Thursday, January 27, 2011

'गुंतता हृदय हे' नाटकाचा उद्या २८ जानेवारीला पुण्यात शुभारंभ.

जुन्या नाटकांना पुन्हा रंगमंचावर आणण्यासाठी सुनिल बर्वेच्या 'सुबक' ने हार्बेरियम द्वारे सुरुवात केली. आणि त्याला यशही मिळाले. त्यानंतर निलम शिर्के आणि आर. डी. सामंत सुद्धा 'बॅरिस्टर' द्वारे यात सामील झाले. 

सागर नाईकरे यांचे 'सागर थिएटर' ने 'गुंतता हृदय हे' हे नाटक नव्याने रंगमंचावर दाखल करत आहेत. २८ जानेवारीला बालगंधर्व रंगमंदिरात होणार आहे. जवळपास २५ वर्षानंतर हे नाटक पुन्हा रंगमंचावर येत आहे. रविंद्र सांभारे यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. प्रकाश योजना बाबा पार्सेकर यांनी केली आहे. 

डॉ. काशिनाथ घाणेकर यांनी साकारलेली (बाबूल) भूमिका दीपक रेगे साकारणार आहेत. आशा काळे यांनी साकारलेली (महानंदा) भूमिका डॉ. प्रचिती सुरु साकारणार असून पद्मा चव्हाण, आशालता वाबगावकर आणि आशू यांनी वेगवेगळ्या प्रयोगांमध्ये साकारलेली कल्याणी अर्चना कुबेर साकारणार आहेत. तसेच या नाटकात दिलीप पेटवे, माधुरी कान्हेरे, राजेंद्र देशपांडे, सुधीर निरफाडके, मनोज देशपांडे आणि रश्मी अनपट यांच्याही भूमिका आहेत.  

या नाटकातून प्रथमच आशाताई (आशा भोसले) संगीतकार म्हणून आपल्याला भेटणार आहेत. त्यांनी या नाटकाच्या संगीतासाठी पुर्णपणे पारंपारिक वाद्यांचा वापर केला आहे. 

Thursday, January 20, 2011

'शहाणपण देगा देवा' प्रदर्शनासाठी सज्ज.

Shahanpan Dega Deva Starcast'अश्वमी फिल्म्स' आणि 'मीराह एण्टरटेन्मेन्ट प्रा. लि.' यांच्या संयुक्त विद्यमानातून आकारास आलेल्या 'ग्रेट मराठा एण्टरटेन्मेन्ट कंपनी प्रा. लि.' अंतर्गत तयार झालेला 'शहाणपण देगा देवा' हा पहिलाच चित्रपट २१ जानेवारीला संपूर्ण राज्यात प्रदर्शित होत आहे. 

महेश मांजरेकर आणि अभिजीत देशपांडे यांनी या चित्रपटाची पटकथा लिहीली आहे. अतुल काळे आणि सुदेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 

भरत जाधव, अंकुश चौधरी, संजय नार्वेकर, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, किशोर कदम, संतोष जुवेकर, कमलाकर सातपुते, मनवा नाईक, क्रांती रेडकर आणि महेश मांजरेकर यांच्या अभिनयाची भन्नाट जुगलबंदी या चित्रपटात पहायला मिळणार आहे. 

Wednesday, January 19, 2011

'स्टार प्रवाह' वर २४ जानेवारीपासून नवी मालिका 'मांडला दोन घडीचा डाव'

दोन बहिणींच्या नाजूक नाते आणि छोटया बहिणीसाठी मोठी बहिण कशी नेहमीच आपल्या आवडीनिवडीचा त्याग करते ते हळूवारपणे उलगडणारी नवी मालिका 'मांडला दोन घडीचा डाव' स्टार प्रवाहवर २४ जानेवारीपासून दर सोमवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता सुरु होत आहे. 

नमिता वर्तक यांच्या 'फार्म फिल्म प्रॉडक्शन्स'ची निर्मिती असलेल्या या मालिकेचे दिग्दर्शन लोकप्रिय आणि नावाजलेले दिग्दर्शक मंगेश कंथाळे यांनी केले आहे. 

या मालिकेत स्मिता शेवाळे, अनुजा साठे आणि सौरभ गोखले यांच्या या मालिकेत प्रमुख भूमिका आहेत.  ही कथा ह्या तिघांभोवती, त्यांची गुंतागुंतीची नाती, त्यांच्या आयुष्यातील चढउतार यांच्याभोवती गुंफलेली आहे. 

'अति केलं मातीत गेलं' पुण्यात प्रदर्शित.

पद्मावती फिल्म प्रस्तुत डॉ. बाळासाहेब कोलते निर्मित 'अति केलं मातीत गेलं' हा चित्रपट नुकताच पुण्यात प्रदर्शित.

