Thursday, December 30, 2010

केदार शिंदे छोट्या पडद्यावर दिसणार.

काही काळापासून अशी बातमी कानावर पडतेय की केदार शिंदे छोट्या पडद्यावर अभिनय करताना दिसणार आहे. होय ही बातमी खरी आहे अस केदारनेच मराठीमुव्हीवर्ल्डशी बोलताना कबुल केलं आहे. लवकरच तो 'स्टार प्रवाह' वाहिनीच्या महेश कोठारे आणि त्यांचा मुलगा आदिनाथ कोठारे यांची निर्मिती असलेल्या 'मन उधाण वार्‍याचे'  या मालिकेत एका विशेष भुमिकेत दिसणार आहे. सध्या चर्चेत असलेल्या 'ऑन ड्युटी २४ तास' च्या दिग्दर्शनानंतर थोडासा ब्रेक घेत केदार अभिनयाकडे वळला आहे. 

कॉमेडीच्या परफेक्ट टायमिंगची जाण असलेला एक दिग्दर्शक म्हणून आपण त्याला ओळखतो. केदार्ने याआधी रंगमंचावर अभिनय करुन त्याच्यातल्या अभिनेत्याची ओळख करुन दिली आहे. प्रसिद्ध बॉलिवुड दिग्दर्शक असे म्हणतात की "एक चांगला दिग्दर्शक हा चांगला अभिनेता असावा लागतो". पण ते स्वतः कधी अभिनयाच्या क्षेत्रात उतरले नाहीत. पण केदारने अभिनय करायचं ठरवलं आहे आणि ते सुद्धा दुसर्‍या दिग्दर्शकाच्या दिग्दर्शनाखाली.

'झी मराठी' वर 'एका पेक्षा एक - अप्सरा आली'.

Eka Peksha Ek-Apsara Ali
'झी मराठी' चा लोकप्रिय डान्स रिएलिटी शो 'एका पेक्षा एक' नव्या रुपात 'एका पेक्षा एक - अप्सरा आली' या नावाने प्रेक्षकांसमोर आला आहे. या नव्या पर्वात ९ सुंदर, गुणी आणि प्रसिद्ध अशा अभिनेत्री एकमेकींना टक्कर देणार आहेत. 

मराठी चित्रपट आणि टेलिव्हिजनच्या सध्याच्या आघाडीच्या नायिका या पर्वाच्या स्पर्धक आहेत. त्यामध्ये नेहा पेंडसे, गिरीजा ओक, मृण्मयी देशपांडे, उर्मिला कानेटकर, नेहा जोशी, स्मिता तांबे, आरती सोलंकी आणि सोनाली खरे. ही टक्कर थोडी आणखी रंगतदार व्हावी म्हणून लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा सुद्धा यात सहभाग आहे.

या स्पर्धकांना त्यांच उत्तमोत्तम सादरीकरण करण्यासाठी मयुर वैद्य, फुलवा खामकर आणि दिपाली विचारे या सध्याच्या नावाजलेल्या नृत्यदिग्दर्शकांच मार्गदर्शन  मिळणार आहे. आणि या सगळ्यांच परीक्षण अर्थातच महागुरु सचिन पिळगावकर करत आहेत. पुष्कर क्षोत्री या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करत आहे.

'एका पेक्षा एक - अप्सरा आली' २९ डिसेंबर पासून बुधवार आणि गुरुवार रात्री ९.३० वा 'झी मराठी' वर प्रसारित होणार आहे.

Monday, December 20, 2010

सरत्या वर्षाला सलाम करण्यासाठी चित्रपटांसोबतच नाटकांची मेजवानी.

सुहास जोशी, विक्रम गोखले, महेश मांजरेकर आणि सिद्धार्थ जाधव हे येत्या काही दिवसात मराठी नाट्य रसिकांच्या चर्चेचा विषय असणार आहेत. कारण सुहास जोशी आणि विक्रम गोखले रंगमंचावर जवळपास ३० वर्षांनी एकत्र दिसणार आहेत. महेश मांजरेकरसुद्धा 'मी शारुक मांजरसुंभेकर' या नाटकाद्वारे लेखक आणि दिग्दर्शक या नवीन भूमिकेत आपल्या भेटीला येणार आहे. या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग २९ डिसेंबरला होणार आहे. या नाटकात सागर कारंडे, रुपाली भोसले आणि किशोर रावराणे यांच्या सोबत सिद्धार्थ जाधव प्रमुख भूमिकेत आहे. 

'कथा (द स्टोरी)', ज्यामुळे सुहास जोशी आणि विक्रम गोखले एकत्र दिसणार आहेत, पती पत्नीचे नाजूक नाते खेळकर पद्धतीने आपल्यासमोर आणणार आहेत. या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग २६ डिसेंबरला होणार आहे. डबल रोल मुळे होणारी फुल टु धमाल कॉमेडी 'चेहराफेरी' नाटकातून १८ डिसेंबरपासून पहायला मिळणार आहे. भूषण कडू या मध्ये दुहेरी भूमिका साकारत आहे. त्यासोबत रसिका वेंगुर्लेकर, पूजा चव्हाण आणि दिप्ती मोरे यांच्याही यात भूमिका आहेत. 

नवरा बायकोच्या वयातील अंतर, वेगवेगळा स्वभाव यामुळे होणारी भांडणं आणि उत्तर यांच विनोदी शैलीने कथन करणारं नाटक म्हणजेच 'नवा गडी.. नवं राज्य'.... उमेश कामत, प्रिया बापट, हेमंत ढोमे, उर्जा देशपांडे ही तरुण टीम हे नाटक सादर करणार आहे. प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांच 'घाशीराम कोतवाल' हे नाटक जवळपास ६ वर्षांच्या गॅपने पुन्हा रंगमंचावर येण्यास सज्ज झाले आहे. याचा पहिला प्रयोग १९ डिसेंबरला बालगंधर्व रंगमंदिरात झाला. तसेच 'गुंतता हृदय हे' हे गाजलेले नाटक सुद्धा नव्या टिमसह सज्ज आहे. 

