Thursday, September 27, 2012

Anulesh Desai Debut Film ………….Saad, releasing on 5th Oct

या जगात प्रत्येक जण स्वत:च्या कोषात कितीही मग्न असला तरी आपल्या जिव्हाळ्याच्या माणसांनी घातलेली साद त्याला खुणावतेच. आईवडीलांच्या मायेचा हुंकार आपल्या अपत्यासाठी जितका गहिरा असतो तितकीच त्या मुलांनी देखील आपल्या प्रेमाच्या माणसांना घातलेली साद लाखमोलाची असते.
analesh1 717x1024 Anulesh Desai Debut Film .............Saad, releasing on 5th Oct
Anulesh Desai in Marathi Movie Saad
मानवी नात्यातील हळुवार भावनिक बंधावर बेतलेल्या कथानकावर ‘अभिरुची फिल्म्स’ ही निर्मिती संस्था ‘साद’ हा पहिला मराठी चित्रपट घेऊन निर्मिती क्षेत्रात प्रवेश करीत आहे. प्रदर्शनासाठी सज्ज असलेला हा चित्रपट ५ ऑक्टोबरला राज्यात सर्वत्र प्रदर्शित होतोय. हेमंत दाभाडे निर्मित, दिग्दर्शित ‘साद’ या चित्रपटातून अनलेश देसाई आणि अवंतिका सालियन ही नवी जोडी रुपेरी पडद्यावर झळकतेय. सोबत यतीन कार्येकर, अरुण नलावडे, इला भाटे, प्रसाद पंडीत, रवी पटवर्धन, संजीवनी जाधव, भाग्यश्री राणे, विवेक पंडकर, यशवंत चोपडे, मयूर पवार, रेधी ही अनुभवी- नवोदित स्तारकास्त साद चित्रपटात एकत्र आली आहे. चित्रपटाचे आणखी एक आकर्षण म्हणजे यातील काही प्रसंगाचे चित्रीकरण मलेशियातील निसर्गरम्य परिसरात करण्यात आले आहे. आनंद म्हसवेकर लिखीत चित्रपटाची कथा आहे राहुलची. मलेशियात स्थायिक असलेल्या राहुलने आपल्या जन्मदात्या आईला साद घातली आहे. तेवीस वर्षाने नियतीने जुळवून आणलेली ही आई मुलाची भेट होईल की जुनी नाती त्या आड येतील. मलेशियातील मॉम- दाद राहुलवर संतापतील की त्याच्या निर्णयाला साथ देतील. प्रेमाच्या माणसांनी एकमेकांना घातलेल्या सादेला प्रतिसाद मिळतोय का? हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल. चित्रपटाची उत्सुकता वाढवणारी वेगळ्या धाटणीची पटकथा- संवाद आणि विस्तार अभिनेते दीपक देऊलकर आणि आरती देसाई यांनी केले आहे. संवाद दीपक देऊलकर, आनंद म्हसवेकर यांनी लिहिले आहे. आरती देसाई यांनी लिहिलेल्या गीतांना अरविंद हळदीपूर यांनी संगीत दिले असून पार्श्वगायन देवकी पंडीत, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, संगीत हळदीपूर या गायकांनी केले आहे. नृत्य दिग्दर्शक नरेंद्र पंडीत आणि फुलवा खामकर यांनी यातील गीतांवर नृत्य दिग्दर्शन केले आहे. संकलन रवी फुटाणे यांनी केले असून ध्वनी संयोजन सुरेश पासवान यांनी केले आहे. येत्या ५ ऑक्तोबेरला साद चित्रपटगृहात दाखल होत आहे.

Wednesday, September 26, 2012

नवा चेहरा अनलेश देसाई देतोय 'साद'.

Anlesh Desai, Saad Marathi Filmप्रेक्षक पसंतीच्या लाटेवर स्वार व्हायला अनलेश देसाई हा नवा उमदा चेहरा मराठी रुपेरी पडद्यावर दाखल होतोय. 'अभिरुची फिल्म्स' निर्मिती संस्थेच्या 'साद' हा पहिल्या मराठी चित्रपटातून अनलेश देसाई आणि अवंतिका सालियन ही नवी जोडी रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे.

अनलेशचा हा पहिलाच सिनेमा असला तरी त्याने आपल्या सहजसुंदर अभिनयाने यातील भूमिका साकारली आहे. या चित्रपटात यतीन कार्येकर, अरुण नलावडे, इला भाटे, प्रसाद पंडित, रवी पटवर्धन, संजीवनी जाधव, भाग्यश्री राणे, विवेक पांडकर, यशवंत चोपडे, मयुर पवार या अनुभवी कलाकारांसोबत तितक्याच तोडीचा अभिनय साकारण्याचे आव्हान त्याने खुबीने पेलले आहे.

आजच्या तरुणाईचे प्रतिनिधीत्व करणारी राहुलची भूमिका अनलेशने साकारली असून त्याच्या आई वडिलांशी असणार्‍या नातेसंबंधावर 'साद' हा चित्रपट भाष्य करतो. चित्रपटाच्या काही महत्त्वाच्या प्रसंगांचे चित्रीकरण मलेशियात करण्यात आले आहे. हा चित्रपट ५ ऑक्टोबरला राज्यभरात सर्वत्र प्रदर्शित होतोय.

Tuesday, September 25, 2012

'या टोपी खाली दडलयं काय ?' या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण.

Ashok Saraf, Makrand Anaspureटोपीखाली भन्नाट विचार असलेल्या एका भ्रष्टचारी नेत्याचा आचार विचारा संबधी सनसनाटी आणि सत्य परिस्थितीवर आधारीत 'या टोपी खाली दडलयं काय ?' या चित्रपटाचं चित्रीकरण कोल्हापूरमध्ये पार पडलं. शेवटच्या या चित्रीकरणांत अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, सुवर्णा काळे या कलाकारांचा सहभाग होता.
निर्माते दिलीप आपेट यांनी आपल्या 'शुभकल्याण फिल्म'च्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत सुरेंद्र पन्हाळकर. अनुभवी व बुजुर्ग दिग्दर्शक दत्ताराम तावडे हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत.

नुकतेच निधन पावलेले संगीतकार बाळ पळसुले यांनी या चित्रपटातील चार गीतांना संगीत दिलं आहे. धमाल विनोदी व राजकीय मिष्किलबाजी असलेल्या चित्रपटात मकरंद अनासपुरे, अशोक सराफ हे दोन मातब्बर कलाकार प्रमुख भूमिकेत असून सुरेखा कुडची, किशोरी अंबिये, भालचंद्र कुलकर्णी व नवतारका सुवर्णा काळे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

Thursday, September 20, 2012

'चार्ली' चित्रपटाचा मुहूर्त संपन्न.

Bharat Jadhav, Charlie Marathi Film
सस्पेन्स, थ्रिलर, सिच्युएशनल कॉमेडी आणि चार्ली चैप्लिन चित्रपटाचे गुण वैशिष्ट्य असलेली ब्लैक कॉमेडी हे चार घटक परस्परपूरक पद्धतीने एकत्र करुन 'समृद्धि क्रिएशन्स' निर्मित अणि 'पर्व क्रिएशन्स' सहनिर्मित चार्ली हा सिनेमा विदीन सिनेमा अर्थात चित्रपटातला चित्रपट आकारला येतोय. मुंबईत झालेल्या एक भव्य कार्यक्रमात ह्या चित्रपटाचा शुभारंभ करण्यात आला. या चित्रपटाचा नायक भारत जाधव याने एका शवपेटीच्या आत दडलेले या चित्रपटाचे शीर्षक अनोख्या पद्धतीने जाहीर केले. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते बाबा काळे अभिनेते सतीश पुळेकर, भारत जाधव, सहनिर्माते रवी गोळे, ज्येष्ठ सनदी अधिकारी गजभिये आणि मराठी चित्रपटसृष्टीतले अनेक मान्यवर उपस्थित होते.

चार्ली चाप्लिन ह्यांना आदरांजली म्हणून या चित्रपटाचे नामकरण 'चार्ली' असे करण्यात आले आहे असे यावेळी दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे यांनी सांगितले तसेच छायाचित्रण आणि संगणकीय तंत्रात झालेल्या नव्या बदलाचा आधार घेऊन हा सिनेमा आकारास येईल असे ते म्हणाले.

