Friday, August 27, 2010

३० ऑगस्ट्पासून 'मी मराठी' वर 'खेळ मांडला'.



मी मराठी ही वाहिनी नवीन मालिकांचा नजराणा ऐन श्रावणात घेऊन येत आहे. यातली एक मालिका आहे 'खेळ मांडला'.  ही मालिका येत्या ३० ऑगस्टपासून सोमवार ते शनिवार ७:३० वाजता सुरु होत आहे. स्मिता ठाकरे 'खेळ मांडला'च्या निर्मात्या असून स्वाती ठाणावाला या सहनिर्मात्या आहेत.  या मालिकेची कथा शैलेश पोळ यांची असून पटकथा लेखन शैलेश पोळ व अरविंद जगताप यांचे आहे तसेच दिग्दर्शन परेश पाटील करत आहेत.

'खेळ मांडला' या मालिकेमध्ये श्रद्धा रानडे, प्रिया मराठे, निशिगंधा वाड, सुचित्रा बांडेकर, छाया कदम, शिल्पा नवलकर, अक्षया भिंगार्डे अशा एकाहून एक सरस अभिनय करणार्‍या अभिनेत्रींसोबत सागर तळाशीलकर, मिलिंद शिंदे, राजन ताम्हणे, केतन क्षीरसागर, संदीप पाठक, कश्यप परुळेकर, स्वप्नील राजशेखर असे तयारीचे कलावंतही आहेत. हरिश सावंत हे या मालिकेचे कॅमेरामन आहेत

Wednesday, August 18, 2010

'डेबू' २० ऑगस्टला प्रदर्शित होणार.

निर्माते प्राचार्य. शत्रुघ्न बिरकड आणि दिग्दर्शक निलेश जळमकर यांनी संत गाडगेबाबा महाराज यांच्या आयुष्यावर आणि त्यांच्या एकूण कार्यावर आधारीत 'डेबू' हा चित्रपट तयार केला आहे. 'देव तेथेची जाणावा' अशी सुयोग्य पंचलाईन असलेला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात २० ऑगस्ट २०१० रोजी प्रदर्शित होत आहे. 

सुप्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी यांची या चित्रपटात प्रमुख भूमिका असणार आहे. तसेच मधु कांबिकर, अश्विनी एकबोटे आणि रवी पटवर्धन यांच्यासुद्धा या चित्रपटात भूमिका असणार आहेत.

Saturday, August 14, 2010

'अर्धा गंगू अर्धा गोंद्या' चित्रपटात खास देशभक्तीपर गीत!

"स्वतंत्र करण्या भारत आपुला, ज्यांनी वेचीला प्राण! 
विसरु नका हो कधी कदापी त्यांचे हे बलीदान!" 
हे या अबाल- वृद्धांच्या मनावर देश स्वातंत्र्य करण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देऊन, रक्त सांडवून, आपले सारे आयुष्य भारतदेशासाठी अर्पण करणार्‍या देशभक्तांच्या बलिदानाची महती कथन करणार्‍या खास गीताची निर्मिती प्रसिद्ध अभिनेते मुकेश खन्ना यांनी ज्येष्ठ बंधू वेद खन्ना यांच्या सोबतीने त्यांच्या रिषी-राज प्रॉडक्शन्स या निर्मिती संस्थेतर्फे 'अर्धा गंगू अर्धा गोंद्या' या मराठी चित्रपटासाठी केली आहे. लोकप्रिय गायक विनोद राठोड यांच्या आवाजातील हे गीत ज्येष्ठ संगीतकार राम लक्ष्मण यांनी ते संगीतबद्ध केले आहे. गीतकार अनंत जाधव यांनी हे गीत लिहिले असून चित्रपटाचा नायक दिपक राजपूत याच्यावर ते चित्रीत करण्यात आले आहे.

Wednesday, August 4, 2010

"स्वर्गाचा विजा" प्रदर्शनासाठी सज्ज.

'स्वर्गाचा विजा' हा कौटुंबिक, विनोदी चित्रपट निर्माते रमेश धीरज सिंह यांनी धीरज एंटरटेनमेंट्च्या बॅनरखाली निर्माण केला आहे. दिग्दर्शक राकेश बारोट व शैलेंद्रसिंह राजपूत यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. रुपाली गायकवाड या चित्रपटाची सहनिर्माती आहे. 'स्वर्गाचा विजा' हा अदभूतपुर्व परंतु संवेदनशील मराठी चित्रपट पूर्ण झाला असून लवकरच हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. 

