Tuesday, December 27, 2011

मराठी निर्मात्यांच्या नव्या संघटनेची घोषणा

Meghraj Rajebhosale, Marathi Nirmata Sangh
अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांच्यासह १०० हून अधिक मराठी चित्रपट निर्मात्यांच्या उपस्थितीत पुण्यात झालेल्या स्नेहमिलन कार्यक्रमात मेघराज राजेभोसले यांनी निर्मात्यांच्या नव्या संघटनेची घोषणा केली. ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक विजय कोंडके आणि मेघराज राजेभोसले यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यावेळी मराठी चित्रपटाच्या निर्मात्यांना येणार्‍या विविध अडचणी, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, थिएटर मालक, वितरक यांच्याकडून होणारे असहकार्य या विषयांवर चर्चा झाली.

या कार्यक्रमात निर्मात्यांनी उपस्थित केलेले काही मुद्दे खालीलप्रमाणेः
नवोदितांना प्रशिक्षण, वितरणावर नियंत्रण, तंबूतले चित्रपट, जाहिरात व प्रमोशन, विषयांचे वेगळेपण, उत्पादनावर विश्वास हवा, चित्रपटाचे हक्क, थिएटरमालक, मराठीसाठी स्लॉट, संयुक्त प्रकल्प, यश आणि अपयश.

Monday, December 26, 2011

संस्कृती कलादर्पण संस्थेचा 'ज्येष्ठ रंगकर्मी सन्मान सोहळा' संपन्न.

Sulochana Didi

गेली बारा वर्षे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्यात अग्रेसर  असलेल्या संस्कृती कलादर्पणच्या संस्थेच्या वतीने ज्यांचे कार्य आजही नवतरुणांच्या विचारांना परिणाम देते अशा मान्यवर ज्येष्ठ कलाकारांना यंदा गौरविण्यात आले. या वर्षी ज्येष्ठ रंगकर्मीच्या कार्याची जाणीव व कलेची जोपासना ह्या दोन मुख्य उद्देशाने 'ज्येष्ठ रंगकर्मी सन्मान सोहळा' या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. संस्कृती कलादर्पण तर्फे यंदापासून ज्येष्ठरंगकर्मीना स्मृतीचिन्ह व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. 

या पुरस्कारांचे यंदाचे १० मानकरी म्हणून भालचंद्र पेंढारकर, सुहास भालेकर, रोहिणी हट्टंगडी, आशालता, नयनतारा, अशोक पत्की, ए राधास्वामी, सुर्यकांत लवंदे, बाबा पार्सेकर, मोहन लोके, तसेच विशेष मदत म्हणून अनिल तावडे या ज्येष्ठरंगकर्मींना स्मृतीचिन्ह व रोख रक्कम देऊन संस्कृती कलादर्पणतर्फे २४ डिसेंबरला सन्मानित करण्यात आले. अनेक कलकारांच्या नृत्य आणि अभिनयाच्या सादरीकरण लाभलेल्या या सोहळ्याचे दिग्दर्शन महेश टिळेकर यांनी केले होते तर गिरीजा ओक व उमेश कामत यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डू. निलेश साबळे यांनी घेतलेल्या मुलाखतींमुळे कार्यक्रमाला वेगळी रंगत आली.

Thursday, December 22, 2011

ना.धों. महानोर यांच दिर्घकाव्य अजिंठा एक प्रेम कहाणी रंगमंचावर.

Ajintha, Akshar Kothari, Pallavi Wagh
१७५ वर्षाची मेजर रॉबर्ट गिल आणि पारु यांची सत्यप्रेम कहाणी अजिंठा एक प्रेम कहाणी च्या रुपाने रंगमंचावर नाटयरुपाने आली आहे. पद्मश्री ना. धों. महानोर यांच अजिंठा या दिर्घकाव्यावर आधारीत ही अमरप्रेम कहाणी रंगमंचावर प्रायोगिक धर्तीवर सादर केली जात आहे. एस. कुमार इंटरनॅशनल निर्मित व सृजण मुंबई प्रस्तुत हा नाट्यनुभव दिग्दर्शक मिलींद इनामदार यांनी दिग्दर्शित केला आहे.. ब्रिटीश मेजर पण मुळात चित्रकार असलेला रॉबर्ट गिलची हिंदुस्थानात बदली होते. अजिंठा वरील चित्र काढीत असताना पारुची भेट होते. मग सुरु होते एक अमर प्रेम कहाणी, ही प्रेम कहाणी ना.धो. महानोर यांनी आपल्या दिर्घकाव्यात काव्य रुपाने मांडली होती.

'अजिंठा एक प्रेम कहाणी'ला संगीत दिले आहे संगीतकार संजय गीते यांनी तर संगीत संयोजन अरविंद हसबनीस यांच आहे. गायिका अमृता नातु व संजय गीते यांनी आवाज दिला आहे. नृत्ये अनिल सुतार, प्रकाश योजना आदित्य देशपांडे, वेषभूषा संध्या साळवे, रंगभूषा कृष्णा बोरकर व नेपथ्य अंकुश कांबळी यांच आहे.