Tuesday, September 18, 2012

‘नाईट स्कूल’ अंधारातील ज्ञानदीप

02 1024x680 नाईट स्कूल अंधारातील ज्ञानदीप

लाख्खो विषय आणि त्यांच्या समाजात उमटणा-या छटा प्रतिबिंबित होऊन जेव्हा रुपेरी पडद्यावर साकारल्या जातात तेव्हा आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्याला एक वेगळेच व्यासपीठ मिळाल्याचा भाव मनात येतो. आपल्या आजूबाजूच्या अनेक व्यक्तींच्या कहाण्या त्या लांब रुंद पडद्यावर प्रेक्षक म्हणून पाहतानाचा आनंद सगळ्यांच्याच चेह-यावर दिसून येतो.
आज आपला भारत देश अनेक क्षेत्रात विकसित होण्याचा प्रयत्न करतोय. पण विकसनाचा पाया असलेल्या शिक्षणाच्या क्षेत्रात मात्र अजूनही थोडी कमतरता भासते आहे. काही जणांना शिकण्याची इच्छा असून परिस्थितीपुढे त्यांना झुकावे लागत आहे, तर काही जणांमध्ये अजूनही जिज्ञासूपणाची कलाच नसल्याचं लक्षात येत आहे. पण परिस्थितीवर मात करून आयुष्याच्या लढायांना समर्थपणे समोर जाऊन त्याचं सोनं करणारे अनेक जण आपल्याला समाजात दिसतात. अंधारातही प्रकाशमान असणा-या रात्रशाळांची कथा सांगणारा ‘नाईट स्कूल’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. वनमाळी बेनरखाली बनणा -या नितीन मावाणी निर्मित या चित्रपटात रात्रशाळेच्या जगाची कहाणी मांडण्यात आली आहे.
सुप्रसिद्ध दिग्दर्शक मानसिंग पवार यांच्या दिग्दर्शनाखाली ‘नाईट स्कूल’ या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून त्याच्या पोस्ट प्रोडक्शनचे कामही पूर्ण झाले आहे. ‘डोंबिवली फास्ट’ सारख्या चित्रपटातून सरस अभिनयाची दाद मिळवलेल्या आणि हिंदी चित्रपटांमधूनही लोकप्रिय झालेला अभिनेता संदीप कुलकर्णी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. गोरगरीबांच्या अज्ञानमय अंधारात ज्ञानाचा प्रकाशाचा दीप प्रज्वलित करण्याच्या उदात्त हेतूने एका समाजसेवकाने सुरु केलेल्या ‘शिवाजी नाईट स्कूल’ ची कथा या चित्रपटात दाखवली आहे. विनोद, सुख दु:खाचे क्षण, विविध समस्या, भावनिक प्रसंग अशा अनेक प्रसंगांनी हा चित्रपट रेखाटण्यात आला आहे.
चित्रपटाची कथा आणि संवाद, दिग्दर्शक मानसिंग पवार यांनीच लिहिले आहेत. याशिवाय बब्रू भोसले यांच्यासह गीतलेखनाचे काम मानसिंग पवार यांनी केले आहे. सुरेश वाडकर, स्वरूप भालवणकर यांच्यासारख्या आघाडीच्या गायकांनी या चित्रपटातील गाणी गायली आहेत. प्रसाद पंडित, श्रीकांत यादव, अन्वय बेंद्रे, दीपा चाफेकर, राजू गोविलकर, शिवराज वाळवेकर, आशित आंबेकर, राजू मावाणी या कलाकारांसह रात्रशाळेतील ४० विद्यार्थ्यांचा अभिनय या चित्रपटात प्रेक्षकांना पाहता येईल. केमेरामन प्रकाश शिंदे यांनी चित्रपटाचे छायांकन केले असून संकलनाची जबाबदारी परेश मांजरेकर यांनी पार पडली आहे.
केवळ विनोदीपट बनवून पैसे न कमावता आपण समाजाचेही काही देणे लागतो या विचाराने प्रेरीत होऊन समाजातील वास्तव समोर आणून, त्यातील समस्या जनतेसमोर मांडून त्या निवारण्याचे आवाहन करण्याचा आपला प्रयत्न आहे, अशा भावना निर्माते नितीन मावाणी यांनी व्यक्त केल्या. दिवसा काम करून रात्री मौजमजा करण्यापेक्षा रात्री शिक्षण घेणे हे कठोर तपस्येप्रमाणे असल्याने रात्र शाळेतील जग ख-या जगासमोर आणण्याची इच्छा होती आणि ती या सिनेमाद्वारे पूर्ण झाल्याचे दिग्दर्शक मानसिंग पवार यांनी सांगितले.
तांत्रिक कार्यभाग पूर्ण झाल्यानंतर लवकरच हा सिनेमा प्रदर्शित करण्याची इच्छा नितीन मावाणी यांनी व्यक्त केली.

Saturday, September 15, 2012

तरुणाईचे दमदार रुप असलेला 'दम असेल तर' २८ सप्टेंबरला राज्यभर प्रदर्शित होणार.

Shankar, Dum Asel Tar
पूर्वी राजकीय विषयावर सहसा व्यक्त न होणारी तरुण पिढी आता हिरीरीने लक्ष घालून आपलं मत मांडताना दिसत आहे. तरुणाईचा हाच बदल आणि असाच काहीसा राजकीय सामाजिक विषय 'दम असेल तर' या आगामी मराठी चित्रपटातही मांडण्यात आला आहे, आणि यात तरुणाईच्या या राजकीय आंदोलनाचं नेतृत्व करतोय शंकर ह उद्योन्मुख दमदार चेहरा.

'सागर सकुंडे फिल्म्स' निर्मित आणि विजय गोखले दिग्दर्शित 'दम असेल तर' मधील तरुणाईचं हे समाजभिमुख राजकारण प्रेक्षकांना लवकरच बघायला मिळणार आहे. चित्रपटाचा मुख्य नायक आहे शंकर. सुभाष घई यांच्या 'व्हिसलिंग वुड्स' या अद्ययावत प्रशिक्षण संस्थेमधून अभिनयाचे धडे गिरवलेला शंकर या चित्रपटातून पदार्पण करत आहे. त्याच्यासोबत मनवा नाईक, स्मिता शेवाळे, उदय टिकेकर, मोहन जोशी, शुभांगी लाटकर, विघ्नेश जोशी, विजय गोखले आणि अनंत जोग अशी तगडी स्टारकास्ट आहे. येत्या २८ सप्टेंबरला हा चित्रपट राज्यभर प्रदर्शित होतोय.

Friday, September 14, 2012

रितेश देशमुख, उत्तुंग ठाकूर आणि रवी जाधव यांची निर्मिती असलेल्या

Ritesh Deshmukh, Ravi Jadhav, Balak Palakप्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख यांची मुंबई फिल्म कंपनी, उत्तुंग ठाकूर यांची विवा इन आणि रवी जाधव फिल्म्सची संयुक्त निर्मिती असलेल्या बीपी ( बालक पालक) चित्रपटाची घोषणा एका पत्रकार परिषदेत करण्यात आली.

या वेळी रितेश देशमुख, उत्तुंग ठाकूर, रवी जाधव यांच्यासह किशोर कदम, सई ताम्हणकर, प्रथमेश परब, शाश्वती पिंपळीकर, मदन देवधर, भाग्यश्री सकपाळ, रोहित फाळके, सुबोध भावे, अमृता सुभाष, अविनाश नारकर, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, सतीश तारे, सुप्रिया पाठारे आदी मान्यवर उपस्थित होते. 'मुंबई फिल्म कंपनी' आणि 'विवा इन' या संस्थेद्वारे श्री. रितेश देशमुख आणि उत्तुंग ठाकूर चित्रपट निर्मिती मध्ये पदार्पण करीत आहेत. बीपी चे आणखीन एक मोठे वैशिष्ट म्हणजे बॉलीवूडमधील प्रख्यात संगीतकार जोडी विशाल - शेखर यांनी या चित्रपटाद्वारे मराठीचित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे ."करूया आता कल्ला" आणि "हरवली पाखरे" ही दोन गाणी मराठी चित्रपट संगीत क्षेत्रात धमाल उडवणार.

