Thursday, December 30, 2010

केदार शिंदे छोट्या पडद्यावर दिसणार.

काही काळापासून अशी बातमी कानावर पडतेय की केदार शिंदे छोट्या पडद्यावर अभिनय करताना दिसणार आहे. होय ही बातमी खरी आहे अस केदारनेच मराठीमुव्हीवर्ल्डशी बोलताना कबुल केलं आहे. लवकरच तो 'स्टार प्रवाह' वाहिनीच्या महेश कोठारे आणि त्यांचा मुलगा आदिनाथ कोठारे यांची निर्मिती असलेल्या 'मन उधाण वार्‍याचे'  या मालिकेत एका विशेष भुमिकेत दिसणार आहे. सध्या चर्चेत असलेल्या 'ऑन ड्युटी २४ तास' च्या दिग्दर्शनानंतर थोडासा ब्रेक घेत केदार अभिनयाकडे वळला आहे. 

कॉमेडीच्या परफेक्ट टायमिंगची जाण असलेला एक दिग्दर्शक म्हणून आपण त्याला ओळखतो. केदार्ने याआधी रंगमंचावर अभिनय करुन त्याच्यातल्या अभिनेत्याची ओळख करुन दिली आहे. प्रसिद्ध बॉलिवुड दिग्दर्शक असे म्हणतात की "एक चांगला दिग्दर्शक हा चांगला अभिनेता असावा लागतो". पण ते स्वतः कधी अभिनयाच्या क्षेत्रात उतरले नाहीत. पण केदारने अभिनय करायचं ठरवलं आहे आणि ते सुद्धा दुसर्‍या दिग्दर्शकाच्या दिग्दर्शनाखाली.

'झी मराठी' वर 'एका पेक्षा एक - अप्सरा आली'.

Eka Peksha Ek-Apsara Ali
'झी मराठी' चा लोकप्रिय डान्स रिएलिटी शो 'एका पेक्षा एक' नव्या रुपात 'एका पेक्षा एक - अप्सरा आली' या नावाने प्रेक्षकांसमोर आला आहे. या नव्या पर्वात ९ सुंदर, गुणी आणि प्रसिद्ध अशा अभिनेत्री एकमेकींना टक्कर देणार आहेत. 

मराठी चित्रपट आणि टेलिव्हिजनच्या सध्याच्या आघाडीच्या नायिका या पर्वाच्या स्पर्धक आहेत. त्यामध्ये नेहा पेंडसे, गिरीजा ओक, मृण्मयी देशपांडे, उर्मिला कानेटकर, नेहा जोशी, स्मिता तांबे, आरती सोलंकी आणि सोनाली खरे. ही टक्कर थोडी आणखी रंगतदार व्हावी म्हणून लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा सुद्धा यात सहभाग आहे.

या स्पर्धकांना त्यांच उत्तमोत्तम सादरीकरण करण्यासाठी मयुर वैद्य, फुलवा खामकर आणि दिपाली विचारे या सध्याच्या नावाजलेल्या नृत्यदिग्दर्शकांच मार्गदर्शन  मिळणार आहे. आणि या सगळ्यांच परीक्षण अर्थातच महागुरु सचिन पिळगावकर करत आहेत. पुष्कर क्षोत्री या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करत आहे.

'एका पेक्षा एक - अप्सरा आली' २९ डिसेंबर पासून बुधवार आणि गुरुवार रात्री ९.३० वा 'झी मराठी' वर प्रसारित होणार आहे.

Monday, December 20, 2010

सरत्या वर्षाला सलाम करण्यासाठी चित्रपटांसोबतच नाटकांची मेजवानी.

सुहास जोशी, विक्रम गोखले, महेश मांजरेकर आणि सिद्धार्थ जाधव हे येत्या काही दिवसात मराठी नाट्य रसिकांच्या चर्चेचा विषय असणार आहेत. कारण सुहास जोशी आणि विक्रम गोखले रंगमंचावर जवळपास ३० वर्षांनी एकत्र दिसणार आहेत. महेश मांजरेकरसुद्धा 'मी शारुक मांजरसुंभेकर' या नाटकाद्वारे लेखक आणि दिग्दर्शक या नवीन भूमिकेत आपल्या भेटीला येणार आहे. या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग २९ डिसेंबरला होणार आहे. या नाटकात सागर कारंडे, रुपाली भोसले आणि किशोर रावराणे यांच्या सोबत सिद्धार्थ जाधव प्रमुख भूमिकेत आहे. 

