Thursday, September 29, 2011

३ ऑक्टोबर पासून 'स्टार प्रवाह' वर नवी मालिका 'दोन किनारे ... दोघी आपण'.

Don Kinare Doghi Apan, Suchitra Bandekar, Kishori SHahane
लोकप्रिय मालिका 'मन उधाण वार्‍याचे' ही संपली असून स्टार प्रवाह वाहिनी आता आपल्या दर्शकांसाठी आणत आहे 'दोन किनार...दोघी आपण', आई आणि मुलीच्या प्रेमाची हृदयद्रावक कथा..... ३ ऑक्टोबरपासून दर सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता. 

ही कथा आहे तनया, साधना आणि अस्मिता यांच्यामधील अनेक पैलू असलेल्या नातेसंबंधांची. तनया (त्रिशाला शाह) ने आपले अख्खे बालपण आपली आई अस्मिता (किशोरी शहाणे) च्या प्रेमाविना घालवले. अर्थात आपल्याला जन्म देणारी आपली आई अस्मिता नसून साधना (सुचित्रा बांदेकर) आहे ह्या सत्यापासून ती वंचित आहे. अस्मिताला तनया आपल्या डोळ्यांसमोरही नकोशी झालेली असताना तनयाची खरी आई साधना तनयाचा शोध घेत असून तिला आईचे प्रेम देण्यासाठी आसुसलेली आहे.

जेव्हा ह्या तिघी एकमेकींसमोर येतील तेव्हा काय होईल? साधना आपली खरी जमदात्री आई आहे हे सत्य तन्याला कधी कळेल का? काय अस्मिता तनयाला कधी आपल्या मुलीसारखी वागवेल? काय साधना तनयाला शोधून तिला सत्य सांगू शकेल? आपले खास कथानक आणि संयोजनासह 'दोन किनारे ... दोघी आपण ही मालिका ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधेल. 

Wednesday, September 28, 2011

'मामि' मध्ये अमृता प्रॉडक्शन्सचा 'खेळ मांडला'.

अशोक नारकर यांच्या अमृता प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेल्या आणि विजू माने यांनी दिग्दर्शित केलेल्या 'खेळ मांडला' या चित्रपटाची 'मामि' महोत्सवासाठी निवड झाली आहे. येत्या १३ ते २० ऑक्टोबर दरम्यान मुंबईत होणार्‍या 'मामि' फिल्म फेस्टिव्हलच्या इंडियन फ्रेम विभागात 'खे़ळ मांडला' दाखवला जाणार आहे.

'खेळ मांडला' या चित्रपटाचे निर्माते अशोक नारकर आहेत. या चित्रपटाचे कथा, पटकथा, संवादलेखन आणि दिग्दर्शन विजू माने यांचे आहे. 'खेळ मांडला'च्या मध्यवर्ती भूमिकेत मंगेश देसाई असून अन्य भूमिकांमध्ये उर्मिला कानेटकर, संतोष जुवेकर, प्रसाद ओक, मानसी साळवी आणि उदय सबनीस तसेच बालकलाकार अनन्या देवरे आदी कलावंत आहेत. गीतकार अभिजीत पानसे, अशोक बागवे आणि विजू माने असून चिनार महेश यांचे संगीत आहे. 

Wednesday, September 21, 2011

तमाशा कलावंतांना मानाचा मुजरा करण्यासाठी 'तमाशा... हाच खेळ उद्या पुन्हा'.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत लोककलेचे मोलाचे योगदान असूनही यातील कलावंतांच्या पदरी कायम उपेक्षाच आली आहे. अनेक शाहिरांनी आणि नर्तकींनी तमाशाला वैभवाला नेऊन ठेवलं आनंद फंदी, राम जोशी, होनाजी बाळा, पठ्ठे बापूराव यांच्यासारख्या शाहिरांनी आपल्या शृंगारीक लावण्यांनी मराठी मनं जिंकली आणि तमाशाला अढळ स्थान प्राप्त करुन दिलं. त्यांना मानाचा मुजरा करुन लोकरंजनासाठी झटणार्‍या तमाशा कलावंतांची कैफियत मांडणारा 'नाईन गॉडेस' निर्मित 'अनिष्का एण्टरटेण्मेंट' प्रस्तुत 'तमाशा... हाच खेळ उद्या पुन्हा' लवकरच प्रदर्शित होत आहे. चित्रपटाची कथा-विक्रम भागवत यांची असून मिलिंद पेडणेकर यांनी या चित्रपटाची पटकथा, संवाद लेखन व दिग्दर्शन अशी तिहेरी जवाबदारी पेलली आहे. 

