातर्फे ‘लेकुरे उदंड जाहली’ हे नाटक रंगभूमीवर येतंय. २ जूनला त्याचा मुहूर्त करण्यात आला. विशेष गोष्ट अशी की प्रेक्षकांसमोरच या नाटकाचा मुहूर्त झाला.
ज्येष्ठ नाटककार वसंत कानेटकर यांची ही अजरामर कलाकृती. काही वर्षांपूर्वी प्रशांत दामले यांनी ‘लेकुरे उदंड जाहली’चे प्रयोग केले होते. आता पुन्हा एकदा रंगमंचावर धुमाकूळ घालायला हे लोकप्रिय नाटक सज्ज होतंय. टीव्हीवर मालिका आणि शोज मध्ये बिझी असलेला सुमीत राघवन जवळजवळ वीस वर्षांनी मराठी रंगभूमीवर पुनरागमन करतोय. या नाटकात प्रमुख भूमिकेत सुमीत आणि त्याची पत्नी चिन्मयी ही जोडी चमकणार आहे. त्याचबरोबर उदय सबनीस, शिवानी, सुनील गोडबोले ह्या कलाकारांच्याही या नाटकात भूमिका आहेत. सुप्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की या नाटकाला संगीत देत आहेत.
या नाटकाबाबत सुमीत म्हणाला, “नाटकात एकत्र काम करायला मिळाल्याने मी आणि चिन्मयी खूप एक्साईटेड आहोत. १९९३ मध्ये आम्ही दोघांनी शेवटचं एकत्र काम केलं होतं. त्यानंतर आम्ही अशा संधीच्या शोधात होतो. ऑफर्स येत होत्या, पण दोघांना एकत्र काम करण्याची ऑफर काही हाती येत नव्हती. काही दिवसांपूर्वी आम्ही ‘वाऱ्यावरची वरात’ हे नाटक बघायला गेलो होतो. तेव्हाच ‘लेकुरे उदंड जाहली’ करण्याचा निर्णय आम्ही घेतला. नाटकातले राजा आणि राणी ज्या वयोगटातले आहेत त्याच वयोगटात आम्ही दोघंही सध्या आहोत. त्यामुळे हे करायला खूप मजा येणार आहे. तालमींपूर्वीच आम्हा दोघांची तयारी मात्र सुरु झाली आहे.”
लवकरच ‘लेकुरे…’च्या तालमी सुरु होणार असून २८ जुलैला नाटकाचा शुभारंभ होणार आहे.

'उंच माझा झोका' चा शतकपूर्ती सप्ताह.

Ramaa, Uncha Maza Zoka


चिमुरडी, लाघवी आणि लडिवाळ रमा आणि तत्त्वनिष्ठ तरिही मायाळू महादेवराव रानडे यांची खरी खुरी कहाणी सांगणार्‍या 'उंच माझा झोका' या झी मराठीवरील मालिकेने शंभर भागांचा यशस्वी टप्पा गाठला आहे. या मालिकेचा शंभरावा भाग गुरुवार २८ जून रोजी प्रदर्शित झाला. या पार्श्वभूमीवर दि. २ जुलै ते ७ जुलै या कालावधीत रात्री ८.०० वाजता या मालिकेचा शतकपूर्ती सप्ताह प्रक्षेपित केला जाणार आहे. रमाबाई रानडे यांच्या जीवनातील पहिला मैलाचा दगड ठरलेली महत्त्वपूर्ण घटना या 'शतकपूर्ती सप्ताहा'त प्रक्षेपित होणार आहे ती म्हणजे प्रार्थना सभेतलं रमाचं पहिलं वहिलं भाषण !

अन्नपूर्णाबाईंच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या महिलांच्या सभेत, भाषण करण्यासाठी महादेवरावांनी रमाबाईंना भाषणाचे मुद्दे लिहून दिले आणि ते पाठ करायला सांगितले. रमाबाईंनी भाषण पाठ केलं. रमाला निरुपण करण्याची सवय होती. मात्र प्रार्थना सभेत सामाजिक प्रश्नांवर स्वतःचे विचार प्रकट करणं आणि प्रार्थना सभेत पहिलं वहिलं भाषण करत महिला सबलीकरणात पहिलं पाऊल उचललं. रमाबाई रानडे यांछं प्रेरणादायी चरित्र अनुभवण्यासाठी पाहात रहा - उंच माझा झोका. सोमवार ते शनिवार रात्री ८.०० वाजता झी मराठीवर.

Thursday, June 28, 2012

|| विठ्ठल गीती गांवा सन्मान सोहळा || संपन्न

Vitthal Geetee Gaava Sohala, Sindhutai Sapkal
श्री विवेक भाटकर आणि (GRACE) संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीच्या निमित्ताने एका विशेष सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नुकताच दादारच्या वीर सावरकर सभागृहात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत 'विठठल गीती गांवा सन्मान सोहळा' संपन्न झाला. 

या सोहळ्यात या वर्षी ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ, मुंबईचा डबेवाला संघटनेचे रघुनाथ भेदगे, गायक संगीतकार अजीत परब - समीर म्हात्रे, जवाहर बुक डेपोचे दिलीप भोगले, जलतरणपटू पूजा भांगिरे, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर पुरंदरे आणि यतीन तुळसकर या मान्यवरांना महाराष्ट्राच्या विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते श्री. विनोद तावडे, ज्येष्ठ संसदपटू - माजी खासदार राम नाईक आणि ज्येष्ठ कार्यकर्ते विवेक शंकर भाटकर या मान्यवरांच्या हस्ते विठठल रुक्मिनीची मूर्ती व तुळशीचे रोपटे देऊन सन्मानित करण्यात आले. 

या कार्यक्रमाप्रसंगी ऍड. आशिष शेलार, सिनेकलाकार गणेश रेवडेकर हे देखील उपस्थित होते.संगीतातील अनुभवी कलावंतांच्या सदरीकरणातून हा सोहळा रंगतदार झाला. या सांगितिक कार्यक्रमाचे निरुपण सौ, मंगला खाडीलकर यांनी केले. रविंद्र साठे, पं. उपेंद्र भट, डॉ. मृदुला दाढे, सुवर्णा माटेगावकर, अरिहंत मुखेडकर, मंजुषा पाटील या दिग्गज गायकांची स्वर मैफिल अतिशय बहारदार रंगली. या कार्यक्रमाचे संगीत संयोजन अविनाश चंद्रचुड यांनी केले. आध्यात्म आणि महाराष्ट्रातील संतांची शिकवण विविधरंगी माध्यमातून रसिकांसमोर उलगडून त्यांना आनंद देणे हा कार्यक्रमाचा मूळ उद्देश होता..

नाना साकारणार बाबा आमटेंची भूमिका

0 300x225  नाना साकारणार बाबा आमटेंची भूमिका



माधुरी अशीरगडे यांच्या झिरो माईलस्टोन फिल्मच्या वतीने बाबा आमटे यांच्या जीवनावर चित्रपट करण्यात येत आहे. अभिनेते नाना पाटेकर बाबांच्या जीवनाला पडद्यावर साकारणार आहेत. येत्या तीस तारखेला चित्रपटाच्या स्क्रिप्टचे वाचन नागपूरमध्ये करण्यात येईल.
माधुरी अशीरगडे म्हणाल्या की बाबांशी मिळतेजुळते व्यक्तिमत्व असल्याने बाबांच्या भूमिकेसाठी नानाची निवड करण्यात आली आहे. शिवाय नानांचे बाबांशी असलेले भावनिक संबंध यामुळे नाना ही भूमिका नक्की करतील अशी त्यांना खात्री आहे. नानांनी आनंदवनला मोठा निधी भेट स्वरुपात दिला होता. त्यांचे आनंदवनात नियमित जाणे येणे होते आणि अजूनही आहे. नानांचा मुलगा व पत्नी निलकांती देखील काही काळ आनंदवनात वास्तव्यास होते. बाबा आमटे यांच्या निधनानंतर नानांनी प्रतिक्रिया व्यक्त केली होती,” आज मी पोरका झालो. बाबांच्या रुपात मी माझे वडीलच गमावले. आयुष्य कसे जगायचे याचे धडे त्यांनी मला दिले. ” त्यामुळे बाबांची भूमिका साकारण्यास नाना नक्की तयार होईल असे अशीरगडे म्हणाल्या.
कवयित्री, लेखिका, गायिका असलेल्या माधुरी अशीरगडे यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. चित्रपटाला संगीतही त्याच देणार आहेत. ‘आई शप्पथ’, ‘तांदळा’ या नंतरचा बाबा आमटेंच्या जीवनावरचा हा त्यांचा तिसरा प्रोजेक्ट आहे. ‘आईशप्पथ’च्या कथेसाठी त्यांना राज्य पुरस्कार प्राप्त झाला होता. बाबांच्या जीवनाशी संबंधित आनंदवन, सोमनाथ, भामरागड, मुंबई अशा सर्व ठिकाणी या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात येणार आहे.

Wednesday, June 27, 2012

अक्षयचा कुमारचा पहिला मराठी चित्रपट : ७२ मेल

akshay kumar new film release 2350d 300x230  अक्षयचा कुमारचा पहिला मराठी चित्रपट : ७२ मेल



रितेशने नुकतेच जाहीर केले होते की तो मराठी चित्रपट निर्मिती करू इच्छितो, परंतु, याबाबतीत अक्षयने बाजी मारली आहे. अक्षयचा पहिला मराठी चित्रपट ‘७२ मेल’ पूर्ण झाला आहे. सूत्रांनी सांगितल्यानुसार नटरंगचे दिग्दर्शक रवी जाधव आणि रितेश यांच्यात मराठी चित्रपट निर्मितीबद्दल चर्चा चालू आहे. रितेशच्या म्हणण्यानुसार त्याच्या मराठी चित्रपट निर्मितीला ऑगस्ट नंतर सुरुवात होईल.
खिलाडी अक्षय कुमार याबाबतीत रितेशच्या एक पाऊल पुढेच आहे. ‘७२ मेल’ हा चित्रपट अशोक व्हटकर यांच्या कादंबरीवर आधारित आहे. २००९ साली राष्ट्रीय पारितोषिक मिळवलेला ‘जोगवा’ या चित्रपटाचे दिग्दर्शक राजीव पाटील हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. ‘७२ मेल’ हा चित्रपट १९६० साली सातारा ते कोल्हापूर चालणाऱ्या तेरा वर्षाच्या मुलाच्या प्रवासावर बेतलेला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, अक्षयच्या मराठी चित्रपट निर्मिती संस्थेने या चित्रपटाबाबत जाणूनबुजून गुप्तता पाळली. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, “अक्षय बऱ्याच दिवसांपासून मराठी चित्रपट निर्मितीसाठी उत्सुक होता. आम्हा दोघांमधील एका समान दुव्यामार्फत याबाबतची मिटींग झाली. मी अक्षयला सांगितलेली संकल्पना त्याला आवडली आणि तो लगेचच चित्रपट निर्मितीला तयार झाला. त्याने दोनच दिवसांपूर्वी चित्रीकरण पूर्ण केले आहे आणि आता तो पुढील निर्मिती प्रक्रिया सुरु करत आहे.”
अक्षयला आम्ही या चित्रपटात पाहू शकू का? या प्रश्नावर पाटील हसून म्हणाले की अक्षय या चित्रपटाचा फक्त निर्माता म्हणून भूमिका बजावत आहे. चित्रपटाबाबत अजून माहिती देण्यास त्यांनी असमर्थता दर्शविली व ते म्हणाले की चित्रपटातील कलाकार आणि इतर माहिती जाहीर करू नये अशी आम्हाला या चित्रपटाच्या निर्मिती संस्थेने विनंती केली आहे.
‘७२ मेल’ प्रदर्शित होण्याची तारीख अजून निश्चित झालेली नाहीये. मराठी चित्रपट सृष्टीतही अक्षयचे जोरदार स्वागत होईल हे मात्र नक्की!

