Wednesday, March 28, 2012

'अहो ! राहू द्या नं घरी...' रंगभूमीवर दाखल.

विविध नाटकांच्या माध्यमातून 'अष्टविनायक' या नाट्यनिर्मितीची संस्थेने आपली आगळीवेगळी विनोदाची शैली निर्माण केली आहे. रसिक प्रेक्षकांच्या मनोरंजनाची हीच परंपरा कायम राखत निर्माते दिलीप जाधव 'अहो ! राहू द्या नं घर' हे नवीन नाटक नाट्यरसिकांसाठी घेऊन येत आहेत. 

फेसबुक, ऑर्कुट, गुगल, ट्वीटर सारख्या सोशल नेटवर्किंगाच्या साईटसच्या जाळ्यात आजची तरुणाई खूप मोठ्या प्रमाणात गुंतत चाललेली आहे. या ग्लोबल युगात जग एकमेकांच्या जवळ आले असले तरी नात्यांमध्ये मात्र दुरावा निर्माण झाला आहे. आजच्या युगाचा हाच वास्तवदर्शी विषय 'अहो ! राहू द्या नं घरी.' 

विविध मनोरंजक नाटकांना आपल्या अभिनयाने यशाच्या उंच शिखरावर घेऊन जाणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री 'कॉमेडीक्विन' निर्मिती सावंत आणि विनोदी अभिनेता अतुल तोडणकर यांच्या कसदार अभिनयाने हे नाटक सजले आहे. 

राजेश देशपांडे यांनी लेखन आणि दिग्दर्शनाची बाजू सांभाळली आहे. या नाटकाचं नेपथ्य प्रदीप मुळ्ये यांनी केले असून प्रकाशयोजना शीतल तळपदे यांची आहे. शैलेंद्र बर्वे यांनी या नाटकाला संगीत दिले आहे. विनोदाच्या माधमातून आजच्या तरुणाईवर भाष्य करणारं हे नाटक मराठी नववर्षदिनापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालेलं आहे.

Tuesday, March 27, 2012

अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी दिलीप ठाकूर यांची अनोखी भेट.... 'अ...अमिताभचा!'

A Amitabhacha, Dilip Thakur
'खरा पत्रकार' स्पॉटवर घडतो या 'रिऍलिटी शो' शी तीन दशके निष्ठा ठेवणाऱ्या लेखक दिलीप ठाकूर यांचे अमिताभ बच्चन यांचे प्रत्यक्ष सेटवरचे वावरणे, त्याच्या काही चित्रपटाचा मुहूर्ताच्या वेळचे वातावरण व त्याच्या काही मुलाखतीचे  अनुभव याचे दर्शन घडवणारे 'अ... अमिताभचा!' हे पुस्तक सायली प्रकाशन, पुणे यांच्या वतीने प्रकाशित करण्यात आले आहे. दिलीप ठाकूर यांचा प्रत्यक्ष चित्रपटसृष्टीत अमर्याद कोणावर असल्याने त्यांना अमिताभचे मराठीतले पहिले स्वतंत्र पुस्तक वाचकांना देणे सहजशक्य आहे. ते अपुरे असल्याचीही त्यांना जाणिव असली तरी मराठी वाचकांना खूप वेगळी व चांगली माहिती देण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे.  

१८४ पाने मजकूर व शिवसेनेच्या व्यासपीठावर अमिताभ, कुलीच्या सेटवरचा अमिताभ, आजारपणातून बरा झाल्यावरचा अमिताभ अशा काही वेगळ्या आठ पानी छायाचित्रांचा समावेश आहे. यांचा सहभाग असणाऱ्या या पुस्तकाचे मूल्य दोनशे रुपये आहे. मराठी सिनेपत्रकारिता टेबलावरून प्रत्यक्ष 'स्पॉट'वर नेण्याचे सगळे श्रेय दिलीप ठाकूर यांना जाते. हेच त्यांचा पुस्तकांचे वेगळेपण आहे.

