शाहीर दादा कोंडके यांनी एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टी खुप गाजविली. त्यांची स्मृती ताजी ठेवण्यासाठी दादांचे पुण्यातील एक निस्सीम चाहते विठ्ठलराव चव्हाण यांनी 'मला एक चानस हवा' या चित्रपटाची निर्मिती केली असून त्याचा मुहूर्त नुकताच पुण्यात हॉटेल संकेत इन' मध्ये पार पडला.याप्रसंगी या चित्रपटातील कलाकार विजय पाटकर, चेतन दळवी, मधु कांबीकर, हेमलता बाणे, किशोर नांदलस्कर आदि उपस्थित होते. या चित्रपटात मकरंद अनासपुरे व दीपाली सय्यद प्रमुख भूमिकेत आहेत. दादा कोंडके यांचे अतिशय निकटचे सहकारी बाळ मोहिते यांनी या चित्रपटाची कथा- पटकथा व संवाद लिहिले असून चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनीच केले आहे. त्यामुळे या चित्रपटात दादा कोंडके स्टाईल सहा गाणी असून ती संगीतकार अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केली आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण पुण्यात सुरु झाले आहे.
हल्ली समाजात कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण वाढतच चालले आहे. इतके दिवस सासरी मुलीचा छळ होतो अशा तक्रारी ऐकू येत होत्या परंतु आता मुलीकडूनही सासरच्या व्यक्तींचा छळ होतो अशी उदाहरणे घडत आहेत. पुण्यात काही दिवसांपुर्वी एका तामिळी कुटुंबातील आई- वडिल व दोन भावांनी पत्नीकडून येणार्या सतत धमक्या व छळाला कंटाळून सामूहिक आत्महत्या केली होती. याच घटनेवर आधारित 'धागेदोरे' या नव्या मराठी चित्रपटाची निर्मिती होत आहे. या चित्रपटाचे निर्माते पंकज छल्लानी व अभिजित आपटे असून दिग्दर्शक 'आरंभ' फेम अक्षय दत्त यांनी केले आहे. या चित्रपटात उमेश कामत, सई ताम्हणकर, भार्गवी चिर्मुले, विनय आपटे, संजय मोने, मानसी मागीकर आदींच्या भूमिका आहेत. गीतकार संदीप खरे यांच्या गीतांना संगीतकार सलील कुलकर्णी यांनी संगीत दिले आहे. पुण्यातील पौंड रस्त्यावरील अजंठा ऍव्हेन्यु सोसायटीत नुकतेच या चित्रपटाचे चित्रीकरण पार पडले.
मराठीमुव्हीवर्ल्डतर्फे लवकरच देण्यात येणाऱ्या पुरस्कारांसाठी नऊ विभागांमध्ये नामांकने जाहीर होणार आहेत. त्यासाठी विशेष परीक्षक बोलाविण्यापेक्षा , हा बहुमान मराठीमुव्हीवर्ल्डच्या दर्शकांनाच मिळणार आहे. दिनांक २१ ते २७ दरम्यान खुल्या असणार्या वेळेमध्ये दर्शकांना आपल्या पसंतीचे कलाकार व चित्रपट, मालिका आणि नाटक निवडण्याचा मान मिळणार आहे. दिनांक १. १. २०११ पासून १५. ११. २०११ पर्यंतच्या कालावधीत प्रदर्शित झालेले नाटक , चित्रपट आणि मालिका व त्यातील कलावंत ह्यांची निवड हे दर्शक करतील. मात्र एका विभागामध्ये फक्त एक अशीच निवड करावी लागेल. हि नामांकने केवळ लोकप्रियतेवर ठरवली जातील व त्यानंतर उत्कृष्ट कलाकार आणि कलाकृतीसाठी मत घेतलं जाईल. मराठीमुव्हीवर्ल्डच्या दर्शकांनी त्यांची निवड कळवण्यासाठीhttp://www.marathimovieworld.com/fun/mmw-awards-choice.php या लिंकवर क्लिक करुन अथवा (admin@marathimovieworld.com) या ई-मेल आयडी वर पाठवावीत .पुरस्कारांचे नऊ विभाग खालील प्रमाणेचित्रपट : सर्वोत्कृष्ट नायक सर्वोत्कृष्ट नायिका सर्वोत्कृष्ट चित्रपट टेलिव्हिजनसर्वोत्कृष्ट नायक सर्वोत्कृष्ट नायिका सर्वोत्कृष्ट मालिकानाटक सर्वोत्कृष्ट नायक सर्वोत्कृष्ट नायिका सर्वोत्कृष्ट नाटक