Tuesday, June 26, 2012

मराठी ई-विश्वकोष

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी विश्वकोषाच्या एक, दोन नाही तर तब्बल सतरा खंडांची निर्मिती करून ज्ञानाचा खजिना सर्वसामान्यांसाठी खुला केला. जगातल्या सगळ्या संज्ञांची माहिती मराठीतून मिळावी हा यामागचा हेतू. मराठीमधील या एनसायक्लोपिडियाला आज ऐतिहासिक दर्जा प्राप्त झाला आहे. परंतु हे विश्वकोष केवळ कपाटाची शान बनून राहू लागले कारण एवढे जाडजूड ग्रंथ जवळ बाळगणे, हाताळणे, वाचणे आणि जतन करणे आजकालच्या काळात अवघड आहे. त्यामुळे मराठी विश्वकोष मंडळाने विश्वकोषाची ई-आवृत्ती काढली. सीडॅकच्या सहाय्याने विश्वकोषाचे युनिकोडमध्ये रुपांतर केले जाऊन त्यातील चित्रांसहित तो जगभर उपलब्ध केला जात आहे. मराठी विश्वकोष मंडळाचा हा प्रयोग चांगलाच यशस्वी झाला.
इंटरनेटमुळे जगातील कोणतीही माहिती एका क्लिकने उपलब्ध होते. मराठी विश्वकोष इंटरनेटवर येणे जरुरी होते, त्यामुळेच मराठी विश्वकोष डॉट इन या वेब साईटचा जन्म झाला आणि ऑन लाईन वाचकांची संख्या अडीच लाख झाली, ज्यात रोज वाढच होते आहे. विश्वकोषातील कालबाह्य झालेल्या नोंदी तसंच समाविष्ट केल्या पाहिजेत अशा नोंदींबद्दल वाचक प्रतिक्रिया देऊ लागले आहेत.
मंडळाच्या अध्यक्षा डॉ. विजया वाड म्हणाल्या, “आठ महिन्यांपूर्वी वेब साईट सुरु झाली तेव्हा विश्वकोषाचा पहिला खंड त्यावर उपलब्ध होता. त्यानंतर दर महिन्याला एक याप्रमाणे विश्वकोषाचे एकेक खंड आम्ही टाकत गेलो. नुकताच सातवा आणि आठवा खंड वेब साईटवर उपलब्ध झाला असून, नवव्या खंडाचे काम सुरु आहे. याशिवाय विश्वकोष अपडेट करण्याचे कामही सुरु आहे. वेब साईटवर विश्वकोष उपलब्ध झाल्यामुळे तो सर्वसामान्यांना सहज वाचता येतो आणि त्याचे प्रिंट घेणे आणि ई-मेल करणे हेही पर्याय उपलब्ध आहेत.”
अमेरिका, लंडन, ऑस्ट्रेलिया येथील मराठी वाचकांनी विश्वकोषावर प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. अशा तब्बल बावीस देशातून प्रतिक्रिया आल्या आहेत. मंडळाने विश्वकोषाच्या सीडीही उपलब्ध केल्या आहेत. विश्वकोषाच्या ऑन लाईन स्पर्धा घेण्याबाबतही वाचक सूचना करत आहेत. वेब साईट वरील आवृत्यांना कमी कालावधीत सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळाला आहे. यात सीडॅकचे योगदान फार मोठे आहे. सीडॅकचे महेश कुलकर्णी आणि त्यांचे सहकारी हजारो पानांचा एकेक ग्रंथ युनिकोड मध्ये परावर्तित करून वेब साईटवर टाकण्याचे काम करत आहेत. त्यामुळेच जगाच्या कानाकोपऱ्यात हे ज्ञानरूपी धन दर महिन्याला पोहोचते आहे. ते कॉम्प्युटर वरून उचलण्याएवढीच वाचकांची जबाबदारी उरते. वैभव पुराणिक आणि आशिष महाबळ या अमेरिकेत स्थायिक झालेल्या दोन मराठी तरुणांनी कोणत्याही मोबदल्याशिवाय विश्वकोषाच्या पुढील खंडांचे युनिकोडमध्ये रुपांतर करण्याची तयारी दर्शवावी ही गोष्ट कौतुकास्पद आहे तसंच ही गोष्ट विश्वकोष सर्वदूर पोहोचत असल्याची साक्ष देणारी आहे.

Monday, June 25, 2012

खलनायिका की खरी नायिका ?

चित्रपट म्हणला की नायकाबरोबरच खलनायकही आलाच. सत्तरच्या दशकात तर खलनायिकांचा ट्रेंड जोरदार सुरु होता. कधी नायिकेची सवत म्हणून खलनायिकेची एन्ट्री व्हायची तर कधी कॅब्रे डान्सर म्हणून आणि मग सिनेमाभर त्या तोऱ्यात वावरायच्या. काळ बदलला, सिनेमाचा चेहरामोहराही बदलला आणि खलनायिकांचं हे तुफानी वादळ स्मॉल स्क्रीनकडे वळलं. छोट्या पडद्यावर जेव्हा मालिका सुरु झाल्या तेव्हा त्यात खलनायिकांना फारसं स्थान नव्हतं. पण स्पर्धा जशी वाढत गेली तसा टीव्ही खरंच इडियट झाला आणि मालिकांमध्ये काहीही दाखवलं तरी प्रेक्षक ते बघतो हा चॅनेलवाल्यांचा विश्वास सार्थ ठरला. एकामागोमाग एक मालिका टीव्हीवर धडकू लागल्या ज्यात खलनायिकांना घुसवण्यात आलं आणि सुरु झाले वेगवेगळे ट्रेंड. कधी प्रेमकथा, कधी सामाजिक विषय तर कधी तरुणाईचे विषय असे ट्रेन्डचे प्रवाह वाहू लागले ज्यात खलनायिकांनी जबरदस्त एन्ट्री घेतली.
सुरुवातीच्या काही मालिकांमध्ये सुंदर दिसणाऱ्या, उत्तम पेहराव केलेल्या, कपाळावर छानशी नागमोडी टिकली लावलेल्या खलनायिका बघण्यातही आनंद वाटायचा. नंतर मात्र भरजरी साड्या नेसणाऱ्या नायिकांचं रूप बदललं पण सध्या वेशातल्या खलनायिका जास्त आक्रमक होऊ लागल्या. हळूहळू हिंदीतला हा ट्रेंड मराठीतही सरकला आणि मराठी मालिकेत क्वचितच दिसणाऱ्या खलनायिकेची जागा एकापेक्षा जास्त खलनायिकांनी सहजच घेतली. स्त्रीचं दुःख स्त्रीलाच कळतं हे आपण वारंवार ऐकतो पण मालिकेतल्या खलनायिका मात्र फक्त नायिकांनाच टारगेट करताना दिसतात. नायिकेपुढे सतत दुःखाचा डोंगर उभा असतो जो खलनायिकाच रचत असते .
आता ही खलनायिकांची साखळी वाढतच चालली आहे. मालिकांच्या वाढत्या जाळ्याबरोबर खलनायिकांची संख्याही वाढत जाईल हे निर्विवादपणे सिद्ध झालंय. सतत कटकारस्थान, कुरघोडी करणाऱ्या खलनायिकांना कदाचित नायिकेचा दर्जा प्राप्त होणार, अशी चिन्हं दिसू लागली आहेत.

देव कुटुंबियांची 'ए़कॅडमी ऑफ लर्निंग ऍन्ड डेव्हलपमेन्ट' या विशेष मुलांच्या शाळेची घोषणा.

Ajinkya Deo, Seema Deo, Ramewsh Deo
विलंबाने विकास होणार्‍या तसेच ज्यांची विशेष काळजी घ्यावी लागते अशा (स्पेशल चाईल्ड) मुलांचे प्रशिक्षण आणि त्यांचा विकास करणारी शाळा गेली सुमारे सहा दशके चित्रपटसृष्टीत असलेल्या देव कुटुंबियांच्या वतीने मुंबईतल्या अंधेरी पश्चिम भागात सुरु केली जात आहे. सुशीलाबाई नानासाहेब देव चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने 'ए़कॅडमी ऑफ लर्निंग ऍन्ड डेव्हलपमेन्ट' चालविली जाणार आहे. 

या अकादमीत संवेदना, श्रवणक्षमता, घ्राणेंद्रियांचा प्रभाव, विचारांचे सुनियोजन, अधिक प्राणवायूचा प्रभावीपणे उपयोग करायला लावणे आणि या सगळ्यांच्या क्षमता वाढवण्याचा सराव व त्याचबरोबरच योगाच्या साह्याने उपचार केले जाणार आहेत.

घरातून सुरु झालेले प्रयत्न आज समाजाला उपयोगी पडणार्‍या अकादमीच्या रुपाने मूर्तरुप धारण करतायत. याची रितसर घोषणा रविवारी अंधेरीतल्या संस्थेच्या कार्यालयात करण्यात आली.