Wednesday, March 21, 2012

सवाई एकांकिका स्पर्धेतील 'यडुकेशन' ही एकांकिका नाटकाच्या माध्यमातून व्यवसायिक रंगभूमीवर

Yadukeshan
शिक्षण पद्धतीतल्या त्रुटी, व्यवस्थेतला भ्रष्टाचार, सरकारी अनास्था आणि  याबाबत समाजाची उदासीनता यावर अतिशय मार्मिक पद्धतीने केलेले भाष्य प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे 'यडुकेशन' या नव्या नाटकामध्ये. सवाई एकांकिका स्पर्धेत आपली विशेष छाप उमटवणारी 'यडुकेशन'  ही एकांकिका आता दोन अंकी नाटकाच्या माध्यमातून व्यवसायिक रंगभूमीवर सादर करण्यात येत आहे 

मराठी रंगभूमीला यापूर्वी 'रामनगरी' हे लोकप्रिय नाटक आणि चित्रपट्सृष्टीला 'शर्यत' सारखा यशस्वी चित्रपट देणार्‍या सौ. दर्शना निलेश सावंत यांच्या अश्वमेघ प्रॉडक्शनची 'यडुकेशन' हे नवी कलाकृती आहे.

'यडुकेशन' या नाटकाचे लिखाण राजेश कोळंबकर यांनी केले असून दिग्दर्शन प्रसिद्ध अभेनेते किशोर चौघुले करीत आहेत. संगीत हेमंत बाबरिया यांनी दिले असून नेपथ्य सचिन गोताड यांचे आहे. रवी करमरकर यांनी प्रकाशयोजनेची जबाबदारी सांभाळली आहे. दिग्दर्शनाबरोबरच यात किशोर चौघुले मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या सोबतीला विजय पगारे, प्रमोद बनसोडे, अक्षय अहिरे, सुशील पवार, अभिजीत जाधव, सचिन वळुंज, अश्विनी जाधव, साधना मोहिते ही नवोदित कलाकारांची टिम पहायला मिळणार आहे.

सध्या नाटकाच्या तालमी जोरात सुरू असून ६ एप्रिलला 'यडुकेशन' प्रेक्षकांसमोर येणार आहे.

Tuesday, March 20, 2012

ॐ काराचा महिमा आता संगीतमय डिव्हीडी स्वरुपात.

Mahima Omkaracah
रोजच्या जीवनात ॐकार कसा व कुठे उपयोगी पडतो त्याच्या सत्यकथांचे आख्यान असलेल्या 'महिमा ॐकाराचा' या संगीतमय कार्यक्रमाच्या डिव्हीडीचा प्रकाशन सोहळा नुकताच हॉटेल कोहीनूर, प्रभादेवी येथे संपन्न झाला. या प्रसंगी लोकप्रिय मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे, शरद पोंक्षे, केतकी थत्ते, संजय खापरे, अश्विनी एकबोटे, डॉ. जयंत करंदीकर, सौ. गीता करंदीकर, वास्तुतज्ञ मोहन गोखले, दैनिक लोकसत्ताचे उपसंपादक प्रशांत मोरे, श्रीकांत रानडे, सौ . सुनिता ( विद्या ) रानडे, निर्माते - वितरक सचिन पारेकर तसेच अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. 

ॐकाराचा उपयोग आध्यात्मिक उन्नतीबरोबरच रोजच्या ऐहिक गोष्टींसाठी, मुख्य म्हणजे आवाज, वाणी दोष, वाचा दोष, रोग प्रतिबंधन, रोग निवारण, एकाग्रता, स्मरणशक्ती, सौंदर्यवर्धन, तांणतणावमुक्ती यांच्यासाठी होतो. प्राचीन ग्रंथातील या वचनांवर संशोधन करुन अहमदनगर स्थित एका हृदयरोगतज्ञ डॉ. जयंत करंदीकर यांनी ॐकार थेरपी (साऊंड थेरपी) अशी उपचार पद्धत विकसित केली. त्याचे यशस्वी प्रयोग करुन विविध प्रकारच्या व्याधी अल्पावधीत बर्‍या करण्यात यश मिळविले. त्यांचे शिष्य श्री. व सौ. रानडे यांनी या माहितीचा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी सदर कार्यक्रमाची निर्मिती केली आहे.