'कथा (द स्टोरी)', ज्यामुळे सुहास जोशी आणि विक्रम गोखले एकत्र दिसणार आहेत, पती पत्नीचे नाजूक नाते खेळकर पद्धतीने आपल्यासमोर आणणार आहेत. या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग २६ डिसेंबरला होणार आहे. डबल रोल मुळे होणारी फुल टु धमाल कॉमेडी 'चेहराफेरी' नाटकातून १८ डिसेंबरपासून पहायला मिळणार आहे. भूषण कडू या मध्ये दुहेरी भूमिका साकारत आहे. त्यासोबत रसिका वेंगुर्लेकर, पूजा चव्हाण आणि दिप्ती मोरे यांच्याही यात भूमिका आहेत. 

नवरा बायकोच्या वयातील अंतर, वेगवेगळा स्वभाव यामुळे होणारी भांडणं आणि उत्तर यांच विनोदी शैलीने कथन करणारं नाटक म्हणजेच 'नवा गडी.. नवं राज्य'.... उमेश कामत, प्रिया बापट, हेमंत ढोमे, उर्जा देशपांडे ही तरुण टीम हे नाटक सादर करणार आहे. प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांच 'घाशीराम कोतवाल' हे नाटक जवळपास ६ वर्षांच्या गॅपने पुन्हा रंगमंचावर येण्यास सज्ज झाले आहे. याचा पहिला प्रयोग १९ डिसेंबरला बालगंधर्व रंगमंदिरात झाला. तसेच 'गुंतता हृदय हे' हे गाजलेले नाटक सुद्धा नव्या टिमसह सज्ज आहे. 

Thursday, December 16, 2010

वर्षअखेरीस अनेक चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज.

Varsh Akheris Anek Chitrapat
गजेंद्र अहिरे यांचा 'समुद्र' प्रदर्शनाच्या वाटेवर असताना नितीन कांबळे यांचा 'चंद्रकला' सुद्धा त्याच दिवशी म्हणजेच १७ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. 'समुद्र' ही एक क्लासिकल लुक असलेली पिरियड फिल्म आहे. कोकणच्या नयनरम्य पार्श्वभूमीवर 'समुद्र'ची प्रेमकथा गुंफण्यात आली आहे. तर 'चंद्रकला' ही कथा आहे  तमाशा फडाची मालकीण आणि तिची मुलगी यांची. तमाशात काम न करण्याचा तिचा निर्णय आणि वेगळं आयुष्य जगण्याच्या धडपडीत समाजाशी केलेला संघर्ष यात मांडण्यात आला आहे. दोन्ही चित्रपट संवेदनशील आहेत यात काही शंका नाही.

'समुद्र' मध्ये नंदा या सुंदर मुलीच्या भूमिकेत सोनाली (नटरंग फेम) सोबत नवोदित अमोघ दिसणार असून 'चंद्रकला' ची भूमिका मेघा घाडगे सोबत विजय चव्हाण यांचा मुलगा वरद चव्हाण पदार्पण करत आहे. दोन्ही चित्रपटांमध्ये अनुभवी सहकलाकार आहेत.

२४ डिसेंबरला प्रदर्शित होणारा 'चल धरपकड' हा एक महिलांवरील अन्यायावर आधारीत चित्रपट आहे. दिग्दर्शक आत्माराम धारणे यांनी महिलांकडून दिल्या जाणार्‍या चॅलेंज मध्ये 'कबड्डी' या खेळाचा वापर केला आहे. ज्यात महिलांच नेतृत्व निर्मिती सावंत करत असून विरुद्ध गटात नागेश भोसले आहे.

पण सर्वात जास्त उत्सुकता असलेला विक्रम गोखले दिग्दर्शित मल्टिस्टारर चित्रपट 'आघात'. हा चित्रपट मेडिकल सायन्सवर आधारीत आहे. आणि बॉलिवुडमधील किरण कुमार सुद्धा या चित्रपटात दिसणार आहेत. तसेच आणखी दोन मल्टीस्टारर चित्रपट 'आयडियाची कल्पना' आणि 'शहाणपण देगा देवा' सुद्धा या वर्षाअखेरीस प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत.