अजिंठा एक प्रेम कहाणी मध्ये रॉबर्ट गिल आणि पारुच्या महत्त्वाच्या भुमिकेत अक्षर कोठारी व पल्लवी वाघ असून प्रसाद ठोसर, प्रदीप सरवदे, नयनाराणी सोनवणे, वैष्णवी नाईक, दिपाली बडेकर, हर्षिता ब्राम्हणकर, अभिजीत भगत, निरंजन जाधव, मुकुंद ब्राम्हणे, अतुल गोवंडी, जयेश मोरे, योगेश मार्कंडे, राकेश पाटील, आशिष शिर्के यांच्याही भूमिका आहेत.

Monday, December 19, 2011

हृषिकेश आणि गायत्री कामेरकर 'संगीत खुर्ची'चे विजेते.

Sangeet Khurchi, Hrishikesh Kamerkar
ईटीव्ही मराठी वाहिनीवर चाललेल्या बहुचर्चित संगीत खुर्चीच्या विजेतेपदाचा मान नव्या दमाचा अष्टपैलू युवा गायक, संगीतकार हृषिकेश कामेरकर आणि त्याची पत्नी गायत्री कामेरकर यांना मिळाला आहे. स्मृतीचिन्ह आणि एक लाख रुपयांचा हा पुरस्कार आहे. 

दहा सेलिब्रिटी जोडयांना घेऊन केलेला म्युझिकल शो असेच याचे स्वरुप होतं. गाण्यांसोबतच, पर्सनल लाईफ उलगडण्याचा प्रयत्न करता करता मनोरंजन व्हावं असा या शोचा मुख्य हेतू होता. मराठीतल्या सगळ्याच रिऍलिटी शोजमध्ये संगीत खुर्ची या शोचा टीआरपी सतत सर्वात जास्त म्हणजे चारहून अधिक होता.

Saturday, December 17, 2011

गुहागरमध्ये वेळणेश्वर किनार्‍यावर 'करुन टाक गोलमाल' या चित्रपटातील दोन गाण्यांचे चित्रीकरण संपन्न.

Aniket Vishvasrao, Girija Joshi
सीएस फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मात्या सुवर्णा बांदिवडेकर 'करुन टाक गोलमाल' या सिनेमाची निर्मिती करीत आहेत. या चित्रपटाची कथा राजेंद्र बांदिवडेकर यांनी लिहीली असून चित्रपटासाठी संगीतरचना सुद्धा त्यांचीच आहे.

राजेंद्र बांदिवडेकर यांचे दिग्दर्शन असलेल्या 'करुन टाक गोलमाल' या चित्रपटातील दोन गाणी गुहागरमध्ये वेळणेश्वर किनार्‍यावर अनिकेत विश्वासराव आणि गिरीजा जोशी यांच्यावर चित्रीत केली. स्वप्निल बांदोडकर, बेला शेंडे तसेच निर्मल कुमार यांनी गायलेल्या गीतांचे गीतलेखन राकेश बामगुडे यांचे असून उमेश जाधवने या गाण्यांसाठी नृत्यदिग्दर्शन केले आहे. प्रसाद भेंडे या सिनेमाचे कॅमेरामन आहेत.

या चित्रपटात अनिकेत विश्वासराव , गिरीजा जोशी सोबत मोहन जोशी, अशोक समर्थ, सतीश तारे, विजू खोटे, जयंत वाडकर, धनंजय मांद्रेकर आणि सुनील शिंदे आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.

Friday, December 16, 2011

'खेळ खेळूया मनसे' कार्यक्रमाने रंगला शिवडी-भायखळा विभागाचा वर्धापन दिन.

Rajesh Shrinagrpure
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवडी - भायखळा विभागाच्या वर्धापन दिनानिमित्त सालाबादप्रमाणे या ही वर्षी 'खेळ खेळूया मनसे' या कार्यक्रमाचे आयोजन केले होते शिवडी विधानसभेचे आमदार, मनसे गटनेते मा. बाळा नांदगावकर आयोजित 'खेळ खेळूया मनसे' कार्यक्रमात शिवडी विधानसभेतून ३०० महिलांचा सहभाग होता.

कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष हरिशचंद्र पडवळ यांच्या हस्ते करण्यात आले. सौ. शर्मिलाताई ठाकरे, सौ लीना बाळा नांदगावकर, महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष रीटाताई गुप्ता, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष शिल्पा सरपोतदार यांची उपस्थिती लाभली. प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेता राजेश शृंगारपूरे यांची उपस्थिती लाभली. 

कार्यक्रमात विविध स्पर्धा घेऊन त्या स्पर्धेच्या विजेत्या महिलांना तसेच सहभागी प्रत्येक महिलेले आकर्षक भेटवस्तु देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरला तो सुप्रसिद्ध अभिनेता व उत्कृष्ट सुत्रसंचालक अशी ख्याती असणारा स्वप्नील जोशी.