संगीतमय, रंजक, महत्वाची माहिती प्रसारित करून, तरुण वैज्ञानिकांना अधिक संशोधनास प्रवृत्त करणारा, भारतीयांना अभिमानास्पद असलेल्या या कार्यक्रमच्या डीव्हीडीचे स्वागत सर्वच स्तरांवर होईल असे रानडे कुटुंबियांना खात्रीपूर्वक वाटते.  

Monday, March 19, 2012

साईभक्तांसाठी सहा ऑडिओ अल्बमची पर्वणी.

साई कंपोसीस निर्मिती असलेल्या साईबाबांच्या स्तुतीस्तवने आणि कवने यांचा समावेश असलेल्या हिंदीतल्या चार आणि मराठीतल्या दोन अशा एकूण सह ऑडिओ अल्बम्सचा लोकार्पण सोहळा प्रख्यात पार्श्वगायिका पौडवाल, अजित कडकडे तसेच रविंद्र साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठया थाटात संपन्न झाला.

या प्रसंगी अल्बम मधल्या काही रचनाही सादर करण्यात आल्या. अनुराधा पौडवाल, अजित कडकडे, रविंद्र साठे, डॉ. नेहा राजपाल, अमोल बावडेकर, विवेक नाईक, पंकज झरबडे, संगीतकार उदय, अभिजीत जोशी, शिर्डी साई संस्थानचे श्री ससाणेसाहेब आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते

अल्बमगायक / गायिकागीतकारसंगीतकार
१) साई भक्तीचा जागर (मराठी)अजित कडकडे
२) साई स्मरणम् अति मंगलम (मराठी)अनुराधा पौडवाल, रविंद्र साठे
३) भजले मन मे साई (हिंदी)रविंद्र साठेअभिजीत जोशीअभिजीत जोशी
४) आओ साई (हिंदी)अनुराधा पौडवाल, अनुप जलोट, अन्वर जानीअभिजीत जोशीउदय-अभिजीत
५) नमो साईनाथा (हिंदी)डॉ. नेहा राजपाल,अभिजीत जोशीउदय-अभिजीत
६) हम साई के दिवाने है (हिंदी)रविंद्र साठे. निवेदन रजा मुरादडॉ. मनोज साल्पेकरशैलेश दाणी

 

२३ मार्चला मुंबई आणि ठाण्याच्या चित्रपटगृहात 'भानामती'.

Bhanamati
अंधश्रद्धेबद्दलच्या भीतीचा फायदा घेऊन स्वतःचा स्वार्थ साधणाऱ्या काही पुढार्‍यांची कथा आता प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. घुमटकर फिल्म कंपनी प्रस्तुत आणि जयप्रकाश घुमटकर निर्मित-दिग्दर्शित 'भानामती' हा चित्रपट येत्या २३ मार्चला मुंबई आणि ठाण्यामध्ये प्रदर्शित होत आहे.

प्रेमाकिरण, अनंत जोग यांसोबतच रवी पटवर्धन ,याकुब सईद, सुनील गोडबोले, अनिकेत केळकर, दीपज्योती, किरण पिसे, दिपक दळवी, डॉ. प्रमोद नलावडे, डॉ. शशिकांत डोईफोडे, गणेश शिंदे आणि प्रा. जयप्रकाश घुमटकर यांच्या 'भानामती' या चित्रपटात महत्वाच्या भूमिका पहायला मिळतील. चित्रपटाची कथा-पटकथा प्रा. जयप्रकाश घुमटकर यांनी लिहिली असून सवांद फलटणचे सुप्रसिद्ध लेखक प्रा.विश्वास लोणकर यांनी लिहिलेले आहेत. चीत्रपटातील गीते जगदीश खेबुडकरांची असून संगीत चंद्रविजय यांनी दिली आहे. संकलन संजय देवकर यांनी केले असून अमोल गायकवाड आणि विनोद पाटील यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.

