Tuesday, March 9, 2010

उषा किरण यांना श्रद्धांजली

दहा वर्षांपूर्वी त्या आपल्याला सोडून गेल्या हे आजही खरे वाटत नाही. उषा किरण ह्यांनी विविध चित्रपटांतून साकार केलेल्या भूमिका आजही आपल्या डोळ्यांसमोर ताज्या आहेत. खरोखरच त्या मराठी, गुजराथी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेल्या अभिनेत्री होत्या असेच म्हणावे लागेल. त्यांच्या चार दशकाच्या करीअर मध्ये त्यांनी जवळजवळ ३०० चित्रपटात अभिनय केला. त्यापैकी 'कन्यादान मधील आभिनायासाठी त्यांना महाराष्ट्र सरकारचा 'सर्वोत्कृष्ट आभिनेत्रीच्या' पुरस्काराने गौरविण्यात आले. उषा किरण ह्यांचे अजून गौरविण्यात आलेले अभिनय म्हणजे त्यांनी साकारलेल्या 'शेजारची बायको' आणि 'गरिबाघरची लेक' या चित्रपटांतील भूमिका. मराठीबरोबरच हिंदी चित्रपटातून सुद्धा त्यांनी चांगलाच नावलौकिक मिळवला. त्या वेळच्या दिग्गज कलाकारांसोबत त्या प्रमुख भूमिकेत चमकल्या. नंतर बरीच वर्ष त्या सहकलाकार म्हणून अभिनय करत राहिल्या. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त मराठीमुव्हीवर्ल्डतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

Tuesday, February 23, 2010

'भैरोबा' कौटुंबिक विनोदी मालिका साम वाहिनीवर

Mohan Joshi in Bhairoba
'कुंडली' सारख्या गाजलेल्या मालिकेनंतर पी. एम. आय एंटरटेन्मेंट इंडिया प्रा. लि. च्या बॅनरखाली 'भैरोबा' ही कौटुंबिक पण विनोदी मालिका साम मराठी वाहिनीवर मंगळवार दि. २३ फेब्रु. पासून सोम. ते शनी. सायं ७.३० वा प्रसारीत होणार आहे. मनीष पटाडिया व अजय पटाडिया यांनी 'भैरोबा' ची निर्मिती केली आहे. गौतम कोळी यांनी 'भैरोबा' या मालिकेचे दिग्दर्शन केले आहे. कथेची संकल्पना डॉ. श्री बालाजी तांबे यांची असून, कथा- पटकथा समीर जोशी यांनी लिहीली आहे तर संवाद चिन्मय केळकर यांनी लिहीले आहेत.


प्रख्यात अभिनेते मोहन जोशी प्रमुख भूमिकेत असून त्यांच्यासह वंदना वाकनीस, गौरी सुखटणकर, रुचा हसबनीस, स्वप्नील फडके, आशीष कुलकर्णी, निर्मल कोटणीस, आशा साठे व बालकलाकार वेदांती गायकवाड यांच्या भूमिका आहेत. शरद पोंक्षे लक्षवेधी भूमिकेत आहेत.  अश्विनी शेंडे यांनी लिहिलेल्या शिर्षक गीताला अशोक पत्की यांनी संगीत दिले आहे. संकलन नरपत चौधरी व कला दिग्दर्शन समरेष करत आहेत. अमिता खोपकर मालिकेच्या क्रिएटीव्ह हेड असून शाहीद सय्यद कार्यकारी निर्माते आहेत. 

'भैरोबा' ही कौटुंबिक, विनोदी मालिका साम मराठी वाहिनीवरील मालिका सर्व स्तरावरील प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असे निर्मात्यांनी सांगितले.