बीपी हा चित्रपट म्हणजे एक हलकेफुलके नाट्य आहे. नाटयातून प्रेक्षकांना आपल्या मुलांशी कसा संवाद साधायला हवा हे समजणार आहे.

‘अरे आवाज कोणाचा….’लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Page 1 अरे आवाज कोणाचा....लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

सर्वसामान्य जनतेपर्यंत सहज पोहोचू शकणारे माध्यम म्हणजे ‘चित्रपट माध्यम’. याच विचारातून सामाजिक विषय सर्व स्तरातील जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी ‘Common Man Films’ द्वारे मराठी चित्रपटांची निर्मिती केली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी ‘हॉटेल ऑर्बेट’ मध्ये या चित्रपट निर्मिती संस्थेच्या ‘अरे आवाज कोणाचा….’ या फिल्मची घोषणा करण्यात आली.
मध्यमवर्गात वाढलेल्या आणि गणेशोत्सव मंडळातून सामाजिक क्षेत्रात कार्य करणा-या तरूणांनी मिळून या संस्थेची स्थापना केली आहे. यानिमित्त चित्रपटाचे निर्माते चिद्विलास क्षीरसागर म्हणाले, “अरे आवाज कोणाचा हा फक्त एक चित्रपट नसून आमच्यासाठी ती एक चळवळ आहे. समाजातील सर्व थरापर्यंत पोहोचण्याचे माध्यम म्हणून भारतीय चित्रपट सृष्टीकडे पाहिलं जातं. सध्या अनेक सामाजिक प्रश्नांनी उचल खाल्ली असली तरी चित्रपटांमधून त्यांचे दर्शन घडत नाही. चित्रपट माध्यम हे थेट समाजापर्यंत पोहोचत असल्यामुळे आम्ही ‘Common Man Films’ या चित्रपट संस्थेची स्थापना केली.”
हा चित्रपट एका कार्यकर्त्याच्या आयुष्यावर, त्याला आलेले अनुभव आणि विविध प्रसंगांवर आधारित आहे. उदय सावंत ही प्रमुख भूमिका प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे साकारत आहेत. एका छोट्याशा खेड्यातून आलेला एक तरुण मुलगा अत्यंत लहान वयात राजकीय क्षेत्रात प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून विकसित होतो. अण्णासाहेब (उदय टिकेकर) यांचा तो समर्थक असतो. अण्णासाहेबांचा विरोधक असलेल्या नानासाहेबांना (तुषार दळवी) त्याची दखल घ्यावी लागते आणि ते त्याची कारकीर्द संपवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करतात, अशी ह्या चित्रपटाची कथा आहे.
या चित्रपटाची निर्मिती हर्षल गरूड, वैभव वाघ, चिद्विलास क्षीरसागर आणि स्वप्नील सुरेश माने यांनी केली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक हेमंत देवधर यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाची कथा अॅड. अनिश पाडेकर यांची असून पटकथा आणि संवादलेखन प्रताप गंगावणे यांचे आहे. संजय जाधव यांनी छायाचित्रणाची जबाबदारी स्वीकारली आहे. चित्रपटातील गीते चिद्विलास क्षीरसागर यांची असून संगीत शैलेंद्र बर्वे यांनी दिले आहे. डॉ. अमोल कोल्हे, उदय टिकेकर, तुषार दळवी, ऐश्वर्या नारकर, विशाखा सुभेदार, विद्याधर जोशी, यशोधन बाळ आणि मनोज जोशी या कलाकारांच्याही महत्वपूर्ण भूमिका या चित्रपटात आहेत.
चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत देवधर सांगतात, “हा चित्रपट प्रत्येकाला आपलासा वाटेल. ही सर्वसामान्य माणसाची कहाणी आहे. आपल्या समाजात अनेक कार्यकर्ते आहेत. पण त्यांचा आवाज किंवा वेदना कोणापर्यंत पोहोचत नाहीत. त्याकडे दुर्लक्ष केले जाते. एखाद्याला घडवण्यात किंवा संपवण्यात प्रसिद्धीमाध्यमांचा खूप मोठा वाटा आहे. त्यावरदेखील या चित्रपटात प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. आजच्या समाजाकडून ज्यांच्या आवाजाकडे दुर्लक्ष झाले आहे त्यांना ‘अरे आवाज कोणाचा’ हा चित्रपट समर्पित करण्यात आला आहे.”
चित्रपटाबद्दल अधिक माहिती देताना निर्माते चिद्विलास क्षीरसागर म्हणाले, “कार्यकर्त्यांच्या आयुष्यातील प्रातिनिधिक समस्यांना या चित्रपटाद्वारे वाचा फोडण्यात आली आहे. समाजाच्या समस्या मांडताना या कार्यकर्त्यांसमोर निर्माण होणारे पेचप्रसंग, राजकीय दबाव आदींचा त्यात समावेश आहे. या विषयाला न्याय देणे ही खूप अवघड गोष्ट होती. परंतु चांगली टीम लाभल्यामुळे हे आव्हान पेलू शकल्याचा आम्हांला आनंद आहे. आजच्या तरुण पिढीचे वास्तव या चित्रपटाद्वारे सर्वांच्या समोर येईल अशी मी आशा करतो.”
या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून लवकरच हा ‘आवाज’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Thursday, September 13, 2012

ठाणे येथे रंगलेल्या मिफ्ता महोत्सवाची सांगता……

1 ठाणे येथे रंगलेल्या मिफ्ता महोत्सवाची सांगता......