Sunday, June 24, 2012

नो एन्ट्री पुढे धोका आहे

अंडरग्राऊंड फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’ हा चित्रपट ऑगस्ट मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचे चाळीस दिवसांचे शूटिंग नुकतेच मुंबई आणि गोव्याच्या निसर्गरम्य परिसरात पूर्ण झाले आहे. चित्रपटाचे निर्माते आहेत प्रेमनाथ राजगोपालन आणि निखील सैनी तर दिग्दर्शक आहे अंकुश चौधरी. हा बिगबजेट चित्रपट आहे. या चित्रपटात सुगम आणि दिलखुश करणारी पाच गाणी आहेत ज्याचं संगीत दिग्दर्शन नकाश सरगम यांनी केले आहे आणि गीतकार आहेत गुरु ठाकूर.
संतोष पवार आणि रवी बोतलजे यांनी अतिशय सुंदर आणि प्रेक्षकांना थिरकवणारे नृत्य दिग्दर्शन केले आहे. चित्रपटातील साहसी दृश्य पप्पू वर्मांनी केली आहेत. नुकतेच ‘हाऊस फुल २’चे पब्लिसिटी डिझाईन हाताळणाऱ्या तृषा पटेल या ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’ चे पब्लिसिटी डिझाईन करणार आहेत. सध्या या चित्रपटाचे पोस्ट प्रोडक्शन खूप जोमाने सुरु आहे.
या चित्रपटात भरत जाधव, अंकुश चौधरी, अनिकेत विश्वासराव, क्रांती रेडकर, सई लोकूर, मनवा नाईक, सई ताम्हणकर आणि पंढरीनाथ कांबळे यांच्या भूमिका आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी प्रेक्षकांना ऑगस्ट महिन्याची वाट पहावी लागणार आहे.

Saturday, June 23, 2012

‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’

नंदू माधव यांचे दिग्दर्शन असलेले ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ हे नाटक सध्या खूप चर्चेत आहे. सिनेमा तयार करतानाच त्याच्या प्रमोशनची सुरुवात होते, त्यासाठी वेगवेगळे उपक्रम आखले जातात. पण नाटकाच्या बाबतीत तसं होत नाही. नाटकाच्या जाहिराती आणि नाटकाबद्दलच्या बातम्या यातून होईल तेच प्रमोशन, त्यासाठी वेगळे उपक्रम वगैरे नसतात. त्यामुळे नाटकाचं फारसं प्रमोशन होत नाही. परंतु, नंदू माधव यांनी सर्वसामान्य माणसांपर्यंत हे नाटक पोहोचविण्यासाठी अशा प्रकारचे प्रमोशन करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी नाटकाच्या टीमने कंबर कसली. शिवराज्याभिषेकाच्या मुहूर्तावर नाटकाच्या प्रमोशनची सुरुवात करून, या नाटकासंबंधी माहिती देण्यासाठी ह्या कलाकार मंडळींनी रस्त्यावर उतरायचं ठरवलं. त्यासाठी ठिकठिकाणी त्याची पथनाट्यही सादर केली जातील. अशा प्रकारचे प्रमोशन मराठी नाट्यसृष्टीत पहिल्यांदाच होत आहे. नंदू माधव यांच्या मते मुळात हे नाटक सर्वसामान्यांचं आहे, त्यामुळे नाटकात मांडलेला विचार, या नाटकाची आजची गरज ही लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी थेट रस्त्यावरच उतरायचं ठरलं.
‘अद्वैत थिएटर्स’ च्या ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ नाटकाच्या प्रमोशनची ही आगळीवेगळी कल्पना नाट्यसृष्टीतील अनेकांना आवडली आहे, अनेकांनी यात सहभागी व्हायची तयारीही दर्शविली आहे. प्रयोगांमध्ये अंतर असेल तर नाटकातील मुलेच पथनाट्य सादर करतील, पण प्रयोग सलग असतील तर नाटकाच्या सादरीकरणाच्या वेळेस मुलांच्या आवाजावर ताण पडू नये म्हणून नाटकाबाहेरची काही मंडळी पथनाट्य सादर करतील. नाटकाचा प्रयोग महाराष्ट्रातील ज्या थिएटरमध्ये असेल त्या परिसरात नाटकाच्या दिवशी पाच ठिकाणी पथनाट्यातून नाटकाचे प्रमोशन करण्यात येईल. त्यावेळेस नाटक कुठे आणि किती वाजता आहे, याचा बोर्डही असेल. या पथनाट्यासाठी संभाजी भगत यांनी गाणी लिहिली आहेत.

‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान व् ‘द वॉल ‘ राहुल द्रविड यांच्या उपस्थितीत रंगला “माझा सन्मान पुरस्कार २०१२”

वृत्तवाहिन्यांच्या दुनियेत अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘एबीपी माझा’ वाहिनीचा ‘माझा सन्मान पुरस्कार’ या वर्षीही अतिशय दिमाखदारपणे पार पडला. मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरमध्ये पार पडलेल्या या सोहळ्यात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत कला,साहित्य,संगीत,चित्रपट,उद्योग आणि क्रीडा क्षेत्रातिल नामवंत व्यक्तीमत्वांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमांच मुख्य आकर्षण ठरले ते अभिनेता आमीर खान आणि क्रिकेटपटू राहुल द्रविड यांची उपस्थिती

Awardee Abhinay Deo 150x150 मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान व् द वॉल  राहुल द्रविड यांच्या  उपस्थितीत रंगला  माझा सन्मान पुरस्कार २०१२Awardee Ashok Khade 150x150 मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान व् द वॉल  राहुल द्रविड यांच्या  उपस्थितीत रंगला  माझा सन्मान पुरस्कार २०१२Awardee Gyle omwet 150x150 मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान व् द वॉल  राहुल द्रविड यांच्या  उपस्थितीत रंगला  माझा सन्मान पुरस्कार २०१२

Friday, June 22, 2012

शोले : थ्री-डी मध्ये

sholay 300x191   शोले : थ्री डी मध्ये



हिंदी चित्रपटसृष्टीत माईलस्टोन ठरलेला ‘शोले’ हा चित्रपट येत्या १५ ऑगस्टला थ्री-डी रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. महत्त्वाचं म्हणजे या थ्रीडी रूपांतरामागे हेमंत शिंदे आणि राम ढुमने हे माया डिजिटल स्टुडिओज मधील दोन मराठी मास्टर माइंड्स काम करत आहेत. हॉलीवुड व्हिज्युअल इफेक्ट्स मधील अनुभवी फ्रँक फॉस्टर आणि हॉलीवुड डी. आय. स्टुडिओ या मेगा प्रोजेक्टसाठी काम करत आहेत.
या थ्री-डी रुपांतरासाठी जवळजवळ २५ कोटी रुपये खर्च होणार आहेत. साधारण २५० लोकांची टीम टेक्निकल रूपांतराच्या प्रक्रियेसाठी काम करत आहे. हेमंत आणि राम या टीमचं नेतृत्व करत आहेत. माईलस्टोन ‘शोले’वर काम करण्याची सुवर्णसंधी मिळाल्यामुळे ते प्रचंड खूष आहेत. टीमला सॉफ्टवेअरची माहिती देणे, त्यांच्या अडचणी सोडवणे अशी सगळी जबाबदारी त्यांच्यावर आहे.
या थ्री-डी व्हर्जनचे फायनान्सर आणि डिस्ट्रीब्युटर जयंतीलाल गाडा यांनी सांगितले की आजवरच्या सगळ्या थ्री-डी चित्रपटांपेक्षा हा सिनेमा मस्त झालाय. तसंच हा सिनेमा बघितल्यावर प्रत्येक भारतीयाला आपल्या देशातील टेक्निशिअन्सच बेस्ट आहेत असं वाटेल.
राम ढुमने (स्टिरिओ सुपरवायझर) म्हणाले, ” शोलेच्या थ्रीडी रुपांतरात खास डायमेन्‍शनल इफेक्ट्स घालण्यात आले आहेत. साधारणतः दर ३-४ मिनिटांनी खास थ्रीडीचा स्पेशल टच देण्यात येतोय. त्यातूनच गब्बरच्या बंदुकीतली गोळी आपल्याला स्वतःला लागते की काय असा भास करून देणारी अनेक दृष्य प्रेक्षकांना थक्क करतील. ”
हेमंत शिंदे (कंपोझिंग हेड) म्हणाले, “फिल्ममेकिंगच्या कोर्समध्ये ‘शोले’ सारख्या लिजंड सिनेमाचा फ्रेम टू फ्रेम, असा अगदी सखोल अभ्यास केला होता. जुना ‘शोले’ आणि थ्रीडी अशा दोन्ही गोष्टींवर मी खूप रिसर्च केला आहे. आय स्पेशालिस्टची मदत घेऊन डोळ्यांना त्रास होऊ न देण्यासाठी थ्रीडीची सखोलता किती ठेवावी यावरही प्रथमच अभ्यास करण्यात आला आहे. मूळ ‘शोले’ १९८ मिनिटांचा सिनेमा असून थ्रीडी रुपांतरासाठी तब्बल २ लाख ८५ हजार २१० फ्रेम्सवर आमची टीम स्वतंत्रपणे काम करतेय.”
त्यामुळे आता ‘कितने आदमी थे’, ‘जो डर गया समझो मर गया’ हे डायलॉग्ज आठवून सुखावणाऱ्या प्रेक्षकांनी जय, वीरू आणि बसंती बरोबर टांग्यात बसून स्वतःच प्रवास करतोय की काय असा फील देणारा ‘शोले’ १५ ऑगस्टला प्रेक्षागृहात बघावा !

Wednesday, June 20, 2012

चौथे विश्व मराठी साहित्य संमेलन अडचणीत

टोरांटो येथील मराठी भाषिक मंडळाने निमंत्रित केलेल्या चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार ३, ४ आणि ५ ऑगस्ट या संमेलनाच्या तारखा होत्या. परंतु या तारखा रद्द करून संमेलन अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. टोरांटो येथील मराठी भाषिक मंडळाकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने हा निर्णय झाल्याचे समजते, तर महामंडळाने टोरांटोतील या मंडळाला पाठवलेल्या खर्चाचे आकडे त्यांच्या आवाक्याबाहेरचे असल्याने हे मंडळ प्रतिसाद देत नसल्याची चर्चा चालू आहे.
मे महिन्यात या तारखा नक्की होऊन पुढील प्रक्रिया सुरु होणार होती. परंतु आता संमेलन होईल की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे कारण महामंडळाने आयोजक मंडळास तीन दिवसांचा कार्यक्रम, साहित्यिकांचे मानपान, उपस्थितांची यादी इ. गोष्टी कळवल्यावर आयोजक मंडळाने महामंडळास खर्च विभागून घेऊ असे कळवले होते. परंतु, महामंडळ तडजोडीस तयार नसल्याचे समजते.
सप्टेंबर नंतर टोरांटोमध्ये प्रचंड थंडी असते, त्याकाळात संमेलन होणे शक्य नाही. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात संमेलन न झाल्यास संमेलनाबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते.

