भिन्न रुची बाळगणाऱ्या माणसांची आवडती गोष्ट म्हणजे नाटक. या नाटकांना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी यावर्षी प्रथमच संस्कृती कला दर्पण संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे आणि उपाध्यक्षा अर्चना नेवरेकर यांनी 'संस्कृती कला दर्पण नाट्य महोत्सव २०१२' चे आयोजन केले आहे. 'संस्कृती कला दर्पण नाट्य महोत्सव २०१२' या नाट्य महोत्सवाचा उदघाटन सोहळा ९२ व्या अ. भा. म. नाट्य संमेलनाचे अध्यक्ष व जेष्ठ रंगकर्मी श्रीकांत मोघे यांच्या शुभहस्ते पार पडला. 'संस्कृतीला कला दर्पण नाट्य महोत्सवा' मध्ये एकूण २९ व्यावसायिक नाटकांमधून उत्कृष्ट १० नाटकांची निवड करण्यात आली. व्यावसायिक नाट्य परीक्षणाचे काम लीलाधर कांबळी, शशिकांत शिर्सेकर, अरुण घाडीगांवकर आणि नंदू गाडगीळ यांनी केले. तसेच ११ प्रायोगिक नाटकांमधून उत्कृष्ट ४ नाटकांची निवड निखील हजारे आणि अरुण घाडीगावकर यांनी केली. यामध्ये 'कोणे एके काळी', 'लख लख चंदेरी', 'अजिंठा' आणि 'बागुलबुवा' या नाटकांचा देखील समावेश करण्यात आला आहे.
प्रविण मसालेवालेचे संस्थापक हुकमीचंद चोरडिया आणि त्यांच्या पत्नी कमलाबाई यांच्या आयुष्यावर प्रेरित होऊन 'मसाला' या चित्रपटाची निर्मिती होत आहे. प्रविण मसालेवाले यांचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याच्या निमित्तानेच झकास पचास हे सेलिब्रेशन सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणजे मसाला या चित्रपटाची निर्मिती.उमेश कुलकर्णी आणि गिरीश कुलकर्णी यांच्या आरभाट या संस्थेची निर्मिती असलेल्या 'मसाला' या चित्रपटासाठी पुण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चित्रीकरण करण्यात आले पुण्याची ओळख दाखविणार्या ठिकाणांचे चित्रण चित्रपटात असून त्यासाठीच आज पुण्यातल्या पौड रोड, शनिवारवाडा अशा वैशिष्ट्यपूर्णं भागात आज 'मसाला' या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले. या चित्रीकरणासाठी महाराष्ट्रातल्या जनतेच्या भेटीगाठींसाठी एक आगळीवेगळी संकल्पना तयार करुन मसालाची टूर काढण्यात आली होती. अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक, सातारा, कोल्हापूर आणि पुणे ही मसाला टूरच्या पहिल्या सत्रातील ठिकाणे होती. लवकरच दुसर्या फेरीला सुरुवात होणार असून त्यात मुंबई ते विदर्भ असा प्रवास घडणार आहे.पुणे-मुंबई या महानगरांमध्ये मराठी सिनेमाची चर्चा अधिक होत असते, कलाकारांच्या भेटीगाठी होत असतात परंतु शहराबाहेरच्या रसिक प्रेक्षकांनासुद्धा या चित्रपटाची माहिती व्हावी, आणि महाराष्ट्रातल्या सर्वच महत्त्वाच्या शहरातल्या प्रेक्षकांशी या निमित्ताने संवाद साधावा हा या टूरचा मुख्य हेतू असून 'मसाला' या चित्रपटाची एक आकर्षक बस तयार करण्यात आली आहे. चित्रीकरण पहायला आलेल्या प्रेक्षकांशी आणि त्या ठिकाणच्या प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला जात आहे. एप्रिलमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
