Monday, February 27, 2012

प्रशांत दामलेच्या गायनाने सरेगमपचा मंच झाला भावूक.

नुकत्याच चित्रीत झालेल्या सारेगमप भागाच्या चित्रीकरणादरम्यान प्रशांत दामले यांनी पंडित वसंतराव देशपांडे यांचे 'अष्टविनायक' या चित्रपटातील दाटून कंठ येतो' हे गाजलेले गीत सादर केले आणि परीक्षक वंदना गुप्ते, अवधूत गुप्ते, कार्यक्रमातील अन्य स्पर्धक कलावंतांबरोबरच उपस्थित प्रेक्षकांनाही अश्रू आवरेनासे झाले आणि सारेगमपचा मंच ह्ळवा, भावूक झाला. 

प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले रसिकांच्या चेहर्‍यावर हसू फुलवण्यासाठी प्रख्यात आहेत. मात्र 'आयडिया सारेगमप'च्या सेटवर प्रशांत दामलेंमधील वत्सल पित्याचे दर्शनही सर्वांना घडले. या गाण्याविषयी बोलताना आपली लेकही आता सासरी जाणार असल्याने ही गाण्यातील भावोत्कटता सध्या आपण कशा अनुभवतो आहोत ते सांगताना प्रशांत दामले यांना भावना अनावर झाल्या. तर त्यांची कन्या चंदना हिने बाबांबरोबरचे नाते कसे मित्राचे आहे आणि सासरी जाताना ती बाबाला स्वतःबरोबर नेणार आहे आणि त्यांनी तसा करार केलाय हे सांगताना तिला अश्रू आवरले नाहीत. बापलेकीचे हे नाते सारेगमपचा अवघा मंच हळवा करुन गेले. 

येत्या बुधवारी, २९ फेब्रुवारीला रात्री ९.३० वाजता झी मराठीवर 'आयडिया सारेगमप' मधील हे हळवे क्षण रसिकांना अनुभवता येणार आहे.

संगीतकार राम कदम आणि गायिका सुलोचना चव्हाण यांना 'ढोलकीच्या तालावर' मध्ये मानवंदना.

येत्या २९ फेब्रुवारी आणि १ मार्चचा 'ढोलकीच्या तालावर' चा सेमी फायनल भाग संगीतकार राम कदम आणि गायिका सुलोचना चव्हाण या दोघांना समर्पित ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे 'ढोलकीच्या तालावर' च्या या मानवंदना भागात सुलोचना बाई परीक्षक म्हणूनही लाभल्या आहेत. त्यांनी गायलेल्या लावण्यांवर तसेच राम कदमांनी संगीत दिलेल्या लावण्यांचा या भागात समावेश करण्यात आला आहे.

या रिऍलिटी शो मध्ये बारा लावण्यवतींमधून सेमी फायनल मध्ये स्नेहा वा, वैशाली जाधव, सुकन्या काळण, सोनाली पवार, सोनाली खरे, पियुषा पाटील या सहा लावण्यवतींमध्ये चुरशीची स्पर्धा रंगली असून अंतिम लढत पाच लावण्यवतांमध्ये होणार आहे. 

'ढोलकीच्या तालावर' या कार्यक्रमातून मराठी रिऍलिटी शोमधील सर्वांत मोठी बक्षिसे या निमित्ताने देण्यात येणार आहे. पहिल्या क्रमांकाच्या विजेत्या लावण्यवतीला पाच लाख रुपये व असुवर्णे मनचिन्हाने गौरविण्यात येणार असून दुसर्‍या क्रमांकासाठी तीन लाख आणि चांदीचे मानचिन्ह देण्यात येणार आहे. तिसर्‍या क्रमांकाच्या विजेतीला एक लाख रुपये व ब्रांझ मानचिन्ह देण्यात येणार आहे.

Friday, February 24, 2012

२४ फेब्रुवारीला येणार 'संभा.... आजचा छावा'.

'समृद्ध जीवन' प्रस्तुत आणि देवेंद्र चौगुले निर्मित 'संभा.... आजचा छावा' या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने जबरदस्त ऍक्शन, श्रवणीय संगीत, बेफाम नृत्य, वेगवान कथा- पटकथा आणि चमकदार संवाद या दाक्षिणात्य स्टाईलचा पुरेपुर वापर प्रथमच रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे. 