Friday, December 10, 2010

'जन-गण-मन' चित्रपटातील गाण्यासाठी 'गौरव महाराष्ट्राचा' मधील सौरभ वखारे पार्श्वगायन करणार

Ramabai Bhimrao Ambedkar, Ramai, Nisha Parulekar
'ई टिव्ही मराठी' वाहिनीच्या 'गौरव महाराष्ट्राचा' या कार्यक्रमाच्या अंतिम ५ स्पर्धकांमध्ये पोहचलेल्या सौरभला प्रसिद्ध संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांनी २६ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार्‍या 'जन-गण-मन' या चित्रपटामध्ये पार्श्वगायनाची संधी दिली आहे. 

सौरभ वखारे सध्या आठवी मध्ये शिकत आहे. नाशिकमध्ये आयोजित निवड चाचणीत त्याची पुढच्या फेरीसाठी निवड झाली. या कार्यक्रमाच्या एका भागात डॉ. सलील कुलकर्णी स्पर्धकांना मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. व तेव्हाच त्यांना सौरभचा आवाज त्यांना भावला होता. 

'जन-गण-मन' या चित्रपटाचं दिग्दर्शन अमित अभ्यंकर यांनी केलं असून नंदु माधव, मधुरा वेलणकर आणि संतोष जुवेकर यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात एकूण तीन गाणी आहेत. त्यापैकी एक सौरभने गायलं आहे.

Tuesday, December 7, 2010

रमाबाईंवरील चित्रपट हिंदीमध्ये 'डब' होणार

Ramabai Bhimrao Ambedkar, Ramai, Nisha Parulekar
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनावरील "रमाबाई भीमराव आंबेडकर (रमाई)' हा मराठी चित्रपट आता हिंदीमध्ये डब करण्यात येणार आहे. रमाबाईंचे कार्य देशभरात पोचावे याकरिता निर्माते व दिग्दर्शक प्रकाश जाधव यांनी हे पाऊल उचलले आहे. हिंदीतील हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनाच्या निमित्ताने,तीन डिसेंबरला "रमाबाई भीमराव आंबेडकर' हा चित्रपट मराठवाड्यासह मुंबईत प्रदर्शित झाला आहे. मराठीतील या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाल्यामुळे,निर्माते व दिग्दर्शक प्रकाश जाधव यांनी या चित्रपटाचे हिंदीतील डबिंग पूर्ण केले आहे. 

"रमाबाई भीमराव आंबेडकर' याच नावाने हा चित्रपट इतर राज्यांत  प्रदर्शित केला जाणार आहे.   रमाबाई बाबासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्या. त्यांचे जीवन खूप खडतर आणि कष्टप्रद होते. आतापर्यंत बाबासाहेबांवर बरेच हिंदी-मराठी चित्रपट आले; परंतु रमाईंचे कार्य जनतेसमोर यावे या उद्देशाने  निर्मात्याने हा चित्रपट बनविला आहे. आता तो जगभरात जावा म्हणजे रमाईंचे कार्य सगळ्यांना समजावे, याकरिता  हिंदी भाषेत हा चित्रपट बनविला जात आहे. 

मराठी भाषेतील हा चित्रपट आतापर्यंत वर्षा गायकवाड, प्रवीण दरेकर, रामदास आठवले अशा काही राजकीय मंडळींनी पाहिलेला आहे आणि त्यांनी त्याचे भरपूर कौतुक केले आहे. प्रवीणदरेकर यांनी एक लाख रुपयांचा धनादेश या चित्रपटाला मदत म्हणून दिला आहे. विश्‍वनाथ तायडे यांनी दीड लाख रुपयांची मदत केली; तसेच वर्षा गायकवाड आणि रामदास आठवले यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्‍वासन दिले आहे. 

Monday, December 6, 2010

स्टार प्रवाह घेऊन येत आहे भांडा सौख्य भरे

Bhanda Saukya Bhare, Prasad Oak
खूप वर्षापासून चालत आलेल्या सासू सुनांमधील संबध हे अद्वितीय आहे. त्यांच्या या नात्यामधील गमती जमती आणि विनोद सगळ्यांना परिचयाचे आहेत कधी सासू आपल्या सुनेपेक्षा स्वताला सरस ठरविण्याचा प्रयत्न करते तर कधी सून आपणच योग्य असे ठरविते. त्यांच्या या नात्यावर खूप कार्यक्रम निघाले आहेत. असाच एक मनोरंजक कार्यक्रम 'भांडा सौख्य भरे' स्टार प्रवाह वर चालु झाला आहे.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकार प्रसाद ओक हे करत आहेत.  हया कार्यक्रमामध्ये आपली आई मुलाला किती ओळखते किवा बायको आपल्या पतीला किती समजते, हे पाहायलामिळेल. दोघींची एक दुस्यांशी तीन भागात लढाई होणार आहे. दर्शनो मीटर, शपत राउंड आणि किचन राउंड हया तीन भागात विभागणीझाल्याने हया कार्यक्रमालावेगळाच रंग चढेल.