Thursday, December 16, 2010

वर्षअखेरीस अनेक चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज.

Varsh Akheris Anek Chitrapat
गजेंद्र अहिरे यांचा 'समुद्र' प्रदर्शनाच्या वाटेवर असताना नितीन कांबळे यांचा 'चंद्रकला' सुद्धा त्याच दिवशी म्हणजेच १७ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. 'समुद्र' ही एक क्लासिकल लुक असलेली पिरियड फिल्म आहे. कोकणच्या नयनरम्य पार्श्वभूमीवर 'समुद्र'ची प्रेमकथा गुंफण्यात आली आहे. तर 'चंद्रकला' ही कथा आहे  तमाशा फडाची मालकीण आणि तिची मुलगी यांची. तमाशात काम न करण्याचा तिचा निर्णय आणि वेगळं आयुष्य जगण्याच्या धडपडीत समाजाशी केलेला संघर्ष यात मांडण्यात आला आहे. दोन्ही चित्रपट संवेदनशील आहेत यात काही शंका नाही.

'समुद्र' मध्ये नंदा या सुंदर मुलीच्या भूमिकेत सोनाली (नटरंग फेम) सोबत नवोदित अमोघ दिसणार असून 'चंद्रकला' ची भूमिका मेघा घाडगे सोबत विजय चव्हाण यांचा मुलगा वरद चव्हाण पदार्पण करत आहे. दोन्ही चित्रपटांमध्ये अनुभवी सहकलाकार आहेत.

२४ डिसेंबरला प्रदर्शित होणारा 'चल धरपकड' हा एक महिलांवरील अन्यायावर आधारीत चित्रपट आहे. दिग्दर्शक आत्माराम धारणे यांनी महिलांकडून दिल्या जाणार्‍या चॅलेंज मध्ये 'कबड्डी' या खेळाचा वापर केला आहे. ज्यात महिलांच नेतृत्व निर्मिती सावंत करत असून विरुद्ध गटात नागेश भोसले आहे.

पण सर्वात जास्त उत्सुकता असलेला विक्रम गोखले दिग्दर्शित मल्टिस्टारर चित्रपट 'आघात'. हा चित्रपट मेडिकल सायन्सवर आधारीत आहे. आणि बॉलिवुडमधील किरण कुमार सुद्धा या चित्रपटात दिसणार आहेत. तसेच आणखी दोन मल्टीस्टारर चित्रपट 'आयडियाची कल्पना' आणि 'शहाणपण देगा देवा' सुद्धा या वर्षाअखेरीस प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत.

Friday, December 10, 2010

'जन-गण-मन' चित्रपटातील गाण्यासाठी 'गौरव महाराष्ट्राचा' मधील सौरभ वखारे पार्श्वगायन करणार

Ramabai Bhimrao Ambedkar, Ramai, Nisha Parulekar
'ई टिव्ही मराठी' वाहिनीच्या 'गौरव महाराष्ट्राचा' या कार्यक्रमाच्या अंतिम ५ स्पर्धकांमध्ये पोहचलेल्या सौरभला प्रसिद्ध संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांनी २६ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार्‍या 'जन-गण-मन' या चित्रपटामध्ये पार्श्वगायनाची संधी दिली आहे. 

सौरभ वखारे सध्या आठवी मध्ये शिकत आहे. नाशिकमध्ये आयोजित निवड चाचणीत त्याची पुढच्या फेरीसाठी निवड झाली. या कार्यक्रमाच्या एका भागात डॉ. सलील कुलकर्णी स्पर्धकांना मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. व तेव्हाच त्यांना सौरभचा आवाज त्यांना भावला होता. 

'जन-गण-मन' या चित्रपटाचं दिग्दर्शन अमित अभ्यंकर यांनी केलं असून नंदु माधव, मधुरा वेलणकर आणि संतोष जुवेकर यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात एकूण तीन गाणी आहेत. त्यापैकी एक सौरभने गायलं आहे.

Tuesday, December 7, 2010

रमाबाईंवरील चित्रपट हिंदीमध्ये 'डब' होणार

Ramabai Bhimrao Ambedkar, Ramai, Nisha Parulekar
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनावरील "रमाबाई भीमराव आंबेडकर (रमाई)' हा मराठी चित्रपट आता हिंदीमध्ये डब करण्यात येणार आहे. रमाबाईंचे कार्य देशभरात पोचावे याकरिता निर्माते व दिग्दर्शक प्रकाश जाधव यांनी हे पाऊल उचलले आहे. हिंदीतील हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनाच्या निमित्ताने,तीन डिसेंबरला "रमाबाई भीमराव आंबेडकर' हा चित्रपट मराठवाड्यासह मुंबईत प्रदर्शित झाला आहे. मराठीतील या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाल्यामुळे,निर्माते व दिग्दर्शक प्रकाश जाधव यांनी या चित्रपटाचे हिंदीतील डबिंग पूर्ण केले आहे. 

"रमाबाई भीमराव आंबेडकर' याच नावाने हा चित्रपट इतर राज्यांत  प्रदर्शित केला जाणार आहे.   रमाबाई बाबासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्या. त्यांचे जीवन खूप खडतर आणि कष्टप्रद होते. आतापर्यंत बाबासाहेबांवर बरेच हिंदी-मराठी चित्रपट आले; परंतु रमाईंचे कार्य जनतेसमोर यावे या उद्देशाने  निर्मात्याने हा चित्रपट बनविला आहे. आता तो जगभरात जावा म्हणजे रमाईंचे कार्य सगळ्यांना समजावे, याकरिता  हिंदी भाषेत हा चित्रपट बनविला जात आहे. 

