Tuesday, November 30, 2010

'पोपटपंची' या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग ४ डिसेंबरला.

Popatpanchi Marathi Natak
'मॅजिक वॉल' या बॅनरखाली निर्माते विक्रम वाटवे आणि प्रदीप मुळ्ये यांनी 'पोपटपंची'  या आपल्या नाटकाचा पहिला शो ४ डिसेंबर २०१० रोजी आयोजित केला आहे. या नाटकात प्रसिद्ध कलाकार न दिसता नविन चेहरे दिसणार असल्याचं नाटकाचे दिग्दर्शक शफाहत खान यांनी प्रभादेवी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. 

'पोपटपंची' या दोन अंकी नाटकात किशोर चौघुले, मंगेश साळवी, सुदेश म्हाशीळकर, रसिका आगशे, योगिनी चौक, प्रज्ञा शास्त्री, रुपेश जाधव, प्रविणकुमार डाळींबकर, सिद्धेश शेलार आणि पुर्णानंद वांडेकर अशा टॅलेंटेड कलाकारांचा अभिनय पहायला मिळणार आहेत. यापैकी बर्‍याच जणांनी प्रसिद्ध अशा अभिनय संस्थेतून प्रशिक्षण घेतले आहे. या आगळ्या वेगळ्या नाटकाला राहुल रानडे यांच संगीत आहे.

Monday, November 29, 2010

पालक आणि पाल्य या दोघांसाठी 'चला वेळ काढूया'.

Chal Vel Kadhuya
सुप्रसिद्ध वास्तुशास्त्रज्ञ रेकितज्ञ मोहन गोखले यांनी 'चला वेळ काढूया' या नाटकाची निर्मिती केली आहे. नोकरी करणारे पालक आणि एकटा असलेला पाल्य या विषयावर भाष्य करणारे हे नाटक आहे. पालक आणि पाल्य दोघांनाही या नाटकातून संगीत नृत्य व विनोद यांच्यामार्फत मनोरंजनातून शिकवण देण्याचा प्रयत्न केला आहे. 

या नाटकाचे दिग्दर्शन विजय भालेराव यांनी केले आहे. शिल्पा पटवर्धन यांनी यशवंत देव यांच्या मार्गदर्शनाखाली संजय आंग्रे यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे. प्रशांत सावंत आणि अनुराधा अष्टिकर हे या नाटकाचे निर्मिती प्रमुख आहेत. पंकज पेडणेकर, विनायक तळेकर, सतिश शेळके, उमेश के. के. सिद्धेश गुरव, प्रशांत दाभोळकर, रोशन आतवणकर, गीता बर्वे, मोहन गोखले या कलाकारांच्या यात प्रमुख भूमिका आहेत.

Saturday, November 27, 2010

लोकशाहीर विठ्ठल उमप कालवश.

Lokshair Vitthal Umap
लोकगीते, पोवाडे, भारुडे तसेच ५०० हून अधिक नाटकांच्या जोरावर मराठमोळया रसिकांवर मोहिनी घालणारे लोकशाहीर विठ्ठल उमप यांचे शुक्रवारी २६ नोव्हेंबरला हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 'लॉर्ड बुद्धा' वाहिनीच्या लोकार्पण सोहळ्यासाठी दीक्षाभूमीवर आले होते. व्यासपीठावर त्यांना भोवळ आल्याने रुग्णालयात हलविण्यात आले; परंतु तो पर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली. 

त्यांचे 'फु बाई फु' हे आणि 'ए दादा हावर रे' ही कोळीगीते आजही प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहेत. अस्सल गावरान गोडवा असलेला त्यांच्या पहाडी आवाज सर्व मराठी रसिकांच्या कायम लक्षात राहिल. लोककलेसोबतच त्यांनी काही चित्रपटांतूनही काम केले आहे. 'सुंबरान' ह्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटात त्यांनी रवि काळेंच्या वडिलांची भूमिका केली आहे. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी
लोककलेसाठी योगदान दिलं.  

Friday, November 26, 2010

अलका कुबल - आठल्ये यांची निर्मिती असलेला 'अग्निपरीक्षा' २६ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित.