मुंबईतील तुर्भे भागातील 'एस्सेल' स्टुडिओमधील चित्रीकारणानिमित्त तेथे असलेल्या सर्वांचीच लगबग सुरु होती. आणि आमच्या समोर आला. तो एक तृतीयपंथी. प्रारंभी आम्ही त्याला ओळखलेच नाही. परंतु जेव्हा त्या तृतीयपंथीयाचा 'हे मिलिंद गवळी' असा परिचय करून देण्यात आला तेव्हा आम्हाला आश्चर्य वाटल्या खेरीज राहिले नाही. मिलींद गवळी आणि तृतीयपंथी? हे काय गौडबंगाल आहे? हे गौडबंगाल आहे 'आम्ही का तिसरे?' या नव्या मराठी चित्रपटातील. त्यामध्ये अभिनेता मिलिंद गवळी 'हिरो'च्या भूमिकेत आहे मात्र हा हिरो आहे चक्क 'तृतीयपंथी'. तृतीयपंथीयांच्या जीवनावर केवळ प्रकाशझोत टाकण्यासाठी नाही तर त्यांच्याबाबत सामाजिक जागृती व्हावी या उद्देशाने या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. 'शुभलक्ष्मी चित्र' च्या 'आम्ही का तिसरे ?' या चित्रपटाची निर्मिती अभिनेत्री अलका कुबल व शिल्पा मसुरकर यांनी केली असून दिग्दर्शक आहेत 'चॅम्पियन' फेम रमेश मोरे.तृतीयपंथीयांच्या समाजजीवनावर प्रकाशझोत टाकणारा मराठीतील पहिलाच चित्रपट असेल. सुप्रसिद्ध साहित्यिक रणजीत देसाई यांच्या कन्या श्रीमती पारू नाईक यांनी अनेक वर्षे संशोधन करून लिहिलेल्या 'मी का नाही?' या कादंबरीवर हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.
ज्योतिबा बॅनर अंतर्गत 'वारस कोण?' आणि 'रामा रामा सिनेरामा' या दोन मराठी चित्रपटांचा मुहूर्त ११-११-११ या शुभ मुहूर्तावर गोरेगाव येथील प्लॅटिनम स्टुडिओत, दोन्ही चित्रपटातील मिळून ११ गाणी असलेल्या तसेच ११ मान्यवरांच्या शुभहस्ते आणि ११ कलावंत - तंत्रज्ञ मिळून ११ च्या पटीत साइनिंग रक्कम देऊन सकाळी ११:११ वाजता करण्यात आला. गेली १५ वर्षे नाटक, मालिका आणि चित्रपटात अभिनेता म्हणून कार्यरत असलेल्या राम मा़ळी यांनी या दोन चित्रपटांच्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. 'वारस कोण?' या चित्रपटाची कथा व गीते दिलीप देशपांडे यांनी लिहीली असून स्वतः राम माळी यांनी 'रामा रामा सिनेरामा' या चित्रपटाची कथा लिहीली आहे. दोन्ही चित्रपटांसाठी लक्ष्मीकांत विस्पुते यांनी पटकथा संवाद लेखन केलं आहे तर दोन्ही चित्रपटांना सुनिल प्रभाशंकर यांनी संगीत दिले आहे.
बीग टॉकीज अंतर्गत 'एक कुतुब तीन मिनार या चित्रपटाचा मुहूर्त गीत ध्वनीमुद्रणाने नुकताच स्वरलता स्टुडिओ येथे करण्यात आला. मनोज यादव आणि अनिल सिंग निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन सुनिल रामचंद्र कांबळे करणार आहेत. या चित्रपटाची कथा-पटकथा आणि संवाद अश्क कांबळी यांचे असून छायांकन राजा फडतरे यांचे आहे. गीतकार बिपिन धायगुडे आणि विनय येरापल्ले यांच्या गीतांना संगीतकार विलास गुरव यांनी संगीत दिले आहे. कुलदीप मालुसरे, श्रीला तांबे, निलादरी देबनाद आणि अनुराग या नव्या दमाच्या गायकांच्या आवाजात ती स्वरबद्ध केली आहेत.'एक कुतुब तीन मिनार' या चित्रपटात भरत जाधव सह विजय चव्हाण, संचित यादव, श्याम ठोंबरे, पूजा कदम, गौरी देशमुख, पूर्णिमा वाव्हळ, अशोक पावडे, नितीन पारेगावकर, सुरेश ढगे, प्रियांका मुणगेकर, गौरी केंद्रे, विजय कदम आणि रसिका धामणकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण रत्नागिरी येथे करण्यात येणार असून लवकरच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असल्याचे दिग्दर्शक सुनिल रामचंद्र कांबळे यांनी सांगितले.