दक्षिणेतील सुपरस्टार नागार्जुनसाठी काम करणारे कोरीओग्राफर कलाधरन यांनी या चित्रपटातील गीतांसाठी नृत्य दिग्दर्शन केले असून 'बॉस', 'वृंदावन'सारख्या गाजलेल्या चित्रपटासाठी ऍक्शन डिरेक्टर म्हणून काम केलेल्या स्टंटमास्टर आनंदराज यांच्या मार्गदर्शनाखाली सादस दृश्ये चित्रीत झाली आहेत.

भ्रष्ट प्रवृत्तीविरुद्ध एकाकी लढा देणार्‍या नायकाची कथा 'संभा'मधून पहायला मिळणार आहे. चित्रपटाचे निर्माते देवेंद्र चौगुले यांनी चित्रपटात संभाची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. त्यांच्यासोबत मोहन जोशी, मिलिंद गुणाजी, कुलदीप पवार, मधू कांबीकर, दिपाली सय्यद, तेजश्री खेळे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.

Thursday, February 23, 2012

'तमाशासम्राज्ञी' विठाबाई नारायणगांवकर यांचा जीवनपट उलगडणारा 'विठा' लवकरच रुपेरी पडद्यावर.

'तमाशा' या लोककलेला सरकार दरबारी आणि जनमानसात प्रतिष्ठा मिळवून देण्याचे कार्य करणार्‍या 'तमाशासम्राज्ञी' विठाबाई नारायणगांवकर यांचे अलौकिक जीवन जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी त्यांच्या आयुष्यावर बेतलेला 'विठा' जीवनपट 'नम्रता एण्टरटेन्मेंट प्रा.. लि' ही चित्रनिर्मिती संस्था रुपेरी पडद्यावर मांडत आहे. निर्माते दिनेश अग्रवाल, सौ प्रितम अग्रवाल यांनी चित्रपटाच्या निर्मितीची धुरा उचलली असून पुंडलिक धुमाळ 'विठा' चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

तमाशा प्रकारात राष्ट्रपती पुरस्कार मिळालेल्या त्या पहिल्या स्त्री कलाकार होत्या. प्रचंड प्रसिद्धी, मानसन्मान आणि पैसा मिळूनही उतारवयात त्यांच्या आयुष्यात लाचारीच आली. योगीराज बागुल यांच्या 'तमाशा : विठाबाईच्या आयुष्याचा' या पुस्तकावर 'विठा' चित्रपट बेतलेला आहे. 

विठाबाई नारायणगांवकर यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेत्री उर्मिला कानेटकर साकारणार असून अभिनेता उपेंद्र लिमये यांची हे महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

Wednesday, February 22, 2012

'सौभाग्य माझे दैवत' मध्ये नम्रता गायकवाडचे तांडव नृत्य.

शिव साई प्रॉडक्शन आणि अरुण गिरे यांची निर्मिती असलेला 'सौभाग्य माझं दैवत' या मराठी चित्रपटात नम्रता गायकवाड प्रमुख नायिकेची भूमिका साकारत आहे. 

या चित्रपटात तिच्यावर एक बेफाम असे तांडव नृत्य चित्रीत करण्यात आले आहे. या नृत्याचे श्रेय ती देते नृत्य दिग्दर्शक अनिल सुतार यांना. कारण त्यांनी घेतलेल्या मेहनत आणि त्यांच्या प्रयत्नांमुळेच ती हे तांडव नृत्य साकारु शकली असं ती सांगते. 

हे तांडव नृत्य साकारण्यासाठी तिने माधुरी दिक्षित, श्रीदेवी आणि जयाप्रदा यांच्या ज्या चित्रपटात त्यांनी तांडव नृत्य साकारले आहे ते चित्रपट पुन्हा पुन्हा पाहिले असल्याच तिने सांगितलं त्यामुळे या नृत्याच श्रेय या तिघींनासुद्धा देते आणि या चित्रपटासाठी तिची निवड करुन हि संधी दिल्याबद्दल निर्माते अरुण गिरे यांचे ती आभार मानते.

Tuesday, February 21, 2012

अमृता, संदेश आणि उमेश यांचा नवा मास्तर गिरीश कुलकर्णी.