चित्रपटाचे दिग्दर्शन सुरेश पाटोळे यांनी केले आहे. तर कथा, पटकथा, संवाद व गीते अशी चौफेर कामगिरी जाफर गुलाब शेख यांनी लिहिली आहेत. 

मंगेश देसाई, विजय चव्हाण, प्रकाश धोत्रे, पराग चौधरी, प्रभाकर मोरे, सुनिल गोडबोले, श्रीराम पेंडसे यांच्या या चित्रपटात भूमिका आहेत. या चित्रपटातूतन अभिनेत्री चतुर्थी पुणेकर हिने अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे

Tuesday, January 18, 2011

'मन्या-द वंडरबॉय' २८ जानेवारीला प्रदर्शित होणार.

अर्थ मोशन पिक्चर्स २८ जानेवारीला 'मन्या -द वंडरबॉय' हा त्यांचा चित्रपट प्रदर्शित करीत आहेत. महाराष्ट्राच्या एका कोप-यातील, अगदी नाव ही ऐकिवात नसलेल्या खेडेगावातील एका सामान्य मुलाच्या असामान्य जिद्दीची, मेहनतीची ही कहाणी आहे.   घरची प्रचंड गरीबी, अपंग वडील, त्यामुळे घरची जबाबदारी आई, मन्या आणि त्याची बहिण ह्या तिघांवरच असते. घराच्या गाईच दूध सेंटरवर पोहोचवण्याची जबाबदारी मन्याची असते. शाळा आणि दूध सेंटर बरेच दूर असल्यामुळे मन्याची होत असलेली धावपळ परिणामी शाळेला नेहमीच होणारा उशीर. असा मन्याचा दिनक्रम. ह्याच दरम्यान शाळेचे ट्रस्टी त्यांच्या मुलाला एथलीट बनवण्यासाठी कोच नियुक्त करतात. त्यांचे ट्रेनिंग शाळेतच चालू असते.शाळेत धावण्याची स्पर्धा आयोजित केली जाते. मात्र ती स्पर्धा मन्या जिंकतो आणि कोच सहीत सर्वांचेच लक्ष वेधूनघेतो.
 
'मन्या'च्या भूमिकेतून दमदार पदार्पण करतोय अभिनेता अमित्रायन आणि त्याला तितकीच दिलखुलास साथ दिली आहे मयुरी वाघ हिने. राजेश श्रृंगारपुरे, मन्याचे ऑलिंपिक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध असलेले, 'मन्या'चे कोच म्हणून एका हिट आणि फिट भूमिकेत दिसणार आहेत. सोबत माधवी जुवेकर, विघ्नेश जोशी, अभिजीत चव्हाण,विजू खोटे इत्यादी कसलेले कलाकार असणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत संग्रामसिंह गायकवाड. प्रसाद गावडे यांच्या कथेवर हरीश नायर ह्यांनी मन्याची पटकथा बांधली आहे. चित्रपटाची गाणी लिहिली आहेत अश्विनी शेंडे ह्यांनी आणि त्यावर संगीत साज चढवला आहे निलेश मोहरीर ह्यांनी. ह्या चित्रपटात मन्याच्या लहानपणीची भूमिका ऋषीराज पवार ह्याने साकारली आहे.

Monday, January 17, 2011

'ई टिव्ही मराठी'वर १९ जानेवारी पासून 'हल्ला बोल'.

'ई टिव्ही मराठी'वरील लोकप्रिय डान्स शो 'हल्ला बोल' चं दुसर पर्व १९ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. पहिल्या पर्वात सिलिब्रिटींची स्पर्धा रंगल्यानंतर या पर्वात महाराष्ट्राच्या विविध भागातून निवड चाचणीतून २४ स्पर्धकांची म्हणजेच १२ जोड्यांची निवड करुन त्यांच्यात ही स्पर्धा रंगणार आहे. 

या पर्वाचं प्रमुख आकर्षण असणार आहे सुप्रसिद्ध अभेनेत्री पद्मिनी कोल्हापुरे ज्या हर्षल आणि विठ्ठल या दोन नृत्य दिग्दर्शकांसोबत परीक्षकांची जवाबदारी पार पाडणार आहेत. तसेच या कार्यक्रमाच निवेदन करणार आहे गौरी निगुडकर.

रिलायन्स बिग प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या या कार्यक्रमाचं दिग्दर्शन केलं आहे अजय खुरपे यांनी. १९ जानेवारी पासून दर बुधवार आणि गुरुवार रात्री ९.३० वा. तुमच्या भेटीस येत आहे 'हल्ला बोल'.

Friday, January 14, 2011

प्रभाकर पणशीकर यांचे पुण्यात निधन.

ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर विष्णुशास्त्री पणशीकर यांचे गुरुवारी रात्री पुण्यात निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. ते गेली ६ दशकांहून अधिक काळ रंगभूमीवर कार्यरत होते. त्यांनी जवळपास ४०पेक्षा अधिक नाटके गाजवली. 'तो मी नव्हेच' मध्ये त्यांनी साकारलेल्या लखोबामुळे त्या नाटकाचे २८०० विक्रमी प्रयोग झाले. या नाटकाच्या निमित्ताने त्यांनी पाच वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. 

'तो मी नव्हेच' व्यतिरीक्त त्यांची 'अश्रुंची झाली फुले', 'इथे ओशाळला मृत्यु', 'भटाला दिली ओसरी', 'इथे गवतात भाले फुटतात', 'थँक यु मि. ग्लॅड' अशा अनेक नाटकातल्या त्यांच्या भुमिका गाजल्या. तसेच त्यांची स्वतःची 'नाट्यसंपदा' ही नाट्यनिर्मिती संस्था सुद्धा ते चालवत होते. ' कट्यार काळजात घुसली', 'अंधार माझा सोबती' अशा काही नाटकांची निर्मिती त्यांनी केली. त्यांच्या सर्व नाटकांचे मिळून ८००१ शो झाले होते यातून ते रंगभूमीच्या किती जवळचे होते ते दिसते. 

त्यांना 'महाराष्ट्र गौरव पुरस्कार', 'संगीत नाटक अकादमी पुरस्कार', 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार' अशा अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

Tuesday, January 11, 2011

PIFF मध्ये 'तार्‍यांचे बेट' चा वर्ल्ड प्रिमियर संपन्न.

Sachin Khedekar In Taryanche Bieatसध्या पुण्यात सुरु असलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील स्पर्धा विभागात सामील असलेल्या एकता कपूर, शोभा कपूर, नीरज पांडे, शीतल भाटिया निर्मित आणि किरण यज्ञोपवित दिग्दर्शित 'तार्‍यांचे बेट' ह्या चित्रपटाचा वर्ल्ड प्रिमियर सोमवारी, सायंकाळी ६ वाजता संपन्न झाला.

किरण यज्ञोपवित दिग्दर्शित हा पहिलाच चित्रपट असून चित्रपटाची कथा सौरभ भावे यांची आहे. चित्रपटाची पटकथा किरण यज्ञोपवित व  सौरभ भावे यांनी लिहीली आहे. संवादलेखन सुद्धा   किरण यज्ञोपवित यांचेच आहे.  छायाचित्रण प्रसिद्ध कॅमेरामन सुधीर पळसाने यांनी केले आहे. संगीत नंदू घाणेकर यांचे असून पार्श्वसंगीत नरेंद्र भिडे यांचे आहे. 

या चित्रपटात सचिन खेडेकर यांच्यासोबत अश्विनी गिरी, किशोर कदम, विनय आपटे, शुभांगी जोशी, मिलिंद फाटक, जयवंत वाडकर, सुनील देव, शशांक शेंडे आदी कलाकारांच्या भुमिका आहेत. तसेच इशान तांबे आणि अस्मिता जोगळेकर ए दोन बालकलाकार सुद्धा आहेत.

Monday, January 10, 2011

पुण्याचा शुभम खंडाळकर 'आयडिया सारेगमप- लिटल चॅम्प्स' चा विजेता.

Shubham Khandalkar
'झी मराठी' वरील सारेगमपचे नववे पर्व 'आयडिया सारेगमप- लिटल चॅम्प्स' चा दिमाखदार महाअंतिम सोहळा मुंबईत अंधेरीच्या शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलात रंगला. आणि पुण्याचा शुभम खंडाळकर "आयडिया सारेगमप- लिटल चॅम्प्स" चा विजेता ठरला.

या सोहळ्याची सुरुवात 'आयडिया सारेगमप- लिटल चॅम्प्स' च्या या पर्वातील सगळ्या चॅम्प्सनी 'लाभले आम्हास भाग्य' या सुरेश भट यांच्या आणि कौशल इनामदार यांनी संगीतबद्ध केलेल्या अभिमानगीताने दमदारपणे केली. 

शुभम खंडाळकर, वेदा नेरुरकर, अदिती आमोणकर, शरयु दाते आणि पद्मनाभ गायकवाड या पाचही लिटल चॅम्प्सनी स्वरांची चौफेर आतषबाजी केली. मात्र स्वरांच्या या पंचरंगी आतषबाजीत 'आयडिया सारेगमप- लिटल चॅम्प्स' च्या या पर्वाचा बाजीगर ठरला शुभम खंडाळकर!