सारथी एण्टरटेनमेंट या बॅनरची निर्मिती असलेल्या आणि सतिश मोतलिंग यांनी दिग्दर्शित केलेल्या 'मॅटर' या चित्रपटाचा म्युझिक लॉच सोहळा रंगला तो फ्लॅश मॉबच्या संगतीने.फ्लॅश मॉब म्हणजे जिथे १०० ते १५० जणांचा जमाव एखाद्या कारणासाठी एकत्र येऊन नृत्य सादर करण्याचा प्रकार. काही दिवसांपूर्वी मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनसमध्ये फ्लॅश मॉब सादर केला होता. या ग्रुपने पुढे ठाण्यातील कोरम मॉल मध्ये एकत्र येऊन तिथेही 'मॅटर'च्या या अनोख्या डान्सच्या गाण्यांवर ठेका धरला. फ्लॅश मॉब या अनोख्या डान्सनंतर कोरम मॉलमध्ये 'मॅटर'च्या कलाकार तंत्रज्ञांच्या सोबतीने दिग्दर्शक-अभिनेते महेश कोठारे यांनी या चित्रपटाच्या ध्वनिफितीच प्रकाशन केल. या प्रसंगी अभिनेता संतोष जुवेकर, सुशांत शेलार, दिग्दर्शक सतिश मोतलिंग, निर्माती पूनम शेंडे, संगीतकार अभिजित कवठाळकर, अभिनेत्री मेघा धाडे, व्हिडिओ पॅलेसचे नानू जयसिंघानी आदि मान्यवर उपस्थित होते. 'मॅटर' या चित्रपटात एकूण ११ गाणी असून ती ओरिजनल आणि रिमिक्स ट्रॅकमध्ये रसिकांना ऐकता येतील. जितेंद्र जोशी, संतोष जुवेकर, सुशांत शेलार, अभिनेत्री मेघा धाडे, योगिनी चौक आणि रुमा बोंद्रे यांनी चित्रपटातील या गाण्यासाठी पाश्वर्गायन केलं आहे. याशिवाय इतर गाण्यांसाठी अभिजित कवठाळकर, आदर्श शिंदे, आशिष गाडे, सागर सातपुते, अभिषेक मोतलिंग, रेश्मा सोनवणे अशा यंग बिग्रेड गायकांचा वापर करण्यात आला आहे. जितेंद्र जोशी आणि दिपक ठुबे यांच्या गीतांना अभिजित कवठाळकर यांनी संगीतबद्ध केलं आहे.
निर्मात्या दिप्ती किरण यांच्या 'ॐ साई संतोषी फिल्मस प्रॉडक्शन' यांची निर्मिती असलेला हायकमांड नावाचा नवा कोरा चित्रपट लवकरच प्रदर्शित होतोय. मराठीत पहिल्यांदाच सीमा प्रश्नावरील व त्यावरील राजकारणावर चित्रपट येतोय. या चित्रपटात हायकमांड येणार म्हटल्यानंतर गल्लीतील नगरसेवकांपासून दिल्लीतील मंत्र्याचा दमछाक होतो तर आमदार खासदारांना तर श्वासच रोखून धरायला लागतो. वाढती महागाई, गुन्हेगारी यावर स्वतःची पोळी कशी भाजतात हे राजकारणी मंडळी हे सर्व आपणास पहावयास मिळेलचित्रपटांची कथा श्री मनीष राम कुलकर्णी तर कथेची संकल्पना किरणसाई कुलकर्णी यांची असून पटकथा, संवाद प्रदीप पाटील यांचे आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक यशवंत भालकर हे आहेत. चित्रपटातील गीते स्व. वि. वा शिरवाडकर ( कुसुमाग्रज ) श्रीकांत नरुले यांची असून वैभव जोशी यांनी आयटम गीते लिहिले आहे. या गीतांना संगीताचा साज शशांक पोवार यांनी चढवला आहे.चित्रपटात प्रमुख भूमिकेत शरद पोक्षे, सुनील बर्वे, राहुल सोलापूरकर, प्रियंका यादव, अश्विनी एकबोटे व स्वप्नील राजशेखर हे कलाकार आपणास पाहावयास मिळतील. तर आयटम सॉंग मध्ये आपणास हेमलता बाणे व सिया पाटील दिसणार आहेत.