गिरीश कुलकर्णी, अमृता सुभाष, संदेश कुलकर्णी आणि उमेश कुलकर्णी यांनी मसालाच्या चित्रीकरणानिमित्ताने महाराष्ट्रातल्या नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद येथे एक भलीमोठी मसाला टूर नुकतीच केली. त्यांच्या या टूरला चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्यामुळे उरलेल्या महाराष्ट्रप्रदेशातही अशीच टूर करायची आहे. 

ते ज्या ज्या ठिकाणी दौरा करणार आहेत त्या त्या ठिकाणचा मसाला.... तिथल्या स्थानिकांच्या बोलण्या चालण्यातला लहेजा, चालीरीती, आनंदसोहळे, खाण्यापिण्याच्या पद्धती, व्यापारी बाजारपेठा, मनोरंजनाची ठिकाणे अशा अनेक गोष्टींचा अगदी पद्धतशीर अभ्यास करीत आहेत आणि यासाठी त्यांच्यातलाच गिरीश त्यांना माहिती पुरवतोय. त्यामुळे अमृता सुभाष, संदेश कुलकर्णी आणि उमेश कुलकर्णी यांचा नवा मास्तर म्हणून गिरीश कुलकर्णी यांच्या नावाची सध्या चर्चा आहे.

Thursday, February 16, 2012

लवकरच घुमणार 'अरे, आवाज कुणाचा....!'.

Avaaj Kunacha

स्वच्छ आणि क्रियाशील सरकारला निवडून देण्यासाठी युवा वर्गाचा, कार्यकर्त्यांचा सहभाग अनिवार्य आहे. येत्या निवडणुकीत प्रत्येक नागरीकाने आपल्या मतदानाचा मुलभूत हक्क बजावावा हे आवाहन करण्यासाठी कॉमनमॅन फिल्मस निर्मित आणि हेमंत देवधर दिग्दर्शित 'अरे, आवाज कुणाचा...' या आगामी चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ एकत्र आले होते. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Wednesday, February 15, 2012

'संस्कृती कला दर्पण'च्या चर्चासत्रात मराठी चित्रपटांच्या प्रसिद्धीबाबत चर्चा.





'संस्कृती कला दर्पण' चित्रपट महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी आजचा चित्रपट, जाहिरात आणि प्रमोशन या विषयावर चर्चा सत्र आयोजित केले होते. या चर्चा सत्रात अभिनेता मिलिंद गवळी, निर्माता दिग्दर्शक विजू माने, निर्माती दिग्दर्शका कांचन अधिकारी, पत्रकार अमित भंडारी, जनसंपर्क व्यवसायिक गणेश गारगोटे, मराठीमुव्हीवर्ल्ड डॉट कॉमचे संचालक श्री. जितेंद्र मोरे व डिझायनर मिलिंद मटकर आदी मान्यवरांचा सहभाग होता. या चर्चा सत्रात जाहिरात आणि प्रमोशन या विषयाचे विविध अंगी चर्चा करुन चित्रपट कशा प्रकारे लोकांपर्यंत पोहचवला जाईल या विषयी ऊहापोह झाला.

हिंदी चित्रपटाची नक्कल केल्यामुळे मराठी चित्रपट फसतात ते सर्वसामान्यांपर्यंत पोहचत नाहीत असे प्रतिपादन दिग्दर्शक विजु माने यांनी केले. हॉलिवूड आणि बॉलीवुडच्या स्पर्धेत मराठी चित्रपटांने टिकण्यासाठी प्रमोशन आणखी मोठ्या स्तरावर केले पाहिजे असे प्रतिपादन गणेश गारगोटे यांनी केले. मराठीमुव्हीवर्ल्डचे संस्थापक श्री.जितेंद्र मोरे यांनी ऑनलाईन प्रमोशन या विषयावर बोलताना सांगितले कि "आपल्या इंडस्ट्री मधील कलाकार आणि तंत्रज्ञांना इंटरनेट ह्या माध्यमाची प्रमोशनसाठी हवी तितकी पुरेशी माहिती नाही. आज इंग्लिश आणि हिंदी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्यातील  कलाकार, दिग्दर्शक हे इंटरनेट चा प्रभावी वापर  करत  असताना मराठी इंडस्ट्रीमधील  कलाकार आणि निर्मात्यांनीही त्याचे महत्व जाणून घेण्याची गरज आहे. ऑनलाईन प्रमोशन म्हणजे फक्त वेबसाईट बनवणे किंवा सोशल नेटवर्किंग साईटवर आपले पेज बनवणे एवढेच नाही तर ते प्रॉपर स्ट्रॅटेजी आखून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवून आपल्या प्रेक्षकांना एन्गेज कसे ठेवावे ते आहे." आणि हे सगळ करण्यासाठी मराठीमुव्हीवर्ल्ड डॉट कॉम कसे फायद्याचे आहे हे सुद्धा त्यांनी यावेळी सांगितले.

