'भविष्यावर बोलू काही' हा 'मी मराठी' वरील शरद उपाध्ये यांचा कार्यक्रम नवीन स्वरुपात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रमात सहभागी होणार्या कुटुंबातील सदस्यांच्या कुंडलीवरुन भविष्याबाबतची माहिती शरद उपाध्ये सांगणार आहेत. २१ मार्चपासून सोमवार ते शनिवार संध्या ६.३० वाजता हा कार्यक्रम पाहता येणार आहे.याचबरोबर आणखी एक नवी मालिका 'कालाय तस्मै नमः' 'ई टिव्ही मराठी' वर २१ मार्चपासून सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता प्रसारीत होणार आहे. या मालिकेत विक्रम गोखले विश्वंभर पंडित ही व्यक्तिरेखा साकारत असून मालिकेतल्या प्रमुख देशमुखांच्या भूमिकेत अरुण नलावडे आणि मानसी मागीकर आहेत, त्यांच्यासोबत सुलभा देशपांडे, अमित भानुशाली, रुचिता जाधव, शरयु जयवंत, नरेश बिडकर आणि मनोज कोल्हटकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
'गंगोत्री कम्बाईन्स' या बॅनरखाली निर्माती सौ. सुनंदा रामराव पवार यांचा 'इचार ठरला पक्का!' हा धमाल मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 'मुंबईचा डबेवाला' या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक मनोहर राघोबा सरवणकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद प्रदीप कबरे यांचे आहेत. या चित्रपटासाठी जगदीश खेबुडकर यांच्यासह डॉ. प्रमोज बेजकर आणि मिलिंद चोलकर यांनी गीतलेखन केले असून संगीतकार हरिशंकर यांनी संगीत दिले आहे. वैशाली सामंत, अवधूत गुप्ते आणि अभिजीत कोसंबी यांनी या चित्रपटातील गाणी गायली आहेत. समीर आठल्ये यांच छायाचित्रण असून फैजल इम्रान यांच संकलन आहे. भरत जाधवसह प्राची शहा, प्रदीप कबरे, विजय चव्हाण, आशिष पवार, किरण, विभा बोके, सुहास भालेकर, रेखा बडे, तेजश्री आणि दिप्ती अहिर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
वेगळा विषय, नेटकी मांडणी आणि हसत हसत मनोरंजनातून स्वप्ननगरीची सैर घडवणारा एकता कपूर, शोभा कपूर यांच्या बालाजी मोशन पिक्चर्सच्या ऑल्ट एन्टरटेन्मेंट आणि नीरज पांडे, शीतल भाटीया यांच्या फ्रायडे वर्क्स ह्या निर्मिती संस्थांची संयुक्त निर्मिती असलेला 'तार्यांचे बेट' हा चित्रपट १५ एप्रिलपासून मुंबई-पुण्यातील रसिकांच्या भेटीला येत आहे. नुकताच मुंबई -पुण्यात खास मान्यवरांसाठी आयोजित केलेल्या शोला मान्यवरांची भरभरुन उपस्थिती लाभली. होती.
किरण यज्ञोपवित दिग्दर्शित या चित्रपटाचे लेखन किरण यज्ञोपवित, सौरभ भावे, शैलेश दुपारे यांनी केले आहे. या चित्रपटात सचिन खेडेकर, अश्विनी गिरी, किशोर कदम, विनय आपटे, शुभांगी जोशी, शशांक शेंडे, जयवंत वाडकर ह्या मान्यवरांबरोबरच बालकलाकार इशान तांबे आणि अस्मिता जोगळेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
कवयित्री व अभिनेत्री मेघना साने यांच्या मेघदूत निर्मित 'सॉलिड मज्जा' या धमाल बालगीतांच्या आणि बडबड गीतांच्या ऑडिओ सी.डी. चा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. याचवेळी मेघना साने लिखीत व डिंपल पब्लिकेशन प्रकाशित 'बहुरुपी' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन सुप्रसिद्ध गीतकार व कवी सुधीर मोघे यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्याला सुप्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ द. कृ. सोमण, व्यंगचित्रकार विवेक मेहेत्रे, संगीतकार निलेश मोहरीर, डिंपलचे शोक मुळे, संगीतकार हेमंत साने, नकलाकार दिलीप खन्ना, अनुजा वर्तक, शर्मिली कुलकर्णी आदींची उपस्थिती लाभली.'सॉलिड मज्जा' ला संगीतकार हेमंत साने यांनी संगीत दिले आहे तर जयंत ओक व मेघना साने ह्यांनी निवेदन केले आहे.