Tuesday, June 19, 2012

सी यू अगेन

03 300x225 सी यू अगेन
सिनेनिर्मितीचे शिवधनुष्य उचलल्यानंतर निर्माते सचिन पारेकर आता नाट्य निर्मितीकडे वळले आहेत. ‘अमोल प्रॉडक्शन’ बॅनरचे ‘सी यू अगेन’ हे अनोखे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नाटकाचा मुहूर्त नुकताच माहीम येथील रंगशारदा हॉलमध्ये कलाकार, तंत्रज्ञांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी सचिन पारेकर म्हणाले की बऱ्याच दिवसांपासून एखादे नाटक करण्याची इच्छा होती, पण बऱ्याच स्क्रिप्ट वाचूनही कोणतीही कथा मनाला भिडत नसल्याने ते थांबले होते.
सिनेमा, नाटक आणि जाहिरात अशा तिन्ही क्षेत्रात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा निखिल रत्नपारखी आता दिग्दर्शनाकडे वळला आहे. ‘सी यू अगेन’चे दिग्दर्शन तसंच लेखनही निखिलने केले आहे. त्याने आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की ‘सी यू अगेन’ बद्दल एका वाक्यात बोलायचे तर…भविष्याची चाहूल देणारे नाटक. निखिल बद्दल सचिन पारेकर म्हणाले की निखिल त्यांचा खूप जुना मित्र असल्याने त्याच्याशी गप्पा मारताना बोलण्याच्या ओघात त्याने एक विषय सांगितला आणि तो मनाला भावला. त्यानंतर निखिलने पटकथा लिहिली आणि पटकथा इतकी सुटसुटीत आणि मुद्देसूद होती की त्यांनी लगेच त्यावर नाटक करण्याचा निर्णय घेतला.
‘सी यू अगेन’ची कथा केवळ दोन पात्रांभोवतीच फिरते, एक पात्र निखिल साकारणार आहे, तर दुसरे कादंबरी कदम. नाटकाला मिलिंद जोशी यांनी संगीत दिले आहे. हे नाटक नवरा-बायकोमधील नाते-संबंधांवर आधारित आहे. भविष्यात हे नाते कोणत्या थराला जाऊ शकते याची झलक ‘सी यु अगेन’मध्ये पाहायला मिळेल. नवरा-बायकोच्या नात्यातील अव्यक्त भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न या नाटकाद्वारे करण्यात येईल. हे नाटक सर्वच वयोगटातील प्रेक्षकांचे मनोरंजन करेल. प्रत्येकासाठी त्यात संदेश आहे.
‘सी यू अगेन’ लवकरच नाट्यरसिकांच्या भेटीला येईल

Monday, June 18, 2012

वडिलांचं प्रेमही मोलाचं

आयुष्यात आई इतकीच बाबांची भूमिकाही महत्वाची असते. त्यांनी दिलेली प्रेरणा, लावलेला धाक, वेळोवेळी दिलेला पाठिंबा आणि न बोलता दर्शवलेली माया ही सुद्धा अनमोल असते. काल (ता.१७) ‘फादर्स डे’ सेलिब्रेट करण्यात आला, त्यानिमित्ताने काही सेलिब्रिटीजने त्यांच्या आयुष्यातील वडिलांची भूमिका स्पष्ट केली.
राजेश शृंगारपुरेने सांगितले की त्याचे वडील त्याच्यासाठी मार्गदर्शक आहेत. लहानपणापासून वडिलांमार्फतच सगळी माहिती पुरवली जायची. कोणत्याही गोष्टीची तोंडओळख व्हायची ती वडिलांकडूनच. त्यामुळे राजेशला त्याचे वडील सर्च इंजिनंच वाटतात.
पुष्कर श्रोत्रीने सांगितले की त्याच्यासाठी त्याचे वडील म्हणजे प्रेरणा, आधारस्तंभ आणि स्फूर्तीस्थान आहेत. कारण आज जो तो उभा आहे तो फक्त त्यांच्यामुळेच. वडिलांनीच त्याला प्रेरणा दिली आणि त्यामुळे तो आज त्याचं यश अनुभवू शकला.
वडिलांबद्दल हृषीकेश जोशीने सांगितले की त्याचे वडील त्याच्यासाठी आभाळ आहेत. आभाळ अथांग असतं, क्षितिजापर्यंत असतं आणि त्याचं मोजमाप करता येत नाही आणि प्रत्येकाला आपापलं आभाळ असावं.
स्पृहा जोशीने सांगितले की तिचे बाबा म्हणजे तिची ताकद, तिच्या सगळ्या निर्णयांना मिळणारा पाठिंबा, तिचा गाईड, फिलॉसॉफर !
तेजस्विनी पंडीतने तिच्या वडिलांचे वर्णन आईच्या भूमिकेतला बाबा असं केलं. तेजस्विनीची आई नेहमी नाटकाच्या निमित्ताने दौऱ्यावर असायची. त्यावेळी अगदी डबे भरण्यापासून बुटांना पॉलीश करण्यापर्यंत सगळं तिचे बाबा करायचे. तेजस्विनीसाठी तिचे वडील म्हणजे तिची आईच आहेत.

Saturday, June 16, 2012

'योगायोग'च्या चित्रीकरणाचे पहिले सत्र महाबळेश्वर येथे संपन्न.

Yogayog, Ankush Chaudhary, Siddharth Jadhav
विनिता क्रिएशन्सची निर्मिती तसेच मिलिंद देविदास पाटील यांच्या एचडी मुव्हीजची प्रस्तुती असलेल्या 'योगायोग' या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाचे ७ दिवसाचे पहिले शेड्युल नुकतेच महाबळेश्वरसारख्या थंड हवेच्या ठिकाणी पूर्ण करण्यात आले. 

'योगायोग' या व्याख्येत अगदी फिट बसत असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन भरत राज आणि प्रशांत शिंदे करत आहेत. अंकुश चौधरी या सिनेमात मुख्य भूमिका साकारत असून सिद्धार्थ जाधवही या चित्रपटात वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच सिया पाटील या सिनेमात मुख्य भूमिकेत असून दिपक शिर्के, विजू खोटे, विकास समुद्रे, अंजली उजवणे, ज्योत्सना आदि कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. 

चित्रपटाची कथा बी. राज यांची असून पटकथा साईदास यांनी लिहीली आहे. शिरीष लाटकर यांनी चित्रपटाचे संवाद लिहीले आहेत. जाफर सागर यांनी लिहिलेल्या गीतांना चिनार्-महेश ही जोडी संगीतबद्ध करणार आहे. दक्षिणेकडील सुप्रसिद्ध कॅमेरामन रामजी यांनी या चित्रपटाचे छायाचित्रण केले आहे. कमलेश मौर्या या सिनेमाचे कार्यकारी निर्माता आहेत, तर शेखर नागवेकर प्रॉडक्शन डिझाइनर. क्रिएटिव्ह हेड साजना सरगम असून सुंदर शेट्टी संकलनाची बाजू सांभाळणार आहेत. लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दुसर्‍या शेड्युल्डची सुरुवात होणार आहे.

Wednesday, June 13, 2012

बीटरूट

सृजन ‘ या कार्यशाळेत हमखास दिसणारं दृश्य म्हणजे नाटक, कुठे पेंटिंग, पॉटरी, फॅशन डिझायनिंग तसंच आर्ट इंस्टॉलेशन अशा भरपूर उपक्रमांमध्ये रमणारी चिल्ली पिल्ली. कारण मुलांच्या कलागुणांना इथे वाव दिला जातो. वेगवेगळ्या कॉलेजच्या मुलांनी म्हणजेच मुलांच्या ताई-दादांनी एकत्र येऊन ‘बीटरूट’ नावाची सामाजिक कला संस्था स्थापन केली. या संस्थेतर्फेच ‘सृजन’ चं काम सुरू आहे. त्यांचं हे यंदांचं सातवं वर्षं आहे. ‘मूकनाट्य’ शिकवणं ही ‘सृजन’ची खासियत आहे. दुसरीकडे बॉलिवुड, हिपहॉप, फोक डान्ससारख्या प्रकारांचही तितक्याच उत्साहात प्रशिक्षण दिलं जातं.
इतक्या लहानग्यांना सांभाळणारा हा उपक्रम ‘नो प्रॉफीट नो लॉस’ वर चालवला जातोय. या ग्रुपमध्ये कुठलाही कॉलेजगोईन्ग स्टुडंट सहभागी होऊ शकतो. या ‘बीटरूट’ ग्रूपमध्ये इंजिनिअरिंग पासून हॉस्पिटॅलिटी, मास मीडिया, आर्किटेक्चर अशा विविध क्षेत्रांमधली मुलं काम करतायंत.
लहान मुलांमधल्या कलेला वाव देण्यासाठी हा उपक्रम चालवत असल्याचं, सृजनचे ताई-दादा सांगतात. यंदाच्या कार्यशाळेची थीम ‘बियाँड रामायण’ ही होती. या नव्या थीमसाठी कार्यशाळेतल्या मुलांनी छान डिझाइन करत ग्रूपच्या नावांचे झेंडे आणि लोगोज तयार केले होते.
रचना संसदच्या शेवटच्या वर्षाला शिकणारा सिद्धेश कोळंबेकर व जे.जे. स्कूलमधून आर्किटेक्चर पास झालेल्या कमलेश गाडे हे या ग्रुपचे संस्थापक आहेत. सिद्धेशने अकरावीत असताना कमलेशच्या मदतीने या आगळ्या वेगळ्या उपक्रमाला सुरुवात केली होती. आणि आता बघता बघता याला सात वर्षं पूर्ण झाली आहेत.
सृजन सोबतच बीटरूट ‘विस्टा’ नावाने फोटोग्राफी स्पर्धा, फूड एक्झिबिशन असेही उपक्रम राबवले जातात. सृजनचंच साहित्य घेऊन कोकणातल्या गावातील मुलांसाठी विनामूल्य कार्यशाळा घेण्यात येते. एकूणच बीटरूटचा ग्रूप एड्युटेनमेंट करत असल्याचं दिसतं.