मराठी चित्रपट निर्मितीत वेगवेगळे बदल होताना दिसत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत प्रथमच भंडारा जिल्ह्यातील शेप या महिला महाबचत गटाकडून ३१ डिसेंबर . . . रक्ताविना क्रांती या मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. भारताला स्वतंत्र होऊन ६० वर्षे उलटून गेली. तरी आपापसातल युद्ध अजून संपत नाही. एका बाजूला देशाचे सशक्त संविधान लोकशाही आणि महान शांतीदूत भगवान गौतम बुद्ध यांची शिकवण तर दुसर्या बाजूला आत्मकेंद्रीत नक्षलवादी विचारसरणीचे द्वंद्व म्हणजेच ३१ डिसेंबर.. रक्ताविना क्रांती चित्रपट होय.चित्रपटाची कथा राज (संतोष जुवेकर) आणि बिरसा (प्रभाकर सुखदेवे) यांच्या भावविश्वाभोवती गुंफण्यात आली आहे. मेजर कांबळे (मोहन जोशी) यांच्या मार्गदर्शनाखाली राज आणि त्याचे दोन मित्र विवान ( सिद्धार्थ चांदेकर) आणि इक्बाल यांचे नक्षलवाद्यांशी लढण्यासाठी सुरु असलेले बौद्धिक, शारिरीक आणि मानसिक प्रशिक्षण आणि ३१ डिसेंबरला घडलेली क्रांती. या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.व्यवसायाने इंजिनीअर असलेल्या मोरेश्वर मेश्राम यांची निर्मिती आणि शशिकांत तुपे यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात संतोष जुवेकर, सिद्धार्थ चांदेकर, मोहन जोशी, सयाजी शिंदे, रिमा लागू, कश्मिरा कुलकर्णी, स्नेहा रायकर, प्रभाकर सुखदेवे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात एकूण ५ गाणी असून सिद्धांत माधव यांनी ती संगीतबद्ध केली आहेत.
'डिफरण्ट स्ट्रोक्स कम्युनिकेशन्स प्रा.लि.' संस्थेचा 'गोळाबेरीज' हा चित्रपट १० फेब्रुवारीला चित्रपटगृहात दाखल होतोय. डॉ. देवदत्त कपाडिया निर्मित, क्षितीज झारापकर दिग्दर्शित या आगामी चित्रपटातून पुलंनी रंगविलेल्या असंख्य व्यक्तिरेखा रुपेरी पडद्यावर जिवंत होणार आहेत. यातील प्रत्येक व्यक्तिरेखा परस्परांहून भिन्न असली तरी तिची खास स्वभाव वैशिष्ठ्य आहेत. त्यामुळे कोणती व्यक्तीरेखा कोणता कलाकार साकारणार ही उत्सुकता आता सिनेरसिकांमध्ये पहायला मिळत आहे. अनेक कलावंतांची फौज असलेल्या 'गोळाबेरीज' चित्रपटातील पेस्तन काकांची भूमिका हिंदीतील अनुभवी अभिनेते सतीश शहा यांनी केली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ते मराठीत काम करीत असून त्यांची ही भूमिका पारशी लोकांच्या स्वभावातील बारकाव्यांचे, लकबींचे अभ्यास करुन साकारली आहे. पारशी लोकांच्या बोलण्याची पद्धत, मराठी बोलण्याची शैली आणि त्यातूनच निर्माण झालेली भाषिक गंमत 'गोळाबेरीज' पाहताना रसिकांना येणार आहे.