Wednesday, December 14, 2011

१६ डिसेंबरला प्रदर्शित होणार 'वन रुम किचन' आणि 'शर्यत'.

Sharyat, One Room Kitchen
येत्या शुक्रवारी म्हणजेच १६ डिसेंबरला वेगवेगळ्या विषयावर आधारीत दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. पुरुषोत्तम अग्रवाल यांची निर्मिती असलेला आणि भरत जाधव व भार्गवी चिरमुले यांची प्रमुख भूमिका असलेला 'वन रुम किचन'. या चित्रपटाचे दिग्दर्शन- कथा- पटकथा आणि गीते महेश टिळेकर यांची असून संगीत अशोक पत्की यांच आहे. 

'वन रुम किचन' ही एक साधी सरळ चाळीतील मध्यमवर्गीय कुटुंबाची कहाणी असून ज्येष्ठ अभिनेत्री हेलन यांनी या चित्रपटात कॅथलिक आईची भूमिका साकारली आहे. तसेच चित्रपटात प्रमुख भूमिकेत भरत जाधव, भार्गवी चिरमुले, राजेश शृंगारपुरे, किशोरी गोडबोले असून सोबत विजू खोटे, आशालता, विजय चव्हाण, किशोरी अंबिये, विजय चव्हाण, संजय मोहिते, स्मिता शेवाळे, राकेश बेदी, किशोर प्रधान, लिलाधर कांबळी, संदीप पाठक यांच्या भूमिका आहेत.

तसेच अश्वमेघ प्रॉडक्शन्स निर्मित विजू माने दिग्दर्शित 'शर्यत' हा चित्रपट. या चित्रपटाची कथा आणि पटकथा हेमंत एदलाबादकर आणि विजू माने यांचे असून हेमंत एदलाबादकर आणि विजू माने यांच्या सोबत नंदकिशोर चौघुले यांनी संवादलेखन केले आहे. विजू माने आणि अशोक बागवे यांनी लिहीलेल्या गीतांना चिनार महेश यांच संगीत आहे. 

सचिन पिळगावकर एका वेगळ्या लुकमध्ये दिसणार असून त्यांच्या सोबतच संतोष जुवेकर आणि विद्याधर जोशी सुद्धा 'शर्यत' मध्ये आहेत.

Monday, December 12, 2011

'अण्णा लयभारी' हा अण्णा भाऊ साठेंवरील चित्रपट १६ डिसेंबर २०११ ला रसिकांच्या भेटीस!

अण्णा भाऊ साठेंच्या कार्याने प्रेरीत होऊन प्रसिद्ध चित्रपट निर्माते- दिग्दर्शक - लेखक पप्पू लाड यांनी अण्णांच्या कार्याची महती सांगणार्‍या अण्णा लयभारी या चित्रपटाची निर्मिती केली असून त्यांचा हा चित्रपट येत्या १६ डिसेंबर, अण्णांचीच कर्मभूमि असलेल्या चेंबूर येथील अमर चित्रपटगृहात प्रदर्शित होत. १६ डिसेंबरला दुपारच्या मॅटिनीला (१२.३० वा) भव्य प्रिमिअर शो होणार आहे.

अण्णा भाऊ साठे याचं साहित्य हा जसा संशोधनाचा विषय आहे. तसंच त्यांच व्यक्तिमत्त्व आणि समग्र जीवनपट सुद्धा ! साहित्य, लोककला, कामगार स्वातंत्र लढा, सर्वसामान्य गरीब माणसावरील अन्यायविरोधात आपलं अवघं आयुष्य ज्या माणसाने पणाला लावलं त्यांच्यावर इतक्या वर्षानंतर मराठीमध्ये चित्रपट येऊ लागलाय, ही खरं म्हणजे अभिनासास्पद आणि तितकीच समाधान देऊन जाणारी बाब आहे.

Wednesday, December 7, 2011

गिरीश कुलकर्णी - अमृता सुभाषचा 'मसाला'.

'वळू' आणि 'विहीर' अशा दोन चित्रपटांच्या यशानंतर आणि लवकरच प्रदर्शित होणार्‍या बहुचर्चित देऊळचे दिग्दर्शक उमेश आणि गिरीश कुलकर्णी यांच्या 'आरभाट' संस्थेची निर्मिती व प्रवीण मसालेवाले यांची प्रस्तुती असलेल्या 'मसाला' या चित्रपटाचे दिग्दर्शन संदेश कुलकर्णी करणार आहे.
 
या चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून उमेश कुलकर्णी काम पाहणार असून कथा, पटकथा आणि संवदलेखन गिरीश कुलकर्णी यांचे आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते एच. एम. रामचंद्र या चित्रपटाचे छ्यांकन करणार असून संकलन अभिजीत देशपांडे करणार आहेत. चित्रपटाची गीते सुनील सुकथनकर यांनी लिहीली असून आनंद मोडक यांनी संगीत दिले आहे. 
 