Monday, February 15, 2010

'राजमाता जिजाऊ' साहेबांची अभिमानदर्शी चरित कहाणी. . . मराठी पडद्यावर प्रथमच

Smita Deshmukha, Pratibhatai Patil
मराठी चित्रपटांत सध्या वेगवेगळे विषय सक्षमपणे हाताळले जात आहेत. पण सध्याच्या या वाटचालीत ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती करणे हे एक धाडसच आहे. आणि हे धाडस आहे नगर जिल्ह्यातील सौ. मंदाताई शरदराव निमसे, आपल्या जिजाई चित्र, शिर्डी या चित्रपट निर्मिती संस्थेचे. या संस्थेअंतर्गत 'राजमता जिजाऊ' या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक यशवं भालकर, निर्मात्या सौ. मंदाताई निमसे, शरदराव निमसे आणि चित्रपटात जिजाऊंची भूमिका साकारणार्‍या प्रा. डॉ. स्मिता देशमुख यांनी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची भेट घेतली. निर्मितीसंस्थेतर्फे त्यांना राजमाता जिजाऊंचे स्मृतीचिन्ह दिले. साहसी आणि दैदिप्यमान चरित्रशिल्प घडविणार्‍या जिजाऊंवर चित्रपटनिर्मिती करण्याच्या धाडसाचे कौतुक राष्ट्रपतींनी केले. कथानकाविषयी जाणून घेऊन शिवाजीच्या व्यक्तीरेखेसंदर्भात विचारणा केली व सर्वांना शुभेच्छा दिल्या.

 गेली १५ वर्षांपासून बुलढाण्याच्या प्रा. डॉ. स्मिता देशमुख या 'मी जिजाऊ बोलतेय...' या एकपात्री नाटकाचा प्रयोग करत आहेत. फेब्रुवारी अखेरीस चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असून पहिले सत्र फलटनच्या वाडयात तर दुसरे भोरच्या वाडयात होईल. बाबासाहेब सौदागर यांनी लिहिलेल्या, शशांक पोवर यांनी संगीतबद्ध केलेली कैलाश खेर आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजातली गाणी रेकॉर्ड झाली आहेत. मदन पाटील यांच्या जिजाऊ साहेब कादंबरीवर आधारीत या चित्रपटाची पटकथा आणि संवाद प्रताप गंगावणे यांनी लिहीले आहेत. चित्रपटासाठी नितीन देसाई यांनी कला दिग्दर्शन केले आहे. कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी राहूल खंडारे यांच्याकडे असून प्रसिद्धीची सूत्रे भूपेंद्रकुमार नंदन करत आहेत.

Wednesday, February 3, 2010

'फिरोदिया करंडक स्पर्धा' १५ फेब्रुवारीपासून सुरुवात.

गेली ३५ वर्षे सातत्याने आयोजित केली जाणारी 'फिरोदिया करंडक स्पर्धा' हे महाविद्यालयीन युवा पिढीच्या कलागुणांना व्यक्त होण्यासाठीचे दर्जेदार व्यासपीठ बनले आहे. 'फिरोदिया'च्या माध्यमातून अनेक कलाकारांनी व्यवसायिक रंगभूमी, चित्रपट आणि अन्य माध्यमात यशस्वी कारकीर्द केली आहे. 

या वर्षीच्या फिरोदिया करंडक स्पर्धेची प्राथमिक फेरी १५ ते १९ फेब्रुवारीदरम्यान  भरत नाटय मंदिरात होणार आहे. स्पर्धेचे हे ३६ वे वर्ष असून अंतिम फेरी २४ फेब्रुवारीला यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होईल. या स्पर्धेत ३६ संघांनी भाग घेतला आहे. त्यापैकी ८ संघ या स्पर्धेत प्रथमच सादरीकरण करणार आहेत. 

रंगमंचीय सादरीकरणासाठी स्पर्धकांना प्रकाशयोजना, ध्वनिव्यवस्था तसेच रंगमंचीय सहाय्य मोफत पुरवण्यात येणार असून ग्रामीण भागातून येणार्‍या संघांना रंगमंचीय आधुनिक तंत्रज्ञानाचा परिचय व्हावा व स्पर्धेत त्याचा वापर व्हावा, स्पर्धेचा दर्जा चांगला रहावा या हेतूने या वर्षी प्रथमच प्राथमिक फेरीपूर्वी सर्व स्पर्धकांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे.