सिने रसिकांना नवीन वर्षातला आधुनिक तंत्रज्ञाने सज्ज असा मराठीतला नाही तर भारतातला पहिला संपूर्ण क्रोमा मध्ये चित्रित झालेला अस्सल मराठमोळा 'सांग सांग गंगाराम' ह्या चित्रपटाच चित्रीकरण पूर्ण झालं आहे. सांग सांग गंगाराम या चित्रपटची कथा व पटकथा जगदीश वाठारकर यांची आहे. कथा फॅन्टसी व विनोदी आहे. बाबुराव नावाचा तरुण अपघातात स्वर्गवासी होतो. इंद्रलोकात चित्रगुप्ताच्या दरबारात बाबुरावाचा आत्मा पोहचलेला असतो. खाली पृथ्वीवर अधर्म असत्याचा प्रभाव इतका वाढला आहे की सत्य डळमळीत झाले आहे. धर्म बुडायला लागला आहे. तेव्हा पृथ्वी भ्रमण करून ह्या गोष्टीची खात्री केली पाहिजे, असे सर्वानुमते ठरते व पृथ्वीवर यमराजांना पाठवायचे ठरते. यमराज पृथ्वीवर येतात, त्यांना गंगाराम भेटतो, तो पृथ्वीवर चाललेल्या घडामोडी यमराजांना दाखवितो. मग यम आणि गंगाराम पृथ्वीवर काय हंगामा करतात. यमाला पृथ्वीवर काय काय अनुभव येतात? बाबुराव कोमातून बाहेर येतो काय? आणि नवशी सावित्री सारखी आपल्या नवऱ्याला यमाच्या पाशातून कसे सोडविते? आणि हे फक्त गंगारामच सांगू शकतो. सांग सांग गंगाराम मध्ये गंगाराम कमलाकर सातपुते व यम अभिजीत चव्हाण यांनी साकारला आहे. सांग सांग गंगाराम ची गीते दिग्दर्शक जगदीश वाठारकर यांनी लिहिली असून बुजुर्ग संगीतकर बाळ पळसुले यांनी दिलं आहे. संवाद एन, रेळेकर, शैलेंद्र पाटील व जयप्रकाश परुळेकर या तिघांनी मिळून लिहिली आहेत. छायाकन अजिजभाई मोतीवाला, ध्वनी प्रकाश निकम यांचा आहे. कमलाकर सातपुते, अभिजीत चव्हाण, श्वेता बोराडे यांच्यासह सिधेश्वर झाडबुके, संदीप पाटक, अरुण कदम, सुरेखा कुडची, रवी फलटणकर, भालचंद्र कुलकर्णी, उमेश बोळके छाया सागावकर यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत.पुढील दोन महिन्यात व्हिज्युअल ग्राफिक (VFX) पूर्ण होईल व लवकरात लवकर चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
असित रेडीज लिखित, दिग्दर्शित आणि रिद्धी एन्टरटेन्मेंटची निर्मिती असलेला 'या गोल गोल डब्यातला' हा चित्रपट २० जानेवारी २०१२ रोजी तो महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.रिद्धी एन्टरटेन्मेंट या बॅनरखाली तयार झालेल्या या चित्रपटात बाप आणि बेटा या दोघांच्या नात्याचा, या दोन पिढ्यांमधल्या वैचारिक संघर्षाचा विषय हाताळण्यात आला आहे. निसार खान, मितेश देसाई, मुकेश गुप्ता यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटात अशोक सराफ, स्मिता तळवळकर, संतोष जुवेकर, स्मिता शेवाळे, आशालता वाबगावकर, बाळ धुरी, विजय चव्हाण, माधव अभ्यंकर, शैलेश दातार, आकांक्षा ठाकूर, प्रफुल्ल सामंत, प्रतिभा गोरेगावकर, इरावती लागू, रश्मी येसूगडे यंच्यासोबतच बालकलाकार पप्पन पाटील आणि आकांक्षा जगदाळे या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन आसित रेडीज यांचे असून चित्रपटाचे संवाद प्रवीण शांताराम आणि आसित रेडीज यांनी लिहीले आहेत. गीते बाबा चव्हाण यांनी लिहीली असून अशोक सराफ, मुग्धा वैशंपायन, क्षितीज तारे, निहीरा जोशी आणि हृषिकेश कामेरकर यांनी स्वरबद्ध केलेल्या गीतांना संगीतकर सतीश चंद्र यांनी संगीतबद्ध केले आहे. समीर आठल्ये यांचे छायांकन असून राजेश राव यांनी संकलन केले आहे, शहरी आणि ग्रामीण संदर्भ असलेले कथानक असल्याने सगळ्याच स्तरातील प्रेक्षकांना हा चित्रपट पसंत पडेल याबद्दल शंकाच नाही.