मराठी भाषेतील हा चित्रपट आतापर्यंत वर्षा गायकवाड, प्रवीण दरेकर, रामदास आठवले अशा काही राजकीय मंडळींनी पाहिलेला आहे आणि त्यांनी त्याचे भरपूर कौतुक केले आहे. प्रवीणदरेकर यांनी एक लाख रुपयांचा धनादेश या चित्रपटाला मदत म्हणून दिला आहे. विश्‍वनाथ तायडे यांनी दीड लाख रुपयांची मदत केली; तसेच वर्षा गायकवाड आणि रामदास आठवले यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्‍वासन दिले आहे. 

Monday, December 6, 2010

स्टार प्रवाह घेऊन येत आहे भांडा सौख्य भरे

Bhanda Saukya Bhare, Prasad Oak
खूप वर्षापासून चालत आलेल्या सासू सुनांमधील संबध हे अद्वितीय आहे. त्यांच्या या नात्यामधील गमती जमती आणि विनोद सगळ्यांना परिचयाचे आहेत कधी सासू आपल्या सुनेपेक्षा स्वताला सरस ठरविण्याचा प्रयत्न करते तर कधी सून आपणच योग्य असे ठरविते. त्यांच्या या नात्यावर खूप कार्यक्रम निघाले आहेत. असाच एक मनोरंजक कार्यक्रम 'भांडा सौख्य भरे' स्टार प्रवाह वर चालु झाला आहे.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकार प्रसाद ओक हे करत आहेत.  हया कार्यक्रमामध्ये आपली आई मुलाला किती ओळखते किवा बायको आपल्या पतीला किती समजते, हे पाहायलामिळेल. दोघींची एक दुस्यांशी तीन भागात लढाई होणार आहे. दर्शनो मीटर, शपत राउंड आणि किचन राउंड हया तीन भागात विभागणीझाल्याने हया कार्यक्रमालावेगळाच रंग चढेल.

स्टार प्रवाहाच्या प्रोग्रामिंग प्रमुख श्रावणी देवधर सांगतात की हा कार्यक्रम बघताना तुम्ही तुमच्या घरातील भांडण विसरून हया कार्यक्रमामधीलभांडण बघत बसाल. कारण हया भांडणामध्ये एक प्रेम आहे, आपलेपणा आहे. हे प्रेम तुम्ही कोणत्याही मापामध्ये मापु शकत नाही. हे पाहताना तुम्ही खूप आनंदी व्हाल. हा कर्यक्रम ६ डिसेंबर पासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी ६.३० वाजता स्टार प्रवाहवर पहाता येइल. 

'आटापिटा' १० डिसेंबरला प्रदर्शित होणार.

Aatapita Releasing
'समर्थ आर्ट'ची निर्मिती असलेला 'आटापिटा' १० डिसेंबर २०१० रोजी विदर्भ वगळता महाराष्ट्रातील ७०-८० सिनेमा गृहात एकाच वेळी प्रदर्शित होणार आहे. भरत जाधव आणि संजय नार्वेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन उत्तुंग शेलार यांनी केलं आहे. 

या शिवाय या चित्रपटात अश्विनी आपटे, गिरीश साळवी, प्रदीप काब्रे, प्रतिभा गोरेगावकर, राजू शिसडकर, संतोष पाटील, राहुल कुलकर्णी, रोहन भालेकर, प्रदीप डोईफोडे, निखिल खैरनार आणि सतिश पुळेकर यांच्या भुमिका आहेत. भुषण पाटील, दिपाली सामंत आणि आचल राणे यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे संवाद 'कॉमेडी एक्स्प्रेस' फेम प्रशांत लोके यांनी लिहिले आहेत. गिरीश साळवी यांच्या गीतांना संजीव कोहली यांनी संगीतबद्ध केलं आहे. प्रसाद भेंडे यांनी छायाचित्रण केलं आहे.

Wednesday, December 1, 2010

सिया पाटील 'वारस' या मालिकेत.

Siya Patil In Waras
सिया  पाटील हे नाव दूरचित्रवाणीच्या क्षेत्रात अगदी नवं आहे. मात्र चित्रपट रसिकांना सिया ओळखीची आहे.  अलिकडच्या काही  चित्रपटांमधून  झळकलेली  सिया छोट्या पडद्यावर प्रथमच झळकतेय, ती  झी  मराठीवर  लवकरच दाखल  होणार्‍या 'श्री सिद्धिविनायक चित्र' च्या 'वारस' या मालिकेद्वारा. अत्यंत संवेदनशील कथा असलेल्या 'वारस' मध्ये सिया मध्यवर्ती भूमिकेत आहे. 

तिचा 'नवरा अवली बायको लवली' हा चित्रपट प्रदर्शित  झाला आहे. तसेच तिचे अजून ५ चित्रपटप्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. तिने एम कॉम पर्यंत शिक्षण घेतले असून कॉलेज मध्ये असताना तिने अनेक नाटकामधून, कॉलेज फेस्टिवल्स मधून कामं केली आहेत. 

'वारस' ही आई मुलाच्या हळुवार नात्याची अतिशय  संवेदनशील कथा आहे.  येत्या ६ डिसेंबर पासून ही मालिका सोमवार ते शनिवार सायंकाळी ६.३० वाजता झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येईल. 'वारस' ही 'श्री सिद्धिविनायक चित्र'ची निर्मिती असून खलील हेरेकर हे या मालिकेचे दिग्दर्शक आहेत. नरेश बोर्डे या मालिकेचे निर्माते आहेत. वारस मध्ये सियाबरोबर आदित्य वैद्य, उदय टिकेकर, मुग्धा गोडबोले, विलास उजवणे, श्रीकांत देसाई असे अनेक नावाजलेले कलाकार आहेत.  

Tuesday, November 30, 2010

'पोपटपंची' या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग ४ डिसेंबरला.

Popatpanchi Marathi Natak
'मॅजिक वॉल' या बॅनरखाली निर्माते विक्रम वाटवे आणि प्रदीप मुळ्ये यांनी 'पोपटपंची'  या आपल्या नाटकाचा पहिला शो ४ डिसेंबर २०१० रोजी आयोजित केला आहे. या नाटकात प्रसिद्ध कलाकार न दिसता नविन चेहरे दिसणार असल्याचं नाटकाचे दिग्दर्शक शफाहत खान यांनी प्रभादेवी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. 