निर्मात्याने आपला प्रेक्षक वर्ग निश्चित करायला हवा चित्रपट जर मल्टिप्लेक्ससाठी असेल आणि त्याचे प्रमोशन जत्रेत केले तर त्याचा काही फायदा होत नाही. आपल्याकडे मोठया नावाचे हिरो नाहीत त्यामुळे प्रमोशन जोरात करायला पाहिजे. असा आपला वेगळा ठसा निर्माती - दिग्दर्शिका कांचन अधिकारी यांनी उमटवला. या चर्चासत्रास प्रेक्षकांचाही उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.



 

Tuesday, February 14, 2012

'संस्कृती कला दर्पण' १२ व्या चित्रपट महोत्सवाची दिमाखात सुरुवात.

'संस्कृती कला दर्पण' या संस्थेतर्फे आयोजित १२ व्या चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सोहळा सोमवार ज्येष्ठ कथा, पटकथाकार, दिग्दर्शक सागर सरहद्दी यांच्या शुभहस्ते रविंद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे संपन्न झाला. याप्रसंगी रमेश साळगावकर, रेखा सहाय, समृद्धी पोरे, कांचन अधिकारी, मिलद गवळी, गजेंद्र अहिरे, विजय पाटकर, प्रमोद पवार, अजय फणसेकर, ए राधास्वामी, स्मिता जयकर, अमृता राव, संतोष भिंगार्डे, सौमित्र पोटे आदि मान्यवर उपस्थित होते.

जून २०१२ मध्ये 'संस्कृती कला दर्पण' या संस्थेतर्फे राष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करणार असल्याचे त्यांनी आज सांगितले. सध्या चालू असलेल्या चित्रपट महोत्सवातील उत्कृष्ट ३ चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्राधान्य दिले जाईल अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे यांनी सांगितले.

'संस्कृती कला दर्पण' या चित्रपट महोत्सवात तब्बल ५६ मराठी चित्रपटातून १७ उत्तम चित्रपटाची निवड करण्यात आली. या परीक्षणाचे कार्य अभय राजाध्यक्ष, रमेश साळगावकर, रेखा सहाय, समृद्धी पोरे या मान्यवरांनी केल्याचे यासंस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे आणि उपाध्यक्षा अर्चना नेवरेकर यांनी सांगितले. या १७ चित्रपटामध्ये 'शाळा', 'गजर', 'रे ला रे', 'डँबिस', 'खेळ मांडला', 'अर्जुन', 'आम्ही का तिसरे', 'फक्त लढ म्हणा', 'आरोही', 'सोपान एक जिदद', 'मुक्ती', 'बालगंधर्व', 'झकास', 'यदा यदा ही धर्मस्य', 'नऊ सव्वा नऊची वेळ होती', 'देऊळ' या चित्रपटांबरोबर 'आजच्या चित्रपटावरील जाहिरात आणि प्रमोशन' व 'आधुनिक तंत्रज्ञान आणि चित्रपट' या विषयावर चर्चासत्र आयोजित केले आहे. 

'अर्जुन' चित्रपटापासून सुरु झालेल्या महोत्सवाची सांगता 'देऊळ' या चित्रपटाने होणार आहे. या स्पर्धेत वरील १७ चित्रपटाचे परीक्षण करून  सर्वोत्कृष्ट तीन चित्रपट निवडण्याचे कार्य अमित भंडारी, संतोष भिंगार्डे, कांचन अधिकारी, सौमित्र पोटे आणि अजय फणसेकर पाहतील अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे आणि उपाध्यक्षा अर्चना नेवरेकर यांनी दिली. चित्रपट महोत्सवात निवडलेल्या तीन सर्वोत्कृष्ट चित्रपटांना प्रथम पारितोषिक रुपये २ लाख, द्वितीय दीड लाख आणि तृतीय एक लाख रुपयाचे पारितोषिक हे या महोत्सवाचे खास आकर्षण ठरले आहे.