युनिव्हर्सल म्युझिक इंडिया प्रस्तुत 'काट्यांची मखमल' या गझल अल्बमच्या निमित्ताने दिलीप पांढरपट्टे, सुधाकर कदम, सुरेश वाडकर आणि वैशाली माडे अशी नामांकित आणि आदरित नावे एकत्र येत आहेत. १६ जानेवारी रोजी प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक यशवंत देव आणि अशोक पत्की यांच्या हस्ते ह्या अल्बमचे प्रकाशन करण्यात आले.प्रसिद्ध कवी श्री. दिलीप पांढरपट्टे यांचे अनोखे व नाविन्यपूर्ण कल्पना मांडणारे लेखन आणि गझल गंधर्व सुधाकर कदम यांचे संगीत दिग्दर्शन असलेल्या या अल्बममध्ये वेगवेगळे मूड आणि शैली दर्शविणार्या ९ गझला आहेत.या अल्बमबद्दल बोलताना सुरेश वाडकर म्हणतात "हा अल्बम म्हणजे अशी रेकॉर्ड आहे जिच्याशी सर्वजण स्वतःला जोडू शकतील आणि ती माझी खूप आवडती आहे. मला खात्री आहे की श्रोत्यांना हा अल्बम खूपच आवडेल."
निर्माते सुशील जैन, गौतम जैन, सचिन शर्मा आणि पंकज विश्वकर्मा यांनी 'माँ महालक्ष्मी एन्टरटेनमेंटच्या बॅनरखाली 'कुणी मुलगी देता का मुलगी' या सिनेमाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाची कथा सचिन शर्मा यांची असून पटकथा अशोक कार्लेकर आणि ऋग्वेद यांनी उत्तमरित्या सांभाळली आहे. संवाद, गीते आणि संगीत याची जवाबदारी ऋग्वेद यांनी उत्तमरित्या सांभाळली आहे. प्रसिद्ध निर्माते- दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्या पत्नी रेखा भारद्वाज यांनी प्रथमच मराठी गाण्याला आपला आवाज दिला आहे. या चित्रपटामध्ये आशुतोष कुलकर्णी, शीतल मौलिक, पराग चौधरी, मनोज आचार्य, सुनील होळकर, विपुल वर्तक, जयवंत पाटेकर, विनीता सुळे-काळे, लीलाधर कांबळी, गणेश रेवडेकर, पूर्णिमा अहिरे, सुनिल शिंदे आणि मेघा घाडगे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
मराठीमुव्हीवर्ल्ड.कॉम च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मराठीमुव्हीवर्ल्ड.कॉम (Marathimovieworld.com) या संकेतस्थळाच्यावतीने देण्यात येणारा पहिला "गौरव पुरस्कार" सोहळा १० जानेवारी रोजी रवींद्र नाट्य मंदीर, प्रभादेवी मुंबई येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला.मराठी रसिकांची लाडकी अभिनेत्री सई रानडे-साने हिने आपल्या प्रभावी आणि विनम्र शैलीत ह्या पुरस्कार सोहळ्याचे निवेंदन केले.मराठीमुव्हीवर्ल्ड.कॉम गौरव पुरस्कारात सर्वोत्कृष्ट सिनेमा, नाटक, मालिका, नायक, नायिका असे विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. याशिवाय प्रथमच मराठी चित्रपटस्रुष्टीतील ''प्रदर्शन पूर्व बहुचर्चित चित्रपट" हा एक नवीन विशेष पुरस्कार देण्यात आला, या पुरस्कारासाठी पहिल्या वर्षाचा मान मिळाला तो 'शाळा' ह्या चित्रपटास. पुरस्कार वितारणादरम्यान विविध रंगतदार आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. त्यात मराठी लावणीनृत्य, लोकगीते, त्याच बरोबर गाजलेल्या मराठी गीतांवरील नृत्य सादरीकरणाचा समावेश होता. विशेष दाद मिळाली ती छत्रपती श्री शिवाजी महाराजांवर आधारित असलेल्या सादरीकरणाला. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन "मराठीमुव्हीवर्ल्ड.कॉम" चे संस्थापक श्री. आर. डी. मोरे, श्री जितेंद्र मोरे, सिनिअर पत्रकार उल्हास शिर्के आणि कलाकारांच्या वतीने मृण्मयी देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. मनोरंजन विश्वातील संपूर्ण माहिती बरोबरच विविध, नवीन, कल्पक सदरांद्वारे "मराठीमुव्हीवर्ल्ड.कॉम" हे संकेतस्थळ जगभरातील मराठी रसिक आणि मराठी मनोरंजन विश्वाला जोडणारा एक दुवा ठरणार आहे .