'पोपटपंची' या दोन अंकी नाटकात किशोर चौघुले, मंगेश साळवी, सुदेश म्हाशीळकर, रसिका आगशे, योगिनी चौक, प्रज्ञा शास्त्री, रुपेश जाधव, प्रविणकुमार डाळींबकर, सिद्धेश शेलार आणि पुर्णानंद वांडेकर अशा टॅलेंटेड कलाकारांचा अभिनय पहायला मिळणार आहेत. यापैकी बर्‍याच जणांनी प्रसिद्ध अशा अभिनय संस्थेतून प्रशिक्षण घेतले आहे. या आगळ्या वेगळ्या नाटकाला राहुल रानडे यांच संगीत आहे.

Monday, November 29, 2010

पालक आणि पाल्य या दोघांसाठी 'चला वेळ काढूया'.

Chal Vel Kadhuya
सुप्रसिद्ध वास्तुशास्त्रज्ञ रेकितज्ञ मोहन गोखले यांनी 'चला वेळ काढूया' या नाटकाची निर्मिती केली आहे. नोकरी करणारे पालक आणि एकटा असलेला पाल्य या विषयावर भाष्य करणारे हे नाटक आहे. पालक आणि पाल्य दोघांनाही या नाटकातून संगीत नृत्य व विनोद यांच्यामार्फत मनोरंजनातून शिकवण देण्याचा प्रयत्न केला आहे. 

या नाटकाचे दिग्दर्शन विजय भालेराव यांनी केले आहे. शिल्पा पटवर्धन यांनी यशवंत देव यांच्या मार्गदर्शनाखाली संजय आंग्रे यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे. प्रशांत सावंत आणि अनुराधा अष्टिकर हे या नाटकाचे निर्मिती प्रमुख आहेत. पंकज पेडणेकर, विनायक तळेकर, सतिश शेळके, उमेश के. के. सिद्धेश गुरव, प्रशांत दाभोळकर, रोशन आतवणकर, गीता बर्वे, मोहन गोखले या कलाकारांच्या यात प्रमुख भूमिका आहेत.

Saturday, November 27, 2010

लोकशाहीर विठ्ठल उमप कालवश.

Lokshair Vitthal Umap
लोकगीते, पोवाडे, भारुडे तसेच ५०० हून अधिक नाटकांच्या जोरावर मराठमोळया रसिकांवर मोहिनी घालणारे लोकशाहीर विठ्ठल उमप यांचे शुक्रवारी २६ नोव्हेंबरला हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 'लॉर्ड बुद्धा' वाहिनीच्या लोकार्पण सोहळ्यासाठी दीक्षाभूमीवर आले होते. व्यासपीठावर त्यांना भोवळ आल्याने रुग्णालयात हलविण्यात आले; परंतु तो पर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली. 

त्यांचे 'फु बाई फु' हे आणि 'ए दादा हावर रे' ही कोळीगीते आजही प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहेत. अस्सल गावरान गोडवा असलेला त्यांच्या पहाडी आवाज सर्व मराठी रसिकांच्या कायम लक्षात राहिल. लोककलेसोबतच त्यांनी काही चित्रपटांतूनही काम केले आहे. 'सुंबरान' ह्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटात त्यांनी रवि काळेंच्या वडिलांची भूमिका केली आहे. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी
लोककलेसाठी योगदान दिलं.  

Friday, November 26, 2010

अलका कुबल - आठल्ये यांची निर्मिती असलेला 'अग्निपरीक्षा' २६ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित.

Alka Kubal in Agnipariksha
प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल- आठल्ये 'शुभलक्ष्मी' या बॅनरखाली 'सुहासिनीची ही सत्त्वपरीक्षा' ह्या आपल्या पहिल्या चित्रपटानंतर आता 'अग्निपरीक्षा'  ह्या  चित्रपटाची निर्मिती करत आहेत. त्यांची बहिण शिल्पा मसूरकर ही या चित्रपटासाठी सहनिर्माती आहे. 

या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिल सुर्वे यांनी केले आहे. श्रद्धा भणगे यांची कथा असून पटकथा व संवाद श्रीनिवास भणगे यांनी लिहीले आहेत. छायांकन समीर आठल्ये यांचे आहे. संजय नार्वेकर, मोहन जोशी, रमेश भाटकर, विजय चव्हाण, गणेश यादव, सुरेखा कुडची, सविता मालपेकर व संजय खापरे यांच्या या चित्रपटात भूमिका आहेत.

Monday, November 22, 2010

'सत्या' थ्रिलर कॉमेडी लवस्टोरी.

निर्माता आणि अभिनेता किशोर गायकवाड आणि दिग्दर्शक नितिन कांबळे या दोन युवकांनी के. आर. जी. क्रिएशन्स या बॅनरखाली 'सत्या' या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. नुकताच या चित्रपटाच्या अखेरच्या सत्राचं चित्रीकरण मुंबईतील फिल्मसिटी, गोरेगाव येथे संपन्न झालं.

'सत्या' चित्रपटापासून प्रतहमच रुपेरी पडद्यावर पदार्पण करणारा किशोर गायकवाड सत्याची अग्रेसिव्ह व तडफदार भूमिका साकारत आहे. त्याच्या सोबत त्याला साथ देत आहेत प्रसाद ओक, शरद पोंक्षे, सारा श्रवण , अभिजीत चव्हाण, सतिश तारे, अश्विनी एकबोटे, सुनिल तावडे आणि बर्‍याच कॉलेज तरुण तरुणींचा यात समावेश आहे.

Saturday, November 20, 2010

'येडपाट गाव' वेडया गावची शहाणी कथा.

बी. बी. फिल्मस च्या बॅनरखाली निर्माते शाम भोईर व दिग्दर्शक एस. विक्रम यांच्या 'येडपाट गांव' या धमाल मराठी चित्रपटाचा मुहुर्त नुकताच चांदवली स्टुडिओ येथे चित्रपटातील अनेक कलाकार व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. 

