Monday, February 28, 2011

अजय-अतुल शोधणार तरुणाईचा आवाज.

ई टिव्ही मराठी'वरील लोकप्रिय कार्यक्र्म 'गौरव महाराष्ट्राचा' मधून यापुर्वी बालसुरांचा शोध घेण्यात आला होता. आणि आता तरुण सुरांचा शोध घेण्यासाठी 'गौरव महाराष्ट्राचा - शोध नव्या सुरांचा' अंतर्गत मराठीतील आजची सर्वात लोकप्रिय आणि आघाडीची संगीतकार जोडी अजय-अतुल या शोध मोहिमेत सामील झाले आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रथमच अजय अतुल परीक्षकांच्या भूमिकेत दिसणार आहेत. लवकरच महाराष्ट्रातील विविध ठिकाणी ह्या निवड चाचण्या पार पडणार असून त्याची सुरुवात येत्या १३ मार्च पासून नागपूर मधून होणार आहे.  

गजेंद्र सिंह यांच्या साईबाबा टेलिफिल्म्स ची निर्मिती असलेल्या 'गौरव महाराष्ट्राचा' या कार्यक्रमाचे दोन्ही पर्व तुफान लोकप्रिय ठरले. या नव्या पर्वामध्ये १६ ते २५ वर्षे वयोगटातील गायक गायिकांची निवड करण्यात येणार आहे.

Friday, February 25, 2011

'हमिदाबाईची कोठी' नव्या संचात सादर होणार.

'सुर्याची पिल्ले' आणि 'लहानपण देगा देवा' या यशस्वी कलाकृतींनंतर ' हर्बेरिअम' आपलं तिसरं नाटक रंगमंचावर घेऊन येत आहे. अनिल बर्वे लिखित 'हमिदाबाईची कोठी' हे नाटक नव्या संचात तब्बल ३० वर्षांनंतर रंगमंचावर येत आहे. 

१९७८ साली हे नाटक 'माऊली प्रॉडक्शन्स' मुंबई या संस्थेने सादर प्रथम सादर केलं होत. विजयाबाईंनी दिग्दर्शित केलेल्या आणि त्यांनी स्वतः 'हमिदाबाई' ची भूमिका साकारलेल्या या नाटकात अशोक सराफ, नाना पाटेकर, भारती आचरेकर, प्रदिप वेलणकर, नीना कुलकर्णी, दिलीप कोल्हटकर, जनार्दन परब या कलाकारांनी आपल्या कसदार अभिनयाने आपापल्या भूमिकेत रंग भरले होते. 

'सुबक' निर्मित या नव्या संचात त्यावेळच्या नाटकात 'शब्बो'ची भूमिका साकारणार्‍या नीना कुलकर्णी आता 'हमिदाबाई' साकारत आहेत. त्यांच्यासह संजय नार्वेकर, जितेंद्र जोशी, स्मिता तांबे, मनवा नाईक, मंगेश सातपुते, विकास पाटील हे कलाकार आव्हानात्मक भूमिकांमध्ये दिसणार आहेत. अनुभवी दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी या नाटकाचे दिग्दर्शन करीत आहेत.

Tuesday, February 22, 2011

'स्वराज्य...मराठी पाऊल पडते पुढे' या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न.

रईस लष्करिया प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या 'स्वराज्य...मराठी पाऊल पडते पुढे' या मराठी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पार पडला. रईस लष्करिया निर्मित या चित्रपटाद्वारे विशाल- विहार ही जोडी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करीत आहे.

चित्रपटाची कथा- पटकथा विहार घाग यांची असून संवाद विहार घाग आणि मंदार गायधनी यांचे आहेत. विहार घाग यांनी लिहिलेल्या गीतांना नितिन हिवरकर यांचे संगीत आहे. 

या चित्रपटामध्ये राजेश शृंगारपुरे, अरुण नलावडे, अंशुमन विचारे, इला भाटे, राजन बने, जयंत पाटेकर, नम्रता गायकवाड, सुश्रूत मंकणी, वर्षा दांदले, किरण माने, निर्मला कोटणीस, रमेश वाणी यांच्या भूमिका आहेत.

Saturday, February 19, 2011

यशवंत देव यांचा 'जगण्यात मजा आहे' हा अल्बम पुण्यात प्रकाशित.