रहस्यमय आणि उत्कंठावर्धक सोबतच सामाजिक जनजागृती संदेश देणारा 'भानामती' चित्रपटाला उर्वरित महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिली असून २३ मार्चला गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर हा चित्रपट मुंबई आणि ठाणे शहरात प्रदर्शित होत आहे.

'साई शंकर फिल्मस' या निर्मिती संस्थेचा 'तीन बायका फजिती ऐका' हा आगामी विनोदी चित्रपट.येत्या २३ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. 'दुभंग ' या प्रेमपटानंतर त्यांचा येऊ घातलेला हा दुसरा मराठी चित्रपट आहे. शंकर रामेश्वर मिटकरी निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन राजू पार्सेकर यांनी केले आहे.

Shree Tirupati Balaji
श्री तीरुपती बालाजीवर मराठीत पहिल्यांदाच चित्रपट निर्मीती केली जात आहे. लाखो भावीकांचे श्रद्धास्थान  असलेल्या बालाजीवर चित्रपट तयार होत असून मराठीतील आणि हिंदीतील दिग्गज कलाकार या सिनेमात काम करणार आहेत. तर बालाजी मंदिराच्या भव्य दिव्य सेटचे काम देखील सुरु झाले असून हा चित्रपट मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासातील बीग बजेट सिनेमा ठरेल, याचे शिवधनुष्य उचलय पुण्याच्या जितेंद्र वाईकर यांनी. श्री तीरुपती बालाजी म्हणजे भारतातील अनेक भविकांचे श्रद्धास्थान. महाराष्ट्रातही घराघरात श्री. बालाजीची मनोभावे पूजा केली जाते. असे जरी असले तरी अनेक भाविकांना बालाजीची कथा देखिल पूर्णपणे माहित नाही.         

बलाजींची कथा ही नुसतीच श्रवणीय आणि रंजक नाही तर त्यामुळे अनेक संकटांचे मोचन करण्याचे देखील क्षमता आहे. त्या मुळेच श्री बलाजींची कथा महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला माहित व्हावी हीच इच्छा मनी बाळगून श्री तीरुपती बालाजी यांच्यावर चित्रपट बनविण्याची प्रबळ इच्छा श्री जितेंद्र वाईकर यांच्या मनात जागृत झाली .     

 ''श्री तीरुपती बालाजी महिमा '' या चित्रपटाची पटकथा श्री जितेंद्र वाईकर यांनी लिहीली आहे. त्याच प्रमाणे दिग्दर्शन आणि निर्मितीची बाजूही त्यांनीच उचलली आहे. 

या चित्रपटाचे संवाद व संहितेचे लेखन नाट्य अभिनेते व लेखक श्रीकृष्ण देशमुख यांनी केले आहे. त्याच प्रमाणे या चित्रपटाला अनेक हिंदी व मराठीतील कलाकारांची दर्जेदार स्टारकास्टही लाभली आहेत. अनेक उत्तम दर्जाचे तंत्रज्ञ देखील या चित्रपटासाठी काम करणार आहेत. त्यामुळेच श्री बालाजींच्या अनेक भक्तांसाठी हा चित्रपट म्हणजे एक पर्वणीच असणार आहे.

Saturday, March 17, 2012

२३ मार्चला 'तीन बायका आणि फजिती ऐका'.