या चित्रपटात मोहन जोशी, दिपक शिर्के, मिलींद गुणाजी, उषा नाडकर्णी, आशालता वाबगावकर, निशा परुळेकर, किशोर नांदलस्कर, सदाशिव अमरापुरकर, दिपा चाफेकर, ट्विंकल भामरे, अजय सिंग, दिपक सावंत, राजन भोईर, राणू पाटोतकर आणि दक्षिणात्य विनोदवीर बजरंग बादशहा यांच्या यात प्रमुख भुमिका आहेत. या सिनेमाचे चित्रीकरण मुंबई, नवी मुंबई व सातारा येथे सलग सत्रामध्ये होणार असून जानेवारी मध्ये हा चित्रपट संपूर्ण महराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Wednesday, November 17, 2010

'कशाला उद्याची बात' चित्रपटाचा मुहूर्त संपन्न.

'साई प्रसाद मीडिया प्रा. लि.' या बॅनरखाली तयार होणार्‍या 'कशाला उद्याची बात' ह्या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पुण्यात पार पडला. मराठी सोबत हिंदीमध्ये सुद्धा हा चित्रपट 'छोडो कलकी बाते' या नावाने प्रदर्शित करण्यात येणार आहे. सचिन खेडेकर, अतुल परचुरे, मृणाल कुलकर्णी यांच्यासोबतच अनुपम खेर एक विशेष भूमिकेत मराठी चित्रपटात प्रथमच दिसणार असून प्रमोद गजानन जोशी यांनी या दोन्ही भाषांतील चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 

चित्रपटाच्या चित्रीकरणास लवकरच सुरुवात होणार असून. संदिप खरे यांनी चित्रपटाची गीते लिहिली असून डॉ. सलील कुलकर्णी यांनी संगीत दिले आहे. सलील सहस्त्रबुद्धे यांनी या दोन्ही चित्रपटांच्या छायाचित्रणाची बाजू सांभाळली आहे.

चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी स्पर्धेचे आयोजन.

केदार शिंदे दिग्दर्शित आगामी चित्रपट "ऑन ड्युटी २४ तास"तर्फ़े एक अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ज्यामध्ये तुम्हाला २ मिनिटांच्या ध्वनिफ़ितीवर एक पोलिसांवर आधारित चित्रफ़ित तयार करायची आहे. 

स्पर्धेतील सर्वोत्तम १० चित्रफ़ितींमधून सिनेमा क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती एकास विजेता म्हणून घोषित करतील. विजेत्या चित्रफ़ितीला केदार शिंदे यांच्या आगामी चित्रपट "ऑन ड्युटी २४ तास"च्या नामावली दरम्यान दाखविण्यात येईल तसेच विजेत्याच्या नावाचाही त्या नामावलीमध्ये समावेश करण्यात येणार आहे.         

३० नोव्हेंबर ही प्रवेशाची अंतिम तारीख असून त्या नंतर कोणाचाही प्रवेश ग्राह्य धरण्यात येणार नाही. इच्छुक स्पर्धकांनी ध्वनिफित आणि फॉर्म साठी kedar.onduty24@gmail.com वर संपर्क साधावा.

Thursday, November 11, 2010

निर्माते नितीन देसाई यांच्या 'बालगंधर्व' चित्रपटाचा संगीतमय वातावरणात मुहूर्त.

निर्माते नितीन देसाई यांनी 'बालगंधर्व' चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त 'बालगंधर्व रंगमंदिर' मध्ये संगीतमय आणि अत्यंत राजेशाही अशा वातावरणात पार पडला. पारंपारिक नांदीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. गंधर्व युगाचे साक्षीदार, त्यांच्या आवाजाच्या जादूने मोहविलेल्या पुणेकरांबरोबरच नाट्य क्षेत्रातील अनेक दिग्गजांची मांदियाळी होती. ज्येष्ठ अभिनेत्री जयमाला शिलेदार, गायिका अभिनेत्री किर्ती शिलेदार, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, संभाजीराजे भोसले, दाजीकाका गाडगीळ, अभिनेत्री लता शिलेदार्-भोगले, नितीन देसाई, गायिका शैला दातार, रोटरी क्लबचे पदाधिकारी शैलेश टिळक, बालगंधर्वांच्या अनेक वस्तूंचे जतन करणारे मुकेश नारंग याची उपस्थिती या कार्यक्रमास लाभली. तसेच चित्रपटातील कलाकार सुबोध भावे, विभावरी देशपांडे, अभिराम भडकमकर, कौशल इनामदार, आनंड भाटे, रवी जाधव आदींची यावेळी रसिकांशी ओळख करुन देण्यात आली. 

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात शैला दातार व सहकार्‍यांनी संगीत मैफल सादर केली. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले.

Tuesday, November 2, 2010

'सुंबरान' चित्रपटाच्या संगीताचे अनावरण.

विख्यात दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या हस्ते अष्टपैलू दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांची सुरेल कलाकृती संबरान.. सोनेरी दिवसाच्या सोनेरी आठवणी, या चित्रपटाची पहिली झलक व संगीत प्रकाशन नुकतेच पार पडले. मराठी सिनेजगतातील नामांकित तारे तारकांच्या समक्ष नंदेश उमप, अजित परब, शान यांनी सुंबरान मधील गाणी सादर करीत सगळ्यांची मने जिंकली. सागरिका म्युझिक प्रा. लि. यांनी सुंबरानचे संगीत प्रकाशित केले आहे.

सुंबरान मध्ये एकूण पाच गाणी आहेत. राहुल रानडे यांनी त्यांच्या कौशल्याने रॉक, जॅझ आणि लोकगीत अशा वेगळ्या संगीत प्रकारांची खुप सुंदर सांगड घातली आहे. 'सुंबरान....... सोनेरी दिवसांच्या सोनेरी आठवणी' हा चित्रपट १९ नोव्हेंबर २०१० रोजी प्रदर्शित होण्यास सज्ज आहे.