या चित्रपटात गिरीश कुलकर्णी मध्यवर्ती भूमिकेत असून अमृता सुभाष, दिलीप प्रभावळकर, डॉ. मोहन आगाशे, हृषिकेश जोशी, श्रीकांत यादव, प्रवीण तरडे, नेहा शितोळे, शशांक शेंडे हे कलाकार आहेत. 

Tuesday, December 6, 2011

कौटुंबिक मराठी चित्रपट थ्रीडीमध्ये.

कौटुंबिक मराठी चित्रपट थ्रीडीमध्ये. ऐकायला वेगळ वाटतं नां? पण हे खरं आहे. मराठी चित्रपटांमध्ये देखील उत्तम, दर्जेदार चित्रपट येत आहेत. तंत्रज्ञानाच्या बाबतीत मराठी चित्रपटात सुधारणा होत असून मराठीतला पहिला थ्रीडी कौटुंबिक चित्रपट 'आई मला मारु नकोस' पूर्ण झाला आहे. नुकतचं या चित्रपटाच्या ऑडिओ सिडीचे प्रकाशन सिनेअभिनेत्री जयश्री टी यांच्या हस्ते पु. ल. देशपांडे सभागृह, प्रभादेवी येथे संपन्न झाले. यावेळी चित्रपटाचे निर्माते व अभिनेते अविनाश जाधव, दिग्दर्शक सत्यप्रकाश मंगतानी, विजू खोटे, मृणालिनी जांभळे, मनोज आनंद, कॅमेरामन राजन लायलपूरी, नृत्यदिग्दर्शक पप्पू खन्ना, जयंत येलूलकर आदि उद्योग, राजकिय व चित्रपटक्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. 

सार्थक प्रॉडक्शनच्या बॅनरखाली निर्माते अविनाश जाधव व दिग्दर्शक सत्यप्रकाश मंगतानी यांनी प्रथमच हा थ्रीडी पट दिग्दर्शित केला आहे. याची कथा राजेंद्र बोडारे यांची असुन पटकथा संवाद सत्यप्रकाश मंगतानी यांनी लिहीले आहेत. 

Thursday, December 1, 2011

२ डिसेंबरला येतोय 'सगळ करुन भागले'.

Makrand Anaspure
'श्री चिंतामणी चित्र' निर्मिती संस्थेच्या या चित्रपटात 'दारुबंदी' सारखा खेड्यापाडयातील आजचा ज्वलंत सामाजिक प्रश्न मार्मिक पद्धतीने रेखाटण्यात आलेला 'सगळं करुन भागले' येत्या २ डिसेंबरला प्रदर्शित  होत आहे. या चित्रपटात मकरंद अनासपुरे मध्यवर्ती भूमिकेत आहे.

'सगळ करुन भागले' ची खुसखुशीत कथा-पटकथा आणि संवाद अरविंद जगताप यांनी लिहिले आहेत. या चित्रपटात मकरंद अनासपुरे सोबत चेतन दळवी, श्वेता मेहेंदळे, माधवी निमकर, भारत गणेशपुरे, जयराज नायर, अविनाश खर्शीकर, जयवंत भालेकर, गणेश रेवडेकर, आधा घोडके, सुनील होलकर, गिरीश जोशी, राधिका बोरगावकर आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Friday, November 25, 2011

'मला एक चानस हवा' चित्रपटाचा मुहूर्त.

Mala Ek Chance Hava
शाहीर दादा कोंडके यांनी एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टी खुप गाजविली. त्यांची स्मृती ताजी ठेवण्यासाठी दादांचे पुण्यातील एक निस्सीम चाहते विठ्ठलराव चव्हाण यांनी 'मला एक चानस हवा' या चित्रपटाची निर्मिती केली असून त्याचा मुहूर्त नुकताच पुण्यात हॉटेल संकेत इन' मध्ये पार पडला.

याप्रसंगी या चित्रपटातील कलाकार विजय पाटकर, चेतन दळवी, मधु कांबीकर, हेमलता बाणे, किशोर नांदलस्कर आदि उपस्थित होते. या चित्रपटात मकरंद अनासपुरे व दीपाली सय्यद प्रमुख भूमिकेत आहेत. 

दादा कोंडके यांचे अतिशय निकटचे सहकारी बाळ मोहिते यांनी या चित्रपटाची कथा- पटकथा व संवाद लिहिले असून चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनीच केले आहे. त्यामुळे या चित्रपटात दादा कोंडके स्टाईल सहा गाणी असून ती संगीतकार अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केली आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण पुण्यात सुरु झाले आहे.

Tuesday, November 22, 2011

कौटुंबिक हिंसाचारावर आधारित 'धागेदोरे'.