Teen Bayka Fajiti Aika, makrand Anaspure
'साई शंकर फिल्मस' या निर्मिती संस्थेचा 'तीन बायका फजिती ऐका' हा आगामी विनोदी चित्रपट.येत्या २३ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. 'दुभंग ' या प्रेमपटानंतर त्यांचा येऊ घातलेला हा दुसरा मराठी चित्रपट आहे. शंकर रामेश्वर मिटकरी निर्मित  या चित्रपटाचे दिग्दर्शन राजू पार्सेकर यांनी केले आहे.

'तीन बायका फजिती ऐका' या चित्रपटात विनोदाचा हुकमी एक्का मकरंद अनासपुरेसोबत त्यांचा तीन बायकांच्या भूमिकेत क्रांती रेडकर, निशा परुळेकर, तेजश्री खेले या अभिनेत्री दिसणार आहेत.

चित्रपटाची कथा राजन अग्रवाल यांनी लिहिली असून पटकथा अरविंद जगताप, दीपक  यादव यांनी तर संवाद अरविंद जगताप यांनी संवाद लिहिले आहेत. चित्रपटात सुरेखा कुडची, विजय गोखले, स्वप्निल राजशेखर, दिगंबर नाईक, वरद चव्हाण, कुलदीप पवार, विजय चव्हाण या कलाकारांच्या भूमिका आहेत.

Friday, March 16, 2012

तात्या विंचू लगे रहो.. मुहूर्त संपन्न

Tatya Vinchu Lage Raho
संगमनेर येथील बॉलीवूड ड्रिम्स नावाच्या चित्रपट विषयक शाळेचा सर्वेसर्वा असलेला अमोल मुके दिग्दर्शित 'तात्या विंचू लगे रहो' या धमाल विनोदी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते संगमनेर (जि.  अहमदनगर ) येथे पार पडला. लाभंम एंटरटेनमेंट्स या निर्मिती संस्थे अंतर्गत निर्माते अमित कटारिया, राजू पारख आणि अल्पेश पारख यांच्या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, परशुराम घुले, गीते डॉ. श्रीकांत नरुले आणि परशुराम घुले यांची आहेत, संगीत राधा चंद्र.

दिग्दर्शक अमोल मुके यांचा हा पहिलाच चित्रपट असून त्याने या चित्रपटाद्वारे अनेक स्थानिक कलावंतांना कामाची संधी मिळवून दिली आहे. लवकरच चित्रपटाचे चित्रीकरण सुरुवात होणार असून चित्रपटात संजय नार्वेकर, प्रतीक्षा जाधव, शितल पाठक,किशोर नांदलस्कर, मोनिका डबडे, यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. 

Saturday, March 3, 2012

'ढोलकीच्या तालावर'च्या सेमी फायनल भागात 'अंधारातली लावणी', 'ताल आणि चाळ' जुगलबंदी.

यावेळी ढोलकीच्या तालावर या रिऍलिटी शो मध्ये 'अंधारातल्या लावण्यांचा' विशेष भाग रसिक प्रेक्षकांसाठी सादर करण्यात येणार आहे. सिनेमाव्यतिरिक्त वर्षानुवर्षे तमाशा फडात गाजणार्‍या लावण्यांना अंधारतल्या लावण्या म्हटलं जातं. 

ताल आणि चाळ यांच्या जुगलबंदीचा नजराणा 'ई टिव्ही' मराठी रसिकांसाठी घेऊन आले आहेत येत्या ७ आणि ८ मार्चला 'ढोलकीच्या तालावर'च्या सेमी फायनल भागात. या भागात किशोरी शहाणे परीक्षक म्हणून लाभल्या आहेत. 

तमाशा फडात जवळपास १५० -२०० वर्षांपासून नाचली- गायली गेलेली, तितकीच लोकप्रिय झालेली पण फडापुरतीच मर्यादित राहिलेल्या लावण्यांचाही आस्वाद रसिकांना मनमुराद लुटता यावा याकरिता हा भाग 'अंधारातल्या लावण्यांना' बहाल करण्यात आला आहे. 'ताल आणि चाळ' राऊंडमध्ये प्रत्येक स्पर्धक नृत्यांगणेला ढोलकीशी जुगलबंदी करावी लागणार आहे. चाळ आणि तालेची ही जुगलबंदी नक्कीच उत्सुकतेची बाब असेल.