Saturday, October 30, 2010

'धो धो पावसातली वन डे मॅच' व 'व्हेकेशन' २९ ऑक्टोबरला प्रदर्शित.

नवनव्या विषयांची रेलचेल, प्रेक्षकांची बदलती अभिरुची या आणि अशा अनेक गोष्टींमुळे मराठी चित्रपट उद्योगात सध्या नाविन्यपूर्ण प्रयोग होताहेत. असाच एक वेगळा प्रयत्न 'धो धो पावसातली वन डे मॅच या अनोख्या शीर्षकासह आकारास आला आहे. मानवी मनाचे, आचार - विचारांचे विविध कंगोरे रेखाटण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.

'धो धो पावसातली वन डे मॅच' या चित्रपटाची निर्मिती 'कटिंग चाय प्रॉडक्शन' बॅनरखाली करण्यात आली आहे. विनायक कारंजकर यांची निर्मिती आणि अभिजीत सावंत यांची सहनिर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कांबळे यांनी केले आहे. कथा- पटकथा-संवाद व गीते स्वप्निल व जन्मेजय यांनी लिहीली आहेत. स्वप्निल बांदोडकर, साधना सरगम यांनी गायलेल्या चित्रपटातील गीतांना संगीत राजेश सावंत यांनी दिले असून पार्श्वसंगीत महेश नाईक यांचे आहे. छायाचित्रण अनिकेत के. तर कला दिग्दर्शन अनिल वाठ यांचे आहे. २९ ऑक्टोबरला मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये प्रदर्शित झाला आहे.

तर दुसरा आहे  अर्थपूर्ण विषय, आशयगर्भ कथानक, कलावंतांची उत्तम जोड असणारा 'श्रीपंत प्रॉडक्शन' प्रस्तुत 'व्हेकेशन' हा चित्रपट. नेहा प्रशांत गोखले यांनी निर्मिलेला हा चित्रपट मैत्री या नात्याचा सखोल मागोवा घेणारा आहे. दिपक तारकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 

या चित्रपटामधून विकास पाटील, गौरी सुखटणकर, किर्ती मेहेंदळे आणि निशा शहा या नवोदित कलावंतांनी पदार्पण केले आहे. त्यासोबत सतीश पुळेकर, आनंद अभ्यंकर, श्रीकांत देसाई, के. वृषाली, अश्विनी एकबोटे, रुपाली भोसले, विघ्नेश जोशी, गजानान गोखले, भारत गणेशपुरे, ज्योती जोशी यांच्या भूमिका असून स्मिता तांबे व संतोष जुवेकर हे पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहेत.

Thursday, October 28, 2010

'दुभंग' चित्रपटाचा मुहूर्त संपन्न.

'साई शंकर फिल्मस' प्रस्तुत,  शंकर मितकरी निर्मित 'दुभंग' या महेश कोठारे यांचे अनुभवी दिग्दर्शन असणार्‍या कौटुंबिक चित्रपटासाठी कैलाश खेर यांनी पार्श्वगायन केले आहे.

दसर्‍याचे निमित्त साधून 'दुभंग' या चित्रपटाचा मुहूर्त हिंदीतील सुप्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी गायलेल्या शीर्षक गीताने करण्यात आला. श्रीरंग गोडबोले यांनी लिहिलेल्या या गीताला संगीतकार बापी-तुतूल यांनी संगीतबद्ध केले आहे. महेश कोठारे दिग्दर्शित या चित्रपटात आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Friday, October 22, 2010

स्टार प्रवाहवर 'तुझविण सख्या रे'.

अग्निहोत्र, मन उधाण वार्‍याचे, ओळख आणि स्वप्नांच्या पलिकडले तसेच झुंज सारख्या मालिका पेश करणारी, स्टार एन्टरटेन्मेंट मीडिया प्रा. लि. ची स्टार प्रवाह ही मराठी जनरल एन्टरटेन्मेंट वाहिनी आता आपल्या लाडक्या प्रेक्षकांसाठी एक मन हेलावून टाकणारी रोमँटिक कहाणी सादर करीत आहे - 'तुझविण सख्या रे.'  

या मालिकेमध्ये सतीश पुळेकर, कादंबरी कदम, गौरव घाटणेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या मालिकेसाठी मराठी चित्रवाणीच्या इतिहासात प्रथमच परदेशी लोकेशन्सवर आणि एवढया भव्य प्रमाणात चित्रीकरण करण्यात आलेले आहे.

अश्विनी महांगडेचा नवा प्रयोग 'नशीबवान बाईचे 'दोन'.......'

नाटक, सिनेमा वा कोणताही कलाविष्कार म्हट्ल तरी तो समाजाचे प्रतिबिंबच म्हणायला हवा, कारण आपल्या समाजात  आसपास घडणार्‍या घटनाच त्यातून परिवर्तीत होत असताना दिसतात. असाच एक वास्तववादी, हृदयस्पर्शी आणि मनाला चटका देणारा नाट्यप्रयोग - 'नशीबवान बाईचे 'दोन'....' अश्विनी महांगडे ही अभिनेत्री साकारत आहे.

अश्वेंद्र निर्मित हे नाटक संदीप माने यांनी दिग्दर्शित केले आहे. या नाटकाचे मुळ लेखक अल्फेड फराग, कैरो, इजिप्तचे आहेत. 

Thursday, October 21, 2010

'गिनीज बुक रेकॉर्डच्या प्रतीक्षेत 'अगडबम'.

 
चित्रपटाच्या सादरीकरणापासून चित्रपटाच्या प्रमोशनपर्यंत प्रत्येक गोष्टीत चर्चेत असलेला आणि नुकताच प्रदर्शित झालेला 'आर. के. एन्टरटेनमेंट' बॅनरचा 'अगडबम' चित्रपट खर्‍या अर्थाने प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात यशस्वी ठरला आहे. या चित्रपटात प्रोस्थेटिक मेकअपमध्ये तब्बल २६ तास काम केल्याबद्द्लची नोंद 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'च्या माध्यमातून जागतिक स्तरावरही घेतली जावी, यासाठी चित्रपटाची निर्मिती -अभिनेत्री तृप्ती भोईर प्रयत्नशील आहे. तसे झाल्यास गिनीज बुकमध्ये नोंद होणारा हा पहिलाच मराठी चित्रपट ठरणार आहे.