Bhargavi Chirmule, Vinay Apte
हल्ली समाजात कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण वाढतच चालले आहे. इतके दिवस सासरी मुलीचा छळ होतो अशा तक्रारी ऐकू येत होत्या परंतु आता मुलीकडूनही सासरच्या व्यक्तींचा छळ होतो अशी उदाहरणे घडत आहेत. पुण्यात काही दिवसांपुर्वी एका तामिळी कुटुंबातील आई- वडिल व दोन भावांनी पत्नीकडून येणार्‍या सतत धमक्या व छळाला कंटाळून सामूहिक आत्महत्या केली होती. याच घटनेवर आधारित 'धागेदोरे' या नव्या मराठी चित्रपटाची निर्मिती होत आहे. या चित्रपटाचे निर्माते पंकज छल्लानी व अभिजित आपटे असून दिग्दर्शक 'आरंभ' फेम अक्षय दत्त यांनी केले आहे.  

या चित्रपटात उमेश कामत, सई ताम्हणकर, भार्गवी चिर्मुले, विनय आपटे, संजय मोने, मानसी मागीकर आदींच्या भूमिका आहेत. गीतकार संदीप खरे यांच्या गीतांना संगीतकार सलील कुलकर्णी यांनी संगीत दिले आहे. पुण्यातील पौंड रस्त्यावरील अजंठा ऍव्हेन्यु सोसायटीत नुकतेच या चित्रपटाचे चित्रीकरण पार पडले. 

Monday, November 21, 2011

मराठीमुव्हीवर्ल्डचे दर्शक ठरविणार नामांकने.

मराठीमुव्हीवर्ल्डतर्फे लवकरच देण्यात येणाऱ्या पुरस्कारांसाठी नऊ विभागांमध्ये नामांकने जाहीर होणार आहेत. त्यासाठी विशेष  परीक्षक  बोलाविण्यापेक्षा , हा  बहुमान  मराठीमुव्हीवर्ल्डच्या दर्शकांनाच  मिळणार  आहे. दिनांक २१ ते २७ दरम्यान  खुल्या असणार्‍या वेळेमध्ये दर्शकांना आपल्या पसंतीचे कलाकार  व चित्रपट, मालिका आणि नाटक निवडण्याचा मान मिळणार  आहे. 

दिनांक  १. १. २०११ पासून  १५. ११. २०११ पर्यंतच्या कालावधीत  प्रदर्शित  झालेले नाटक , चित्रपट आणि मालिका व त्यातील  कलावंत  ह्यांची निवड  हे दर्शक करतील. मात्र  एका विभागामध्ये  फक्त  एक  अशीच  निवड  करावी लागेल. 

हि नामांकने केवळ  लोकप्रियतेवर ठरवली जातील  व त्यानंतर उत्कृष्ट  कलाकार  आणि कलाकृतीसाठी मत घेतलं जाईल. मराठीमुव्हीवर्ल्डच्या दर्शकांनी त्यांची निवड कळवण्यासाठीhttp://www.marathimovieworld.com/fun/mmw-awards-choice.php या लिंकवर क्लिक करुन अथवा (admin@marathimovieworld.com) या ई-मेल आयडी वर पाठवावीत .

पुरस्कारांचे नऊ विभाग  खालील  प्रमाणे

चित्रपट : 
सर्वोत्कृष्ट नायक 
सर्वोत्कृष्ट नायिका 
सर्वोत्कृष्ट चित्रपट 
  
टेलिव्हिजन
सर्वोत्कृष्ट  नायक 
सर्वोत्कृष्ट  नायिका 
सर्वोत्कृष्ट  मालिका

नाटक 
सर्वोत्कृष्ट नायक 
सर्वोत्कृष्ट नायिका 
सर्वोत्कृष्ट नाटक  

Thursday, November 17, 2011

तृतीयपंथीयांचे समाजिक जीवन आता मोठ्या पडद्यावर.

Amhi Ka Tisare, Milind Gavali
मुंबईतील तुर्भे भागातील 'एस्सेल' स्टुडिओमधील चित्रीकारणानिमित्त  तेथे असलेल्या सर्वांचीच लगबग सुरु होती. आणि आमच्या समोर आला. तो एक तृतीयपंथी. प्रारंभी आम्ही त्याला ओळखलेच नाही. परंतु जेव्हा त्या तृतीयपंथीयाचा 'हे मिलिंद गवळी' असा परिचय करून देण्यात आला तेव्हा आम्हाला आश्चर्य वाटल्या खेरीज राहिले नाही. मिलींद गवळी आणि तृतीयपंथी? हे काय गौडबंगाल आहे? 

हे गौडबंगाल आहे 'आम्ही का तिसरे?' या नव्या मराठी चित्रपटातील. त्यामध्ये अभिनेता मिलिंद गवळी 'हिरो'च्या भूमिकेत आहे मात्र हा हिरो आहे चक्क 'तृतीयपंथी'. तृतीयपंथीयांच्या जीवनावर केवळ प्रकाशझोत टाकण्यासाठी नाही तर त्यांच्याबाबत सामाजिक जागृती व्हावी या उद्देशाने या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. 'शुभलक्ष्मी चित्र' च्या 'आम्ही का तिसरे ?' या चित्रपटाची निर्मिती अभिनेत्री अलका कुबल व शिल्पा मसुरकर यांनी केली असून दिग्दर्शक आहेत 'चॅम्पियन' फेम रमेश मोरे.

