Tuesday, January 18, 2011

'मन्या-द वंडरबॉय' २८ जानेवारीला प्रदर्शित होणार.

अर्थ मोशन पिक्चर्स २८ जानेवारीला 'मन्या -द वंडरबॉय' हा त्यांचा चित्रपट प्रदर्शित करीत आहेत. महाराष्ट्राच्या एका कोप-यातील, अगदी नाव ही ऐकिवात नसलेल्या खेडेगावातील एका सामान्य मुलाच्या असामान्य जिद्दीची, मेहनतीची ही कहाणी आहे.   घरची प्रचंड गरीबी, अपंग वडील, त्यामुळे घरची जबाबदारी आई, मन्या आणि त्याची बहिण ह्या तिघांवरच असते. घराच्या गाईच दूध सेंटरवर पोहोचवण्याची जबाबदारी मन्याची असते. शाळा आणि दूध सेंटर बरेच दूर असल्यामुळे मन्याची होत असलेली धावपळ परिणामी शाळेला नेहमीच होणारा उशीर. असा मन्याचा दिनक्रम. ह्याच दरम्यान शाळेचे ट्रस्टी त्यांच्या मुलाला एथलीट बनवण्यासाठी कोच नियुक्त करतात. त्यांचे ट्रेनिंग शाळेतच चालू असते.शाळेत धावण्याची स्पर्धा आयोजित केली जाते. मात्र ती स्पर्धा मन्या जिंकतो आणि कोच सहीत सर्वांचेच लक्ष वेधूनघेतो.
 
'मन्या'च्या भूमिकेतून दमदार पदार्पण करतोय अभिनेता अमित्रायन आणि त्याला तितकीच दिलखुलास साथ दिली आहे मयुरी वाघ हिने. राजेश श्रृंगारपुरे, मन्याचे ऑलिंपिक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध असलेले, 'मन्या'चे कोच म्हणून एका हिट आणि फिट भूमिकेत दिसणार आहेत. सोबत माधवी जुवेकर, विघ्नेश जोशी, अभिजीत चव्हाण,विजू खोटे इत्यादी कसलेले कलाकार असणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत संग्रामसिंह गायकवाड. प्रसाद गावडे यांच्या कथेवर हरीश नायर ह्यांनी मन्याची पटकथा बांधली आहे. चित्रपटाची गाणी लिहिली आहेत अश्विनी शेंडे ह्यांनी आणि त्यावर संगीत साज चढवला आहे निलेश मोहरीर ह्यांनी. ह्या चित्रपटात मन्याच्या लहानपणीची भूमिका ऋषीराज पवार ह्याने साकारली आहे.

No comments:

Post a Comment