तृप्ती भोईरने स्वतःच्या वजनाच्या चारपट वजनाची साकारलेली 'नाजुका'ची भूमिका प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली आहे. अशा हेवी मेकअपमध्ये तृप्ती यांनी चित्रपटातील एका गीताच्या नृत्यासाठील हान मुलांसोबत सलग २६ तास काम केले आहे. अनिल पेमगिरीकर यांनी 'अगडबम' मधील तृप्ती भोईर यांचा मेकअप केला आहे. 'अगडबम' चित्रपटाचे नाव जर गिनीज बुकमध्ये नोंदवले गेले तर मराठी सिनेसृष्टीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.

Wednesday, October 20, 2010

'कस' २२ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला.

महेश सातोस्कर (कनक चित्र) निर्मित आणि दिपक कांबळे ( स्नेहा प्रॉडक्शन प्रा.लि.) प्रस्तुत 'कस' २२ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन महेश सातोस्कर यांच्यासह अरुणा जोगळेकर यांनी केले आहे. आरती प्रभू व सुधीर मोघे यांचे शब्द आणि पं हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीताने नटलेल्या 'कस' चित्रपटात राधा मंगेशकर, स्वप्नील बांदोडकर आणि आशा भोसले यांनी गायन केले आहे. छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये ठसा उमटविणार्‍या भार्गवी चिरमुले हिची मध्यवर्ती भूमिका असलेला हा पहिलाच चित्रपट आहे. शिवाय राधा मंगेशकर हिने सुद्धा या चित्रपटाद्वारे तिच्या पार्शवगायन वाटचालीस सुरुवात केली आहे. 

या चित्रपटात भार्गवी चिरमुले सोबत. प्रसाद ओक, राजेश शृंगारपुरे, निलम शिर्के, माधव अभ्यंकर, विद्या पटवर्धन, आनंद अभ्यंकर आदि कलाकारांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटात दिवंगत अभिनेते चित्तरंजन कोल्हटकर यांनी ही विशेष भूमिका साकारली आहे.

Sunday, October 17, 2010

कविवर्य नारायण सुर्वे यांचे निधन.

कविवर्य नारायण सुर्वे (वय ८३) यांचे सोमवारी दिनांक १६ ऑगस्ट रोजी सकाळी  साडेआठच्या सुमारास ठाण्याच्या हेल्थकेअर रुग्णालयात निधन झाले. १९२६-२७ मध्ये मुंबईतील गंगाराम सुर्वे यांनी त्यांना आपल्या घरी आणले. त्यांचे आयुष्य संघर्षमय होते. १९६१ मध्ये शिक्षक म्हणून त्यांची नोकरी सुरु झाले व गिरणगावचे 'सुर्वे मास्तर' म्हणून त्यांना लोक ओळखू लागले. १९६६ मध्ये तयंचा 'माझे विद्यापिठ' हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला.

१९९८ साली त्यांना पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 'जाहिरनामा', 'ऐसा ग मी ब्रह्म', 'सनद', 'माणूस कलावंत आणि समाज' हे त्यांचे काही प्रसिद्ध काव्यसंग्रह आहेत.

Saturday, October 9, 2010

लवकरच महाराष्ट्रात 'भैरु पैलवान की जय हो!'

महाराष्ट्राच्या तांबडया मातीला कुस्तीची फार मोठी परंपरा लाभली आहे. प्रचंड श्रद्धा आणि मनगटातील ताकद यांच्या जोरावर कमावलेलं शरीर घेऊन एखादा बलदंड पैलवान जेव्हा आखाडयात उतरतो तेव्हा पाहणार्‍यांच्या डोळ्यांच पारणं फिटलं नाही तर नवलच! महाराष्ट्रातील कुस्तीच्या याच गौरवशाली परंपरेच्या पार्श्वभूमीवर 'सागर बरसेरिया मोशन फिल्म प्रा.लि.' बॅनरखाली 'भैरु पैलवान की जय हो!' हा मराठी चित्रपट तयार झाला आहे. डॉ. अनिल सक्सेना निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रविण राजा कारळे यांनी केले आहे. १५ ऑक्टोबरला 'भैरु पैलवान की जय हो!' हा चित्रपट पश्चिम महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

चित्रपटाचे आकर्षण म्हणजे प्रेक्षकांचा लाडका अभिनेता सिद्धार्थ जाधव भैरु पैलवानाच्या भूमिकेत दिसणार आहे. उत्तम कथाबीज, अनुभवी तंत्रज्ञ आणि कलाकारांच्या उत्स्फुर्त अभिनयांचा मिलाप असलेला 'भैरु पैलवान की जय हो!' हा कुस्तीपट ७० एम एम च्या पडद्यावर पाहणे प्रेक्षकांसाठी उत्कंठा वाढविणारा अनुभव ठरणार आहे. १५ ऑक्टोबरला पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, कोल्हापूर तसेच नाशिक, औरंगाबाद येथे प्रदर्शित होणारा हा चित्रपट १५ ऑक्टोबरला पुणे आणि  महाराष्ट्राच्या इतर भागात तर ५ नोव्हेंबरला मुंबईमध्ये प्रदर्शित होणार आहे.

 

Tuesday, September 28, 2010

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोयं 'संसाराची माया'.