मराठी मनोरंजन विश्वाचा सर्वांत दिमाखदार सोहळा म्हणून ओळखल्या जाणा-या मिफ्ता महोत्सवाचे आयोजन यावर्षी ठाण्याच्या काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात करण्यात आले होते. २ सप्टेंबर पासून चालू झालेल्या ह्या मनोरंजक महोत्सवाचा सांगता समारोह दिनांक ९ सप्टेंबर रोजी पार पडला. यावेळी मनसे अध्यक्ष मा. श्री. राज ठाकरे, निरंजन हिरानंदानी, राजेश आथयडे, सुधाकर चव्हाण, वंदना गुप्ते, सुहास जोशी यांसह अनेक मान्यवर कलाकारही उपस्थित होते.
मान्यवर परीक्षक आणि मायबाप रसिकांच्या पसंतीची दहा नाटके आणि दहा चित्रपटांचा समावेश या मिफ्ता महोत्सवात करण्यात आला होता. रसिक ठाणेकरांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल महेश मांजरेकर यांनी ठाणेकरांचे आभार मानले. त्याचबरोबर पुढील वर्षी हा महोत्सव एकाच वेळी पाच विविध जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्याचा त्यांचा मानस असल्याचंही त्यांनी सांगितलं. यंदा तिसरे वर्ष असलेला मिफ्ता पुरस्कार सोहळा ऑक्टोबरमध्ये सिंगापूर यथे रंगणार आहे.
अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत यांनी पुरस्कार सोहळ्याची नामांकने आणि घोषित पुरस्कार जाहीर केले.
सिनेमा नावाचा माणूस व्ही. शांताराम या राहुल रानडे दिग्दर्शित नृत्यसंगीताच्या कार्यक्रमाने या महोत्सवाची सांगता करण्यात आली.
स्वप्नील बांदोडकर, अजित परब, केतकी भावे, मधुरा कुंभार, श्रीरंग भावे यांच्या सुश्राव्य संगीताने रसिक प्रेक्षकांची मने जिंकली, तर उर्मिला कानेटकर- कोठारे, नेहा पेंडसे, मानसी नाईक, मृण्मयी देशपांडे, सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ जाधव यांच्या नृत्याविष्काराने महोत्सवाची शान वाढवली. या सोहळ्याचे सूत्रसंचालन सुबोध भावे, सचिन खेडेकर, प्रसाद ओक आणि जितेंद्र जोशी यांनी अतिशय उत्तमरित्या पार पाडले.
म्हैसकर फाऊंडेशनचे प्रायोजकत्व लाभलेल्या या सोहळ्याची संकल्पना महेश मांजरेकर यांची आहे.
नामांकने व घोषित पुरस्कार
चित्रपट घोषित पुरस्कार पुढीलप्रमाणे :-
१.कथा – मिलिंद बोकील – शाळा
२.पटकथा – अविनाश देशपांडे – शाळा
३.संवाद – विवेक बेळे – बदाम राणी गुलाम चोर .
४.गीतकार – स्वानंद किरकिरे – दत्ता दिगंबरया हो , मला भेट द्या हो …- देऊळ .
५.संगीतकार – अजय नाईक – सतरंगी रे .
६.पार्श्वगायक – रूपकुमार राठोड ,नाही एकटा… डँबिस
७.पार्श्वगायिका – उर्मिला धनगर – वेलकम हो राया वेलकम… – देऊळ
८. नृत्य दिग्दर्शक – सुभाष नकाशे – अजिंठा.
९. कला दिग्दर्शक -प्रशांत राणे अभिषेक विजयकर – काकस्पर्श
१०.संकलक – अभिजित देशपांडे – देऊळ.
११.वेशभूषा – लक्ष्मण येल्लप्पा गोल्लार – काकस्पर्श
१२.रंगभूषा – विक्रम गायकवाड – काकस्पर्श
१३.साऊंड डिझायनर – निमेश छेडा अविनाश सोनावणे – शाळा
१४.प्रसिद्धी – साकेत धोगडे -अजिंठा
१५.छायांकन – अजित रेड्डी -काकस्पर्श
१६.विनोदी भूमिका – जयवंत वाडकर – झकास.
मिफ्ता पुरस्कार सोहळा २०१२ ( नाटक विभाग घोषित पुरस्कार )
१.लेखक – विवेक बेळे -अलिबाबा आणि चाळीशीतले चोर.
२.नेपथ्य – निखील रत्नपारखी – टॉम आणि जेरी.
३.संगीत – संभाजी भगत – शिवाजी अंडरग्राउंड ईन भिमनगर महुल्ला
४.प्रकाश – प्रदीप वैद्य – अलिबाबा आणि चाळीशीतले चोर.
मिफ्ता पुरस्कार सोहळा २०१२ (नाटक विभाग नामांकन )
५.सहाय्यक अभिनेत्री – मंजुषा गोडसे – अलिबाबा आणि चाळीशीतले चोर.
सीमा देशमुख – अलिबाबा आणि चाळीशीतले चोर.
सायली महाडिक – सरगम.
६.सहाय्यक अभिनेता – संभाजी तांगडे – शिवाजी अंडरग्राउंड ईन भिमनगर महुल्ला
रमेश भाटकर – मी रेवती देशपांडे
विद्याधर जोशी – अलिबाबा आणि चाळीशीतले चोर.
७.सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – मधुरा वेलणकर – लग्नबंबाळ
कादंबरी कदम – टॉम आणि जेरी.
रिमा – सासू माझी ढासू .
८.सर्वोत्कृष्ट अभिनेता -निखील रत्नपारखी – टॉम आणि जेरी.
मोहन जोशी – मी रेवती देशपांडे
आनंद इंगळे – लग्नबंबाळ
९.सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – विजय केंकरे – लग्नबंबाळ
निखील रत्नपारखी – टॉम आणि जेरी.
नंदू माधव – शिवाजी अंडरग्राउंड ईन भिमनगर महुल्ला
१०.सर्वोत्कृष्ट नाटक – अलिबाबा आणि चाळीशीतले चोर – महाराष्ट्र कल्चरल सेंटर
टॉम आणि जेरी – अश्वमी थिएटर्स.
लग्नबंबाळ – शुभम थिएटर्स.
विशेष ज्यूरी पुरस्कार – शिवाजी अंडरग्राउंड ईन भिमनगर महुल्ला – पब्लिक ओपिनियन प्रोडक्शन आणि रंगमळा.
पुनरुजिवित नाटक – लेकुरे उदंड जाली – नाट्यसंपदा ,मुंबई.

Wednesday, September 12, 2012

'आनंदमूर्ती' ऑडीओ सीडीचे प्रकाशन आणि सामाजिक ट्रस्टची निर्मिती.

Anandmurti Audio Albumआपल्या आईच्या स्मरणार्थ एका भक्तीगीताच्या अल्बम सोबतच सामाजिक आणि शैक्षणिक कार्यासाठी धर्मादाय संस्थेची स्थापना करून एक नवा आदर्श निर्माण करणारा सोहळा नुकताच जुहू स्कीम पार्ले येथील प्रसिद्ध भाईदास सभागृहात समस्त बुरांडे कुटुंबीयांनी आयोजित कार्यक्रमात पहायला मिळाला. या प्रसंगी स्वरचंद्रिका पद्मश्री पद्मजा फेणाणी - जोगळेकर यांच्या अलौकिक रचनांनी सजलेल्या 'आनंदमूर्ती' या ऑडिओ सीडीचे प्रकाशन भजनसम्राट अनुप जलोटा यांच्या शुभहस्ते आणि खासदार एकनाथ गायकवाड, माजी नगरपाल जगन्नाथ हेगडेवार, कोळी समाजाचे नेते नामदेव भगत, भजन सम्राट महादेवबुवा शहाबाजकर, गायिका पद्मजा फेणाणी- जोगळेकर, विलास बुरांडे, तुलसी बुरांडे, आणि इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

सुप्रसिद्ध गायिका पद्मश्री पद्मजा फेणाणी - जोगळेकर यांच्यासोबत मंदार पारखी आणि मनोज देसाई यांनी 'आनंदमूर्ती' ह्या ऑडिओ सीडीतील भक्तिगीतांच्या रचनांसाठी योगदान दिले आहे.

‘अय्या……राणी मुखर्जी!!!’

11111111 e1347418669121 अय्या......राणी मुखर्जी!!!

‘गंध’ आणि ‘रेस्टॉरंट’ सारख्या यशस्वी फिल्म्सचे दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांचा ‘अय्या’ हा हिंदी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्रीयन सचिन कुंडलकर यांनी महाराष्ट्रीयन गावाकडचा तडका बॉलीवूडमध्ये आणण्यासाठी या चित्रपटाची कथा आणि पात्रंही मराठीच निवडली आहेत. चित्रपटाचे विशेष म्हणजे बॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जी या चित्रपटातील मुख्य नायिका आहे. मिनाक्षी देशपांडे या तरुण मराठी मुलीची भूमिका राणी या चित्रपटात साकारत आहे. मध्यमवर्ग कुटुंबात राहणा-या मिनाक्षीच्या आईच्या भूमिकेत मराठी कॉमेडी क्वीन निर्मिती सावंत असून वडिलांच्या भूमिकेत सतीश आळेकर असणार आहेत. याचबरोबर सुबोध भावे, अमित वाघ असे आणखीही काही मराठी चेहरे या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत.
मराठी मुलीच्या भूमिकेत उतरण्यासाठी राणीने फक्त ड्रेसिंग स्टाईलवरच नाही तर मराठी भाषेवरसुद्धा खूप मेहनत घेतली आहे. ‘आता मराठी माहोल लावणीशिवाय परिपूर्ण कसा होणार?’ हा प्रश्न सगळ्यांच्या मनात यायच्या आधीच राणी आपल्याला तिच्या मराठमोळ्या अदांनी घायाळ करणारी लावणी या चित्रपटात सादर करणार आहे. वैभवी मर्चंट यांनी नृत्य दिग्दर्शन केलेल्या ‘अगं बाई …..’ या झक्कास लावणीवर राणी थिरकणार आहे.
अनुराग कश्यप निर्मित ही मराठी बॉलीवूड फिल्म १२ ऑक्टोबरला प्रदर्शित करण्यात येईल.

Tuesday, September 11, 2012

संदिप कुलकर्णीचा 'नाईट स्कूल' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला.

