मराठी तसेच हिंदी चित्रपटात आपल्या छायाचित्रणाच्या आणि दिग्दर्शनाच्या सहाय्याने आपले स्वतःची ओळख निर्माण केलेले जेष्ठ दिग्दर्शक - छायाचित्रकार प्रभाकर निकळंकर यांचे आज (मंगळवारी दिनांक २८ जून २०११ रोजी) पहाटे २:२० वाजता हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने मुंबईत दु:खद निधन झाले. प्रभाकर निकळंकर यांनी हिंदीतील 'पाकिजा', 'कुवारा बाप', 'हिर रांझा', 'बॉम्बे टू गोवा' आणि मराठीतील 'अपराध', 'अश्या रंगल्या' रात्री या गाजलेल्या चित्रपटांचे छायाचित्रण केले. प्रभाकर निकळंकर हे एक उत्तम चित्रकार सुद्धा होते. त्याने मराठीतील सवाई हवालदार, महानदीच्या तीरावर या चित्रपटांसाठी दिग्दर्शक, निर्माता आणि छायाचित्रकार अशी तिहेरी भूमिका पार पडली होती.प्रभाकर निकळंकर यांना त्यांच्या कामासाठी अनेक पुरस्काराने गौरविण्यात आलेय. जीवन गौरव पुरस्कार, चित्रकर्मी पुरस्कार या बरोबरच दादासाहेब फाळके अकादमीच्या वतीने छायाचित्रणाच्या विशेष पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. 'चंदनाची उटी' या मराठी चित्रपटाच्या निर्मितीसाठी ते सध्या कार्यरत होते .
बॉलिवुड आणि टॉलिवुड यांच मराठी चित्रपट सृष्टीशी असलेलं नातं सर्व परिचित आहे.... अमिताभ बच्चन, सुनिधी चौहान, शान, कुणाल गांजावाला, अनुपम खेर, सीमा विश्वास, जॉनी लिवर असे बॉलिवुडचे काही निर्माते, गायक, अभिनेते मराठी मध्ये रमलेले दिसतात...
'पद्मभूषण पुरस्कार' आणि चार वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले संगीत क्षेत्रातील सैगनानी म्हणजेच संगीतातील ज्ञानी ईलाय राजा आता 'हॅलो जयहिंद' हा मराठी चित्रपट संगीतबद्ध करणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती तृप्ती भोईर यांची असून दिग्दर्शन गजेंद्र अहिरे यांच आहे.
राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता उपेंद्र लिमये 'जेआरडी एंटरटेन्मेंट' च्या 'चिरगूट' या चित्रपटासाठी पार्श्वगायन करत आहे. दिलीप जगताप यांनी लिहिलेल्या आणि कनकराज यांनी संगीतबद्ध केलेल्या कविता स्वरुपातील गीताला उपेंद्र लिमये यांच्यासोबत साधना सरगम यांनी पार्श्वगायन केले आहे.
रेकॉर्डिंगनंतर उपेंद्र लिमये याला गाण्याचा अनुभव विचारला असता उपेंद्र म्हणाला की मुळात हा खूप वेगळा प्रकार होता. असा प्रयोग पूर्वी थिएटरमध्ये आम्ही अनेकदा केला आहे. तसेच राम गोपाल वर्मा यांच्या एका आगामी चित्रपटासाठीसुद्धा त्याने एक गाणं गायल आहे.
निर्माते अनिल पत्याणे यांच्या नवलाई क्रिएशनची निर्मिती असलेला 'ज्ञानेश्र्वरी एक्सप्रेस' १७ जूनला रोजी प्रदर्शित होत आहे. दिग्दर्शक प्रकाश पांचाळ दिग्दर्शित आणि लिखित ह्या चित्रपटाला सत्यघटनेची पार्श्वभूमी आहे. मनाला भिडणार्या या चित्रपटाची पटकथा प्रकाश पांचाळ आणि तेजेश घाडगे यांची असून संवाद लेखन तेजेश घाडगे यांनी केले आहे. श्रीकांत नरुले यांनी लिहिलेल्या गीतांना बाळ पळसुले यांनी संगीतबद्ध केले आहे. जीतू आचरेकर यांनी छायांकन केले असून संकलन दिलीप दरक, नृत्ये अनिल सुतार यांची तर सदाशिव चव्हाण या चित्रपटाचे निर्मिती प्रमुख आहेत.