Alka Kubal in Agnipariksha
प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल- आठल्ये 'शुभलक्ष्मी' या बॅनरखाली 'सुहासिनीची ही सत्त्वपरीक्षा' ह्या आपल्या पहिल्या चित्रपटानंतर आता 'अग्निपरीक्षा'  ह्या  चित्रपटाची निर्मिती करत आहेत. त्यांची बहिण शिल्पा मसूरकर ही या चित्रपटासाठी सहनिर्माती आहे. 

या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिल सुर्वे यांनी केले आहे. श्रद्धा भणगे यांची कथा असून पटकथा व संवाद श्रीनिवास भणगे यांनी लिहीले आहेत. छायांकन समीर आठल्ये यांचे आहे. संजय नार्वेकर, मोहन जोशी, रमेश भाटकर, विजय चव्हाण, गणेश यादव, सुरेखा कुडची, सविता मालपेकर व संजय खापरे यांच्या या चित्रपटात भूमिका आहेत.

Monday, November 22, 2010

'सत्या' थ्रिलर कॉमेडी लवस्टोरी.

निर्माता आणि अभिनेता किशोर गायकवाड आणि दिग्दर्शक नितिन कांबळे या दोन युवकांनी के. आर. जी. क्रिएशन्स या बॅनरखाली 'सत्या' या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. नुकताच या चित्रपटाच्या अखेरच्या सत्राचं चित्रीकरण मुंबईतील फिल्मसिटी, गोरेगाव येथे संपन्न झालं.

'सत्या' चित्रपटापासून प्रतहमच रुपेरी पडद्यावर पदार्पण करणारा किशोर गायकवाड सत्याची अग्रेसिव्ह व तडफदार भूमिका साकारत आहे. त्याच्या सोबत त्याला साथ देत आहेत प्रसाद ओक, शरद पोंक्षे, सारा श्रवण , अभिजीत चव्हाण, सतिश तारे, अश्विनी एकबोटे, सुनिल तावडे आणि बर्‍याच कॉलेज तरुण तरुणींचा यात समावेश आहे.

Saturday, November 20, 2010

'येडपाट गाव' वेडया गावची शहाणी कथा.

बी. बी. फिल्मस च्या बॅनरखाली निर्माते शाम भोईर व दिग्दर्शक एस. विक्रम यांच्या 'येडपाट गांव' या धमाल मराठी चित्रपटाचा मुहुर्त नुकताच चांदवली स्टुडिओ येथे चित्रपटातील अनेक कलाकार व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. 

या चित्रपटात मोहन जोशी, दिपक शिर्के, मिलींद गुणाजी, उषा नाडकर्णी, आशालता वाबगावकर, निशा परुळेकर, किशोर नांदलस्कर, सदाशिव अमरापुरकर, दिपा चाफेकर, ट्विंकल भामरे, अजय सिंग, दिपक सावंत, राजन भोईर, राणू पाटोतकर आणि दक्षिणात्य विनोदवीर बजरंग बादशहा यांच्या यात प्रमुख भुमिका आहेत. या सिनेमाचे चित्रीकरण मुंबई, नवी मुंबई व सातारा येथे सलग सत्रामध्ये होणार असून जानेवारी मध्ये हा चित्रपट संपूर्ण महराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Wednesday, November 17, 2010

'कशाला उद्याची बात' चित्रपटाचा मुहूर्त संपन्न.

'साई प्रसाद मीडिया प्रा. लि.' या बॅनरखाली तयार होणार्‍या 'कशाला उद्याची बात' ह्या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पुण्यात पार पडला. मराठी सोबत हिंदीमध्ये सुद्धा हा चित्रपट 'छोडो कलकी बाते' या नावाने प्रदर्शित करण्यात येणार आहे. सचिन खेडेकर, अतुल परचुरे, मृणाल कुलकर्णी यांच्यासोबतच अनुपम खेर एक विशेष भूमिकेत मराठी चित्रपटात प्रथमच दिसणार असून प्रमोद गजानन जोशी यांनी या दोन्ही भाषांतील चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 

चित्रपटाच्या चित्रीकरणास लवकरच सुरुवात होणार असून. संदिप खरे यांनी चित्रपटाची गीते लिहिली असून डॉ. सलील कुलकर्णी यांनी संगीत दिले आहे. सलील सहस्त्रबुद्धे यांनी या दोन्ही चित्रपटांच्या छायाचित्रणाची बाजू सांभाळली आहे.

चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी स्पर्धेचे आयोजन.

केदार शिंदे दिग्दर्शित आगामी चित्रपट "ऑन ड्युटी २४ तास"तर्फ़े एक अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ज्यामध्ये तुम्हाला २ मिनिटांच्या ध्वनिफ़ितीवर एक पोलिसांवर आधारित चित्रफ़ित तयार करायची आहे. 

स्पर्धेतील सर्वोत्तम १० चित्रफ़ितींमधून सिनेमा क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती एकास विजेता म्हणून घोषित करतील. विजेत्या चित्रफ़ितीला केदार शिंदे यांच्या आगामी चित्रपट "ऑन ड्युटी २४ तास"च्या नामावली दरम्यान दाखविण्यात येईल तसेच विजेत्याच्या नावाचाही त्या नामावलीमध्ये समावेश करण्यात येणार आहे.         

३० नोव्हेंबर ही प्रवेशाची अंतिम तारीख असून त्या नंतर कोणाचाही प्रवेश ग्राह्य धरण्यात येणार नाही. इच्छुक स्पर्धकांनी ध्वनिफित आणि फॉर्म साठी kedar.onduty24@gmail.com वर संपर्क साधावा.

Thursday, November 11, 2010

निर्माते नितीन देसाई यांच्या 'बालगंधर्व' चित्रपटाचा संगीतमय वातावरणात मुहूर्त.

निर्माते नितीन देसाई यांनी 'बालगंधर्व' चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त 'बालगंधर्व रंगमंदिर' मध्ये संगीतमय आणि अत्यंत राजेशाही अशा वातावरणात पार पडला. पारंपारिक नांदीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. गंधर्व युगाचे साक्षीदार, त्यांच्या आवाजाच्या जादूने मोहविलेल्या पुणेकरांबरोबरच नाट्य क्षेत्रातील अनेक दिग्गजांची मांदियाळी होती. ज्येष्ठ अभिनेत्री जयमाला शिलेदार, गायिका अभिनेत्री किर्ती शिलेदार, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, संभाजीराजे भोसले, दाजीकाका गाडगीळ, अभिनेत्री लता शिलेदार्-भोगले, नितीन देसाई, गायिका शैला दातार, रोटरी क्लबचे पदाधिकारी शैलेश टिळक, बालगंधर्वांच्या अनेक वस्तूंचे जतन करणारे मुकेश नारंग याची उपस्थिती या कार्यक्रमास लाभली. तसेच चित्रपटातील कलाकार सुबोध भावे, विभावरी देशपांडे, अभिराम भडकमकर, कौशल इनामदार, आनंड भाटे, रवी जाधव आदींची यावेळी रसिकांशी ओळख करुन देण्यात आली. 

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात शैला दातार व सहकार्‍यांनी संगीत मैफल सादर केली. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले.

Tuesday, November 2, 2010

'सुंबरान' चित्रपटाच्या संगीताचे अनावरण.

विख्यात दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या हस्ते अष्टपैलू दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांची सुरेल कलाकृती संबरान.. सोनेरी दिवसाच्या सोनेरी आठवणी, या चित्रपटाची पहिली झलक व संगीत प्रकाशन नुकतेच पार पडले. मराठी सिनेजगतातील नामांकित तारे तारकांच्या समक्ष नंदेश उमप, अजित परब, शान यांनी सुंबरान मधील गाणी सादर करीत सगळ्यांची मने जिंकली. सागरिका म्युझिक प्रा. लि. यांनी सुंबरानचे संगीत प्रकाशित केले आहे.

सुंबरान मध्ये एकूण पाच गाणी आहेत. राहुल रानडे यांनी त्यांच्या कौशल्याने रॉक, जॅझ आणि लोकगीत अशा वेगळ्या संगीत प्रकारांची खुप सुंदर सांगड घातली आहे. 'सुंबरान....... सोनेरी दिवसांच्या सोनेरी आठवणी' हा चित्रपट १९ नोव्हेंबर २०१० रोजी प्रदर्शित होण्यास सज्ज आहे.