Sandeep Kulkarni, Night School
'डोंबिवली फास्ट' सारख्या सिनेमाद्वारे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचल्यावर हिंदीतही यशस्वी कारकिर्द घडवणारा मराठमोळा अभिनेता संदिप कुलकर्णी 'नाईट स्कूल' मध्ये मुख्य भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक मानसिंग पवार यांच्या दिग्दर्शनाखाली या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्यावर या सिनेमाच्या पोस्ट प्रॉडक्शनचे कामही आता पूर्ण झाले आहे. दिग्दर्शनासोबत 'नाईट स्कूल'ची कथा आणि संवादही माअनसिंग पवार यांनीच लिहीले आहेत. 

गोर गरिबांच्याही जीवनात ज्ञानाचा दिवा प्रकाशमान व्हावा या उदात्त हेतूने एका समाजसेवकाने सुरु केलेल्या शिवाजी नाईट स्कुलची कथा या सिनेमात पहायला मिळेल. संदिप कुलकर्णींसोबत प्रसाद पंडित, श्रीकांत यादव, अन्वय बेंद्रे, दीपा चाफेकर, राजू गोविलकर, शिवराज वाळवेकर, आशित आंबेकर, राजू मावाणी आणि रात्र शाळेतील ४० विद्यार्थ्यांच्या अभिनयाने हा सिनेमा सजला आहे. छायालेखन प्रकाश शिंदे यांचे असून संकलन परेश मांजरेकर यांचे आहे.

झी मराठी अवार्ड २०१२



मतदान करण्यासाठी इथे क्लिक करा.
मतदानाची शेवटची तारीख – १३ ऑक्टोबर २०१२

कार्यक्रम –  २८ ऑक्टोबर २०१२ -  संध्या ७ वाजता. झी मराठी वर

Monday, September 10, 2012

‘भोजपुरी सुपरस्टार रविकिशन मराठीत झळकणार’

2 भोजपुरी सुपरस्टार रविकिशन मराठीत झळकणार

असंख्य मालिका आणि चित्रपटांमध्ये ताकदीचा अभिनय करून लोकप्रियता मिळवलेला भोजपुरी सुपरस्टार प्रथमच मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकत आहे. ‘वसन आर्ट्स प्रा. लि.’ या बॅनरखाली तयार होणा-या ‘मध्यमवर्ग…..Middle Class’ या चित्रपटात ‘भोजपुरी सुपरस्टार रविकिशन’ हा पत्रकाराच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. श्रीमती लक्ष्मी बाबाजी आंजर्लेकर आणि संजय गोपाळ छाब्रिया यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
वसन आर्ट्स प्रा. लि. प्रस्तुत आणि हॅरी फर्नांडीस दिग्दर्शित ‘मध्यमवर्ग….Middle Class’ या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच मुंबईत पार पडला. यावेळी चित्रपटातील कलाकारांच्याबरोबर तंत्रज्ञांची ही उपस्थिती होती. मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव हा या चित्रपटात इन्स्पेक्टरच्या भूमिकेत झळकणार आहे. नयना आपटे, निशा परुळेकर, कश्मीर कुलकर्णी, आणि अनंत जोग या कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका या चित्रपटात आहेत.
मराठी चित्रपटात पदार्पणाबद्दल रविकिशन म्हणतो,” माझा जन्म मुंबईचाच आहे आणि मी मुंबईकर आहे. त्यामुळे मराठी चित्रपटात काम करण्याची फार पूर्वीपासून इच्छा होती. मी चांगल्या कथेच्या शोधात असतानाच फर्नांडीस यांनी मला मध्यमवर्गची कथा ऐकवली आणि ती मला खूप आवडली. फर्नांडीस बरोबर याआधी अनेक भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केल्यामुळे माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास होताच, त्यामुळे मी लगेच होकार दिला. मराठी भाषा मला समजते आणि ब-यापैकी बोलताही येते. परंतू आता या चित्रपटासाठी मी ती अधिक चांगल्या प्रकारे शिकेन. या चित्रपटाचे डबिंगही मीच करणार आहे.”
सिद्धार्थ जाधव पुन्हा एकदा एका नवीन भूमिकेत प्रेक्षकांसमोर येतोय. इन्स्पेक्टरच्या भूमिकेत असणारा सिद्धार्थ सांगतो,”रविकिशन यांच्यासोबत मी एका तेलगु चित्रपटात काम केलं आहे. तेव्हापासून आमची छान मैत्री जमली. त्या ट्युनिंगचा छान वापर या चित्रपटासाठीही होईल.”
या चित्रपटाची कथा फर्नांडीस यांची असून छायांकन शफिक शेख, संकलन अरविंद त्यागी, वेशभूषा बादशाह खान, संगीत गुणवंत सेन, गीते बाबासाहेब सौदागर आणि सावंता गवळी यांची आहेत. चित्रपटातील साहसदृश्ये आर.पी. यादव यांची आहेत. वसंत बाबाजी आंजर्लेकर, श्रीमती शफी, संजय आढाव आणि एस. प्रमोद हे या चित्रपटाचे निर्मिती सूत्रधार आहेत.
 

Sunday, September 9, 2012

‘Student Of The Year’ शिक्षक दिनाच्या निमित्ताने Big 92.7 FM वर

RJ Yamini Karan Johar Sidharth Malhotra Alia Bhatt Varun Dhawan celebrates Teachers Day at 92.7 BIG FM Andheri West Mumbai Student Of The Year शिक्षक दिनाच्या निमित्ताने  Big 92.7 FM वर

दिग्दर्शक करण जोहर आणि अभिनेते वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्ट या कलाकारांनी BIG 92.7 FM या भारताच्या नंबर १ रेडीओवर शिक्षकदिन साजरा केला. करण जोहर यांचा पुढील महत्वाकांक्षी सिनेमा ‘Student Of The Year’ च्या कलाकारांनी BIG 92.7 FM वर आपल्या शाळेतल्या आठवणींची मनमुराद सफर केली आणि त्याचबरोबर सिनेमाच्या शूटिंगमध्ये आलेल्या गंमतीदार अनुभवांचा प्रवासही सर्वांसमोर मांडला.
करण जोहर दिग्दर्शित अनेक चित्रपटांची चर्चा आणि त्याचे मूल्यमापन सर्वच प्रेक्षकांकडून होत असते. त्यामुळे त्यांच्या येत्या महत्वाकांक्षी सिनेमाबद्दलसुद्धा इंडस्ट्रीमध्ये चर्चेला हुरूप आला आहे. ‘आता आणखी नवीन काय?’ या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी सगळेच जण उत्सुक आहेत. सर्वांत विशेष म्हणजे करण जोहरच्या जवळपास सर्वच सिनेमांमध्ये ‘किंग खान’ चे सहकार्य असते. ‘Student Of The Year’ मध्ये सुद्धा किंग खानने सिनेमाच्या दिग्दर्शन भागात खूप मोठी भूमिका निभावली आहे. ‘एक तरल प्रेमकहाणी’ अशी या सिनेमाची कथा आहे. तीन नवोदित तरुण वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्ट हे फिल्म इंडस्ट्री मध्ये प्रवेश करतात, त्यांचा सिनेसृष्टीतील प्रवास यात रेखाटण्यात आला आहे.
BIG 92.7 FM च्या स्टुडीओमध्ये आर जे यामिनीने सिनेमाचे दिग्दर्शक आणि प्रमुख कलाकारांबरोबर मनमोकळ्या गप्पा मारल्या. या चर्चेत सिनेमाबद्दल बोलताना, प्रेक्षक या सिनेमाकडून काय अपेक्षा ठेऊ शकतो हे दिग्दर्शक आणि कलाकारांनी सांगितले. शूटींगच्या वेळी झालेले अनेक गंमतीदार किस्से सांगत ही मुलाखत रंगून गेली. शिक्षक दिनाच्या निमित्ताने कलाकारांनी त्यांच्या शाळा आणि कॉलेजमधील आठवणींना उजाळा दिला. त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यात दिग्दर्शकाचे स्थान मिळवलेल्या आणि त्यांच्या यशस्वी जीवनाचे शिल्पकार असलेल्या शिक्षकांच्याप्रती सर्व कलाकारांनी ऋण व्यक्त केले.
१९ ऑक्टोबरला मुहूर्त असलेल्या या सिनेमातली सर्व गाणी BIG 92.7 FM वर ऐकवली जाणार आहेत.
…माधुरी ढमाले

Saturday, September 8, 2012

'नजराणा लावणीचा' लवकरच रंगमंचावर.