Sunday, January 9, 2011

'नातवंड' जानेवारी अखेरीस प्रदर्शित होणार.

Mohan Joshi In Naatwand
सुप्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक दिपक आहिरे यांनी प्रस्तुत केलेला आणि 'सुजाता एंटरटेनमेंट'च्या बॅनरखाली अश्विन आहिरे आणि अनिरुद्ध आहिरे या जुळ्या बंधुंची निर्मिती असलेला 'नातवंड' हा एक पारिवारीक, कौटुंबिक आणि विनोदी चित्रपट या महिन्याच्या अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

दिलीप प्रधान यांनी या चित्रपटाच दिग्दर्शन केलं आहे. विस्कटलेलं कुटुंब नातवंड एकमेकांच्या सहाय्याने कसे सावरतात आणि आई वडिलांना याची जाणीव कशी करुन देतात. याचे चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे. चित्रपटाची कथा अनिल पवार यांची असून पटकथा आणि संवाद दिलिप प्रधान आणि अनिल पवार यांचे आहेत. प्रसाद कुलकर्णी आणि गौतम आठवले यांच्या गीतांना अबुझर रिझवी यांनी संगीत दिले आहे. 
 
'नातवंड' मध्ये मोहन जोशी, रमेश भाटकर, रवि पटवर्धन या दिग्गजांसोबत संजय मोहिते, जयवंत वाडकर, शांताबाई तांबे, अभिजीत भोसले, दिपा चाफेकर, दिपज्योती, प्रियांका यादव, सिद्धार्थ शहा, सेवा मोरे, जयेश राजे, कोमल जाधव, प्रिया गमरे, अभय खडपकर, कोमल आपके यांच्याही प्रमुख भुमिका आहेत.

Saturday, January 8, 2011

'झी टॉकीज' चा "गुलदस्ता" १४ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला.

Makrand Anaspure In Guldasta
मकरंद अनासपुरे आणि जितेंद्र जोशी यांच भन्नाट काँबिनेशन 'शिवलीला फिल्म्स' च्या 'गुलदस्ता' या चित्रपटाद्वारे १४ जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात १०० हून अशिक चित्रपटगृहात झी टॉकीजद्वारे दणक्यात दाखल होत आहे. 

'गुलदस्ता' या धमाकेदार विनोदी चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद अरविंद जगताप यांनी लिहीले आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांनी केले आहे. या चित्रपटाला  त्यागराज खाडिलकर यांचे संगीत असून मनीषराज यांच्या गीतांना अमृता नातू आणि त्यागराज खाडीलकर यांनी स्वरबद्ध केले आहे. 

मकरंद अनासपुरे आणि जितेंद्र जोशी यांची कॉमेडीची जुगलबंदी ही प्रेक्षकांना तिगुळाचा गोडवा चाखून जाईल. या चित्रपटाद्वारे तेजस्विनी लोणारी ही नवोदित अभिनेत्री मराठी चित्रपटात पदार्पण करत आहे. यापुर्वी तिने 'द्रौपदी' या हिंदी मालिकेत द्रौपदीची भूमिका रंगवली होती. उदय टिकेकर, सागर तळाशीकर, मंगेश सातपुते, परि तेलंग, मेधा भागवत, विशाखा सुभेदार आणि सयाजी शिंदे यांच्या भूमिका आहेत. 

Tuesday, January 4, 2011

'पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल' (PIFF) ची सुरुवात ६ जानेवारी २०११ रोजी होणार

Piff 2011
अतिशय प्रसिद्ध अशा 'पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल' (PIFF) ची सुरुवात ६ जानेवारी २०११ रोजी निरनिराळ्या विभागात होणार आहे. यामधील पहिला विभाग हा आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा असून त्यात १४ निवडक चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. दुसर्‍या विभाग हा मराठी चित्रपटांसाठी असून त्यात ७ चित्रपटांच स्क्रिनिंग होणार आहे. आणि तिसरा विभाग हा विदयार्थ्यांनी तयार केलेल्या शॉर्ट फिल्म्सचा असून या मध्ये ३८ शॉर्ट फिल्म्सची निवड करण्यात आली आहे. अशा प्राकारे यामध्ये एकूण ४० देशांतून २०० चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. चित्रपट रसिकांना पुण्यातील इ-स्क्वेअर, सिटी प्राईड, आयनॉक्स, फेम, आर्-डेक्कन आणि गणेश कला क्रिडा मंच अशा विविध ठिकाणी नोंदणी करता येणार आहे. 

याच सोहळ्यात 'प्रभात' उत्कॄष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट, आणि 'संत तुकाराम पुरस्कार' अशा राज्यशासनच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात येणार आहे.