Monday, June 11, 2012

”संत तुकारामाच्या ”माणूस” पणाच्या थोरवीचे भावरम्य दर्शन”

Tukaram1 संत तुकारामाच्या माणूस पणाच्या थोरवीचे भावरम्य दर्शन

”संत तुकाराम म्हणजे महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांचे दैवत. संत म्हणून तुकाराम श्रेष्ठच होते परंतु एक ‘माणूस’ म्हणूनही ते ‘देव माणूस’ होते. त्यामुळेच आजही महाराष्ट्रातील घराघरात ‘तुकारामा’ चे नाव घेतले जाते. ‘माणूस’ म्हणून त्यांचे व्यक्तिमत्व कसे होते याचे भावरम्य दर्शन चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ”तुकाराम” या नव्या मराठी चित्रपटात पहावयास मिळते. विशेष म्हणजे या चित्रपटामुळे तब्बल ७६ वर्षांनी मोठ्या पडद्यावर तुकारामाचे दर्शन पुन्हा एकदा घडले आहे. यापूर्वी म्हणजे १९३६ साली ‘प्रभात’ फिल्म कंपनीने काढलेला ”संत तुकाराम” हा चित्रपट खूपच गाजला होता. त्यातील विष्णुपंत पागनीस यांनी केलेली तुकारामाची भूमिका लोकांना एवढी आवडली होती की, पागनीस हे जणू संत तुकारामाचे ‘अवतार’ आहेत अशा पद्धतीने लोक त्यांना मान देत असत. मात्र ‘तुकाराम’ या नवीन चित्रपटात त्यांच्या संतंत्वापेक्षा तुकारामाच्या ‘माणूस’ पणाचीच थोरवी सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात तुकारामाचे बालपण दाखविताना लहानपणापासूनच त्यांच्यात ‘माणुसकी’ किती दडलेली होती हे छोट्या-छोट्या प्रसंगातून छान चित्रित केले आहे. ” चांदीचे सालकडे मित्राला का दिले म्हणून जेंव्हा आई रागावते त्यावेळी लहान तुकारामाने ‘ माझ्याजवळ सोन्याचे नव्हते म्हणून चांदीचे दिले’ असे निरागस भावनेने दिलेले उत्तर” त्याची साक्ष देते. त्यानंतर मोठेपणी ‘व्यापार-उदीम’ क्षेत्रात उतरलेले तुकाराम विठूरायावरील भक्तीच्या ओढीमुळे हळूहळू विरक्त होऊ लागतात. भीषण दुष्काळात त्यांनी स्वताच्या घरातील धान्यसाठा रिकामा करून गावकऱ्यांना केलेली मदतही त्यांच्या अपार माणुसकीचे दर्शन घडविते. त्यानंतरही अनेक प्रसंगातून तुकारामाच्या जीवनविषयक तत्वद्यानाचे सहज सुलभ दर्शन घडते. शिवाजी महाराज व तुकाराम यांच्या भेटीचा प्रसंग देखील साधाच परंतु हृद्य झाला आहे. अभंगाची रचना करून रूढी, परंपरा आणि संस्कृतीची मर्यादा ओलांड्ल्याबद्दल ‘धर्मपीठा’ने शिक्षा दिली म्हणून आपली गाथा इंद्रायणी नदीत बुडविणारे तुकाराम नदीकिनारी बसूनच अन्न-पाणी वर्ज्य करतात हा प्रसंगही खूप भावस्पर्शी झाला आहे. मात्र दिग्दर्शकाने ‘ तुकारामाच्या गाथा नदीत तरल्या व त्या तशाच वर आल्या हा ‘चमत्कार’ दाखविलेला नाही उलट या गाथातील अभंगाची लोकांनीच पुढे परंपरा चालवली व या गाथा ‘अमर’ केल्या असे निवेदनात्मक पद्धतीने सांगून कल्पक शेवट केला आहे.
हा चित्रपट प्रभावशाली करण्यात कथा-पटकथा व संवाद लेखक प्रा. अजित दळवी व प्रशांत दळवी तसेच छायालेखक राजन कोठारी यांचाही फार मोठा वाटा आहे. तुकारामाच्या भूमिकेत जितेंद्र जोशी छान शोभले आहेत. त्यांनी तुकारामाचे संतत्व कोठेही डोकावू दिले नाही. तसेच शरद पोंक्षे ( तुकारामाचे वडील ), प्रतीक्षा लोणकर ( तुकारामाची आई ), रुतुसेन दाभोळकर ( तुकारामाचा मोठा भाऊ ), विकास पाटील (तुकारामाचा लहान भाऊ) वीणा जामकर (तुकारामाची पहिली पत्नी ), राधिका आपटे (तुकारामाची दुसरी पत्नी-आवली ), यतीन कार्येकर ( मंबाजी गोसावी ) आदी कलाकारांनी आपापल्या भूमिकांना चांगला न्याय दिला आहे. त्यामुळेच या चित्रपटात ”संत तुकारामाच्या ”माणूस” पणाच्या थोरवीचे भावरम्य दर्शन” घडू शकले आहे.

Sunday, June 10, 2012

तुकोबांच्या शब्दांची आस : हरिहरन

20080316hariharan112  तुकोबांच्या शब्दांची आस : हरिहरन

ज्येष्ठ गायक हरिहरन यांनी ’तुकाराम’ या मराठी सिनेमात गाणं गायल्यानंतर, त्यांना आता तुकोबांच्या शब्दांचीच आस लागली आहे. संत तुकारामांच्या मूळ अभंगांवर ते लवकरच अभंग काढणार आहेत. हरिहरन मुंबईतच शिकले असल्यामुळे त्यांना मराठी भाषा नवीन नाही. त्यामुळेच जरी मराठी त्यांची मातृभाषा नसली तरी मराठी गाणी गाताना भाषेचा गोडवा त्यांना समजतो. ‘तुकाराम’ मधलं ‘कोरडं आभाळ’ हे नवं गाणंही त्यांना असंच स्पर्शून गेलं.
हरिहरन यांच्या मते सिनेमाचं संगीत सिनेमासाठी, त्यातल्या व्यक्तिरेखांसाठी, तो पुढे जाण्यासाठी असतं. अल्बमचं तसं नाही. अल्बममधल्या गाण्यावर बाकी गोष्टी गुंफल्या जातात. गाण्यानुसार कथा बनते , त्यानुसार सीन्स येतात. त्यामुळे गाण्यात कमी पडतात ते अल्बम्स मागे राहतात. पण , म्हणून अल्बम्स बाजारात येतंच नाहीत असं नाही. अनेक चांगले अल्बम्स, गाणी बाजारात येत आहेत.
‘ तुकाराम ‘ च्या निमित्ताने तुकोबांचं जीवनकार्य आणि रचनांमुळे ते भारावून गेले आहेत. त्यामुळे तुकोबांच्या मूळ रचनांवर एखादा म्युझिक अल्बम काढायला त्यांना नक्की आवडेल . संगीत जगतात होणाऱ्या बदलांबाबत ते म्हणाले की’ ‘ जसं फॅशनचं एक चक्रं असतं तसंच संगीताचं आहे. सध्या आयटम साँग्जची लाट आहे , त्यामुळे ती चालतायंत. उद्या आणखी कसली लाट येईल तेव्हा ती गाणी लोकप्रिय होतील. पण म्हणून शांत , सौम्य गाण्यांना लोकांची पसंती नाहीच असं नाही. प्रत्येक संगीतप्रकारांच्या चाहत्यांत ही गाणी लोकप्रिय होत असतात. आजची तरुणाई फक्त ढिंगचॅक गाणी ऐकते,यात त्यांचा दोष नाही. लहानपणापासून जे ऐकायला मिळणार त्यावरच त्यांची अभिरुची अवलंबून असेल. चांगलं दिलंत तर तरुणांना ते आवडेल ‘ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
येत्या सप्टेंबर महिन्यात हरिहरन त्यांच्या प्रसिद्ध ‘कलोनिअल कझिन्स’ अल्बमचा भाग २ घेऊन येत आहेत. हा अल्बम आधीच्या अल्बम प्रमाणेच रॉकिंग असेल. तसंच ‘शाम-ए-गझल’ हा त्यांचा अल्बमही लवकरच संगीतप्रेमींच्या भेटीला येणार आहे.

Saturday, June 9, 2012

भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे धगधगते पर्व मराठी रुपेरी पडद्यावर : पत्री सरकार

Krantisingh Nana Patil 1 भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे धगधगते पर्व मराठी रुपेरी पडद्यावर : पत्री सरकार

‘पत्री सरकार’ या चित्रपटाद्वारे अतिशय रोमांचकारी आणि नाट्यपूर्ण घटनांनी भरलेली क्रांतीसिंह नाना पाटील यांची जीवन कहाणी मराठी रुपेरी पडद्यावर अवतरणार आहे. भारतीय स्वातंत्र्यासाठी लढलेले क्रांतीकारक आणि त्यांच्या जीवन संघर्षाची कहाणी या सर्वांची व्याप्ती एवढी मोठी आहे की या प्रत्येक क्रांतिकारकाच्या आयुष्यावरच नव्हे तर प्रत्येक घटनेवर एक स्वतंत्र अध्याय लिहिला जाऊ शकतो. काहींनी आपल्या विचारांना आदर्श मानून चळवळ उभारली तर काहींनी प्रवाहाच्या विरुद्ध जात आपल्या सशस्त्र क्रांतीने ब्रिटीश साम्राज्याला खिळखिळे केले. भारतीय स्वतंत्र लढ्यातील असेच एक धगधगते पर्व म्हणजे ‘क्रांतीसिंह नाना पाटील’.
ब्रिटीश राजवटीच्या अत्याचाराखाली भारतीय समाज भरडून निघत असताना नाना पाटलांनी पश्चिम महाराष्ट्र आणि परिसरात ब्रिटीशांच्या कारवाया उधळून लावत त्यांची जुलमी राजवट मोडून काढली. आपल्या तुफानी सेना या सशस्त्र क्रांतीकारी संघटनेच्या माध्यमातून ब्रिटीशांबरोबरच सामान्य शेतकऱ्यांवर जुलूम करणाऱ्या सावकारशाही आणि भटशाहीविरुद्ध लढा उभारला आणि स्वतःचं प्रतिसरकार स्थापन केलं.
शेतकरी कामगार पक्षांतर्गत ग्रामीण भागातील चळवळ ही मुख्यतः नाना पाटील यांच्यामुळे शक्य झाली. समाजाला नडणाऱ्या सावकार आणि तत्सम दुष्ट प्रवृत्तींना नानांच्या प्रतिसरकारचा चांगलाच धाक होता. गरिबांवर, बहुजन समाजावर अन्याय करणाऱ्या समाजविघातक शक्तींना प्रति सरकारने अक्षरशः पत्र्या ठोकल्या. त्यामुळे ‘प्रतिसरकार’ हे ‘पत्री सरकार’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
संवेदनशील विषयांबरोबरच आशयघन मांडणी आणि तांत्रिक कौशल्यासाठी प्रसिद्ध असणारे लेखक-दिग्दर्शक हा चित्रपट घेऊन येत आहेत. गेली दोन दशकं हिंदी मनोरंजन सृष्टीत कार्यरत असणाऱ्या ‘ए.एस.आर.मिडिया’ या निर्मिती संस्थेअंतर्गत तयार होणाऱ्या या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सय्यद आसिफ जाह-शुजा अली सांभाळत आहेत. ऐतिहासिक विषय किंवा व्यक्तिरेखांवर चित्रपट करण्याचं काम हे नेहमीच आव्हानात्मक असतं. तो काळ, त्या व्यक्ती, त्या काळचे संदर्भ, त्यासाठीचे संशोधन, निरीक्षण या सगळ्याच गोष्टी खूप महत्वाच्या असतात. दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी ‘पत्री सरकार’साठी गेल्या सहा महिन्यांपासून क्रांतीसिन्हांच्या आयुष्याशी निगडीत अनेक दस्तावेज, कागदपत्रे गोळा केली. त्यांच्या साथीदारांशी, नातेवाईकांशी, संबंधित माणसांशी त्यांनी प्रत्यक्ष जाऊन संवाद साधला. क्रांतीसिंहांनी प.महाराष्ट्राच्या परिसरात आपल्या संघटनेचा विस्तार केला होता. त्यांच्या भूमिगत चळवळीचे कार्यक्षेत्र असलेल्या या परिसरातील विविध गावांना गजेंद्र अहिरेंनी भेटी दिल्या. यामध्ये नानांसोबत प्रत्यक्ष लढ्यात सहभागी झालेले काही साथीदार त्यांना भेटले. ज्यांनी नानांचे कार्य बघितले असे लोक, त्यांचे वारसदार अशा अनेकांच्या अनुभवकथनातून हा संपूर्ण कालखंड जिवंत झाला. यामध्ये नानांच्या सहकार्यांबरोबरच त्यांच्या मुलीने आणि इतर जवळच्या नातेवाईकांनी नानांच्या देशभक्तीच्या आणि शौर्याच्या सांगितलेल्या कथा सुन्न करणाऱ्या होत्या.
पारतंत्र्याचा काळ, ब्रिटीशांचे अत्याचार अशात नानांनी भूमिगत राहून, घरादारावर तुळशीपत्र ठेऊन लढलेला स्वातंत्र्यसमर आजच्या पिढीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे हा विचार या चित्रपटाच्या निर्मितीस कारणीभूत ठरला. चित्रीकरण स्थळे आणि महत्वाच्या पात्रांच्या निवड प्रक्रियेचे काम सध्या वेगात सुरु असून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील हे धगधगतं पर्व लवकरच रुपेरी पडद्यावर साकारणार आहे.