Vaishali Jadhav, Lavani Samradni
'ई टीव्ही' मराठीवरील 'ढोलकीच्या तालावर' या यशस्वी रिऍलिटी शो ची टीम, दिग्दर्शक संतोष कोल्हे, महाराष्ट्राची पहिली 'लावणी सम्राज्ञी' वैशाली जाधव, महावस्ताद, 'पानिपत'कार विश्वास पाटील 'नजराणा लावणीचा' हा लावणीवर आधारीत आगळावेगळा बहारदार कार्यक्रम रंगमंचावर घेऊन येत आहेत. मराठी रुपेरी पडद्यावरील बाई सुंदराबाई ते राम कदम यांच्या लावणीचा प्रवास, पारंपारिक लावणीचा पेशवाईपासून आता पर्यंतचा प्रवास, २० वर्षात मॉडर्न लावणीमध्ये झालेले प्रयोग अशा ३ टप्प्यात 'नजराणा लावणीचा' हा कार्यक्रम रंगभूमीवर सादर होणार आहे. 

'लॉजिकल थिंकर्स' आणि स्पेस डिझाईन' संस्थाच्या संयुक्त विद्यमाने 'नजराणा लावणीचा' कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. ढोलकीच्या तालावर रिऍलिटी शोची पहिली विजेती 'लावणी सम्राज्ञी' वैशाली जाधव हे कार्यक्रमाची खास आकर्षण असून सोबत नृत्यांगणा गौरी जाधव, अमृता जोशी सह ३० कलाकारांचा भव्य संच या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. 'नजराणा लावणीचा' हा कार्यक्रम लवकरच रंगमंचावर दाखल होणार 

Friday, September 7, 2012

मिफ्ता नाट्य चित्रपट महोत्सवात मिफ्ता जल्लोष ची एक आगळी वेगळी भेट

DSC 00281 मिफ्ता नाट्य चित्रपट महोत्सवात मिफ्ता जल्लोष ची एक आगळी वेगळी भेट

तमाम मराठी मनोरंजन विश्वाच्या अस्मितेचा केद्र बिंदू असलेल्या मिफ्ता महोत्सवाचे चे पडघम ठाण्यात सर्वत्र घुमू लागले आहेत. या मिफ्ता महोत्सवाचे आयोजन ठाण्यातील डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात दिनांक २ ते ९ सप्टेंबर या कालावधीत करण्यात आले आहे .या कार्यक्रमाचे उद्घाटन मा.श्री .उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.मिफ्ता नाट्य चित्रपट महोत्सवात मान्यवर परीक्षकांनी तसेच रसिक प्रेक्षकांनी निवड केलेल्या दहा नाटके तसेच दहा चित्रपटाचा आस्वाद रसिक प्रेक्षकांना घेता येणार आहे.
याच बरोबर मिफ्ता जल्लोष नावाच्या एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ४ ते ८ सप्टेंबर या कालावधीत दुपारी ४ ते ५ या वेळेत करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मनोरंजनाची एक आगळी वेगळी भेट रसिकांना मिळणार आहे, सदर कार्यक्रम सर्व रसिकांसाठी विनामूल्य ठेवण्यात आला आहे .
४ सप्टेंबरला सुरु झालेल्या या मिफ्ता जल्लोष कार्यक्रमात सोनाली कुलकर्णी, उर्मिला कानेटकर – कोठारे, मानसी नाईक, क्रांती रेडकर आणि गौरी इंगवले यांनी लावण्या सादर करून रसिक श्रोत्यांची वाहवा मिळवली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप पटवर्धन यांनी केले.
तर ५ सप्टेंबरला झालेल्या फु बाई फुल २ या कार्यक्रमात वैभव मांगले, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, प्रदीप पटवर्धन, भाऊ कदम, प्रभाकर मोरे, सुनील जाधव, तृप्ती खामकर, आशिष राणे, नुपूर दुधवाडकर, संदीप रेडकर या कलाकारांनी उपस्थित रसिक प्रेक्षकांना हसवून त्यांची मने जिंकली. फु बाई फ़ुल २ या कार्यक्रमाचे लेखन राजेश देशपांडे यांनी केले होते.
रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून सदर कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा अशी विनंती आयोजकांतर्फे करण्यात आली आहे.
दिनांक ९ सप्टेंबर रोजी या संपूर्ण महोत्सवाची सांगता “सिनेमा नावाचा माणूस” व्ही .शांताराम या एका वेगळ्या कार्यक्रमाने होणार आहे, ज्यामध्ये अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, अजित परब, श्रीरंग भावे, केतकी भावे, मधुरा कुंभार यांचे सुश्राव्य संगीत आपल्याला ऐकता येणार असून सोनाली कुलकर्णी, उर्मिला कानेटकर – कोठारे, मानसी नाईक, नेहा पेंडसे, मृण्मयी देशपांडे यांच्या नृत्याची अदाकारी आपल्याला पाहता येणार आहे, या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सुबोध भावे, सचिन खेडेकर, प्रसाद ओक हे सांभाळणार आहेत तर दिग्दर्शन राहुल रानडे यांचे आहे. सदर कार्यक्रमाची तिकीट विक्री उद्या ( ७ सप्टेंबर ) पासून नाट्यगृहावर होणार असून तिकीट दर रु.१००, ७५, ५० आहेत .
म्हैसकर फाऊडेशन चे मुख्य प्रायोजकत्व लाभलेल्या या कार्यक्रमाची संकल्पना श्री.महेश मांजरेकर यांची आहे.

Thursday, September 6, 2012

‘हिरॉईन’चा महागडा जलवा

kareena 350 082712114940 हिरॉईनचा महागडा जलवा

मधुर भांडारकर या नावाबरोबर लगेचच अनेक फिल्म्सची यादी आपल्या डोळ्यांसमोर येते. ‘सामाजिक विषय अतिशय उत्कृष्ट कलाकृतीच्या माध्यमातून मांडणारे’ अशी त्यांची ओळख सर्वांच्याच परिचयाची आहे. येत्या काही दिवसांतच मधुर भांडारकर यांचा आणखी एक वास्तववादी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेप्रेमींमध्ये ‘हिरॉईन’ची चर्चा जोरात चालू असतानाच सर्वांना चकित करणारी आणखी एक न्यूज मधुर भांडारकर यांनी नुकतीच दिली. ‘चांदणी बार’ या मधुर भांडारकरांच्या दीड कोटी बजेट असलेल्या फिल्मने खूप चांगले यश मिळवले होते. अनेक पुरस्कारांवर या चित्रपटाने नाव कोरलं होतं. पण येत्या ‘हिरॉईन’ या चित्रपटातील हिरॉईनच्या फक्त ‘Costume’ आणि दागिन्यांवरच तब्बल दीड कोटींहून जास्त रकमेची बरसात करण्यात आली आहे.
भांडारकर एंटरटेनमेंट आणि यू टीव्ही मोशन्स पिक्चर्स यांनी ‘हिरोईन’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. स्त्रियांच्या ‘फॅशन ब्रॅण्ड’ मध्ये अग्रेसर असलेले ‘जेलस 21′ या चित्रपटाचे ‘स्टाईल पार्टनर’ आहेत. त्यांच्या नवीन वस्त्रांचे लॉंचिंग अंधेरी येथील समारंभात करिनाच्या हस्ते झाले. “मला सामाजिक विषय हाताळायला खूप आवडते. आपल्या समाजातील कित्येक समस्यांवर चित्रपट बनू शकतो. मी तेच करत आलो आहे; मी बनवलेले वास्तववादी चित्रपट प्रेक्षकांना भावले आहेत. मी यू टीव्हीबरोबर यापूर्वी ‘फॅशन’ हा चित्रपट केला होता. ‘हिरॉईन’च्या चित्रीकरणाला जानेवारीत सुरुवात झाली आणि 21 सप्टेंबरला तो प्रदर्शित होईल,” असे मधुर भांडारकर यांनी त्यावेळी सांगितले.
“21 सप्टेंबर ही माझ्या आवडीची तारीख आहे. त्या दिवशी माझा वाढदिवस आहे आणि माझा महत्त्वाकांक्षी ‘हिरॉईन’ चित्रपटही प्रदर्शित होत आहे,” अशा भावना चित्रपटाच्या हिरॉईनने म्हणजेच करीना कपूरने यावेळी व्यक्त केल्या. मधुर भांडारकर आणि करीना कपूर यांनी केलेल्या रॅम्प वॉकने सर्व उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या.