ढोलकीच्या तालावर मध्ये 'लावणी' विरुद्ध शास्त्रीय नृत्य.

मराठी सिनेसृष्टी आणि मालिकांमध्ये काम करणार्‍या नऊ नायिका आणि तीन लावणी नृत्यांगणा यांचा स्पर्धक म्हणून सहभाग असलेल्या 'ढोलकीच्या तालावर' ह्या रिऍलिटी शो मधून दिवसागणिक एक एक लावण्यवती बाद होऊन स्नेहा वाघ, वैशाली जाधव, सुकन्या काळण, सोनाली पवार, सोनाली खरे आणि तेजा देवकर या लावण्यवती सेमी फायनलमध्ये दाखल झाल्या आहेत यांच्या सोबत कॉल बॅक एपिसोडच्या भागात पियुषा पाटील आणि सुझेन बरनेट या दोन लावण्यवती सेमी फायनल मध्ये दाखल होऊन अंतिम लढत  या लावण्यवतींमध्ये होणार आहे.

'ढोलकीच्या तालावर' हा कार्यक्रम ह्या ही वेळी विशेष ठरणार आहे तो जुगलबंदीमुळे. सेमी फायनलच्या भागात शास्त्रीय नृत्य आणि लावणीचा नजराणा प्रेक्षकांना मिळणार आहे. कथ्थक, कुचीपुडी आणि भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्यांचा नजराणा आणि लावणी यांची जुगलबंदी रंगणार आहे 'ढोलकीच्या तालावर घुंगरांच्या बोलावर मध्ये.

आगामी भागात हिंदी आणि मराठी मालिका आणि चित्रपटात काम करणारी तसेच कथ्थक या शास्त्रीय नृत्यात पारांगत असलेली अभिनेत्री, नृत्यांगणा प्राची शहा स्पेशल ज्युरी म्हणून येणार आहेत.

Saturday, February 11, 2012

'संस्कृती कला दर्पण' - १२ व्या चित्रपट महोत्सवाची पर्वणी

SKD Chitrapat Mahotsav 2012
'संस्कृती कला दर्पण' या संस्थे तर्फे रविंद्र नाटय मंदिर, प्रभादेवी येथे दि १३ फेब्रु ते १७ फेब्रु दरम्यान भव्य चित्रपट महोत्सवाची पर्वणी रसिकांना अनुभवण्यास मिळणार आहे. 

या चित्रपट महोत्सवात तब्बल ५६ मराठी चित्रपटातून १७ उत्तम चित्रपटाची निवड करण्यात आली. या १७ चित्रपटामध्ये 'शाळा', 'गजर' , 'रे ला रे' , 'डँबिस', 'खेळ मांडला' , 'अर्जुन',  'आम्ही का तिसरे' , 'फक्त लढ म्हणा', 'आरोही' , 'सोपान एक जिदद' , 'मुक्ती' , 'बालगंधर्व' , 'झकास' , 'यदा यदा ही धर्मस्य' , 'नऊ सव्वा नऊची वेळ होती', 'देऊळ' या चित्रपटांबरोबर 'आजच्या चित्रपटावरील जाहिरात आणि प्रमोशन' व 'आधुनिक तंत्रज्ञान आणि चित्रपट' या विषयावर चर्चासत्र आयोजित केले आहे.

'शाळा' चित्रपटापासून सुरु झालेल्या महोत्सवाची सांगता 'देऊळ' या चित्रपटाने होणार आहे. या स्पर्धेत वरील १७ चित्रपटाचे परीक्षण करून  सर्वोत्कृष्ट तीन चित्रपट निवडले जाणार असून निवडलेल्या तीन सर्वोत्कृष्ट चित्रपटांना प्रथम पारितोषिक रुपये २ लाख, द्वीतीय दीड लाख आणि तृतीय एक लाख रुपयाचे पारितोषिक हे या महोत्सवाचे खास आकर्षण ठरले आहे.

Friday, February 10, 2012

डॉ. श्रीराम लागूंच्या अभिनयाने 'मसाला'ची चव वाढणार.



'नटसम्राट' म्हणून रसिक मान्यता मिळविणारे जेष्ठ अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू 
यांचे प्रदीर्घ काळानंतर रसिकांना मोठ्या पडद्यावर सुखद दर्शन होणार आहे.

आरभाट निर्मिती कृत व प्रवीण मसालेवाले यांच्या 'मसाला ' या आगामी चित्रपटात डॉक्टर श्रीराम लागू एका 'अत्तरवाल्याच्या' भूमिकेत दिसणार असून यानिमिताने त्यांच्या अभिनयाचा सुगंध पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर दरवळणार आहे. 'मसाला' चे क्रिएटिव्ह प्रोड्युसर उमेश कुलकर्णी, अभिनेते - कथालेखक गिरीश कुलकर्णी व दिग्दर्शक संदेश कुलकर्णी या 'कुलकर्णी त्रयींनी' ही किमया साध्य केली आहे.  बुजुर्ग कलावंतांची कलेवरची निष्ठा, त्यांची कामाची शिस्त आणि कामाकडे पाहण्याची दृष्ठी खूपच प्रेरणा देणारी असते असे या चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर उमेश कुलकर्णी यांचे प्रामणिक मत आहे. त्यामुळे त्यांच्या या पूर्वीच्या चित्रपटातही चंद्रकांत गोखले ( वळू ). विठ्ठल उमप ( विहीर ) , नसिरुदिन शहा ( देऊळ ) , हे बुजुर्ग कलावंत छोट्या छोट्या पण महत्वाच्या भूमिकेत पडद्यावर दिसले होते. आणि आता 'मसाला' या आगामी चित्रपटात डॉक्टर लागू 'हद्रीस भाई' नावाच्या एका 'अत्तरवाल्याच्या' भूमिकेत दिसणार आहेत.

Thursday, February 9, 2012

'गोळाबेरीज' मधून 'म्हैस' वजा.



महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांच्या आयुष्यावर तयार करण्यात आलेल्या चित्रपटातून 'म्हैस' ची वजाबाकी करण्यात आली आहे. 

"प्रांजळ हेतूने हा चित्रपट तयार केला. पण काही लोकांनी पु.लं. च्या 'म्हैस' ह्या कथेबाबत काहूर पेटवल्यानं आज प्रदर्शित होणार्‍या 'गोळाबेरीज' या चित्रपटातून 'म्हैस' या कथेवर चित्रीत करण्यात आलेला भाग काढून टाकण्यात आला आहे. असे चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांनी सांगितले.

Saturday, February 4, 2012

'डोंबारी' चित्रपटाचे चित्रीकरण सुरु.

Dombari, Hemangi Kavi
ऐश्वर्या मुव्हीजची निर्मिती असलेल्या 'डोंबारी' या चित्रपटाचे चित्रीकरण पुण्याच्या पौड, मुळशी, सावरगाव, बेलवडे या परिसरात सध्या सुरु आहे.  चाकोरी बाह्य विषयाची हाताळणी करून 'डोंबारी' समाजावर थेट भाष्य करुन प्रकाशझोत टाकणार्‍या या चित्रपटाची कथा - पटकथा व दिग्दर्शक अशी तिहेरी बाजू सुनिल वाईकर हे संभाळत आहेत.

पोटाची खळगी भरण्यासाठी दररोज जीवघेणी कसरत करून लोकांना करमणूक करून दाखवणेस्वतःच्या आयुष्याचा खेळ खंडोबा झाला असला तरी कष्ट करून मुलांना चांगले शिक्षण द्यायचे असे स्वप्न त्यांच्यातील अनेकजण पाहू लागले आहेत . 

असेच काहीसे स्वप्न पाहणाऱ्या एका 'डोंबारी' कुटुंबाची कथा या चित्रपटात मांडली आहे. अशा वेगळ्या धाटणीच्या विषयाचे संवाद लेखन शंकर नर्‍हे यांचे असून गीत लेखन रवी पाईक व राजेंद्र भोसले यांचे आहे. तर संगीताची धुरा संगीतकार हर्षीत अभिराज यांनी संभाळली आहे. 