तृतीयपंथीयांच्या समाजजीवनावर प्रकाशझोत टाकणारा मराठीतील पहिलाच चित्रपट असेल. सुप्रसिद्ध साहित्यिक रणजीत देसाई यांच्या कन्या श्रीमती पारू नाईक यांनी अनेक वर्षे संशोधन करून लिहिलेल्या 'मी का नाही?' या कादंबरीवर हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.

Wednesday, November 16, 2011

११.११.११ चा योग साधून 'वारस कोण?' आणि 'रामा रामा सिनेरामा' चा मुहूर्त.

Varas Koun?, Raama Raama Cineraama
ज्योतिबा बॅनर अंतर्गत 'वारस कोण?' आणि 'रामा रामा सिनेरामा' या दोन मराठी चित्रपटांचा मुहूर्त ११-११-११ या शुभ मुहूर्तावर गोरेगाव येथील प्लॅटिनम स्टुडिओत, दोन्ही चित्रपटातील मिळून ११ गाणी असलेल्या तसेच ११ मान्यवरांच्या शुभहस्ते आणि ११ कलावंत - तंत्रज्ञ मिळून ११ च्या पटीत साइनिंग रक्कम देऊन सकाळी ११:११ वाजता करण्यात आला. 

गेली १५ वर्षे नाटक, मालिका आणि चित्रपटात अभिनेता म्हणून कार्यरत असलेल्या राम मा़ळी यांनी या दोन चित्रपटांच्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. 'वारस कोण?' या चित्रपटाची कथा व गीते दिलीप देशपांडे यांनी लिहीली असून स्वतः राम माळी यांनी 'रामा रामा सिनेरामा' या चित्रपटाची कथा लिहीली आहे. दोन्ही चित्रपटांसाठी लक्ष्मीकांत विस्पुते यांनी पटकथा संवाद लेखन केलं आहे तर दोन्ही चित्रपटांना सुनिल प्रभाशंकर यांनी संगीत दिले आहे.

Tuesday, November 15, 2011

'एक कुतुब तीन मिनार या चित्रपटाचा मुहूर्त गीत ध्वनीमुद्रणाने संपन्न.

बीग टॉकीज अंतर्गत 'एक कुतुब तीन मिनार या चित्रपटाचा मुहूर्त गीत ध्वनीमुद्रणाने नुकताच स्वरलता स्टुडिओ येथे करण्यात आला. मनोज यादव आणि अनिल सिंग निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन सुनिल रामचंद्र कांबळे करणार आहेत. या चित्रपटाची कथा-पटकथा आणि संवाद अश्क कांबळी यांचे असून छायांकन राजा फडतरे यांचे आहे. 

गीतकार बिपिन धायगुडे आणि विनय येरापल्ले यांच्या गीतांना संगीतकार विलास गुरव यांनी संगीत दिले आहे. कुलदीप मालुसरे, श्रीला तांबे, निलादरी देबनाद आणि अनुराग या नव्या दमाच्या गायकांच्या आवाजात ती स्वरबद्ध केली आहेत.

'एक कुतुब तीन मिनार' या चित्रपटात भरत जाधव सह विजय चव्हाण, संचित यादव, श्याम ठोंबरे, पूजा कदम, गौरी देशमुख, पूर्णिमा वाव्हळ, अशोक पावडे, नितीन पारेगावकर, सुरेश ढगे, प्रियांका मुणगेकर, गौरी केंद्रे, विजय कदम आणि रसिका धामणकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण रत्नागिरी येथे करण्यात येणार असून लवकरच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असल्याचे दिग्दर्शक सुनिल रामचंद्र कांबळे यांनी सांगितले.

Monday, November 7, 2011

११ नोव्हेंबर पासून येतोय 'मामाच्या राशीला भाचा'.

महादेव सांगळे आणि मनोज मांढरे यांच्या एम. एम. मुव्हीज या बॅनरची निर्मिती असलेला 'मामाच्या राशीला भाचा' हा मराठी चित्रपट पुण्यासह कोल्हापुर, सांगली, सातारा, सोलापुर या ठिकाणी शुक्रवार दि ११ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.

यशवंतराव पाटील चित्रपटाचे सहनिर्माते असून प्रमोद रामचंद्र जोशी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटातील गीतांना संगीतकार जिंतेंद्र कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केले असून उत्तरा केळकर, चंद्रशेखर गाडगीळ, संदीप उबाळे यांच्यसह सोनु निगम यांनी पार्श्वगायन केले आहे. 

