Wednesday, October 19, 2011

२४ ऑक्टोबर पासून 'खल्लास डान्स एकच चान्स'

Isha Kopikar, Eesha Kopikar
'मी मराठी'वर एकदम हटके असा 'खल्ल्लास डान्स एकच चान्स' हा रिऍलिटी शो २४ ऑक्टोबर पासून येत आहे. या शोचे खास आकर्षण म्हणजे हिंदीतील नामवंत नायिका 'ईशा कोपीकर' या शो मध्ये डान्सगुरु म्हणून काम पाहणार आहेत. तर मयुरेश वाडकर, वृषाली चव्हाण, सिद्धेश पै हे तीन कोरिओग्राफर स्पर्धकांना मार्गदर्शन करणार आहेत.  

या शो मध्ये कॉल बॅक राऊंड नाही म्हणजेच स्पर्धकाला पुन्हा संधी दिली जाणार नसल्याने या कार्यक्रमाला असे शिर्षक देण्यात आले आहे. मराठी शोजमध्ये यापूर्वी कधीही न वापरले गेलेले नृत्यप्रकार जसे जॅज, सालसा, लॉकिंग पॉपिंग, हिपहॉप यासोबतच भारतीय सांस्कृतिक नृत्याने रंगलेल्या या दर्जेदार कार्यक्रमाची मजा आपल्याला २४ ऑक्टोबरपासून सोम-मंगळ, रात्री ९ वाजता 'मी मराठी' वाहिनीवर लुटता येणार आहे.

Thursday, October 13, 2011

'स्वराज्य ... मराठी पाऊल पडते पुढे' चित्रपटाची ध्वनीफित प्रकाशित.

Swarajya Marathi Paul Padte Pudhe
'रईस लष्करिया प्रॉडक्शन' निर्मिती संस्थेचा 'स्वराज्य ... मराठी पाऊल पडते पुढे' हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय प्रदर्शनाआधीच या चित्रपटातील सुमधूर गीतांची ध्वनीफित चित्रपटातील कलाकार- तंत्रज्ञांच्या उपस्थितीत सुप्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांच्या हस्ते नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे.

या चित्रपटाद्वारे विशाल-विहार या जोडीने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. सादीक लष्करिया चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. विहार घाग लिखीत यातील गीतांना संगीतकार नितीन हिवरकर- विहार घाग यांनी संगीत दिले आहे. या चित्रपटाचे शिर्षक गीत नंदेश उमप यांनी गायलं असून रविंद्र साठे, त्यागराज खाडीलकर, साधना सरगम, सुदेश भोसले आणि स्वरुप भालवणलकर अशा सुप्रसिद्ध गायकांच्या आवाजात ती स्वरबद्ध करण्यत आली आहेत. 

चित्रपटाची संकल्पना-कथा-पटकथा-गीते तसेच नृत्यदिग्दर्शन विहार घाग यांनी केले असून संवाद विहार घाग व मंदार गायधनी यांनी लिहीले आहेत. चित्रपटात राजेश शृंगारपुरे, अरुण नलावडे, इला भाटे, अंशुमन विचारे, सुशृत मंकणी, किरण माने, नम्रता गायकवाड, निर्माला कोटणीस, हेमांगी कवी, वर्षा दांदले, जयंत पाटेकर, दर्शन जरिवाला या कलाकारांच्या यात भूमिका आहेत.

Tuesday, October 11, 2011

'यमाच्या गावाला जाऊ या' चित्रपटातील गाणे कार्तिकी गायकवाडवर चित्रीत.

Kartiki Gaikwad,Yamachya Gawala Jayu Yaa
गार्गी मुव्हीज या चित्रपटनिर्मिती संस्थेअंतर्गत विदर्भातील प्रसिद्ध साहित्यिक ज्ञानेश वाकुडकर यांनी 'यमाच्या गावाला जाऊ या' या मराठी चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण कोल्हापूर येथील मळ्यात सुरु आहे. सारेगामा लिटील चॅम्प विजेती गायिक कार्तिकी गायकवाड प्रथमच पार्श्वगायन करणार आहे आणि हे गाण तिच्यावरच चित्रीत करण्यात येत आहे.

चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि गीते स्वतः ज्ञानेश वाकुडकर यांचे आहेत दिग्दर्शन सुद्धा त्यांचेच आहे.

चित्रपटात एकूण ६ गाणी आहेत ज्याला मिलिंद इंगळे यांचे संगीत लाभले आहे. मिलिंद शिंदे, मिलिंद इंगळे, नेहा राजपाल आणि नंदेश उमप यांनी गायली आहेत. 

चित्रपटात मुख्य नायिका तेजा देवकर असून तिच्यासोबत राहूल लोहगावकर, मंगेश देसाई, विजय चव्हाण, चारुशीला वाच्छानी, सनी भूषण मुनगेकर, विजय पाटकर, किशोरी अंबिये असे कलाकार असणार आहेत.

Tuesday, October 4, 2011

'तृतीय नेत्र' चा मुहूर्त पुण्यात संपन्न.

Trutiy Netra
महात्मा जोतिराव फुले यांच्या 'तृतीय रत्न' या नाटकावर आधारित 'तृतीय नेत्र' या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पुण्यातील सासवड येथे करण्यात आला. बापूराव ओहळ यांनी मुहूर्ताचा नारळ फोडला तसेच श्रद्धा सावर्डेकर यांनी मुहूर्त क्लॅप दिला. शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर आधारीत 'तृतीय नेत्र' या चित्रपटाची निर्मिती मुक्तीघोष प्रॉडक्शन हाऊस या बॅनरअंतर्गत सिद्धार्थ भालेराव यांनी केली आहे. 

'तृतीय नेत्र' या चित्रपटाची कथा व संवाद महात्मा जोतिराव फुले यांचे असून पटकथा सिद्धार्थ भलेराव यांची आहे. या चित्रपटामध्ये यतिन कार्येकर, अनुपम श्याम, लालन सारंग, डॉ. विलास उजवणे, वरद चव्हाण, ज्योति पाटील, अंजली उजवणे, प्रदीप पटवर्धन, प्रदीप रघुनाथ यांच्यासह रझा मुराद आणि शाहबाज खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Monday, October 3, 2011

उमेश- गिरीश कुलकर्णी घेऊन येणार 'मसाला'.

'वळू' आणि 'विहीर' अशा दोन चित्रपटांच्या यशानंतर आणि लवकरच प्रदर्शित होणार्‍या बहुचर्चित देऊळचे दिग्दर्शक उमेश आणि गिरीश कुलकर्णी यांच्या 'आरभाट' संस्थेची निर्मिती व प्रवीण मसालेवाले यांची प्रस्तुती असलेल्या 'मसाला' या चित्रपटाच्या निर्मितीची घोषणा पुण्यातल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली. नाटक आणि मालिकांचे दिग्दर्शन केल्यानंतर संदेश कुलकर्णी प्रथमच मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.

या चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून उमेश कुलकर्णी काम पाहणार असून कथा, पटकथा आणि संवदलेखन गिरीश कुलकर्णी यांचे आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते एच. एम. रामचंद्र या चित्रपटाचे छ्यांकन करणार असून संकलन अभिजीत देशपांडे करणार आहेत. चित्रपटाची गीते सुनील सुकथनकर यांनी लिहीली असून आनंद मोडक यांनी संगीत दिले आहे. 

या चित्रपटात गिरीश कुलकर्णी मध्यवर्ती भूमिकेत असून अमृता सुभाष, दिलीप प्रभावळकर, डॉ. मोहन आगाशे, हृषिकेश जोशी, श्रीकांत यादव, प्रवीण तरडे, शशांक शेंडे हे कलाकार आहेत.