Yashwant Deo
प्रख्यात संगीतकार यशवंत देव यांनी संगीत दिलेल्या 'जगण्यात मजा आहे' या मराठी रोमॅन्टिक गाण्यांच्या अल्बमचे प्रकाशन ज्येष्ठ कवी सुधीर मोघे यांच्या हस्ते आणि संगीतकार यशवंत देव व सुप्रसिद्ध गायिका साधना सरगम, संगीतकार नंदू होनप, चित्रपट निर्माते अतुल काळे, ख्यातनाम गायक अरुण दाते, बुजुर्ग संगीतकार प्रभाकर जोग यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यातील एस. एम. जोशी सभागृहात पार पडला.

या सोहळ्यात अल्बममधली काही गीते जीतेंद्र अभ्यंकर आणि स्वरजा लेले यांनी साद्र केली. या अल्बमसाठी गीत लेखन केलेले कवी - गीतकार राजन लाखे, सुमीतचे सुभाष परदेशी हेही या सोहळ्यास उपस्थित होते.

'जगण्यात मजा आहे' या अल्बमम्ध्ये एकूण ८ गाणी आहेत. यातली गीतरचना राजन लाखे यांची असून त्यांना यशवंत देव यांनी संगीत दिलं आहे.

Friday, February 18, 2011

'तूच खरी घरची लक्ष्मी' चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण...

Tuch Khari Gharachi Laxmi
'चंद्रकला' या तमाशा प्रधान चित्रपटाच्या निर्मितीनंतर 'सुदत्त फिल्म्स' च्या बॅनरखाली हर्षल भदाणे 'तूच खरी घरची लक्ष्मी' हा पारिवारिक  चित्रपट घेऊन येत आहेत. विजय भानू दिग्दर्शित या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद बाबूराव बोरगांवकर ह्यांचे आहेत. सुप्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर ह्यांच्या लेखणीतून उतरलेल्या गीतांना संगीतकार अच्युत ठाकूर ह्यांनी संगीतबद्ध केलं आहे. छायाचित्रण चंद्रशेखर यांचे आहे तर नंदू दांडेकर यांनी कला दिग्दर्शन केले आहे. दिपाली विचारे यांनी या नृत्य दिग्दर्शन केलं आहे.

या चित्रपटात सुनिल बर्वे, तेजा देवकर, आदिती सारंगधर, शरद पोंक्षे, रविंद्र बेर्डे, सुशांत शेलार, अंजली जोशी, असित रेडीज ह्यांच्या प्रमुख भुमिका आहेत.

Wednesday, February 16, 2011

'झी गौरव २०११' पुरस्काराची नामांकने जाहिर.

Zee Gaurav 2011
मराठी कलांगणात आपल्या तेजाने लखलखणार्‍या गुडनाईट प्रस्तुत 'झी गौरव' या दिमाखदार पुरस्कार २०११ साठी नामांकने जाहिर. करण्यात आली . यावर्षी 'मी सिंधुताई सपकाळ' चित्रपटाने एकूण १३ नामांकने पटकावून बाजी मारली. तर 'मी मन आणि ध्रुव', 'शिक्षणाच्या आयचा घो', 'मुंबई पुणे मुंबई' तसेच 'पारध' या चित्रपटांमध्ये चुरस आहे.

व्यवसायिक नाटकांमध्ये 'नवा गडी नवं राज्य' ने सर्वाधिक म्हणजे आठ नामांकने मिळवली आहेत तर 'वा गुरु', 'काटकोन त्रिकोण', 'कथा', 'काय डेंजर वारा सुटलाय' आणि 'मीटर डाऊन' हे सुद्धा या स्पर्धेत आहेत. प्रायोगिक नाटकांच्या स्पर्धेत 'पुनःश्च हनिमून' सात नामांकनासह आघाडीवर आहे तर 'जा खेळायला पळ', 'रात्रंदिन आम्हा', 'तिची सतरा प्रकरणे' या नाटकांनी प्रत्येकी सहा नामांकने मिळवली आहेत.

या पुरस्कारासाठी जानेवारी २०१० ते डिसेंबर २०१० पर्यंतच्या कालावधीत प्रदर्शित झालेले चित्रपट आणि नाटक यांचा विचार करण्यात आला आहे. यावर्षी ६४ चित्रपट, २७ व्यावसायिक नाटकं, २७ प्रायोगिक नाटकं व ९ पुनरुज्जीवित नाटकं या पुरस्कारासाठीच्या स्पर्धेत दाखल झाली.