Tuesday, September 4, 2012

सिंगल स्क्रिन थिएटर्स मालकांचा बेमुदत संप

महाराष्ट्रातील सिंगल स्क्रिन थिएटरच्या मालकांनी १२ ऑक्टोबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सामान्य प्रेक्षकांचा ऑक्टोबर मात्र मनोरंजनाशिवाय जाणार असल्याची चिन्हं दिसत आहेत. राज्य सरकार लादत असलेल्या अतिरिक्त करामुळे त्रस्त होऊन चित्रपट प्रदर्शकांनी हे पाऊल उचलले आहे.
चित्रपटगृहांची जमीन आणखी काही गोष्टींसाठी वापरण्यात यावी, यासाठी चित्रपटगृहांच्या मालकांनी राज्य सरकारकडे अटीरहित ‘User Change’ ची परवानगी मागितली होती. पुणे शहरामध्ये एकूण २६ सिंगल स्क्रिन सिनेमागृह असून त्यांपैकी १७ सिनेमागृह सध्या कार्यरत आहेत. ऐन सणावळीच्या मुहूर्तावर अनेक बिग बजेट फिल्म प्रदर्शित होत असताना पुकारलेला हा बंद प्रेक्षकांना मात्र नाउमेद करणारा ठरणार आहे. संपूर्ण राज्यातील एकूण ५४६ सिंगल स्क्रिन थिएटर्स या संपामध्ये सामील होणार असल्याची माहिती ‘Cinema Owners And Exhibitions Association Of India’ च्या कार्यालयीन सूत्रांनी दिली आहे.
“कित्येक राज्यांमधील सरकारने ह्या अतिरिक्त कराचा नियम काढून टाकला आहे तर काही राज्यांमध्ये त्याचा दर कमी करण्यात आला आहे. सिंगल स्क्रिन ऑपरेटर अशीच मागणी महाराष्ट्र राज्य सरकारकडे करत असूनही सरकार मात्र या विनंतीकडे संपूर्ण दुर्लक्ष करत आहे. तिकीट मिळकतीवर ५७ %, मनोरंजन कर ४७% याबरोबर आणखी काही करांची भर एकूण करामध्ये आहे. या उलट सिंगल स्क्रिनचा व्यवसाय मात्र वर्षावर्षाने घटत चालला असून त्यांच्या व्यवसायात सरासरी १५ ते २०% ची घट झाली आहे.” अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष आर.वि.विधानी यांनी दिली.
सिंगल स्क्रिन मालकांना त्यांचा व्यवसाय विकता येणार नसल्याच्या राज्य सरकारच्या निर्बंधावरदेखील असोसिएशनने आक्षेप घेतला आहे. “थिएटर मालकांच्या पुढच्या पिढीला हा व्यवसाय सुरु ठेवण्याची उत्सुकता नाही. परंतु, राज्य सरकारच्या या निर्बंधामुळे इतर उत्सुक असणा-यांना आम्हाला हा व्यवसाय विकता येत नाही. या अडचणीमुळे शेवटी ही संपत्ती रिअल इस्टेट मालकांना विकणे किंवा इतर कामासाठी भाड्याने देणे हे दोनच पर्याय आमच्यासमोर उरले आहेत,” असेही आर. वि. विधानी यांनी स्पष्ट केले.
शहरातील एकूण २६ सिनेमागृहांपैकी ८ सिनेमा गृहांमध्ये न होणा-या नफ्यामुळे चित्रपटाचे प्रदर्शन बंद करण्यात आलेले आहे. जर हे थिएटर बंद करण्यात आले तर निदान मालकांचा दिवसागणिक होणारा खर्च टाळता येऊ शकतो. अल्पना, सोनमर्ग, विद्यानंद, भारत, निशात, नटराज, डिलक्स (पिंपरी), Excelsior (खडकी) अशी बंद झालेल्या सिनेमागृहांची नावे आहेत.
“राज्य सरकारने आम्हाला सवलतीच्या दरात आर्थिक सहकार्य करावं आणि कमी दर असलेला निधी पुरवावा, जेणेकरून आम्ही नवीन सुविधांचा विचार करू शकू आणि प्रेक्षकांना आकर्षित करून घेऊ शकू”, अशी मागणी विधानी यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
या मागण्यांची पूर्तता झाल्यास संप मागे घेण्याचा विचार केला जाईल असे विधानी यांनी सांगितले.

Monday, September 3, 2012

स्वातंत्र्योत्तर भरतभूमिचा विश्लेषक इतिहास

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेला ‘भारत’. या भारताचा लोकशाहीपर्यंतचा झालेला प्रवास अर्थातच अनेक खडतर प्रसंगांनी व्यापलेला आहे, याची जाणीव प्रत्येक भारतीयाला आहेच. भारताला मिळालेले स्वातंत्र्य, त्यानंतर झालेली त्याची फाळणी, आणि गांधींची हत्या या घटनांपर्यंतचा इतिहास सर्वश्रुत आहे. पण यानंतर म्हणजे लोकशाही अस्तित्वात आल्यानंतरचा समग्र इतिहास अजून कोणीच आपल्यासमोर मांडलेला नाही. ‘रामचंद्र गुहा’ यांच्यासारख्या समाजसंस्कृतीची व्यापक जाण असलेल्या राजकीय विश्लेषकाने तो लिहिला आहे. ‘इंडिया आफ्टर गांधी’ या नावाने इंग्रजीत प्रकाशित झालेला हा इतिहास, शारदा साठे यांनी ‘गांधींनंतरचा भारत’ या नावाने उत्तमरित्या मराठीत अनुवादित करून लिहिला आहे.
”गांधींनंतरचा भारत’ या ग्रंथाची एकूण पाच भागात विभागणी करण्यात आलेली आहे. यातील पहिल्या भागात स्वातंत्र्य, फाळणी, गांधीहत्या, संस्थानांचे विलीनीकरण, निर्वासितांचे प्रश्न या घटनांची हकीकत सांगितली आहे. त्यानंतर स्वतंत्र भारतातील पहिली निवडणूक, नेहरूंचे विकासाचे स्वप्न, परराष्ट्रधोरण, आदिवासी जमातींचे संघर्ष या सर्वांचा समावेश असलेले नेहरूयुग उलगडले आहे. तिस-या भागात नेहरूंच्या राजकीय कारकिर्दीला लागलेली उतारकळा अनुभवास येते. यामध्ये भाषावार प्रांतरचना, दक्षिणेकडील राज्यांचे आव्हान, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, चीनचे आक्रमण आणि काश्मीर प्रश्न यांचा ज्वलंत इतिहास कथन केला आहे. ग्रंथाचा चौथा भाग ‘लोकप्रियतावादाचा उदय’ अशा शीर्षकाने सुरु होतो. या भागात लालबहादूर शास्त्रींची दोन वर्षांची कारकीर्द, इंदिरा गांधींचा उदय आणि जनता राजवट या घटनांचा समावेश आहे. राजीव गांधी आणि १९९० पर्यंतच्या अस्थिर राजकीय परिस्थितीचा निर्देश करून चौथ्या भागाला पूर्णविराम मिळतो. ग्रंथाच्या अखेरच्या भागात ‘समृद्धी आणि मनोरंजन’ या शीर्षकाखाली मागील वीसेक वर्षात झालेल्या घडामोडींचा आढावा घेत या ग्रंथाची समाप्ती होते.
रामचंद्र गुहा यांनी केलेले या ग्रंथाचे लेखन अत्यंत जबाबदारीने आणि सर्व घटनांच्या गांभीर्याचे भान ठेऊन केले आहे. भारतासारख्या सांस्कृतिक विविधता, आर्थिक विषमता असलेल्या देशाचा खोल इतिहास मांडताना देशात केला जाणारा लिंगभेद, स्त्रियांचे शोषण यावरही लक्ष केंद्रित करून त्यावेळच्या परिस्थितीची जाणीव त्यांनी करून दिली आहे. गुहा यांनी ग्रंथामध्ये प्रत्येक दशकासाठी स्वतंत्र नकाशे दाखवले आहेत. या नकाशांची जमेची बाजू म्हणजे त्यावेळचा संघर्षाचा भाग गुहा यांनी लाल रंगामध्ये तर संघर्षरहित भाग पांढ-या रंगाने दाखवला आहे. आणि सर्वात महत्वाचे असे की खूप व्यापक संघर्षाच्या काळातही लाल रंगापेक्षा पांढ-या रंगाने व्यापलेली जागा जास्त आहे.
भारतातली गरिबी, दलित समाजाचे प्रश्न, दंगली, स्त्रियांचे शोषण, आर्थिक विषमता, राजकारणाचे झालेले व्यावसायिकरण या सर्वांची विस्तृत चर्चा या ग्रंथात केलेली आहे. या ग्रंथामध्ये गुहा यांनी दोन महत्वाच्या विधानांवर भाष्य केले आहे. ‘भारत निराशेच्या गर्तेत लोटला जाईल ‘ हे विधान जितके अतिशयोक्त तितकेच ‘भारत नजीकच्या काळात महासत्ता बनेल’ हे विधानही अपरिपक्व असल्याचे मत गुहा यांनी व्यक्त केले आहे.
‘हिंदुस्थान हा एक देश कधीही नव्हता आणि होणारही नाही’ असे विधान ब्रिटीश राज्यकार्यकर्त्यांपासून ते राजकीय विश्लेषकांपर्यंत अनेकांनी केले. पण या सर्वाला छेद देत आज साठ वर्षांनंतरही भारत एकसंध लोकशाही राष्ट्र म्हणून उभा आहे ही वस्तुस्थिती आहे. या अभेद्य राष्ट्राचा इतिहास वाचणे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्यच म्हणावे लागेल.