ह्या चित्रपटात मोहन जोशी, मिलिंद गुणाजी, योगेश महाजन, किशोर नांदलसकर, आनंद अभ्यंकर, डॉ. विलास उजवणे, दिपज्योती नाईक ह्या दिग्गज कलाकारांबरोबरच कोमल ढिल्लो, रुपाली गायकवाड, राकेश बारोट, रमेश डी. सिंह, प्रविण वाडकर, सोनी सिंह, मिली तांबे व निलम ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Friday, July 30, 2010

मराठीतला पहिला ग्राफिकल चित्रपट 'रामचंद्र पुरुषोत्तम जोशी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला.

'एक होती वादी'नंतर तब्बल सहा वर्षांनी दिग्दर्शक अजय फणसेकर आपल्या आणाखी एक वेगळी कलाकृती प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. मराठी चित्रपटात ऍनिमेशन, ग्राफिक्सचा वापर प्रथमच केला जात असून 'हॅरी पॉटर'च्या दर्जाचे काम करण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात मराठीतील पहिला ग्राफिकल चित्रपट तयार केला आहे. १९९० च्या दशकात फणसेकरांनी लिहिलेल्या 'श्राद्ध' एकांकिकेवर हा चित्रपट आधारीत आहे.

चित्रपटात दिलीप प्रभावळकर, राजन ताम्हाणे, सुहास जोशी, दीपक शिर्के, मिलिंद वाघ, मेधा गोखले, विकास कदम मुख्य भूमिकांत दिसणार आहेत.

Saturday, July 24, 2010

'वृंदावन' मालिकेचे १०० भाग पूर्ण.

मी मराठी वाहिनीवर सोम. ते शुक्र. सायं. ७.०० वा प्रसारित होणारी वृंदावन ही मालिका १०० भाग पुर्ण करुन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेची कथा सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या, फॅशनेबल, मॉड झालेल्या संस्कृतीला भेद देणारी आहे. वारकरी सांप्रदायातील पांडुरंग भक्तांच्या जीवनाशी निगडीत  आहे. सरळसाधे स्वभाव, एकमेकांविषयी असलेला जिव्हाळा यामुळे या मालिकेतील पात्र ही आपल्या अवती भवती आपल्याशी निगडीत असल्यासारखी वाटतात. 

वृंदावन या मालिकेची निर्मिती निता देवकर यांनी आपल्या सुर्यतेज प्रॉडक्शन या निर्मिती संस्थेअंतर्गत केली आहे. या मालिकेचे संवाद निता नामजोशी यांनी लिहिले आहेत. मालिकेचे शिर्षक गीत रोहिणी निनावे यांनी लिहीले असून निलेश मोहरीर यांनी संगीत बद्ध केले आहेत. वृंदावन मालिकेची निर्माण व्यवस्था सुनिल भालेराव याची असून कार्यकारी निर्माता मेनानाथ गाडे आहेत.

Friday, July 23, 2010

एल. जी. प्रॉडक्शन्सच्या "एक कटींग चाय- वन बाय टू" चे चित्रीकरण सुरू!

"एल. जी. प्रॉडक्शन्स" या संस्थेअंतर्गत "सुपारी", "लाडाचा गणपती", "माहेरची वाट", "सासरचा पंगा- सवतीचा इंगा", "बापमाणूस", "नाद करायचा नाय" तसेच "लाडाची चिंगी" यासारख्या एका पेक्षा एक चित्रपटांची निर्मिती करणारे निर्माते सदानंद उर्फ पप्पू लाड वेगळ्या वळणाच्या चित्रपटांची निर्मिती करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
पप्पू लाड सध्या "एक कटींग चाय- वन बाय टू" या आपल्या आगमी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. ह्या चित्रपटाचा मुहुर्त थोडया वेगळ्या ठिकाणी, वेगळ्या वेळेवर आणि वेगळ्या वातावरणात पार पडला. ह्या चित्रपटाचा मुहुर्ताचा क्लॅप चक्क मुंबईतल्या चर्नीरोड येथील हिंदू जिमखान्यात त्यांच्या मुलाच्या लग्नातच करण्यात आला तेही उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते. मुहुर्तानंतर मरीन  लाईन्स  तसेच दक्षिण मुंबईमध्ये "एक कटींग चाय- वन बाय टू" चे चित्रीकरण करण्यात आले. चित्रपटाचे पहिले शेड्युल पूर्ण झाले आहे. चित्रपटाची गोष्ट मुंबईत घडणारी असल्यामुळे चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण मुंबईतच होणार असल्याने प्रेक्षकांना संपूर्ण मुंबापुरीचे दर्शन व मुंबईतल्या रात्रीच्या झगमगटाचे सुद्धा दर्शन होणार आहे.