Tuesday, February 2, 2010

'कटयार काळजात घुसली' चा पुण्यात गुरुवारी शुभारंभ

'वसंतराव देशपांडे संगीत सभा' संस्थेची निर्मिती असलेलं 'कटयार काळजात घुसली' या लोकप्रिय संगीत नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग गुरुवारी (४ फेब्रुवारी) पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाटयगृह येथे सायंकाळी सात वाजता होणार आहे. या नाटकासाठी महेश काळे/ चैतन्य कुलकर्णी (सदाशिव), सुबोध भावे/ अतुल परचुरे किंवा सतीश तारे (कविराज बांकेबिहारी), सौरभ काडगावकर (चाँद), अमेय वाघ (उस्मान), दीप्ती माटे/ अनुजा साठे (झरिना), वेदश्री ओक/ आरती बडकबाळकर (उमा), रवींद्र बापट (दिवाणजी) आणि प्रशांत तपस्वी (बद्रीप्रसाद) असे कलाकारांचे दोन संच तयार करण्यात आले आहेत. मात्र डॉ. वसंतराव देशपांडे यांनी लोकप्रिय केलेली खाँ साहेबांची भूमिका त्यांचा नातू आणि प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे साकारणार आहे. हे नाटक पूर्वी तीन अंकाचे होते ते आता दोन अंकांचे करण्यात आले असून मूळ संहितेमध्ये बदल केलेला नाही. 

संस्थेचे अध्यक्ष आणि यापूर्वी 'कटयार' मध्ये खाँ साहेबांची भूमिका केलेले चंद्रकांत लिमये हे या नाटकाचे निर्माते असून सुबोध भावे व राहुल देशपांडे यांनी दिग्दर्शन केले आहे. नेपथ्य व प्रकाश योजना प्रदीप मुळे यांची असून वेशभूषा संयोगिता भावे यांची आहे. आदित्य ओक यांनी या नाटकासाठी संगीत संयोजन केले आहे.

Tuesday, January 26, 2010

'सामना' नंतर तब्बल ३५ वर्षांनंतर 'विहीर' च्या निमित्ताने मराठी चित्रपट बर्लिनमध्ये.

पुसान, मामी, एशियन, केरळ, पीफ, रॉटरडॅम आदी चित्रपट महोत्सवांमध्ये 'विहीर'चा गौरव झाला आहे. आणि आता साठाव्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट  महोत्सवासाठी या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. या पूर्वी ३५ वर्षापूर्वी 'सामना' चित्रपटाची या महोत्सवासाठी  निवड करण्यात आली होती. 

बर्लिन महोत्सवातील या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी 'एबी कॉर्प'च्या जया बच्चन, उमेश कुलकर्णी, डॉ. मोहन आगाशे, श्रीकांत यादव, मदन देवधर, आलोक राजवाडे, शार्वी कुलकर्णी, पर्ण पेठे उपस्थित राहणार आहेत. १४ तारखेला होणार्‍या या 'शो'ला 'रेड कार्पेट'चा मान मिळणार असून १४ ते १७ फेब्रुवारी या सलग चार दिवस हा चित्रपट दाखवला जाणार आहे. 

३५ वर्षापूर्वी बर्लिन महोत्सवात सहभागी झालेल्या 'सामना' चित्रपटात आणि आता सहभागी होणार्‍या 'विहीर' चित्रपटात एक साम्य आहे. ते म्हणजे डॉ. मोहन आगाशे. 

Thursday, January 14, 2010

'आघात' च्या निमित्ताने अभिनेते विक्रम गोखले यांच दिग्दर्शनात पदार्पण.

Vikram Gokhale
'आघात' च्या निमित्ताने अभिनेते म्हणून रसिकांना परिचित असलेले विक्रम गोखले 'दिग्दर्शका'च्या भूमिकेत प्रेक्षकांना भेटणार आहेत. 'स्प्रिंट आर्ट क्रिएशन्स' या बॅनरखाली मोहन दामले, श्रीराम दांडेकर आणि संजय साठे हे 'आघात' या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.

पटकथा-संवाद समीर विद्वांस यांचे आहेत. अभिनेत्री मुक्ता बर्वे, डॉ. अमोल कोल्हे यांच्या यात महत्त्वपूर्ण भूमिका असून कादंबरी कदम, अनिकेत विश्वासराव, सुहास जोशी, अनंत जोग, अरुण नलावडे, सुरेखा कुडची, शशांक शेंडे, विद्याधर जोशी, मनोज जोशी, दीपा श्रीराम आदींच्या भूमिका आहेत.