Monday, September 3, 2012

स्वातंत्र्योत्तर भरतभूमिचा विश्लेषक इतिहास

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेला ‘भारत’. या भारताचा लोकशाहीपर्यंतचा झालेला प्रवास अर्थातच अनेक खडतर प्रसंगांनी व्यापलेला आहे, याची जाणीव प्रत्येक भारतीयाला आहेच. भारताला मिळालेले स्वातंत्र्य, त्यानंतर झालेली त्याची फाळणी, आणि गांधींची हत्या या घटनांपर्यंतचा इतिहास सर्वश्रुत आहे. पण यानंतर म्हणजे लोकशाही अस्तित्वात आल्यानंतरचा समग्र इतिहास अजून कोणीच आपल्यासमोर मांडलेला नाही. ‘रामचंद्र गुहा’ यांच्यासारख्या समाजसंस्कृतीची व्यापक जाण असलेल्या राजकीय विश्लेषकाने तो लिहिला आहे. ‘इंडिया आफ्टर गांधी’ या नावाने इंग्रजीत प्रकाशित झालेला हा इतिहास, शारदा साठे यांनी ‘गांधींनंतरचा भारत’ या नावाने उत्तमरित्या मराठीत अनुवादित करून लिहिला आहे.
”गांधींनंतरचा भारत’ या ग्रंथाची एकूण पाच भागात विभागणी करण्यात आलेली आहे. यातील पहिल्या भागात स्वातंत्र्य, फाळणी, गांधीहत्या, संस्थानांचे विलीनीकरण, निर्वासितांचे प्रश्न या घटनांची हकीकत सांगितली आहे. त्यानंतर स्वतंत्र भारतातील पहिली निवडणूक, नेहरूंचे विकासाचे स्वप्न, परराष्ट्रधोरण, आदिवासी जमातींचे संघर्ष या सर्वांचा समावेश असलेले नेहरूयुग उलगडले आहे. तिस-या भागात नेहरूंच्या राजकीय कारकिर्दीला लागलेली उतारकळा अनुभवास येते. यामध्ये भाषावार प्रांतरचना, दक्षिणेकडील राज्यांचे आव्हान, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, चीनचे आक्रमण आणि काश्मीर प्रश्न यांचा ज्वलंत इतिहास कथन केला आहे. ग्रंथाचा चौथा भाग ‘लोकप्रियतावादाचा उदय’ अशा शीर्षकाने सुरु होतो. या भागात लालबहादूर शास्त्रींची दोन वर्षांची कारकीर्द, इंदिरा गांधींचा उदय आणि जनता राजवट या घटनांचा समावेश आहे. राजीव गांधी आणि १९९० पर्यंतच्या अस्थिर राजकीय परिस्थितीचा निर्देश करून चौथ्या भागाला पूर्णविराम मिळतो. ग्रंथाच्या अखेरच्या भागात ‘समृद्धी आणि मनोरंजन’ या शीर्षकाखाली मागील वीसेक वर्षात झालेल्या घडामोडींचा आढावा घेत या ग्रंथाची समाप्ती होते.
रामचंद्र गुहा यांनी केलेले या ग्रंथाचे लेखन अत्यंत जबाबदारीने आणि सर्व घटनांच्या गांभीर्याचे भान ठेऊन केले आहे. भारतासारख्या सांस्कृतिक विविधता, आर्थिक विषमता असलेल्या देशाचा खोल इतिहास मांडताना देशात केला जाणारा लिंगभेद, स्त्रियांचे शोषण यावरही लक्ष केंद्रित करून त्यावेळच्या परिस्थितीची जाणीव त्यांनी करून दिली आहे. गुहा यांनी ग्रंथामध्ये प्रत्येक दशकासाठी स्वतंत्र नकाशे दाखवले आहेत. या नकाशांची जमेची बाजू म्हणजे त्यावेळचा संघर्षाचा भाग गुहा यांनी लाल रंगामध्ये तर संघर्षरहित भाग पांढ-या रंगाने दाखवला आहे. आणि सर्वात महत्वाचे असे की खूप व्यापक संघर्षाच्या काळातही लाल रंगापेक्षा पांढ-या रंगाने व्यापलेली जागा जास्त आहे.
भारतातली गरिबी, दलित समाजाचे प्रश्न, दंगली, स्त्रियांचे शोषण, आर्थिक विषमता, राजकारणाचे झालेले व्यावसायिकरण या सर्वांची विस्तृत चर्चा या ग्रंथात केलेली आहे. या ग्रंथामध्ये गुहा यांनी दोन महत्वाच्या विधानांवर भाष्य केले आहे. ‘भारत निराशेच्या गर्तेत लोटला जाईल ‘ हे विधान जितके अतिशयोक्त तितकेच ‘भारत नजीकच्या काळात महासत्ता बनेल’ हे विधानही अपरिपक्व असल्याचे मत गुहा यांनी व्यक्त केले आहे.
‘हिंदुस्थान हा एक देश कधीही नव्हता आणि होणारही नाही’ असे विधान ब्रिटीश राज्यकार्यकर्त्यांपासून ते राजकीय विश्लेषकांपर्यंत अनेकांनी केले. पण या सर्वाला छेद देत आज साठ वर्षांनंतरही भारत एकसंध लोकशाही राष्ट्र म्हणून उभा आहे ही वस्तुस्थिती आहे. या अभेद्य राष्ट्राचा इतिहास वाचणे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्यच म्हणावे लागेल.

No comments:

Post a Comment