मिलिंद शिंदे, हेमांगी कवी, मधू कांबीकर, मेधा घाडगे, मोहिनी कुलकर्णी, दादा पासलकर, दिपक करंदीकर, संजय खापरे हे कलाकार चित्रपटात आपल्याला दिसतील.

मराठी संगीत रंगभूमीचा प्रवास उलगडणारी 'रंगयात्रा' ६ फेब्रुवारीला.

Kalangan Rangyatra
मराठी रंगभूमीच्या इतिहासातल्या बालगंधर्व सुवर्णयुगापासून आजच्या काळातल्या संगीत मराठी रंगभूमीचा प्रवास आणि त्यातली स्थित्यंतरे यांचा आलेख आखत दुसरीकडे आजवर अज्ञात असलेला अनेक प्रकारचा तपशीलही उलगडणारा "रंगयात्रा" हा रंगीत - संगीत कार्यक्रम ०६ फेब्रुवारी रोजी मुंबईत होत आहे. 

'कलांगणच्या जल्लोष २०१२' अंतर्गत होत असलेल्या 'रंगयात्रा' या कार्यक्रमाची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन मराठी संगीत रंगभूमीचे अभ्यासक वर्षा भावे यांचे आहे. चार ते पंचवीस वयोगटातले बाल आणि तरुण कलाकार हा कार्यक्रम सादर करणार आहेत. 

वर्षा भावे, चैतन्य कुलकर्णी, केतकी भावे, अवंती पटेल, आदिती आमोणकर, सोमेश नार्वेकर, सायली महाडिक, गायत्री फुणगुसकर, ईशा लिमये, नंदिनी आमोणकर, अपूर्वा क्षीरसागर, कुहू दातार, नेहा कुलकर्णी, कलिका नाईक, तन्वीर मुणगेकर, राशी हरमळकर, निवेदक पूर्वी भावे व आदित्य सुरते कलावंतांचा सहभाग असलेला हा कार्यक्रम ६ फेब्रुवारी रोजी ६:४५ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क येथे हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. अधिक माहितीसाठी ९५९४९६२५८७/९३ येथे संपर्क साधा

Friday, February 3, 2012

आजपासून चित्रपटगृहात 'येडयांची जत्रा'.

'ऑरेंजन एण्टरटेन्मेंट' प्रस्तुत 'येडयांची जत्रा' हा चित्रपट आज ३ फेब्रुवारीला चित्रपटगृहात दाखल  झाला आहे. विनोदातून समाजप्रबोधनाचा संदेश देण्याचा आगळावेगळा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.

निर्माते विश्वजीत गायकवाड आणि दिग्दर्शक मिलिंद अरुण कवडे यांनी 'येड्यांची जत्रा' या त्यांच्या पहिल्याच चित्रपटातून ग्रामीण भागातील स्वच्छतेच्या प्रश्नाला हात घालण्याचे धाडस केले आहे. या चित्रपटाची कथा - पटकथा, दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी लिहिली असून संवाद प्रकाश भागवत यांचे आहेत. गुरु ठाकूर लिखित चित्रपटातील गीतांना क्षितीज वाघ यांनी संगीत दिले असून पार्श्वसंगीत पंकज पुष्कर यांचे आहे. सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका सरोज खान व संतोष पालवणकर यांनी क्षितीज वाघ व श्रेया घोषाल, अमृता नातू यांच्या स्वरातील गीतांवर कोरिओग्राफी केली आहे.

चित्रपटात मध्यवर्ती भूमिका भरत जाधवने साकारली असून त्याच्या सोबतीला मोहन जोशी, विनय आपटे, संदीप पाठक, पंढरीनाथ कांबळी, निशा परुळेकर, आरती सोळंकी, विशाखा सुभेदार, आनंदा कारेकर, जयराज नायर, गणेश मयेकर, सुहास भालेकर, प्रकाश भागवत, सतिश तारे, किशोर नांदलस्कर, जयंत सावरकर, मनोज टाकणे, अंजली उजवणे, वासू भागवत या कलाकारांसोबत स्नेहा कुलकर्णी ही नावेदित अभिनेत्री चित्रपटातून पदार्पण करते आहे.