'मामाच्या राशीला भाचा' या चित्रपटात मोहन जोशी व सिद्धार्थ जाधव यांच्या सोबत स्नेहा लक्ष्मेश्वर, विजय पाटकर, पॅडी कांबळे, विजय गोखले, नुतन जयंत, वंदना वाकनीस व नृत्यांगना स्पेहा लखनगावकर यांच्या भूमिका आहेत.

Friday, November 4, 2011

सुबोध आणि मधुराची म्युझिकल 'पाऊलवाट' १८ नोव्हेंबरपासून.

Paulwaat, Subodh Bhave, Madhura Satam
'माय ड्रीम प्रॉडक्शन' निर्मित आणि स्टेट ऑफ द आर्टस प्रस्तुत 'पाऊलवाट' हा संगीतप्रधान चित्रपट १८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. मुक्ता भिडे, मानसी पेठे, स्मिता भागवतदार, अजय भिडे, व्यंकटेश मांडके, अलका दातार असे सहा निर्माते असलेला हा चित्रपट आहे. संजय सूरकरांसारख्या दिग्दर्शकाच्या बरोबर काम केलेल्या आदित्य इंगळे यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे.

आदित्य इंगळे दिग्दर्शित या चित्रपटाची कथा अभिराम भडकमकर, पटकथा- संवाद अभिराम भडकमकर आणि आदित्य इंगळे यांचे आहेत. या संगीतप्रधान चित्रपटाचे गीतकार वैभव जोशी असून प्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांनी संगीत दिले आहे.

या चित्रपटासाठी ज्येष्ठ गायिका आशा भोसले, अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, शुभा जोशी, विभावरी जोशी, जसराज जोशी, पं. रघुनंदन पणशीकर, राजेश दातार, संदीप उबाळे, माधवी नानल, अमोल निसळ आणि स्वतः संगीतकार नरेंद्र भिडे यांनी पार्श्वगायन केले आहे. 

या चित्रपटात सुबोध भावे, ज्योती चांदेकर, मधुरा वेलणकर- साटम, किशोर कदम, आनंद इंगळे, हृषिकेश जोशी, अभिराम भडकमकर, विजय केंकरे, वैभव तत्ववादी आणि अतिथी कलाकार सीमा देव यांच्या भूमिका आहेत. 

Thursday, November 3, 2011

'आम्ही चमकते तारे' चा शानदार मुहूर्त.

Amhi Chamakate Taare
रमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई) च्या अभूतपूर्व यशानंतर साईनाथ चित्र या बॅनरअंतर्गत 'आम्ही चमकते तारे' या चित्रपटाचा मुहूर्त गीत ध्वनीमुद्रणाद्वारे नुकताच मुंबईतील आजीवसन स्टुडिओमध्ये करण्यात आला. 

'श्वास' सारख्या लोकप्रिय चित्रपटाच्या निर्मितीमध्ये मोलाची भूमिका असणारे दिपक. एस. चौधरी प्रस्तुत या चित्रपटाचे संकलन्-दिग्दर्शन प्रकाश जाधव करणार आहेत. चित्रपटाची कथा अनंत सुतार यांची आहे. 

या चित्रपटात संगीताला विशेष प्राधान्य दिले आहे. गीतकार सागर पवार यांच्या जोडीला रवींद्र आवटे आणि प्रमोद बेजकर यांनी 'आम्ही चमकते तारे' साठी गीतलेखन केले आहे. संगीतकार आहेत श्रीरंग आरस. या चित्रपटासाठी अवधूत गुप्ते, स्वप्निल बांदोडकर, साधना सरगम, वैशाली सामंत, बेला शेंडे, आनंद शिंदे आणि संजिवनी भेलांडे या आजच्या मराठीतील आघाडीच्या गायकांनी पार्श्वगायन केले आहे.

Wednesday, October 19, 2011

२४ ऑक्टोबर पासून 'खल्लास डान्स एकच चान्स'

Isha Kopikar, Eesha Kopikar
'मी मराठी'वर एकदम हटके असा 'खल्ल्लास डान्स एकच चान्स' हा रिऍलिटी शो २४ ऑक्टोबर पासून येत आहे. या शोचे खास आकर्षण म्हणजे हिंदीतील नामवंत नायिका 'ईशा कोपीकर' या शो मध्ये डान्सगुरु म्हणून काम पाहणार आहेत. तर मयुरेश वाडकर, वृषाली चव्हाण, सिद्धेश पै हे तीन कोरिओग्राफर स्पर्धकांना मार्गदर्शन करणार आहेत.  

या शो मध्ये कॉल बॅक राऊंड नाही म्हणजेच स्पर्धकाला पुन्हा संधी दिली जाणार नसल्याने या कार्यक्रमाला असे शिर्षक देण्यात आले आहे. मराठी शोजमध्ये यापूर्वी कधीही न वापरले गेलेले नृत्यप्रकार जसे जॅज, सालसा, लॉकिंग पॉपिंग, हिपहॉप यासोबतच भारतीय सांस्कृतिक नृत्याने रंगलेल्या या दर्जेदार कार्यक्रमाची मजा आपल्याला २४ ऑक्टोबरपासून सोम-मंगळ, रात्री ९ वाजता 'मी मराठी' वाहिनीवर लुटता येणार आहे.

