Friday, March 2, 2012

'विठाबाई नारायणगांवकर' चित्रपटाचा मुहूर्त संपन्न.

तमाशा क्षेत्रात स्वकर्तृत्वावर स्वतःचे अढळ स्थान निर्माण करणार्‍या ख्यातनाम तमाशा कलावंत 'विठाबाई नारायणगांवकर' यांच्या जीवनावर आधारीत  'विठाबाई नारायणगांवकर' या मराठी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच लालबाग येथील हनुमान थिएटर हॉलमध्ये करण्यात आला.

रेनबो प्रॉडक्शनतर्फे निर्मित होत असलेल्या 'विठाबाई नारायणगांवकर' या चित्रपटाच्या मुहूर्तप्रसंगी हनुमान थिएटरचे मालक मधुकरशेठ नेराळे, पुण्यातील आर्यभूषण थिएटरचे मालक मसजीदथेठ तांबे, विठाबाईंचा तमाशा उभा करणारे अण्णा कामेरकर, चित्रपटाचे संगीतकार अच्युत ठाकूर, कार्यकारी निर्माते महेश यादव अनिल चौधरी, निर्मिती व्यवस्थापक बाबा पाटील आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती. 

या चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक संतोष राऊत म्हणाले, विठाबाईच्या जीवनावर चित्रपट बनवावा ही संकल्पना कै. जगदीश खेबुडकर यांनी मला दिली. चित्रपटाची कथा, संकल्पना खेबुडकरांचीच असून खेबुडकरांनी लिहिलेल्या कथेबरोबरच विठाबाईंवर उपलब्ध असलेल्या साहित्याच्या आधार घेऊन घटनांची मांडणी करण्यात आली आहे.

चित्रपटात आठ गीते असून त्यांची रचना गीतकार ना. धो. महानोर, बाबासाहेब सौदागर, अनिल बचाटे यांची असून संगीताचा साज संगीतकार अच्युत ठाकूर यांचा आहे. कलाकारांची निवड येत्या महिनाभरात होणार असून हा एक मल्टिस्टारर असा चित्रपट असेल.

No comments:

Post a Comment