पहिल्या "मराठीमुव्हीवर्ल्ड.कॉम" गौरव पुरस्कारात, सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान पटकावला तो 'देउळ' या चित्रपटाने, महाराष्ट्र टाईम्सचे पत्रकार श्री. सौमित्र पोटे आणि नाट्य निर्माते श्री. गोविंद चव्हाण यांच्या हस्ते चित्रपटाचे निर्माते श्री. अभिजित घोलप ह्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 'देउळ' ला मिळालेल्या ह्या पुरस्कारात आणि तिकीट खिडकीवरील मिळालेल्या यशामध्ये, प्रेक्षकांचा मोठा वाट आहे." अशा शब्दात चित्रपट निर्माते श्री. घोलप ह्यांनी आभार व्यक्त केले .
मालिका विभागात 'गुंतता हृदय हे' , 'कालाय तस्मै नम:' , ' बंध रेशमाचे', 'पिंजरा' आणि 'पुढचे पाउल' ह्या मालिकांमध्ये मोठी स्पर्धा होती, त्यात प्रेक्षकांनी 'बंध रेशमाचे' ह्या मालिकेला सर्वोत्कृष्ट मालिका म्हणून आपली पसंती कळवली. प्रसिद्ध चित्रपट वितरक श्री. समीर दिक्षित आणि निर्मात्या सौ. उषा भावे यांच्या हस्ते 'बंध रेशमाच्या' टीमला पुरस्कार देण्यात आला. सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला तो भुषण प्रधान तर, मृणाल कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. चित्रपट दिग्दर्शक एफ. एम. इल्यास, आणि अभिनेत्री सई लोकूर यांच्या हस्ते भुषण आणि मृणाल यांना पुरस्कृत करण्यात आले. "गुंतता हृदय हे' मधील नायिकेची भूमिका साकारणे हे खरं तर खुप कठीण होते, आणि त्यासाठी घेतलेल्या मेहनतीची पावती ह्या पुरस्काराद्वारे मिळाली. रसिकांचे असेच प्रेम लाभावे अशी आशा करते." अशा शब्दात अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या .
कार्याक्रमादरम्यान "हनिबी मेडिया" द्वारे अजून एक नवीन उपक्रमाची घोषणा करण्यात आली. मुंबई आणि मुंबईकर यांच्याबद्दल पुरेपूर आणि नवनवीन सदरांद्वारे माहिती देण्यात येणार असून विविध विषयांवर चर्चा करण्यासाठीचे एक व्यासपिठ देणारे 'www.magzmumbai.com' हे संकेतस्थळ असणार आहे. ह्याचे अनावरण अभिनेता राजेश शृंगारपुरे आणि अभिनेत्री हेमांगी धुमाळ यांच्या हस्ते करण्यात आले .
पुरस्कार वितरण सोहळ्यास अभिनेता प्रकाश भेंडे, राजेश शृंगारपुरे, सचित पाटील, आनंद इंगळे, गिरीश परदेशी, नरेश बिडकर, अक्षर कोठारी, कौस्तुभ दिवाण, अभिनेत्री उमा भेंडे, प्रतीक्षा लोणकर, हेमांगी कवी, मृण्मयी देशपांडे, सई लोकूर, सुपर्णा खर्डे, निर्मात्या विना लोकूर, उषा भावे, प्रसिद्ध संगीतकार श्रीरंग आरास, दिग्दर्शक एफ. एम. इल्यास, अजित भैरावकर, तसेच अनेक मान्यवर कलाकाराची उपस्थिती लाभली.