Thursday, October 13, 2011

'स्वराज्य ... मराठी पाऊल पडते पुढे' चित्रपटाची ध्वनीफित प्रकाशित.

Swarajya Marathi Paul Padte Pudhe
'रईस लष्करिया प्रॉडक्शन' निर्मिती संस्थेचा 'स्वराज्य ... मराठी पाऊल पडते पुढे' हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय प्रदर्शनाआधीच या चित्रपटातील सुमधूर गीतांची ध्वनीफित चित्रपटातील कलाकार- तंत्रज्ञांच्या उपस्थितीत सुप्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांच्या हस्ते नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे.

या चित्रपटाद्वारे विशाल-विहार या जोडीने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. सादीक लष्करिया चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. विहार घाग लिखीत यातील गीतांना संगीतकार नितीन हिवरकर- विहार घाग यांनी संगीत दिले आहे. या चित्रपटाचे शिर्षक गीत नंदेश उमप यांनी गायलं असून रविंद्र साठे, त्यागराज खाडीलकर, साधना सरगम, सुदेश भोसले आणि स्वरुप भालवणलकर अशा सुप्रसिद्ध गायकांच्या आवाजात ती स्वरबद्ध करण्यत आली आहेत. 

चित्रपटाची संकल्पना-कथा-पटकथा-गीते तसेच नृत्यदिग्दर्शन विहार घाग यांनी केले असून संवाद विहार घाग व मंदार गायधनी यांनी लिहीले आहेत. चित्रपटात राजेश शृंगारपुरे, अरुण नलावडे, इला भाटे, अंशुमन विचारे, सुशृत मंकणी, किरण माने, नम्रता गायकवाड, निर्माला कोटणीस, हेमांगी कवी, वर्षा दांदले, जयंत पाटेकर, दर्शन जरिवाला या कलाकारांच्या यात भूमिका आहेत.

Tuesday, October 11, 2011

'यमाच्या गावाला जाऊ या' चित्रपटातील गाणे कार्तिकी गायकवाडवर चित्रीत.

Kartiki Gaikwad,Yamachya Gawala Jayu Yaa
गार्गी मुव्हीज या चित्रपटनिर्मिती संस्थेअंतर्गत विदर्भातील प्रसिद्ध साहित्यिक ज्ञानेश वाकुडकर यांनी 'यमाच्या गावाला जाऊ या' या मराठी चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण कोल्हापूर येथील मळ्यात सुरु आहे. सारेगामा लिटील चॅम्प विजेती गायिक कार्तिकी गायकवाड प्रथमच पार्श्वगायन करणार आहे आणि हे गाण तिच्यावरच चित्रीत करण्यात येत आहे.

चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि गीते स्वतः ज्ञानेश वाकुडकर यांचे आहेत दिग्दर्शन सुद्धा त्यांचेच आहे.

चित्रपटात एकूण ६ गाणी आहेत ज्याला मिलिंद इंगळे यांचे संगीत लाभले आहे. मिलिंद शिंदे, मिलिंद इंगळे, नेहा राजपाल आणि नंदेश उमप यांनी गायली आहेत. 

चित्रपटात मुख्य नायिका तेजा देवकर असून तिच्यासोबत राहूल लोहगावकर, मंगेश देसाई, विजय चव्हाण, चारुशीला वाच्छानी, सनी भूषण मुनगेकर, विजय पाटकर, किशोरी अंबिये असे कलाकार असणार आहेत.

Tuesday, October 4, 2011

'तृतीय नेत्र' चा मुहूर्त पुण्यात संपन्न.

Trutiy Netra
महात्मा जोतिराव फुले यांच्या 'तृतीय रत्न' या नाटकावर आधारित 'तृतीय नेत्र' या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पुण्यातील सासवड येथे करण्यात आला. बापूराव ओहळ यांनी मुहूर्ताचा नारळ फोडला तसेच श्रद्धा सावर्डेकर यांनी मुहूर्त क्लॅप दिला. शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर आधारीत 'तृतीय नेत्र' या चित्रपटाची निर्मिती मुक्तीघोष प्रॉडक्शन हाऊस या बॅनरअंतर्गत सिद्धार्थ भालेराव यांनी केली आहे. 

'तृतीय नेत्र' या चित्रपटाची कथा व संवाद महात्मा जोतिराव फुले यांचे असून पटकथा सिद्धार्थ भलेराव यांची आहे. या चित्रपटामध्ये यतिन कार्येकर, अनुपम श्याम, लालन सारंग, डॉ. विलास उजवणे, वरद चव्हाण, ज्योति पाटील, अंजली उजवणे, प्रदीप पटवर्धन, प्रदीप रघुनाथ यांच्यासह रझा मुराद आणि शाहबाज खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत.