सर्वसामान्य जनतेपर्यंत सहज पोहोचू शकणारे माध्यम म्हणजे ‘चित्रपट माध्यम’. याच विचारातून सामाजिक विषय सर्व स्तरातील जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी ‘Common Man Films’ द्वारे मराठी चित्रपटांची निर्मिती केली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी ‘हॉटेल ऑर्बेट’ मध्ये या चित्रपट निर्मिती संस्थेच्या ‘अरे आवाज कोणाचा….’ या फिल्मची घोषणा करण्यात आली.
मध्यमवर्गात वाढलेल्या आणि गणेशोत्सव मंडळातून सामाजिक क्षेत्रात कार्य करणा-या तरूणांनी मिळून या संस्थेची स्थापना केली आहे. यानिमित्त चित्रपटाचे निर्माते चिद्विलास क्षीरसागर म्हणाले, “अरे आवाज कोणाचा हा फक्त एक चित्रपट नसून आमच्यासाठी ती एक चळवळ आहे. समाजातील सर्व थरापर्यंत पोहोचण्याचे माध्यम म्हणून भारतीय चित्रपट सृष्टीकडे पाहिलं जातं. सध्या अनेक सामाजिक प्रश्नांनी उचल खाल्ली असली तरी चित्रपटांमधून त्यांचे दर्शन घडत नाही. चित्रपट माध्यम हे थेट समाजापर्यंत पोहोचत असल्यामुळे आम्ही ‘Common Man Films’ या चित्रपट संस्थेची स्थापना केली.”
हा चित्रपट एका कार्यकर्त्याच्या आयुष्यावर, त्याला आलेले अनुभव आणि विविध प्रसंगांवर आधारित आहे. उदय सावंत ही प्रमुख भूमिका प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे साकारत आहेत. एका छोट्याशा खेड्यातून आलेला एक तरुण मुलगा अत्यंत लहान वयात राजकीय क्षेत्रात प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून विकसित होतो. अण्णासाहेब (उदय टिकेकर) यांचा तो समर्थक असतो. अण्णासाहेबांचा विरोधक असलेल्या नानासाहेबांना (तुषार दळवी) त्याची दखल घ्यावी लागते आणि ते त्याची कारकीर्द संपवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करतात, अशी ह्या चित्रपटाची कथा आहे.
या चित्रपटाची निर्मिती हर्षल गरूड, वैभव वाघ, चिद्विलास क्षीरसागर आणि स्वप्नील सुरेश माने यांनी केली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक हेमंत देवधर यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाची कथा अॅड. अनिश पाडेकर यांची असून पटकथा आणि संवादलेखन प्रताप गंगावणे यांचे आहे. संजय जाधव यांनी छायाचित्रणाची जबाबदारी स्वीकारली आहे. चित्रपटातील गीते चिद्विलास क्षीरसागर यांची असून संगीत शैलेंद्र बर्वे यांनी दिले आहे. डॉ. अमोल कोल्हे, उदय टिकेकर, तुषार दळवी, ऐश्वर्या नारकर, विशाखा सुभेदार, विद्याधर जोशी, यशोधन बाळ आणि मनोज जोशी या कलाकारांच्याही महत्वपूर्ण भूमिका या चित्रपटात आहेत.
चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत देवधर सांगतात, “हा चित्रपट प्रत्येकाला आपलासा वाटेल. ही सर्वसामान्य माणसाची कहाणी आहे. आपल्या समाजात अनेक कार्यकर्ते आहेत. पण त्यांचा आवाज किंवा वेदना कोणापर्यंत पोहोचत नाहीत. त्याकडे दुर्लक्ष केले जाते. एखाद्याला घडवण्यात किंवा संपवण्यात प्रसिद्धीमाध्यमांचा खूप मोठा वाटा आहे. त्यावरदेखील या चित्रपटात प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. आजच्या समाजाकडून ज्यांच्या आवाजाकडे दुर्लक्ष झाले आहे त्यांना ‘अरे आवाज कोणाचा’ हा चित्रपट समर्पित करण्यात आला आहे.”
चित्रपटाबद्दल अधिक माहिती देताना निर्माते चिद्विलास क्षीरसागर म्हणाले, “कार्यकर्त्यांच्या आयुष्यातील प्रातिनिधिक समस्यांना या चित्रपटाद्वारे वाचा फोडण्यात आली आहे. समाजाच्या समस्या मांडताना या कार्यकर्त्यांसमोर निर्माण होणारे पेचप्रसंग, राजकीय दबाव आदींचा त्यात समावेश आहे. या विषयाला न्याय देणे ही खूप अवघड गोष्ट होती. परंतु चांगली टीम लाभल्यामुळे हे आव्हान पेलू शकल्याचा आम्हांला आनंद आहे. आजच्या तरुण पिढीचे वास्तव या चित्रपटाद्वारे सर्वांच्या समोर येईल अशी मी आशा करतो.”
या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून लवकरच हा ‘आवाज’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
No comments:
Post a Comment