'२१ न्यु सेंचुरे फिल्म्स' अंतर्गत पूनम झांवर यांनी 'संसाराची माया' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये लोकप्रिय असलेल्या पूनम झांवर यांची ही पहिलीच मराठी निर्मिती असून दिपक कदम यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 'एका लग्नाची गोष्ट', 'अशी ही फसवा फसवी' आणि 'भंडारा प्रेमाचा' या चित्रपटांच्या यशानंतर दिग्दर्शक दिपक कदम यांनी 'संसाराची माया' या चित्रपटाद्वारे आणखीन एक वेगळा विषय हाताळला आहे. या चित्रपटामध्ये योगेश महाजन, मैथिली जावकर, उमेश ठाकूर, महेश कोळी, दीपज्योती नाईक, स्नेहल विलणकर, अक्षिता, स्वप्नील राजशेखर, संजय कसबेकर, कोमल आपके, अभिजीत कुलकर्णी आणि नैना कर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Monday, September 27, 2010

'एक दिवसाची सुहासिनी' चित्रपटाचा मुहूर्त संपन्न......

हिना फिल्म्स, सुयोग म्युझिक फिल्म्स, प्रकाश प्रोडक्शन निर्मित 'एक दिवसाची सुहासिनी' या मराठी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच मोठया दिमाखात पार पडला. धनाजी पाटील, प्रकाश पाटील, प्रदीप वाघमारे निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीनाथ पाटील आणि स्वप्निल म्हात्रे करत आहेत. चित्रपटाचे सहनिर्माते सदाकत चौधरी, प्रदीप मोकाशी, वंदना कांबळे, राजा (भाऊ) चव्हाण आहेत.

चित्रपटाची कथा विनोद कांबळी यांची असून चित्रपटात अशोक शिंदे, जयराज नायर, मानसी पाठारे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाची विशेष बाब म्हणजे या मराठी चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध स्टंट, पर्सनल बॉडी ट्रेनर आणि अभिनेता गेविन पुनरागमन करतोय.

Saturday, September 18, 2010

'मी सिंधूताई सपकाळ' आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात.

बॉलिवूडमधले दिग्दर्शक अनंत महादेव यांनी दिग्दर्शित केलेल्या  'मी सिंधूताई सपकाळ' या मराठी चित्रपटाची आगामी लंडन फिल्म फेस्टीव्हल आणि एशियन फिल्म फेस्टीव्हलसाठी निवड झाली आहे. समाज सेविका सिंधूताई सपकाळ यांच्या ऑटोबायोग्राफी 'मी वनवासी' वर आधारीत हा चित्रपट परदेशी प्रेक्षकांचे मन नक्की जिंकेल.

या दोन महोत्सवात सादरीकरण झाल्यानंतर हा चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. बिंदीया खानोलकरांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाला अशोक पत्की यांचे संगीत आहे. या चित्रपटात तेजस्विनी पंडीत, उपेंद्र लिमये आणि नीना कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Friday, September 17, 2010

एक आगळा वेगळा 'बोकड' चित्रपटसृष्टीत दाखल होणार.

bokad
वाई तालुक्यातील सुप्रसिद्ध उद्योगपती अनिल देव आणि वाईचेच कॅमेरामन मनु सावंत चित्रपटसृष्टीत निर्माते म्हणून पदार्पण करीत आहेत. या दोन वाईकरांनी हेमा फिल्म्सच्या बॅनरखाली 'बोकड' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. यावेळी वाईचे आमदार मकरंद (आबा) पाटील यांनी मुहुर्ताचा नारळ वाढविला व क्लॅप दिला. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रविण राजा कारळे यांनी केले आहे. 

चित्रपटात एकूण २४ गाणी आहेत. चित्रपटाची कथा या गाण्यातून घडून जाते. अशोक बागवे यांनी लिहिलेल्या गीतांना अवधुत गुप्ते यांनी संगीत दिले आहे. स्वतः अवधूत गुप्तेर, स्वप्निल बांदोडकर, स्वानंद किरकिरे, अमृता सुभाष व जान्हवी यांनी या गीतांना आवाज दिला आहे. 

'बोकड' मध्ये सयाजी शिंदे, किशोर कदम, विनय आपटे, प्रिया बेर्डे, अमेय वाघ, राहून साळवे, उदय सबनीस, शरद पोंक्षे, मेघा घाडे आणि मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि महाराष्ट्रात ऑडिशन घेऊन या महाराष्ट्रातील विविध २० कॉलेजची मुलंमुली यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. लवकर या चित्रपटाच चित्रिकरण वाई व मुंबईत होणार आहे. 

Tuesday, September 14, 2010

तृप्ती भोईरचा आगळा वेगळा प्रयत्न - 'अगडबम'.

Trupti Bhoir, Agadbam
'अगडबम' या आपल्या आगामी चित्रपटात अभिनेत्री आणि निर्माती तृप्ती भोईर हिने चित्रपटाच्या कथानकानुसार संपूर्ण चित्रपटात प्रोथेस्टिक मेकअप मध्ये वावरण्याचा एक वेगळाच पराक्रम केला आहे. १ ऑक्टोबर रोजी तिचा 'अगडबम' हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. 

प्रोस्थेटिक मेकअपचा वापर कमल हसन व अनिल कपूर या कलावंतांनी आत्तापर्यंत केला आहे. या मेकअपसाठी बाहेरच्या देशातून मेकअपमन मागविण्याची पद्धत आहे. पण तृप्तीने आपल्या मराठी मेकअपमनच्या मदतीने हे साध्य करुन दाखविले आहे. संपूर्ण चित्रपटात एका गलेलठ्ठ मुलीची भूमिका ती करत आहे जी लग्नासाठी तयार आहे. 

एक धमाल फँटॅसी म्हणून प्रेक्षक ह्या चित्रपटाकडे पाहणार आहेत, मात्र तृप्तीला या चित्रपटाद्वारे एक वेगळाच विक्रम नोंदवायचा आहे. 'मला बर्‍याच जणांनी हा चित्रपट हिंदीमध्ये करण्यास सांगितले होते, पण माझी इच्छा होती की हा चित्रपट मराठीतच व्हावा. कारण इतरांनीसुद्धा हा मराठी चित्रपट पहावा हीच माझी इच्छा. गरज लागल्यास पुढे हिंदीत डब करु." असे तृप्तीने मराठीमुव्हीवर्ल्डशी बोलताना सांगितले.