Friday, June 8, 2012

आयफा : भारतीय चित्रपटातील सौंदर्यवती रेखाला पुरस्कार

Rani Mukherjee on Rekhas lap at IIFA Amsterdam आयफा : भारतीय चित्रपटातील सौंदर्यवती रेखाला पुरस्कार

जेपी आयफा अॅवॉर्ड्स २०१२ या लायन सिटी, सिंगापोर मध्ये होणाऱ्या सोहळ्यात सौंदर्य आणि विषयासक्तता यांचा केंद्रबिंदू असलेल्या रेखाचा ‘भारतीय सिनेमामधील अतुलनीय कामगिरी’ या पुरस्काराने गौरव होणार आहे. भारतीय रसिकांना रेखाने तब्बल तीन दशके मंत्रमुग्ध केले आहे. तिने कित्येक अजोड चित्रपट केले असून या चित्रपटांनी तिच्या चाहत्यांच्या मनावर कायमस्वरूपी छाप पाडली आहे. रेखाचा हा प्रवास फार प्रदीर्घ असा आहे आणि ती भारताची फार लोकप्रिय ग्लॅमर आयकॉन ठरली आहे. तिला अस्सल ‘मेकओव्हर क्वीन’ म्हणूनच ओळखले गेले.
दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेता जेमिनी गणेशन आणि पुष्पवल्ली यांची मुलगी असलेली रेखा गेल्या तीस वर्षांहूनही अधिक काळ बॉलीवूडमध्ये असून ती अगदी सुरुवातीपासूनच आश्वासक अभिनेत्री म्हणून ओळखली गेली आहे. १९७० मध्ये आलेला सावन भादो हा तिचा पहिलाच चित्रपट अगदी लोकप्रिय ठरला होता आणि त्यानंतर ती एक मोठी स्टार ठरली. त्यानंतर नमक हराम, धर्मा, कहानी किस्मत की आणि प्राण जाए पर वचन ना जाए यासारखे कित्येक हीट चित्रपट तिने दिले. दो अंजाने या चित्रपटात तिने महत्वाकांक्षेसाठी आपल्या प्रेमाची तिलांजली देणाऱ्या पत्नीची साकारलेली भूमिका प्रेक्षकांना वेगळा आनंद देऊन गेली. गुलजार यांच्या घर मध्ये एक प्रगल्भ रेखा पाहायला मिळाली. त्यानंतर ती भारतीय प्रेक्षकांचे मन जिंकत गेली आणि शेवटी बॉक्स ऑफिस क्वीन म्हणूनच ओळखली जाऊ लागली. मुकद्दर का सिकंदर, खुबसुरत, जुदाई, माँग भरो सजना, एक ही भूल यासारखे तिचे चित्रपट हीट ठरले होते. यश चोप्रा यांचा सिलसिला आणि मुजफ्फर अली यांचा उमराव जानने तिच्या आगळ्या प्रतिमेवर शिक्कामोर्तब केले आणि तिला स्वतःचे स्थानही मिळवून दिले. रेखाने भारतीय चित्रपट इतिहासाला सुवर्णक्षणांचे संचित बनवले आहे.
दरवर्षी, भारतीय चित्रपटामध्ये अतुल्य असे योगदान केलेल्या भारतीय चित्रपट क्षेत्रातील एका सदस्याला आयफा सन्मानित करते. विझक्राफ्ट इंटरनॅशनल एन्टरटेनमेंटचे संचालक टीमिन्स म्हणाले, “गेल्या कित्येक वर्षांमध्ये, भारतीय चित्रपट सृष्टीतील कित्येक बड्या कलाकारांना त्यांचे सिनेमाप्रती असलेले योगदान लक्षात घेऊन आम्ही अभिवादन केले आहे. आमच्या १३ व्या वर्षामध्ये, आयफाला भारतातील सर्वाधिक प्रेम मिळालेली अभिनेत्री रेखा हिला तिच्या भारतीय चित्रपट उद्योगाप्रतीच्या फार मोठ्या योगदानासाठी गौरवताना अतिशय आनंद होत आहे. नेमका याच वर्षी भारतीय सिनेमाचा शतकमहोत्सवही आम्ही साजरा करत आहोत. आमच्या चित्रपट क्षेत्रातील लाखो लोकांच्या मनावर तिने निःसंशयपणे अधिराज्य गाजवले आहे आणि आजही तिची जादू कमी झालेली नाही.”
या पुरस्काराबाबतीत रेखा म्हणते, “माझ्या नावाचा विचार झाला आणि भारतीय चित्रपट क्षेत्रातील माझ्या योगदानाचा गौरव केला जात आहे, ही बाब माझ्यासाठी हेलावून सोडणारी आहे. हा प्रवास खूप प्रदीर्घ राहिला आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की सिनेमाप्रती असलेले प्रेम आणि वेड पुढेही मला माझ्या सर्व चाहत्यांपर्यंत पोहोचवायला मदत करेल. भारतीय चित्रपट सृष्टीचा शतक महोत्सव साजरा केला जात असतानाच माझा अशाप्रकारे गौरव होत आहे, ही बाब माझ्यासाठी आणखी आनंददायी आहे.”

Thursday, June 7, 2012

‘बाबूरावला पकडा’ ८ जूनला प्रदर्शित

6 X 20  बाबूरावला पकडा ८ जूनला प्रदर्शित

संपूर्ण चित्रपटाचे शूटिंग परदेशात झालेला ‘बाबूरावला पकडा’ हा मराठी चित्रपट ८ जूनला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय. ‘साई व्हिजन शोबिझ’ निर्मित, ‘वॉच टॉवर इंटरनॅशनल ‘प्रस्तुत ‘बाबूरावला पकडा’ या चित्रपटाचे निर्माते आहेत तन्मय सेनगुप्ता आणि अश्विन कुमार क्षीरसागर तर दिग्दर्शक आहेत आशिष उबाळे. चित्रपटाची कथा, पटकथा ही आशिष उबाळे यांचीच असून संवाद त्यांच्यासोबत शशांक केवले आणि शाम पेठकर यांनी लिहिले आहेत. चित्रपटाचे संकलन गुरजंत सिंग यांचे असून नृत्य दिग्दर्शन पप्पू खन्ना व अग्नेस हॅमिल्टन यांचे आहे तर कलादिग्दर्शन जयदेव भट्टाचार्य यांचे आहे. मिलन तारी यांची सहनिर्मिती असलेल्या या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत वैभव शहा. गीतकार सागर पवार व ज्ञानेश वाकुडकर यांनी लिहिलेल्या गीतांना दुर्गा नटराज यांनी संगीत दिले आहे. ‘जंगली म्युझिक’ कंपनीने ‘बाबूरावला पकडा’ च्या गीतांची ध्वनीफित प्रकाशित केली आहे.
या चित्रपटात मराठी चित्रपट सृष्टीतील हुकुमाचे तीन एक्के म्हणजे भरत जाधव, संजय नार्वेकर, मकरंद अनासपुरे यांची एकत्रित धमाल पाहायला मिळणार आहे. या तिघांबरोबरच या चित्रपटात समीर धर्माधिकारी, निशा परुळेकर, सई ताम्हणकर, सिया पाटील, मीना कंवर, अभिजित चव्हाण, अमृता देशमुख, अश्विनकुमार क्षीरसागर या नामवंत मराठी कलाकारांच्या भूमिका आहेत.
बाबूरावची मुंबईमध्ये स्वतःची चाळ आहे आणि त्या चाळीवर बाबुरावचा मित्र चिमण पोपटची नजर आहे. चिमणची बहीण चमेली बाबूराववर प्रेम करते. त्याचा फायदा चिमण पोपटला करून घ्यायचा असतो, पण बाबूराव जास्त हुशार म्हणून तो चिमण पोपटला मूर्ख बनवून त्याचे पैसे घेऊन चमेलीसोबत बँकॉकला पळून जातो. आता बँकॉकमध्ये काय घडतं हे पाहण्यासाठी प्रेक्षागृहातच जावं लागेल. धमाल व्यक्तिरेखा, त्यांच्यातील गडबड गोंधळ , समज गैरसमज आणि त्यामुळे घडणारा विनोद म्हणजे ‘बाबूरावला पकडा’ हा गमतीदार चित्रपट.
सिनेमांचे डिजीटल पोस्टर तयार करून प्रमोशन करण्याची नवी पद्धत या चित्रपटाच्या निमित्ताने मराठीतही वापरण्यात आली आहे. मराठीत प्रथमच ‘बाबूरावला पकडा’ चित्रपटाचं डिजीटल पोस्टर बनवण्यात आले असून सोशल नेटवर्क साईटच्या माध्यमातून प्रेक्षकांनी त्याला पसंती दर्शविली आहे.
प्रेक्षकांचे धमाल मनोरंजन करायला ‘बाबूरावला पकडा’ ८ जूनला प्रदर्शित होतोय.