प्रसिद्ध शाहिर कै. पठ्ठे बापूराव यांच्या लेखणीतून साकारलेल्या लावण्यांना ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी संगीत दिले आहे. कल्याणी पांडे, नंदेश उमप, अंजली नांदगावकर या गायकांनी गाय्लेल्या गीतांना दिपाली विचारे यांनी नृत्यदिग्दर्शन केले आहे.
भरत जाधव, रमेश भाटकर, प्रिया बेर्डे, वैशाली जाधव, रणजीत जोग, केतकी पालव, अनिरुद्ध देशपांडे, विवेक पवार, दिनेश धुरी, अनिरुद्ध कुणकावळेकर, देवेंद्र गमरे या कलाकारांच्या यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Monday, September 19, 2011

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला 'स्वर्गाचा व्हिजा'.

निर्माते रमेश धीरज सिंह यांनी धीरज एंटरटेन्मेंटच्या बॅनरखाली 'स्वर्गाचा व्हिजा' ह्या कौटुंबिक, विनोदी चित्रपटाची निर्मिती केली आहे. दिग्दर्शक राकेश बरोट व शैलेंद्रसिंह राजपूत यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. 'स्वर्गाचा व्हिजा' नावावरुन ह्या चित्रपटाचा फँटसी आशय लक्षात येतो. थोडी फार अदभूततेची जोड घेऊन ह्या चित्रपटाचं कथानक विणलं गेल आहे. याचं लेखन राकेश बरोट ह्यांच असून गीतरचना प्रमोद गायकवाड व जयसिंह विजयसिंह यांची आहे. ध्रुवजीत रॉय या बंगाली तरुणाने ह्या गीतरचना संगीतबद्ध केल्या आहेत.

'स्वर्गाचा व्हिजा' मध्ये मोहन जोशी, मिलिंद गुणाजी, योगेश महाजन, किशोर नांदलासकर, आनंद अभ्यंकर, डॉ. विलास उजवणे, दिपज्योती नाईक ह्या दिग्गज कलाकारांबरोबरच कोमल ढिल्लो, रुपाली गायकवाड, राकेश बरोट, रमेश डी. सिंह, प्रवीण वाडकर, सोनी सिंह, मिली तांबे व निलम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. एक निखळ करमणूक करणारा चित्रपट लवकरच महाराष्ट्रात एकाचवेळी प्रदर्शित होत आहे.

Thursday, September 15, 2011

उर्मिला मातोंडकर मराठी चित्रपटात.........

'एच टू एच एण्टरटेन्मेंट' या बॅनरखाली निर्माते नितेश वाघमारे व क्रिएटिव्ह प्रोडयुसर जयश्रीकांत सावंत यांच्या अमर गुप्ते लिखित दिग्दर्शित 'हृदयनाथ' या चित्रपटात उर्मिला मातोंडकरने चक्क आयटम साँग केले आहे. 

या चित्रपटात जॅकी श्रॉफ, आदित्य पांचोली या हिंदीतल्या सितार्‍यांसोबतच मराठीतील स्वरांगी मराठे, चिन्मयी सुमित, अमेय हुस्नवाडकर अशी यातील स्टारकास्ट आहे. उर्मिलाने केलेक्या आयटम साँगची कोरिओग्राफी रेमो डिसुझाने केली आहे. सुनिधी चौहानने हे गाणे गायले आहे तर प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांचे म्युझिक ऍरेंजर संतोष मुळेकर यांनी या चित्रपटात संगीत दिले आहे. या चित्रपटात एकूण सहा गाणी आहेत.