Saturday, September 1, 2012

‘सेन्सॉर बोर्डाचा दणका’

सेन्सॉर बोर्डाकडून ‘ए’ प्रमाणपत्र मिळाल्यानंतर तो सिनेमा टीव्हीवर दाखवला जावा की नाही याबाबतचा महत्वपूर्ण निर्णय सेन्सॉर बोर्डाने दिला आहे. या निर्णयाप्रमाणे ‘द डर्टी पिक्चर’ आणि ‘जन्नत-२’ हे चित्रपट टीव्हीवर दाखवण्यास सेन्सॉर बोर्डाने साफ इन्कार केला आहे. त्यामुळे या दोन्ही चित्रपटांच्या प्रक्षेपणावरून चाललेले वाद आणि चर्चा यांना पूर्णविराम मिळाला आहे. सेन्सॉर बोर्डाकडून ‘ए’ प्रमाणपत्र मिळालेला सिनेमा कधीही टीव्हीवर प्रदर्शित केला जाणार नाही अशा सूचना सेन्सॉर बोर्डाकडून देण्यात आल्या आहेत. यासाठी ‘Cinematograph Act’ चा आधार घेण्यात आला आहे.
या आधी ‘ए’ प्रमाणपत्र मिळालेला सिनेमा टीव्हीवर दाखवण्याआधी तो पुन्हा एकदा सेन्सॉर बोर्डाकडून तपासला जात होता. त्यानंतर चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्य अथवा शब्द गाळले जाऊन नंतरच तो सिनेमा प्रदर्शित करण्यासाठीचे प्रमाणपत्र सिनेमांना मिळत होते. आणि हे प्रमाणपत्र मिळवणे बंधनकारकही होते. पण आता मात्र सेन्सॉर बोर्डाने दुसरा चान्सच ठेवला नसल्याचं समजत आहे.
असे असतानाही मोठमोठ्या फिल्म्स हे प्रमाणपत्र मिळवण्याच्या रांगेत आहेत. त्यामध्ये आमीर खान प्रॉडक्शनचा ‘देहेली बेल्ली’, अनुराग कश्यपचा ‘ गँग्ज ऑफ वस्सेपूर’ आणि विक्रम भट यांचा ‘हेट स्टोरी’ या चित्रपटांचा समावेश आहे. यापैकी अनेक फिल्म्सचे Satelite प्रसारणाचे हक्क १० कोटी रुपयांना विकण्यात आलेले आहेत. पण सेन्सॉर बोर्डाच्या या निर्णयामुळे या फिल्म्सच्या प्रॉडक्शन हाऊसेसना चांगलाच फटका बसला आहे .
‘ए’ प्रमाणपत्र मिळालेल्या कोणत्याही सिनेमाला टीव्हीवर प्रदर्शित करण्यासाठीचे प्रमाणपत्र देणे सेन्सॉर बोर्डाने बंद केले आहे,असे सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षा पंकजा ठाकूर यांनी सांगितले. “हा काही ‘Cinematograph Act’ चा भाग नसून तसा कायदा तयार करण्याचे आमचे प्रयत्न सुरु आहेत, असे असले तरीही या निर्णयाला कायद्यात रुपांतरीत करण्याचा निर्णय संसदच घेऊ शकते.”, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

म्हैसकर मिफ्ता नाट्य-चित्रपट महोत्सव २ ते ९ सप्टेंबर २०१२ वेळापत्रक


म्हैसकर मिफ्ता नाट्य - चित्रपट महोत्सव २ ते ९ सप्टेंबर २०१२
नामांकन प्राप्त १० नाटकं
दिनांक
वार
वेळ
नाटक
२ सप्टेंबर, २०१२
रविवार
दु. २
शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला
२ सप्टेंबर, २०१२
रविवार
सायं. ७
केशवा माधवा
३ सप्टेंबर, २०१२
सोमवार
सायं. ६.३०
सासू माझी ढाँसू
४ सप्टेंबर, २०१२
मंगळवार
सायं. ६.३०
लग्नबंबाळ
५ सप्टेंबर, २०१२
बुधवार
सायं. ६.३०
वैशाली कॉटेज
६ सप्टेंबर, २०१२
गुरुवार
सायं. ६.३०
मी रेवती देशपांडे
७ सप्टेंबर, २०१२
शुक्रवार
सायं. ६.३०
सरगम
८ सप्टेंबर, २०१२
शनिवार
दु .३
खळखट्याक
८ सप्टेंबर, २०१२
शनिवार
सायं. ७
अलीबाबा आणि चाळीशीतले चोर
९ सप्टेंबर, २०१२
रविवार
दु. ३
टॉम आणि जेरी
स्थळ - डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे
पूर्णोत्सव नाट्य प्रवेशिका
६००, ५००, बाल्कनी ४००
ति. वि. दि. २८ पासून थिएटरवर. (काही जागा राखीव)


नामांकन प्राप्त १० चित्रपट
दिनांक
वार
वेळ
चित्रपट
२ सप्टेंबर, २०१२
रविवार
दु. ३
देऊळ
२ सप्टेंबर, २०१२
रविवार
सायं. ६.३०
झकास
३ सप्टेंबर, २०१२
सोमवार
सायं. ६.३०
मसाला
४ सप्टेंबर, २०१२
मंगळवार
सायं. ६.३०
बदाम राणी गुलाम चोर
५ सप्टेंबर, २०१२
बुधवार
सायं. ६.३०
सतरंगी रे
६ सप्टेंबर, २०१२
गुरुवार
सायं. ६.३०
शाळा
७ सप्टेंबर, २०१२
शुक्रवार
सायं. ६.३०
अजिंठा
८ सप्टेंबर, २०१२
शनिवार
दु. ३
काकस्पर्श
८ सप्टेंबर, २०१२
शनिवार
सायं. ६.३०
डॅंबिस
९ सप्टेंबर, २०१२
रविवार
दु. ३
तुकाराम
स्थळ - डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे
पूर्णोत्सव चित्रपट प्रवेशिका
५००
ति. वि. दि. २८ पासून थिएटरवर. (काही जागा राखीव)