१६ मार्चला प्रदर्शित होणार 'काय करू न कसं करू'.

'जी. व्ही. फिल्म्स लिमिटेड' चा 'काय करू न कसं करू' हा विनोदी मराठी चित्रपट. बालागिरी निर्मित, विनय ए. लाड दिग्दर्शित हा चित्रपट १६ मार्चला चित्रपट गृहात दाखल होतोय.

'काय करू न कसं करू' ही कथा आहे उषा आणि निशा या दोन बहिणींची. मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाच्या मोठ्या झालेल्या उषा आणि निशाला नेहमीच उच्चवर्गीय राहणीमानाने भुरळ घातली आहे. श्रीमंत राहणींची आवाक्याबाहेरची स्वप्न पाहणं हा या दोघी बहिणीचा फंडा. त्या दोघी विजय आणि अजयच्या प्रेमात पडल्या आहेत. त्या दोघी सारखीच श्रीमंत व्हायची स्वप्नं पाहण्यार्‍या विजयला संगीतकार तर अजयला डॉक्टर व्हायचं आहे. एका अनपेक्षित घटनेत त्या चौघांचे एकमेकांविषयी गैरसमज होतात. उषा-निशा त्याना संगीतकार व डॉक्टर समजतात तर अजय- विजय त्यांना उद्योगपतीच्या मुली समजतात. गडबड, गोंधळातून नसलेलं सत्य प्रत्यक्षात असल्याचा भासविण्याचा त्यांचा प्रयत्न कोणत्या वळणावर येऊन पोहचतो हे पाहण्यासाठी  'काय करू न कसं करू' चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पहावी लागेल. 

भरत जाधव, दिपाली सय्यद, पुष्कर श्रोत्री, आदिती सारंगधर, विजय चव्हाण, उमा सरदेशमुख, ज्योती जोशी, अशोक शिंदे या कलाकारांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा - पटकथा चित्रपटाचे दिग्दर्शक विनय ए. लाड यांची असून संवाद संजय बेलोसे यांनी लिहिले आहे. 'काय करू न कसं करू' चित्रपटासाठी निशिकांत सदाफुले यांनी लिहिलेल्या व संगीतबद्ध केलेल्या गीतांना स्वप्नील बांदोडकर, त्यागराज खाडिलकर, नेहा राजपाल, कल्पना या गायकांचे स्वर लाभले आहेत. चित्रपटातील गीतांवर दिलीप मेस्त्री त्यांनी नृत्य दिगदर्शन केले आहे. चित्रपटाचे छायाचित्रण - अनिल खांडेकर, कला दिगदर्शन - रशीद रनग्रेझ यांनी तर संकलन विनय ए.लाड यांनी केले आहे.

Friday, March 2, 2012

लवकरच येतोय 'जय महाराष्ट्र ढाबा, बठिंडा' .

अवधूत गुप्ते आपल्या नव्या चित्रपटातून राजकीय आणि सामाजिक विषयाला थोडसं बाजूला ठेवत 'फ्रेश लव्हस्टोरी' प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. 'जय महाराष्ट्र ढाबा, बठिंडा' असं या चित्रपटाचे नाव असून  महाराष्ट्र आणि पंजाबमधल्या रांगडया मातीत फुलणार्‍या या कथेतूनअभिजीत खांडकेकर आणि प्रार्थना बेहरे या 'फ्रेश' जोडीची एक परिपूर्ण प्रेमकहाणी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

या चित्रपटाचे पहिले चित्रीकरण सत्र पंजाबात पार पडले असून महाराष्ट्राचा मराठमोळा 'पोवाडा' आणि पंजाबच्या दिलदारापानाची महती सांगणारा 'भांगडा' या दोन संगीतप्रकारांना एकत्र करून मराठी अस्मितेची महती कथन करणार्‍या एका गाण्याचं चित्रीकरण नुकतंच मुंबईतील स्टुडिओत  झाले. जिथे चित्रपटाचा नायक आभिजीत 'मराठी मातीचा अभिमान' एका जोरदार गीतातून सांगत होता तर 'पंजाब दि मिठ्ठी कि शान' चे गोडवे अवधूत गात होता आणि त्यांना साथ देत होते अनेक पंजाबी आणि मराठी तरुण तरुणी.