देवेंद्र चौगुले यांची संकल्पना आणि निर्मिती असलेला 'संभा . . आजचा छावा' या चित्रपटात ते स्वतः मुख्य भूमिका साकारत आहेत. आजच्या महागाईला जवाबदार असलेले भ्रष्टाचारी आणि जीवनावश्यक वस्तुंचा साठा आणि काळाबाजार करणरे लोकही महागाईला कारणीभूत आहेत. अशाच साठेबाजांच्या विरुद्ध 'संभा' लढा उभारणार आहे. अतिशय आधुनिक अशा व्हिएफएक्स तंत्रज्ञानाचा वापर करुन या चित्रपटाची निर्मिती झाली. चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद संजय पवार यांनी लिहीले असून दृश्य संजय तोडकर, साहस दृश्य - आनंदराज, नृत्य दिग्दर्शन -कलाधरन, छायांकन - गिरीश उदाळे यांनी केले आहे.'समृद्ध जीवन' प्रस्तुत 'संभा . . आजचा छावा' चित्रपटात देवेंद्र सोबत दिपाली सय्यद, मोहन जोशी, मिलिंद गुणाजी, कुलदीप पवार, अमधु कांबीकर, तेजश्री खेळे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.
'ईटिव्ही मराठी'वर 'ढोलकीच्या तालावर' या कार्यक्रमातील लावण्यांचा फड आता आठवडयागणिक अधिकच रंगत आहे. लावण्यांचे पारंपारिक आणि आधुनिक प्रकार सादर करुन यातील स्पर्धक नृत्यांगणा आता एकमेकींना आव्हान देण्यासाठी खर्या अर्थाने सज्ज झाल्या आहेत. पारंपरिक लावणी विरुद्ध पाश्चात्य नृत्याची रंगतदार स्पर्धा. नववर्षाच्या पहिल्या आठवडयात म्हणजे ४ आणि ५ जानेवारीच्या भागामध्ये लावणीचा हा फड प्रेक्षकांना 'ई टीव्ही' मराठीवर रात्री ९.३० वाजता पाहता येईल.या सगळ्यांचं परीक्षण करायला या आठवडयात परीक्षक विश्वास पाटील, सुरेखा पुणेकर आणि अमृता पत्की यांच्या सोबत नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य आणि दिग्दर्शक व ऍड मेकर अभिनय देव यांची उपस्थिती असणार आहे.
नावात किंवा आडनावात साघर्म्य असू शकतं पण नाव आणि आडनाव दोन्ही सारखं असल्याने लोकांपर्यंत पोहचण्यास अडथळा येऊ शकतो. मराठी चित्रपट सृष्टीत एक सोनाली कुलकर्णी प्रसिद्ध होती आणि आहे पण 'बकुळा नामदेव घोटाळे' या केदार शिंदेच्या चित्रपटाने या चित्रपटसृष्टीला आणखी एक सोनाली कुलकर्णी दिली. त्यामुळे आधीच्या सोनाली कुलकर्णीला 'दिल चाहता है' फेम सोनाली कुलकर्णी आणि दुसर्या सोनाली कुलकर्णीला 'बकुळा नामदेव घोटाळे' फेम सोनाली कुलकर्णी म्हणून ओळखू लागले. सोनाली कुलकर्णी नाव जरा जास्त वेळा वापरल्याने तुम्ही पण गोंधळलात ना? पण आता हा गोंधळ संपणार आहे. कारण आता 'बकुळा नामदेव घोटाळे' फेम सोनाली कुलकर्णी आपलं नाव फक्त सोनाली लावणार आहे. एवढचं नाही तर ती म्हणे नावाचं स्पेलिंगसुद्धा SONALI च्या ऐवजी SONALEE करणार आहे. . . . असो.... तिचा महत्त्वपूर्ण भूमिका असलेला 'नटरंग' हा चित्रपट १ जानेवारीला प्रदर्शित झाला आहे. नवीन वर्षाची सुरुवात एवढी छान झाल्यावर वर्ष पण झक्कास असेल यात काही शंका नाही. पण नावातला हा बदल सुद्धा फायद्याचा ठरावा....