अकरावा 'रामबंधू मटा सन्मान' सोहळा शुक्रवारी संध्याकाळी सिने सृष्टीतील अनेक मान्यवर कलाकारांच्या उपस्थितीत रंगला. या सोहळ्यात 'मटा सन्मान' २०११ ची नामांकनाची घोषणा करण्यात आली.चित्रपट विभागात 'झेंडा या चित्रपटास आठ आणि 'लालबाग परळ' या चित्रपटास सात नामांकन आहेत. नाटक विभागात 'नवा गडी.. नवं राज्य' आणि 'वा गुरु' या नाटकांमध्ये स्पर्धा आहे. टिव्हीतील कथा विभागामध्ये 'श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी', 'कस्तुरी' आणि 'झुंज' या तीन मालिकांमध्ये चुरस आहे. प्रायोगिक नाटक विभागात 'पुनश्च हनिमुन', 'रात्रंदिन आम्हा....!' आणि 'अनिकेत राशोमान' यांना नामांकने मिळाली आहेत.
चित्रपट विभाग.
सर्वोत्कृष्ट अभिनेता.
सुबोध भावे (रानभूल)
भरत जाधव (रिंगा रिंगा)
संतोष जुवेकर (झेंडा)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
राजेश्वरी सचदेव (आरंभ)
मुक्ता बर्वे ( मुंबई पुणे मुंबई)
तेजस्विनी पंडित ( मी सिंधुताई सपकाळ)
नाटक विभाग
सर्वोत्कृष्ट अभिनेता.
दिलीप प्रभावळकर (वा गुरु)
उमेश कामत (नवा गडी.. नवं राज्य)
चिन्मय मांडलेकर (एक लफडं विसरता न येणारं)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
सुहास जोशी ( कथा)
आदिती सारंगधर (एक लफडं विसरता न येणारं)
प्रिया बापट (नवा गडी.. नवं राज्य)
टेलिव्हिजन विभाग
सर्वोत्कृष्ट अभिनेता.
सुबोध भावे (झुंज)
सिद्धार्थ चांदेकर (कशाला उद्याची बात)
अंगद म्हसकर (श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
रुपाली फोपसे (झुंज)
कादंबरी कदम (तुझविण सख्या रे)
तेजस्विनी पंडित (तुझं नि माझं घर श्रीमंताच)
'श्री संकल्प फिल्म प्रॉडक्शन'च्या बॅनरखाली निर्माते शरद शेलार यांनी 'हर हर महादेव' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या बॅनरची ही पहिलीच निर्मिती असून दिग्दर्शक सुभाष फडके यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 'हर हर महादेव' या चित्रपटाची कथा, पटकथा आहे सुभाष फडके यांची आणि संवाद त्यांनी अभिजीत जोशी यांच्या समवेत लिहीले आहे. अभिजीत उदय यांनी या चित्रपटाला साजेस संगीत दिलं आहे. अनुभवी कॅमेरामन विश्वनाथ मठ यांच या चित्रपटाला छायांकन लाभल आहे. संकलक दिलीप कोटलगी, कला दिग्दर्शन देवदास भंडारे यांच आहे. अमर शेलार या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.या चित्रपटात संजय नार्वेकर चार वेगवेगळ्या भुमिकेत असून सोबत अरुण नलावडे, अमिता खोपकर, रेखा कामत, नागेश भोसले, गौरी सुखटणकर, साहिल पिंपळे यांच्या भुमिका आहेत.
'सरोज आनंद चित्र' या बॅनरखाली सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक माँटी शर्मा आणि त्यांचे पिताश्री आनंद शर्मा या द्वयीने 'पाटीवरची रेष' या स्त्री शिक्षणावर आधारित चित्रपटाची घोषणा केली आहे. माँटी शर्मा आणि अभिनेता युग हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत.'स्त्री शिक्षण फार गरजेचं आहे' या आशयावर चित्रपटाची कथा असून कथा, पटकथा आणि संवाद युग यांचेच आहेत. अशिक्षीत असल्याने माणसाचं किती मोठं नुकसान जोऊ शकतं आणि खास करुन मुलीच्या आयुष्यात हे किती धोकादायक आहे याचं वास्तववादी चित्रण आणि एक संदेश यात देण्यात आला आहे. युग यात महत्त्वपूर्ण भूमिकेत असून इतर कलावंतांची निवड होताच या चित्रपटाच चित्रीकरण सुरु होणार आहे.