गुरु ठाकूर लिखित हे गीत गायलं आहे स्वप्निल बांदोडकर आणि अवधूत गुप्ते यांनी, चित्रपटाला  संगीत दिलं आहे युवा संगीतकार निलेश मोहरीर यांनी. तर त्यांच नृत्य दिग्दर्शन केले आहे उमेश जाधव यांनी. 'जय महाराष्ट्र ढाबा, बठिंडा' च्या निर्मितीची धुरा अतुल कांबळे आणि अवधूत गुप्ते सांभाळीत असून त्यांच्या 'एकवीरा प्रॉडक्शन्स' आणि 'ए स्क्वेअर एण्टरटेनमेंट'या बॅनरखाली हा चित्रपट तयार होत आहे. चित्रपटाची कथा अवधूत गुप्ते यांची असून पटकथा- संवाद अरविंद जगताप यांनी लिहिले आहेत. छायाचित्रण राहुल जाधव, कलादिग्दर्शन  शैलेश महाडीक तर कार्यकारी निर्मात्याची जवाबदारी हेमेंद्र कुलकर्णी सांभाळीत आहेत.
पंजाबमध्ये जावून महाराष्ट्राची वेगळी ओळख सांगण्यार्‍या एका जिगरबाज मराठी तरुणाची प्रेमकथा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

'विठाबाई नारायणगांवकर' चित्रपटाचा मुहूर्त संपन्न.

तमाशा क्षेत्रात स्वकर्तृत्वावर स्वतःचे अढळ स्थान निर्माण करणार्‍या ख्यातनाम तमाशा कलावंत 'विठाबाई नारायणगांवकर' यांच्या जीवनावर आधारीत  'विठाबाई नारायणगांवकर' या मराठी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच लालबाग येथील हनुमान थिएटर हॉलमध्ये करण्यात आला.

रेनबो प्रॉडक्शनतर्फे निर्मित होत असलेल्या 'विठाबाई नारायणगांवकर' या चित्रपटाच्या मुहूर्तप्रसंगी हनुमान थिएटरचे मालक मधुकरशेठ नेराळे, पुण्यातील आर्यभूषण थिएटरचे मालक मसजीदथेठ तांबे, विठाबाईंचा तमाशा उभा करणारे अण्णा कामेरकर, चित्रपटाचे संगीतकार अच्युत ठाकूर, कार्यकारी निर्माते महेश यादव अनिल चौधरी, निर्मिती व्यवस्थापक बाबा पाटील आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती. 

या चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक संतोष राऊत म्हणाले, विठाबाईच्या जीवनावर चित्रपट बनवावा ही संकल्पना कै. जगदीश खेबुडकर यांनी मला दिली. चित्रपटाची कथा, संकल्पना खेबुडकरांचीच असून खेबुडकरांनी लिहिलेल्या कथेबरोबरच विठाबाईंवर उपलब्ध असलेल्या साहित्याच्या आधार घेऊन घटनांची मांडणी करण्यात आली आहे.

चित्रपटात आठ गीते असून त्यांची रचना गीतकार ना. धो. महानोर, बाबासाहेब सौदागर, अनिल बचाटे यांची असून संगीताचा साज संगीतकार अच्युत ठाकूर यांचा आहे. कलाकारांची निवड येत्या महिनाभरात होणार असून हा एक मल्टिस्टारर असा चित्रपट असेल.