Wednesday, June 6, 2012

क्रांतीसिंह नाना पाटलांची जीवनकहाणी 'पत्री सरकार' चित्रपटाद्वारे मराठी रुपेरी पडद्यावर

Patri Sarkar, Nana Patil


भारतीय स्वातंत्र्यासाठी लढलेल्या क्रांतीकारकांपैकी काहींनी आपल्या विचारांना आदर्श मानून चळवळ उभारली तर काहींनी प्रवाहाच्या विरुद्ध जात आपल्या सशस्त्र क्रांतीने ब्रिटीश साम्राज्याला खिळखिळे केले. भारतीय स्वातंत्र्यलढयातील असेच एक धगधगते परव म्हणजे 'क्रांतीसिंह नाना पाटील'. 

ब्रिटीश राजवटीच्या अत्याचाराखाली भारतीय समाज भरडून निघत असताना नाना पाटीलांनी पश्चिम महाराष्ट्र आणि परिसरात ब्रिटीशांच्या कारवाया उधळून लावत त्यांची जुलमी राजवट मोडून काढली. आपल्या तुफानी सेना या सशस्त्र क्रांतीकारी संघटनेच्या माध्यमातून ब्रिटीशांबरोबरच सामान्य शेतकर्‍यांवर जुलुम करणार्‍या सावकारशाही आणि भटशाहीविरुद्ध लढा उभारला आणि स्वतःचं 'प्रतिसरकार' स्थापन केलं. अतिशय रोमांचकारी आणी नाट्यपूर्ण घटनांनी भरलेल्या क्रांतीसिंह नाना पाटलांची जीवनकहाणी 'पत्री सरकार' चित्रपटाद्वारे मराठी रुपेरी पडद्यावर अवतरणार आहे. 

'ए. एस. आर. मिडिया' या निर्मिती संस्थेच्या अंतर्गत तयार होणार्‍या या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सय्यद आसिफ जाह -शुजा अली सांभाळत आहेत आणि लेखक- दिग्दर्शक गजेंद्र अहिरे हा चित्रपट दिग्दर्शित करत आहेत. 

पारतंत्र्याचा काळ, ब्रिटीशांचे अत्याचार, अशात नानांनी भूमिगत राहून घरादारावर तुळशीपत ठेवून लढलेला स्वातंत्र्यसमर आजच्या पिढीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे हा विचार या चित्रपटाच्या निर्मितीस कारणीभूत ठरला असून लवकरच देशाच्या स्वातंत्र्यलढयातील हे धगधगतं पर्व लवकरच रुपेरी पडद्यावर साकारणार आहे. 

श्री कुलदीप पेडणेकर करित आहेत 'संकासूर्'ची निर्मिती.

Sankasur

दशावतारी नाटकांना कोकणाच्या सांस्कृतिक परंपरेत मानाचे स्थान आहे. विष्णूच्या दहा अवतारांचे नाट्यरुप दर्शन त्यातून घडविले जातं. म्हणून याला दशावतारी नाटक असे म्हणतात. या दशवतारातील 'संकासूर' हे पात्र मालवणी मुलखातील आबालवृद्धांच्या गळ्यातील ताईत आहे. 

'आई श्री भगवतीदेवी' या प्रॉडक्शनद्वारे 'संकासूर' निर्माण होत असून कोकणचे सुपूत्र आणि महाराष्ट्र राज्य मत्स्य उत्पादन महामंडळाचे उपाध्यक्ष श्री कुलदीप पेडणेकर या चित्रपटाचे निर्माते आहेत. संकासूराचे पात्र रंगवणार्‍या दाजी गावकर या प्रसिद्ध दशावतारी कलाकाराभोवती या चित्रपटाचे कथानक फिरते. 

या चित्रपटाची संकल्पना, कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन श्री. ज्ञानेश्वर मर्गज करत आहेत. चित्रपटाचे छायांकन श्री. राजा फडतरे करीत आहेत. 'संकासूर'ची मध्यवर्ती भूमिका कोण करणार हे गुपित चित्रपटाच्या मुहुर्तादिवशीच उघड केले जाणार आहे. 

आयफा पुरस्कार : शाहिदच्या जोडीला फरहान

यावर्षी ७ ते ९ जून रोजी होणाऱ्या व्हिडीओकॉन आयफा वीकेंडचे यजमानपद सिंगापोर या सिंहांच्या शहराकडे आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीद कपूर बरोबरच अभिनेता-दिग्दर्शक फरहान अख्तरही करणार आहे. ९ जूनला १३ व्या आयफा पुरस्कारांच्या मंचावर फरहान आपल्या मोहक आणि विनोदी शैलीने या उद्योगातील मंडळींना आणि ८० कोटींच्या वर दर्शकांना खिळवून ठेवेल.
या सोहळ्यातील आत्तापर्यंत घोषित झालेल्या कार्यक्रमांमध्ये प्रभुदेवा, शाहीद कपूर, बिपाशा बसू आणि सोनाक्षी सिन्हा यांचा समावेश आहे. अभिनेता, दिग्दर्शक, नृत्यरचानाकार प्रभुदेवा पहिल्यांदाच नृत्ये बसवणार आहे. शाहीद आणि फरहान या दोन्ही अभिनेत्यांमधील रसायन जादूमय असेल तसेच पटलेखन, एकमेकांमधील संवाद आणि सवालजवाब या गोष्टी दर्शकांना नक्कीच खुश करतील आणि हसवून सोडतील.
सिंगापोरमधला हा व्हिडीओकॉन आयफा वीकेंड भारतीय सिनेसृष्टीचा एक अपूर्व सोहळा असेल ज्यात भारतीय चित्रपट उद्योगाची श्रेष्ठता जागतिक मंचावर सादर केली जाईल. २०१२ चा आयफा वीकेंड व्हिडीओकॉन लागोपाठ चौथ्यांदा पुरस्कृत करत आहे तर ग्रे गूज हे आयफा रॉक्सचे पुरस्कर्ते आहेत. पॅनासोनिक त्यांच्या पर्यावरणात्मक कल्पनांच्या पुढाकारासह हरित उपक्रमांसाठी आयफा बरोबरची भागीदारी पुढे चालू ठेवणार आहे. एयर इंडिया आयफाचा अधिकृत विमान कंपनी भागीदार असणार आहे. गीतांजली समूह आणि जेमफिल्ड्स हे व्हिडीओकॉन आयफा वीकेंडचे सहपुरस्कर्ते आहेत.

Tuesday, June 5, 2012

संकासूर

Poster  संकासूर

‘आई श्री भगवतीदेवी’ या प्रॉडक्शनद्वारे ‘संकासूर’ हा चित्रपट निर्माण होत असून कोकणचे सुपुत्र आणि महाराष्ट्र राज्य मत्स्य उत्पादन महामंडळाचे उपाध्यक्ष श्री. कुलदीप पेडणेकर या चित्रपटाचे निर्माते आहेत. हा चित्रपट म्हणजे संकासूराच्या रूपकाआडून भारतीय गावांची जागतिक स्तरावर महती सांगण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येकाच्या मनात एक गाव वसत असते आणि त्या गावाच्या भावविश्वात एक संकासूर जिवंत असतो. ही भावना भाषा, देश, प्रांताची सीमा जाणत नाही. त्याचप्रमाणे हा चित्रपट भाषा, देश, प्रांतापलीकडे जात माणसातल्या माणूसकीचा, त्याच्या अस्तित्वाचा धांडोळा घेतो.
कोकण हे निसर्गाला पडलेले सुंदर स्वप्नं. कोकणातील गावगाडा देवस्थानाभोवती फिरतो. मालवणी मुलखातला प्रत्येक जण ‘देवाक काळजी’ असे म्हणत निर्धास्तपणे अवघडातल्या अवघड प्रसंगाला सामोरा जातो. गजालीत रमणारा इथला माणूस ‘दशावतारी नाट्य परंपरेला’ आपला सांस्कृतिक ठेवा मानतो. दशावतारी नाटकांना कोकणाच्या सांस्कृतिक परंपरेत मानाचे स्थान आहे. विष्णूच्या दहा अवतारांचे नाट्यरूप दर्शन त्यातून घडवले जाते. म्हणून याला दशावतारी नाटक असे म्हणतात. या दशावतारातील ‘संकासूर’ हे पात्र मालवणी मुलखातील अबाल वृद्धांच्या गळ्यातील ताईत आहे. या संकासुराचे पात्र रंगवणाऱ्या दाजी गावकर या प्रसिद्ध दशावतारी कलाकाराभोवती या चित्रपटाचे कथानक फिरते.
निर्माते श्री. कुलदीप पेडणेकर या चित्रपटाच्या कथेमुळे भारावून जाऊन हा चित्रपट करत आहेत. ‘संकासूर’ या चित्रपटाद्वारे त्यांचे मराठी चित्रपट निर्मिती विश्वात दमदार पदार्पण होत आहे. या चित्रपटाची संकल्पना, कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन श्री.ज्ञानेश्वर मर्गज करत आहेत. त्यांनी यापूर्वी अनेक मालिकांचे लेखन केलेले असून ‘एक वाडा झपाटलेला’ आणि ‘निवडुंग’ या गाजलेल्या मालिकांचे दिग्दर्शन केले होते. ‘निवडुंग’साठी त्यांना मटा सन्मान मिळाला आहे.
‘संकासूर’ची मध्यवर्ती भूमिका भारतीय चित्रपटातील एक महान अभिनेता करणार आहे. त्याचे नाव चित्रपटाच्या मुहूर्तादिवशीच उघड केले जाणार आहे. ‘संकासूर’ ही एक ट्रीट असणार आहे, जगभर पसरलेल्या चित्रपट रसिकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे याची लेखक दिग्दर्शक श्री. मर्गज यांना खात्री आहे. या चित्रपटाचे छायांकन श्री.राजा फडतरे करत आहेत. श्री. गणेश जगदीश गावकर या चित्रपटाचे कार्यकारी निर्माता असून श्री.पुष्कराज गायकवाड हे निर्मिती प्रमुख आहेत.
‘संकासूर’ चित्रपटातील काही महत्वाच्या व्यक्तिरेखांसाठी लवकरच ऑडिशन होत आहे, त्यासाठी फोटोज आणि बायोडेटा sankasurmovie@gmail.com वर पाठवावेत किंवा ९३२२२२३१०५ या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Monday, June 4, 2012