या चित्रपटाच्या खास शोच्या वेळी श्रेया सेन या अपघातग्रस्त आर्किटेक्चरच्या विद्यार्थिनीला निमंत्रित करण्यात आले होते. या अपघातात ती आपला उजवा हात गमावून बसली होती. आर्किटेक्चरला असल्यामुळे कॉलेजमध्येही प्रवेश नाकारला जाणार होता. पण जिद्दीने आपल्या डाव्या हाताने सराव करुन आर्किटेक्चरच्या परीक्षेमध्ये उच्च श्रेणीमध्ये पास होऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. या शोच्यावेळी निर्माते अनिल पत्याणे यांनी श्रेयाला तिच्या ऑपरेशनसाठी रु ५१०००/- चा धनादेश दिला व संपुर्ण युनिटने तिच्या पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या चित्रपटात डॉ. गिरीश ओक, शरद पोंक्षे, आनंद अभ्यंकर, अश्विनी एकबोटे, शांता तांबे, मंजुषा गोडसे, अक्षया भिंगार्डे, अनिरुद्ध बनकर यांच्या प्रमुख भुमिका आहेत. निशा परुळेकर, विनोद पंडीत आणि भुषण कडु यांनी या 'ज्ञानेश्र्वरी एक्सप्रेस' मध्ये पाहुणे कलाकार म्हणून काम केले आहे.
गेली अनेक वर्षे शेतकी विषयक व्यवसाय करित असलेल्या सचिन भालिंगे ह्यांनी 'नामदेव उमाजी सिने आर्ट' या बॅनरखाली 'स्वप्न तुझं नी माझं' चित्रपटाची निर्मिती केली आहे. दिग्दर्शक अशोक कांबळी ह्यांनी दिग्दर्शना बरोबर चित्रपटाचे लेखनही केले आहे. मिलिंद दास्ताने या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.
या चित्रपटाला सिद्धार्थ -सौमिल या आजच्या तरुण पिढीच्या संगीतकारांनी दिल आहे. या चित्रपटात सिमा सिंग हिच्या एका आयटम साँगचा समावेश आहे. छायाचित्रकार राजा फडतरे, कलादिग्दर्शक एकनाथ राणे, नृत्यदिग्दर्शक अनिल सुतार यांनी स्वप्न..... मध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.
स्वप्न तुझं नी माझं या चित्रपटात मिलिंद गुणाजी, ओंकार कर्वे, नेहा जोशी, अनिता विश्वासराव, नितीन पारेगांवकर, मेघा गोखले, अशोक सवणे, शाम ठोंबरे, संचित यादव, प्रिया गमरे, अनिल सुतार, अशोक पावडे, सुरेश ढगे आणि मिलिंद दास्ताने यांच्या भुमिका आहेत.
'मी मराठी' घेऊन येत आहे नवा कार्यक्रम 'एक तास भुताचा' ३ जून पासून शुक्रवार आणि शनिवार रात्री ९ वाजता. या मालिकेची निर्मिती 'एक्स्प्रेशन एन्टरटेनमेन्ट' यांनी केली असून अभिनेत्री अमिता खोपकर या मालिकेच्या निर्मात्या आहेत. दिग्दर्शन संजय खांबे यांचे असून संजीव कुमार यांनी छायंकन केले आहे. ही भूतकथांची भयावह मालिका प्रेक्षकांना घाबरवत एक वेगळ्या प्रकारचे मनोरंजन देऊन जाईल.