'मुक्ती - द फायनल फ्रिडम' चित्रपटाचे चित्रिकरण सुरु.

Nandu Madhav Tejaswini Pandit In Mukti
शेतकर्‍यांच्या आत्महत्येवर मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये चित्रपट आप्ण पाहिले आहेत. अनेक चित्रपटात या आत्महत्येचे कारण दाखविण्यात आले. पण त्या आत्महत्यांचे परिणाम दाखवण्याचा प्रयत्न निर्माते सचिन झनकर यांनी  'लॉग आईसलॅड प्रॉडक्शनच्या बॅनरखाली 'मुक्ती - द फायनल फ्रिडम' ह्या चित्रपटाद्वारे केला आहे.

दिग्दर्शक मच्छिंद्र मोरे यांनी आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याच्या मागे राहिलेल्या कुटुंबाची व्यथा यात मांडली आहे. या चित्रपटाची कथा आणि गीतलेखन सुद्धा मच्छिंद्र मोरे यांनी केले आहे. या चित्रपटात नंदू माधव आणि तेजस्विनी पंडित यांच्या प्रमुख भूमिका असून सोबत नागेश भोसले, मिलिंद शिंदे, अजय जाधव, सतिश सलागर, अमीर तळवळकर, गौरव कांबळे व चार्वी संगखोळकर या चित्रपटात दिसणार आहेत.

Tuesday, February 8, 2011

आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर 'दुभंग' चित्रपटात एकत्र दिसणार.

Urmila And Adinath In Dubhang
'माझा छकुला' मध्ये बालकलाकार म्हणून आणि 'वेड लावी जीवा' या रोमँटिक चित्रपटातून पदार्पण केल्यानंतर महे कोठारे यांचा मुलगा आदिनाथ कोठारे हा आपल्या आगामी चित्रपट 'दुभंग' मध्ये उर्मिला कानेटकर सोबत दिसणार आहे. महेश कोठारे दिग्दर्शित का चित्रपट एक कौटुंबिक चित्रपट असून शशांक मितकरी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. आदित्य आणि उर्मिला या नवीन जोडीसोबतच अजिंक्य देव आणि सोनाली कुलकर्णी सुद्धा या चित्रपटात दिसणार आहेत. 

अभिराम भडकमकर आणि शेखर ढवळीकर यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. संजय मेमाणे यांनी छायाचित्रण केले आहे. श्रीरंग गोदबोले यांनी या चित्रपटातील गाणी लिहिली असून बापी-तुतूल यांनी ती संगीतबद्ध केली आहेत.

Wednesday, February 2, 2011

'पकडा पकडी' चित्रपटाचा ध्वनीफित प्रकाशन सोहळा ३१ जानेवारीला संपन्न.

'व्हेंचर मोशन पिक्चर्स प्रा. लि.' निर्मित 'पकडा पकडी' या धम्माल विनोदी चित्रपटाच्या ध्वनिफितीचा प्रकाशन सोहळा ३१ जानेवारीला मुंबईतील जुहू प्लाझामध्ये संपन्न झाला. यावेळी अशोक सराफ, प्रसाद ओक, रविंद्र बेर्डे आणि बेला सुलाखे उपस्थित होते. 

संदीप मनोहर नवरे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून कथा लेखन सुद्धा त्यांचेच आहे. पटकथा आणि संवादलेखनहेमंत एदलाबादकर यांचे आहे. हा चित्रपट ११ फेब्रुवारीला संपुर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. प्रविण दवणे यांनी लिहीलेल्या गीतांना संदीप- सचिन- शैलेश यांनी या चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात एकूण ५ गाणी आहेत ज्यांना सुरेश वाडकर, वैशाली सामंत, आनंद शिंदे, कुणाल गांजावाला, साधना सरगम, शान आणि बेला सुलाखे अशा गायकांचा आवाज आहे. 

अशोक सराफ, प्रसाद ओक, तेजस्विनी पंडीत, सई रानडे, विजय चव्हाण, रविंद्र बेर्डे, किशोरी अंबिये, आशालता वाबगावकर, विकास समुद्रे यांच्या या चित्रपटात भूमिका आहेत.