महादेव सांगळे आणि मनोज मांढरे यांच्या एम. एम. मुव्हीज या बॅनरची निर्मिती असलेला 'मामाच्या राशीला भाचा' हा मराठी चित्रपट पुण्यासह कोल्हापुर, सांगली, सातारा, सोलापुर या ठिकाणी शुक्रवार दि ११ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.यशवंतराव पाटील चित्रपटाचे सहनिर्माते असून प्रमोद रामचंद्र जोशी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटातील गीतांना संगीतकार जिंतेंद्र कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केले असून उत्तरा केळकर, चंद्रशेखर गाडगीळ, संदीप उबाळे यांच्यसह सोनु निगम यांनी पार्श्वगायन केले आहे. 'मामाच्या राशीला भाचा' या चित्रपटात मोहन जोशी व सिद्धार्थ जाधव यांच्या सोबत स्नेहा लक्ष्मेश्वर, विजय पाटकर, पॅडी कांबळे, विजय गोखले, नुतन जयंत, वंदना वाकनीस व नृत्यांगना स्पेहा लखनगावकर यांच्या भूमिका आहेत.
'माय ड्रीम प्रॉडक्शन' निर्मित आणि स्टेट ऑफ द आर्टस प्रस्तुत 'पाऊलवाट' हा संगीतप्रधान चित्रपट १८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. मुक्ता भिडे, मानसी पेठे, स्मिता भागवतदार, अजय भिडे, व्यंकटेश मांडके, अलका दातार असे सहा निर्माते असलेला हा चित्रपट आहे. संजय सूरकरांसारख्या दिग्दर्शकाच्या बरोबर काम केलेल्या आदित्य इंगळे यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे.आदित्य इंगळे दिग्दर्शित या चित्रपटाची कथा अभिराम भडकमकर, पटकथा- संवाद अभिराम भडकमकर आणि आदित्य इंगळे यांचे आहेत. या संगीतप्रधान चित्रपटाचे गीतकार वैभव जोशी असून प्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांनी संगीत दिले आहे.या चित्रपटासाठी ज्येष्ठ गायिका आशा भोसले, अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, शुभा जोशी, विभावरी जोशी, जसराज जोशी, पं. रघुनंदन पणशीकर, राजेश दातार, संदीप उबाळे, माधवी नानल, अमोल निसळ आणि स्वतः संगीतकार नरेंद्र भिडे यांनी पार्श्वगायन केले आहे. या चित्रपटात सुबोध भावे, ज्योती चांदेकर, मधुरा वेलणकर- साटम, किशोर कदम, आनंद इंगळे, हृषिकेश जोशी, अभिराम भडकमकर, विजय केंकरे, वैभव तत्ववादी आणि अतिथी कलाकार सीमा देव यांच्या भूमिका आहेत.
रमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई) च्या अभूतपूर्व यशानंतर साईनाथ चित्र या बॅनरअंतर्गत 'आम्ही चमकते तारे' या चित्रपटाचा मुहूर्त गीत ध्वनीमुद्रणाद्वारे नुकताच मुंबईतील आजीवसन स्टुडिओमध्ये करण्यात आला. 'श्वास' सारख्या लोकप्रिय चित्रपटाच्या निर्मितीमध्ये मोलाची भूमिका असणारे दिपक. एस. चौधरी प्रस्तुत या चित्रपटाचे संकलन्-दिग्दर्शन प्रकाश जाधव करणार आहेत. चित्रपटाची कथा अनंत सुतार यांची आहे. या चित्रपटात संगीताला विशेष प्राधान्य दिले आहे. गीतकार सागर पवार यांच्या जोडीला रवींद्र आवटे आणि प्रमोद बेजकर यांनी 'आम्ही चमकते तारे' साठी गीतलेखन केले आहे. संगीतकार आहेत श्रीरंग आरस. या चित्रपटासाठी अवधूत गुप्ते, स्वप्निल बांदोडकर, साधना सरगम, वैशाली सामंत, बेला शेंडे, आनंद शिंदे आणि संजिवनी भेलांडे या आजच्या मराठीतील आघाडीच्या गायकांनी पार्श्वगायन केले आहे.