या चित्रपटाच्या गाण्याविषयी माहिती देताना या चित्रपटाचे लेखक- दिग्दर्शक अमर गुप्ते म्हणाले की कथानकानुसार कोकण कला महोत्सव भरलेला असतो. त्याचे अध्यक्ष तात्या सावंत (जॅकी श्रॉफ) असतात. महोत्सवात बॉलिवुडची प्रसिद्ध मराठी हिरॉईन आणावी असा विचार येतो आणि त्या अनुषंगाने उर्मिलाला आणले जाते. लवकरात लवकर या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करुन ह्या वर्षा अखेरीस हा चित्रपट पूर्ण होणार आहे.

Wednesday, September 14, 2011

दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सवामध्ये 'उदय' करणार मराठी सिनेसृष्टीचे प्रतिनिधित्व.

१५ ते १८ सप्टेंबर २०११ या कालावधीत गोव्यातील पणजी येथे दक्षिण आशिया फिल्म फेस्टिव्हल संपन्न होणार आहे. या महोत्सवामध्ये दक्षिण आशियातील विविध देशांमधील वेगवेगळ्या भाषांमधील हजारो चित्रपटांमध्ये 'उदय' या मराठी चित्रपटाला मराठी सिनेसृष्टीचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे. पणजी येथील कला अकादमीमध्ये दुपारी ३ वाजता 'उदय' चित्रपटाचा शो सादर केला जाईल. 

गोव्याची पार्श्वभूमी असलेल्या आणि अस्सल कोकणी माणसाच्या जीवनावर प्रकाशझोत टाकणार्‍या 'कलाक्षेत्र बॅनर'ची निर्मिती असलेल्या 'उदय' या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच गोव्यात पूर्ण झाले.

निर्माते प्रविणकुमार पासी यांची ही पहिलीच मराठी निर्मिती आहे. कथा-पटकथा आणि दिग्दर्शन जितेंद्र शिकेरकर यांचे असून संवाद युवराज पाटील यांचे आहेत. या चित्रपटाद्वारे राम यशवर्धन हा नवोदित चेहरा मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहे. राम यशवर्धनसह या चित्रपटात अविनाश नारकर, संपदा जोगळेकर- कुलकर्णी, तेजश्री प्रधान, शरद पोंक्षे, किशोर नांदलस्कर, आनंदा कारेकर, अरुण कदम, अनिरुद्ध हरीप, संजय मोहिते यांच्या प्रमुख भूमिका असून  विनय आपटे पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

Saturday, September 10, 2011

'कृपासिंधू' मालिकेचे २०० भाग पूर्ण.

मी मराठी वाहिनी वरील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या लीलांवर आणि त्यांच्या भक्तांना आलेल्या अनुभवांवर आधारित 'कृपासिंधू' - भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या मालिकेने २०० भाग पूर्ण करून लोकप्रियतेचा उच्चांक गाठला आहे. दोनशे भागांच्या या प्रवासात मालिकेने स्वामी समर्थ महाराजांच्या अगाध लीला आणि त्यांच्या भक्तांना आलेले अनुभव लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. अतिशय सखोल संशोधन आणि उत्तम लिखाणाद्वारे स्वामी समर्थांच्या आयुष्याशी निगडीत लोकांना फार माहित नसलेल्या गोष्टी ही लोकांपर्यंत पोहचवण्यात ही मालिका यशस्वी झाली आहे.

Tuesday, September 6, 2011

'कर्तबगार' चित्रपटाची ध्वनीफित प्रकाशित.

एच.पी.मुव्हीज निर्मित आणि सिद्धार्थ मोरे लिखित आणि दिग्दर्शित 'कर्तबगार' एक निर्भिड व्यक्तिमत्व या चित्रपटाच्या ध्वनीफितेचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर आणि आनंद मोडक यांच्या हस्ते ध्वनीफितीचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर, संजय मोहिते, दादा पासलकर आदि मंडळी उपस्थित होती.

या चित्रपटात राघवेंद्र गणेशपुरे आणि हर्षित अभिराज यांनी लिहिलेली चार गीते असून त्यांना हर्षित अभिराज यांनी संगीत दिले आहे. आनंद शिंदे आणि रेश्मा सोनावणे यांनी गायलेल्या गीताला विजय फराटे कंठशहनाई वादक यांच्या कंठशहनाईचा वापर केला आहे.

या चित्रपटात नागेश भोसले, मधू कांबीकर, मोहन जोशी, दादा पासलकर व मुख्य भूमिकेत संजय मोहिते आदि कलाकार दिसणार आहेत.