स्टार प्रवाहाच्या प्रोग्रामिंग प्रमुख श्रावणी देवधर सांगतात की हा कार्यक्रम बघताना तुम्ही तुमच्या घरातील भांडण विसरून हया कार्यक्रमामधीलभांडण बघत बसाल. कारण हया भांडणामध्ये एक प्रेम आहे, आपलेपणा आहे. हे प्रेम तुम्ही कोणत्याही मापामध्ये मापु शकत नाही. हे पाहताना तुम्ही खूप आनंदी व्हाल. हा कर्यक्रम ६ डिसेंबर पासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी ६.३० वाजता स्टार प्रवाहवर पहाता येइल. 

'आटापिटा' १० डिसेंबरला प्रदर्शित होणार.

Aatapita Releasing
'समर्थ आर्ट'ची निर्मिती असलेला 'आटापिटा' १० डिसेंबर २०१० रोजी विदर्भ वगळता महाराष्ट्रातील ७०-८० सिनेमा गृहात एकाच वेळी प्रदर्शित होणार आहे. भरत जाधव आणि संजय नार्वेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन उत्तुंग शेलार यांनी केलं आहे. 

या शिवाय या चित्रपटात अश्विनी आपटे, गिरीश साळवी, प्रदीप काब्रे, प्रतिभा गोरेगावकर, राजू शिसडकर, संतोष पाटील, राहुल कुलकर्णी, रोहन भालेकर, प्रदीप डोईफोडे, निखिल खैरनार आणि सतिश पुळेकर यांच्या भुमिका आहेत. भुषण पाटील, दिपाली सामंत आणि आचल राणे यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे संवाद 'कॉमेडी एक्स्प्रेस' फेम प्रशांत लोके यांनी लिहिले आहेत. गिरीश साळवी यांच्या गीतांना संजीव कोहली यांनी संगीतबद्ध केलं आहे. प्रसाद भेंडे यांनी छायाचित्रण केलं आहे.

Wednesday, December 1, 2010

सिया पाटील 'वारस' या मालिकेत.

Siya Patil In Waras
सिया  पाटील हे नाव दूरचित्रवाणीच्या क्षेत्रात अगदी नवं आहे. मात्र चित्रपट रसिकांना सिया ओळखीची आहे.  अलिकडच्या काही  चित्रपटांमधून  झळकलेली  सिया छोट्या पडद्यावर प्रथमच झळकतेय, ती  झी  मराठीवर  लवकरच दाखल  होणार्‍या 'श्री सिद्धिविनायक चित्र' च्या 'वारस' या मालिकेद्वारा. अत्यंत संवेदनशील कथा असलेल्या 'वारस' मध्ये सिया मध्यवर्ती भूमिकेत आहे. 

तिचा 'नवरा अवली बायको लवली' हा चित्रपट प्रदर्शित  झाला आहे. तसेच तिचे अजून ५ चित्रपटप्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. तिने एम कॉम पर्यंत शिक्षण घेतले असून कॉलेज मध्ये असताना तिने अनेक नाटकामधून, कॉलेज फेस्टिवल्स मधून कामं केली आहेत. 

'वारस' ही आई मुलाच्या हळुवार नात्याची अतिशय  संवेदनशील कथा आहे.  येत्या ६ डिसेंबर पासून ही मालिका सोमवार ते शनिवार सायंकाळी ६.३० वाजता झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येईल. 'वारस' ही 'श्री सिद्धिविनायक चित्र'ची निर्मिती असून खलील हेरेकर हे या मालिकेचे दिग्दर्शक आहेत. नरेश बोर्डे या मालिकेचे निर्माते आहेत. वारस मध्ये सियाबरोबर आदित्य वैद्य, उदय टिकेकर, मुग्धा गोडबोले, विलास उजवणे, श्रीकांत देसाई असे अनेक नावाजलेले कलाकार आहेत.