जेपी ग्रुप आयफा अॅवॉर्ड्स २०१२ च्या विशेष विभागाच्या विजेत्यांची घोषणा

आयफाने २९ मे ला जेपी ग्रुप ऑफ आयफा अॅवॉर्ड्स २०१२ चे विशेष पुरस्कार विजेते घोषित केले. रमेश सिप्पी यांना भारतीय चित्रपट सृष्टीला विशेष योगदान दिल्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात येईल, तर जोहरा सेहगल यांना ‘भारतीय सिनेमाला १०० वर्षांचे योगदान’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. व्हिडीओकॉन आयफा वीकेंडचे आयोजन ७ ते ९ जून २०१२ दरम्यान सिंगापोर मध्ये करण्यात येईल.
अवघ्या नवव्या वर्षी रमेश सिप्पींनी शहनशाह चित्रपटामध्ये अचला सचदेवच्या मुलाची भूमिका साकारून भारतीय चित्रपट उद्योगामध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली, शोले चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून ते सर्वात जास्त सुप्रसिद्ध झाले. सध्या ते भारतीय चित्रपट सृष्टीच्या अत्यंत वरिष्ठ व्यक्तिमत्वांपैकी एक आहेत. अमेरिकन वेस्टर्न प्रकारामध्ये निर्मिती करण्यात आलेला ‘शोले’ हा हिंदी चित्रपट इतिहासाच्या सर्वात सुप्रसिद्ध चित्रपटांपैकी एक आहे. रमेश सिप्पी यांना यावर्षी सिंगापोर मधील आयफा आयोजनामध्ये ‘आऊटस्टँडींग कंट्रीब्युशन टू इंडियन सिनेमा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. रमेश सिप्पी म्हणतात, ” आयफा भारतीय सिनेमाच्या आवाक्याचा विस्तार करण्यामध्ये अग्रगण्य राहिली आहे. तसेच याला भारतीय सीमांपलीकडे घेऊन जाण्यामध्ये यशस्वी राहिली आहे. एका आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सन्मानित केले जाणे, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. याकरता मी आयफाचे आभार मानू इच्छितो. माझ्या कार्याला नावाजण्यात येत आहे. तसेच वास्तविकता माझ्यासाठी ही अत्यंत सन्मानाची बाब आहे.”
याशिवाय, भारतीय अभिनेत्री जोहरा सेहगलला देखील या प्रतिष्ठित समारंभामध्ये सन्मानित करण्यात येईल. या विख्यात नृत्यांगना व अभिनेत्रीला ‘पद्मभूषण’ सन्मानाने नावाजण्यात आले आहे. रंगमंच, चित्रपट व नृत्याच्या क्षेत्रामध्ये जोहराचे करियर शानदार राहिले आहे. भारतीय चित्रपटसृष्टीवरील त्यांचा जादूमय प्रभाव सिंगापोर मध्ये पाहता येईल.
श्री. सब्बास जोसेफ, संचालक, ‘विझक्राफ्ट इंटरनॅशनल एन्टरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ म्हणतात,” आयफाच्या अंतर्गत आम्हाला अशा लोकांना सन्मानित करण्यातकरिता खूपच अभिमान वाटतो आहे , ज्यांनी भारतीय सिनेमाच्या विकासामध्ये आपले जीवन समर्पित केले आहे. या लोकांनी आपल्या उत्साहाने संपूर्ण विश्वभरातील जनतेचे मनोरंजन केले आहे. यांच्या कार्यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीचा विकास झाला आहे. तसेच आम्हाला यांच्या प्रयत्नांना सन्मामित करून अभिमान वाटतो आहे.”

Sunday, June 3, 2012

‘येडा आप्पा’चे चित्रीकरण पूर्ण

Producer Satish More Sunil Tambe with Aashutosh Rana on Yeda Aappa Location  येडा आप्पाचे चित्रीकरण पूर्ण

‘धुडगूस’ चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत यशस्वी पदार्पण करणाऱ्या मैत्र एन्टरटेनमेंट बॅनर अंतर्गत सतीश मोरे, स्नेहा तांबे, गिरीश साळवी, लक्ष्मण साळुंखे आणि आदित्य शर्मा यांची निर्मिती तसेच हनुमानजी रॉक्ज एन्टरटेनमेंटची सहनिर्मिती असलेल्या ‘येडा आप्पा’ चे चित्रीकरण अलिबाग तसेच आजूबाजूच्या परिसरात पूर्ण करण्यात आले. सध्या चहुबाजूंनी मराठी सिनेमाचा बोलबाला आहे. राष्ट्रीय पारितोषिकांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर बरेच मराठी सिनेमे आपला ठसा उमटवत आहेत. मराठी सिनेमांची हीच परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी कटिबद्ध असलेला ‘येडा आप्पा’ हा मराठी सिनेमा तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे.
‘येडा आप्पा’ ही मानसिक दृष्ट्या अपंग असलेल्या एका व्यक्तीची कथा आहे. विक्षिप्त आणि खुनशी व्यक्तीची ही कथा असल्याने चित्रपटात बऱ्याच उत्कंठावर्धक घटनांची गुंफण करण्यात आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन किशोर पांडुरंग बेळेकर यांचे आहे. दिग्दर्शनाबरोबरच किशोर बेळेकरांनी सिनेमाची कथा-पटकथा लिहिली असून संकलनही त्यांचेच आहे. गिरीश साळवी यांनी चित्रपटाचे संवाद लेखन केले आहे. पवन वैद्य या सिनेमाचे कार्यकारी निर्माते आहेत.
बॉलीवूडनंतर तेलुगु सिनेमातही अभिनय केलेला आशुतोष राणा या चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत दाखल होत आहे. ‘येडा आप्पा’ मध्ये आशुतोष शीर्षक भूमिकेत दिसेल. रीमा लागू, किशोरी शहाणे, सतीश पुळेकर, अनिकेत विश्वासराव तसेच इतर काही कलाकारांच्या या चित्रपटात महत्वाच्या भूमिका आहेत.
आजवर बऱ्याच चित्रपटांमध्ये विविध छायालेखकांच्या दृष्टीकोनातून अलिबागचे सौंदर्य रसिकांनी पहिले आहे. ‘येडा आप्पा’चे चित्रीकरणही अलिबागमधील चेऊल, नागाव या ठिकाणी करण्यात आले असले तरी या चित्रपटातील लोकेशन्स यापूर्वी कधीच पडद्यावर आलेली नाहीत. त्यामुळे या चित्रपटात छायालेखक रईस अन्सारींच्या नजरेतून अलिबागचे सौंदर्य प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Saturday, June 2, 2012

'कलाकार'मध्ये भूषण साकारत आहे 'सुपरस्टार'.

Kalakar Marathi Movie, Actor Bhushan Pradhan
आशय पालेकर निर्मित भूषण प्रधान अभिनित 'कलाकार' या चित्रपटाचे चित्रीकरण मंगळवारी मॅक्स स्टोर्स, आर मॉल, ठाणे येथे झाले. 

रंगमंच एन्टरटेन्मेन्ट निर्मित 'कलाकार' या चित्रपटाचे निर्माते आशय पालेकर असून दिग्दर्शक साकार राऊत आहेत. भूषण प्रधान आणि अमृता देशमुख हे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. छोट्या गावातून आलेल्या एका सामान्य तरूणाचा सुपरस्टार पर्यंतचा प्रवास म्हणजे 'कलाकार' चित्रपट होय. सुपरस्टार झालेला हा चित्रपटाचा नायक 'मॅक्स स्टोर्स'चे उद्घाटन करतो असे दृश्य मंगळवारी ठाण्याच्या आर मॉलमधील मॅक्स स्टोर्स येथे पार पडले. सदर दृश्य भूषण प्रधान याच्यावर चित्रीत करण्यात आले. 

चित्रपटाविषयी बोलताना भूषण प्रधान म्हणाला की, माझी वाटचाल ही कुठेतरी कलाकार चित्रपटातल्या नायकासारखीच आहे. ही भूमिका साकारताना खरोखरच एक वेगळा अनुभव आणि आनंद मिळत आहे. 

'कलाकार'चे दिग्दर्शक साकार राऊत चित्रपटाविषयी माहिती देताना म्हणाले की, आपल्या मराठी चित्रपटसृष्टीत उत्तम अभिनेते आहेत. पण सुपरस्टार नाही. बॉलिवुडमधल्या सलमान, शाहरुख, आमिर सारखा सुपरस्टार आपल्याकडे देखील होऊ शकतो, हे या चित्रपटातून दाखविण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.

Friday, June 1, 2012

झपाटलेला पार्ट २

महेश कोठारे यांच्या ‘झपाटलेल्या’ तात्या विंचूने १९९३-९४ मध्ये मराठी सिनेसृष्टीत खळबळ उडवून दिली. तब्बल वीस वर्षांनी हा क्रूर तात्या विंचू परत येतोय. आता तो असेल आणखी ताकदवान, हायटेक आणि थ्रीडीसुद्धा! तात्या विंचू, कुबड्या खवीस अशी सगळी टीम पुन्हा अवतरणार आहे, ती महेश कोठारे यांच्या झपाटलेला पार्ट २ मधून. त्यामुळे महाराष्ट्राला पुन्हा ‘ओम फट स्वाहा’चा भयावह मंत्र ऐकायला मिळणार आहे.
सिनेमाची कथा, पटकथा कोठारे यांचीच असून, अशोक पाटोळे यांचे संवाद आहेत. या चित्रपटासाठी परदेशी तंत्रज्ञांची मदत घेण्यात येतेय तसेच हायटेक लॅबशी करार करण्यात आलाय. या चित्रपटाचा बाहुलाही रामदास पाध्येच बनवणार आहेत. चित्रपट आजच्या काळातला असेल. सर्व तयारी झाल्यानंतर २८ सप्टेंबरला चित्रपटाचं शूट सुरु होईल.
‘झपाटलेला’ला लोकांनी डोक्यावर घेतलं, त्यामुळे त्याचा सिक्वल करताना जबाबदारी वाढलीय. या चित्रपटातून येणारा तात्या हायटेक असेल पण तो पूर्णपणे ग्राफिकल बनवलेला नाही कारण त्याची मजा त्या बाहुल्यात आहे. या चित्रपटातला बाहुला तोच असला तरी त्याच्यावर खूप काम केलं जाईल.
‘झपाटलेला’ मध्ये सर्वात जास्त भाव खाऊन गेला तो लक्ष्मीकांत बेर्डे. तो आज नसल्याची खंत आहेच पण चित्रपटाचं कथानक असं फिरलंय की या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे असणारच आहे. आता तो चित्रपटात कसा येईल ते आपण चित्रपटातच बघू.